Next
‘महर्षी पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार’ किंजवडेकर यांना प्रदान
खडीवाले वैद्य संस्थेच्या ‘अण्णासाहेब पटवर्धन’ पुरस्कारांचे वितरण
BOI
Friday, January 11, 2019 | 06:25 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थे’मार्फत दिला जाणारा ‘महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार’ यंदा मुंबईचे वैद्य शंकर पांडुरंग किंजवडेकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारांतर्गत इतर १३ वैद्यांना विविध कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले. यंदाचे पुरस्काराचे हे ३४वे वर्ष आहे. 

नुकताच येथील धन्वंतरी हॉलमध्ये पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्य परशूराम यशवंत वैद्य-दादा खडीवाले यांनी १९८५मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली होती. यामध्ये महर्षी अण्णा पटवर्धन यांच्या नावे मोठा पुरस्कार दिला जातो, ज्याचे स्वरूप रोख रक्कम ३१ हजार एक रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह व शाल-श्रीफळ असे आहे. इतर तेरा पुरस्कार हे प्रत्येकी रुपये ११ हजार, स्मृतीचिन्ह व शाल-श्रीफळ या स्वरूपात दिले जातात. 

वैद्य शंकर किंजवडेकर यांना मुख्य पुरस्कार देण्यात आला, तर वैद्य उपेंद्र दिक्षीत (गोवा), वै. सौरभ छत्रे (मुंबई), वै. संभाजी पाटील (सोलापूर), वै. शिवाजी वाव्हळ (अहमदनगर), वै. अभय कुलकर्णी (नाशिक), वै. अमर द्विवेदी (मुंबई), वै. मेधा कुलकर्णी (पुणे), वै. उर्मिला पिटकर (मुंबई), वै. प्रभाताई गोडबोले (पुणे), वै. उदय तल्हार (जळगाव), वै. सोहन पाठक (औरंगाबाद) आणि वै. श्रीरंग यादव (कोल्हापूर) यांना इतर १३ पुरस्कार देण्यात आले. 

या वेळी धुतपापेश्वर कंपनीचे कार्यकारी संचालक रणजीत पुराणिक यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. ‘आदरणीय दादांकडून रुग्णहित हा शब्द मी शिकलो. हरी परशुराम औषधालयात तयार होणाऱ्या प्रत्येक औषधाकडे किती बारकाईने लक्ष दिले जाते, गुणवत्तेवर कसा भर दिला जातो हे मी पाहत आलो आहे’, या शब्दात पुराणिक यांनी संस्थेचे कौतुक केले. याव्यतिरिक्त अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कारप्राप्त वैद्यराज किंजवडेकर यांनी स्वस्थ वृत्तीचे महत्त्व पटवून दिले. तसेच ‘आहार-विहार, अभ्यंग व व्यायामाने शारीरिक व्याधींना दूर ठेवता येते’, असा संदेश तरुणांना दिला. 

याप्रसंगी पुरस्कार समिती अध्यक्ष वैद्यराज सरदेशमुख, संस्थेचे विश्वस्त रा. ह. भिडे, वैद्य विनायक वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, वैद्य विवेक साने, साठे आणि योगेश गोडबोले हेदेखील उपस्थित होते.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search