Next
मांडवा, रेवस बंदर, खांदेरी, उंदेरी...
BOI
Wednesday, July 10, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मांडवा बीच

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण अलिबागसह रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेकडील चौलपर्यंतचा निसर्गरम्य भाग पाहिला. आजच्या भागात पाहू अलिबागच्या उत्तरेकडील भाग...
..........
अलिबागच्या उत्तरेकडील भाग निसर्गरम्य तर आहेच; पण त्या भागात आधुनिक इमारतीही पाहायला मिळतात. उद्योगपती, चित्रपट तारका/ताऱ्यांचे बंगले या भागात आहेत. बौद्ध संस्कृतीचा वारसा सांगणारी गुंफा, मराठे आणि सिद्दी यांच्यातील लढायांची साक्षीदार असलेले जलदुर्ग, थळ वाशेतसारखी औद्योगिक ठिकाणे व प्रामुख्याने पर्यटकांनी सतत गजबजलेली किनारपट्टी असलेली ठिकाणे या भागामध्ये आहेत.

मांडवा बंदर : येथे नवीन जेट्टीचे काम पूर्ण होत आले असून, मोठ्या फेरी बोटी लवकरच नियमितपणे येऊ लागतील. सध्या छोट्या बोटीची वाहतूक चालू आहे. नवीन जेट्टी कार्यान्वित झाल्यावर मुंबईकर आपली गाडी बोटीवरून घेऊन मांडवामार्गे अलिबाग परिसरात येऊ शकतील. मुंबईकरांना जलमार्गाने जवळ असलेले हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. गेटवे ऑफ इंडियापासून १० नॉटिकल मैल अंतरावर असून, साधारण एक ते दीड तासाचा बोटीचा प्रवास करून आपण समुद्रप्रवासाचा आनंद घेत येथे पोहोचतो. आकाश स्वच्छ असले, तर गेट वे ऑफ इंडियाचा परिसर मांडवा बंदरावरून दिसू शकतो. मांडवा बंदर परिसर एकदम आधुनिक आहे. तसेच मुंबईकरांची मोठी वर्दळ येथे आहे. मांडवा समुद्रकिनारा अजून तरी प्रदूषणमुक्त आहे. त्याच्या सभोवतालच्या किनाऱ्याला नारळाच्या झाडांची हिरवी किनार आहे. मांडव्यापासून सुरू झालेल्या सागरकिनाऱ्यांच्या माळेत रेवदंड्यापर्यंत अनेक सागरकिनारे आहेत. मुंबईतही सागरकिनारे आहेत, चौपाट्या आहेत; पण तेथे गर्दी असते. मुंबईकर शांततेसाठी आणि निसर्गाच्या सान्निध्याला भुकेला असल्याने मांडव्याकडे वळतोच. मांडवा बीच त्याच्या नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेच आहेच; पण येथे उपलब्ध असलेल्या सागरी खेळांसाठीही प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या आकाराच्या बोटी (केळ्याच्या आकाराची बनाना बोट, पॅडलबोट, वॉटर स्कूटर असे अनेक प्रकार) येथे उपलब्ध आहेत. अनेक हॉटेल्स तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सिद्ध आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे निवासाची व्यवस्थाही आहे. आसपासच्या गावातून होम-स्टेची सुविधाही आहे. 

मांडवा - बनाना राइड

रेवस :
कोकण किनारपट्टीवरील सर्वांत जुने बंदर म्हणून याची ख्याती आहे. येथेही बीच असून, फारशी गर्दी नसते. बंदराभोवतालचा सारा भूप्रदेश नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. धक्क्यावर उभे राहिले असता समोर करंजा व उरणचा किनारा, उंच भागातील छोटे-छोटे बंगले, मच्छिमारांची गलबते, तसेच लाटांवर डुलणाऱ्या होड्यांचे मनमोहक दृश्य दिसते. हवामान स्वच्छ असल्यास मुंबईतील गगनचुंबी इमारतींचे दर्शनही येथून होते. हे बंदर अंबा नदीच्या मुखावर आहे. प्रवासी जलवाहतुकीकरिता १९१३मध्ये रेवस येथे बंदर उभारण्यात आले. या बंदरातून अद्यापही प्रवासी वाहतूक होते. भाऊच्या धक्क्यावरून कारंजा व रेवस बोट सेवा चालू आहे. मांडवा बंदरामुळे याचे महत्त्व कमी होत चालले आहे व याकडे दुर्लक्षही होत आहे. १०७ वर्षांपूर्वीचे हे बंदर अडगळीत पडल्यासारखे झाले आहे. रेवस बंदराच्या अनेक आठवणी आहेत. त्यापैकी महत्त्वाची म्हणजे रामदास बोटीला मिळालेली जलसमाधी. 

रेवस बीच१७ जुलै १९४७ रोजी मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यास निघालेली रामदास नावाची बोट मुंबई बंदरापासून अवघ्या १४ किलोमीटरवर असलेल्या ‘काश्या’च्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली. त्या बोटीवर कर्मचाऱ्यांसह ८५७ प्रवासी होते. त्यापैकी ६२५ बुडाले व २३२ पोहून किनाऱ्यावर लागले. या घटनेला येत्या १७ जुलै रोजी ७२ वर्षे होत आहेत. कोकण किनारपट्टीवरील ही सर्वांत मोठी दुर्घटना होती. 

सासवणे - करमरकर शिल्प संग्रहालयसासवणे - करमरकर शिल्प संग्रहालयसासवणे : शिल्पकलेचे मराठी सम्राट विनायक पांडुरंग करमरकर यांचे हे गाव. त्यांना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्पेशालिस्ट असे संबोधले जायचे. त्यांनी त्यांच्या राहत्या घरी एक छोटे संग्रहालय उभारले आहे. या छोटेखानी संग्रहालयात २००हून अधिक साचे आहेत. १९१०मध्ये जिल्ह्याचे कलेक्टर ओटो रोथंफिल्ड सासवणे येथे आले होते. तेथील रामाच्या देवळामध्ये करमरकरांनी काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र त्यांनी पाहिले. त्यांना ते खूप आवडले. हे चित्र कोणी काढले अशी चौकशी करून त्यांनी करमरकरांना बोलवून घेतले. ही त्यांच्या जीवनाला वळण देणारी घटना ठरली. त्यांच्यातील कलाकार त्यांनी ओळखला व त्यांना मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या शिल्पकलेची ख्याती सातासमुद्रापार नेली. त्यांच्या घरातील नोकरापासून ते गोठ्यातील प्राण्यांपर्यंत सर्वांची शिल्पे तेथे पाहायला मिळतात. हे छोटेखानी संग्रहालय पाहून खूप छान वाटते. आवर्जून पाहावे असे हे ठिकाण आहे. सासवणे येथे छोटा बीचही आहे. 

आवास बीचआवास बीच : अलिबाग-मांडवा रस्त्यावर झिराड येथून डावीकडे या सागरकिनारी जाता येते. अतिशय निसर्गरम्य असे हे ठिकाण आहे. मऊशार सोनेरी वाळू व शांत, सखल किनारा हे याचे वैशिष्ट्य. 

कनकेश्वर : हे या भागातील १२०० फूट उंच डोंगरावरील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते; मात्र देवळापर्यंत ७५० पायऱ्यांची चढण चढून जावे लागते. पायऱ्यांना मध्येच किंचित उतार दिला आहे. त्यामुळे चढताना त्रास होत नाही. डोंगर जंगलाने वेढलेला आहे. येथील निसर्ग सुंदर आहे. साधारण मध्यावर नागोबाचा टप्पा आहे. त्यानंतर देवाची पायरी येते. कष्ट घेऊन चढण चढल्यावर मात्र थकवा निघून जातो, इतके हे सुंदर ठिकाण आहे. हे देऊळ होयसळ पद्धतीचे वाटते. सन १७६४मध्ये याचे बांधकाम झाले आहे. मंदिराच्या शिखरावरील एक शिल्प पाहण्याजोगे आहे. शिखरावर चढणारा एक माणूस दाखवला आहे. त्याच्या पायात असलेला दगडी वाळा सुटा असून, गोल फिरतो. येथील पुष्करिणी पाहण्यासारखी आहे. वडोदरा येथील गोपाळराव मराळ यांच्याकडून गणेशाची मूर्ती आणून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 

कनकेश्वरकनकेश्वर पुष्करिणी‘आज्ञापत्र’ या प्रख्यात ग्रंथात शिवराजनीती सांगणारे रामचंद्रपंत अमात्य हे पुढे शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्षांत कोणाची बाजू घ्यायची यावरून द्विधा मन:स्थितीत सापडले. शेवटी त्यांनी संन्यास घेतला आणि ते या कनकेश्वरी येऊन राहिले होते, असे सांगितले जाते. हे ठिकाण अलिबागपासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर आहे. 

किहीम : अलिबाग-रेवस रस्त्यावरील चढी किहीम फाट्यापासून डावीकडे पश्चिमेला हा सुंदर सागरकिनारा आहे. छायाचित्रणासाठी हा किनारा महत्त्वपूर्ण समजला जातो. स्वच्छ नितळ अथांग सागर हे येथील वैशिष्ट्य. त्यामुळे साहजिकच येथे पर्यटकांची गर्दी असतेच; या समुद्रकिनारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटकांसाठी तंबूंची सोय करण्यात आली आहे. किहीम गावात अनेक ठिकाणी घरगुती राहण्याची, तसेच भोजनाची व्यवस्था होते. 

रामधरण बौद्ध गुंफारामधरण बौद्ध गुंफा : अलिबागच्या उत्तर-पूर्वेला ८०० फूट उंचीवर ही लेणी आहेत. कारली खिंडीकडून येथे जाता येते. येथे दक्षिण-पूर्वेस तोंड असणाऱ्या १२ गुंफांचा समूह आहे. याची फारशी माहिती उपलब्ध नसली, तरी त्या साधारण दोन हजार वर्षांपूर्वीच्या असाव्यात. 

रामधरणेश्वर मंदिर : रामधरण बंधाऱ्याच्या पूर्वेला डोंगरावर हे ठिकाण असून, निसर्गरम्य आहे. येथे पक्षी अभ्यारण्याही आहे. विविध जातींचे पक्षी येथे पाहण्यास मिळतात. 

खांदेरी (कान्होजी आंग्रे बेट) दीपगृह

खांदेरी (आता कान्होजी आंग्रे बेट) :
शिवाजी महाराजांचे सरदार मायनाक भंडारी यांनी हे बेट सन १६७९मध्ये ताब्यात घेतले. या बेटावर दोन उंच टेकड्या आहेत. जंजिऱ्याच्या सिद्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे तटबंदी करून घेण्यात आली. सन १८१८मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. येथे एक दिमाखदार दीपगृह ब्रिटिशांनी बांधले. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मरणार्थ आता या बेटाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. येथे नौदलाचा तळ आहे. त्यामुळे नौदलाच्या परवानगीने किल्ला पाहता येतो. आता हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यास नौदलाने मान्यता दिली आहे. 

उंदेरी (जयदुर्ग)

उंदेरी (जयदुर्ग) :
सन १६८०च्या जानेवारीमध्ये जंजिऱ्याच्या सिद्दीने हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली. हे कळताच छत्रपती संभाजी महाराजांनी तेथे हल्ला केला; पण तो यशस्वी झाला नाही. पुन्हा १६८०च्या ऑगस्ट महिन्यात महाराजांनी हल्ला केला. या वेळी मोठी लढाई होऊन मराठ्यांचा सरदार मायनाक भंडारी व त्याच्या मुलाला वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर १७६०मध्ये नारो त्र्यंबकाने हा किल्ला जिंकला व त्याला जयदुर्ग असे नाव दिले. १८१८मध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 

थळ वायशेत : थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. येथे सुफला व उज्ज्वला ही खते तयार होतात. 

खूबलढा किल्ला

खूबलढा किल्ला :
अलिबागजवळील थळच्या किनाऱ्यावर हा किल्ला आहे. उंदेरी व खांदेरी किल्ल्याच्या मदतीसाठी शिवाजी महाराजांनी १६५९मध्ये हा किल्ला बांधला. सन १७४९मध्ये इंग्रज आणि सिद्दीने हा किल्ला जिंकला; पण मानाजी आंग्रे यांनी तो किल्ला एकाच वर्षात परत जिंकला. 

नागाव बीच : अलिबागच्या दक्षिणेस असलेले हे ठिकाण मागील भागात राहून गेले. ते या भागात पाहू. अलिबागपासून सात किलोमीटरवर हा सुंदर सागरकिनारा आहे. सुरूच्या डौलदार वृक्षांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ, सुंदर, मऊशार रूपेरी वाळूच्या बीचवर सूर्यास्ताच्या वेळी खूप गर्दी होते. येथे पर्यटकांसाठी नाष्टा, जेवण, तसेच निवासाच्या भरपूर सोयी आहेत. 

सिद्धेश्वर मंदिर, खांडले : अलिबाग-पेण राज्य महामार्गावरून फक्त चार किलोमीटर अंतरावर खांडले गावाजवळ टेकड्यांच्या जवळ हे शिवमंदिर आहे. छोटी चढण पायीच चालून जावी लागते. श्रावण महिन्यात सोमवारी येथे दर्शनासाठी गर्दी होते. येथूनच जवळ सागरगड आहे. 

सागरगडसागरगड : शिवाजी महाराजांनी सागरकिनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ल्यांची शृंखला तयार केली होती. त्यासाठी काही किल्ले नव्याने बांधले, तर काही जुने किल्ले जिंकून ते बळकट केले. असा एक किल्ला म्हणजे अलिबागजवळील सागरगड उर्फ खेडदुर्ग होय. किल्ल्याचे नाव सागरगड असले, तरी समुद्रकिनाऱ्यापासून हा किल्ला पाच मैल दूर आहे. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. सागरगड बहामनी राजवटीत बांधला गेला होता. इ. स. १६६०मध्ये शिवाजी महाराजांचे सरदार दोरोजी यांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. पुरंदरच्या तहात इ. स. १६६५मध्ये शिवाजीराजांनी जे २३ किल्ले मुघलांना दिले, त्यात सागरगडही होता. आग्ऱ्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी तो परत ताब्यात घेतला. १८ ऑक्टोबर १६७९ रोजी खांदेरीच्या युद्धातील इंग्रज कप्तान फ्रान्सिस मौलीव्हेअरसह २५ इंग्रज कैद्यांना सागरगडावर बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. 

मुंबई-मांडवा फेरीबोट

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सागरगड सिद्दीने ताब्यात घेतला; पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी गुजर, आरमारप्रमुख सिधोजी यांनी १६९८मध्ये सिद्दीकडून किल्ला परत जिंकून घेतला. छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे ताराराणीच्या बाजूस होते; पण १७१३मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी मुत्सद्देगिरीने शाहू महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला. त्या वेळी कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात १६ किल्ले देण्यात आले. त्यांत सागरगडाचा समावेश होता. कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांची दोन मुले मानाजी व येसाजी यांच्यात वाद सुरू झाला. पोर्तुगीजांनी या वेळी मानाजीस साथ केली; मानाजीने येसाजीचा सागरगडावरून कडेलोट केला. पुढे संभाजी आंग्रे याने किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर येसाजी आंग्रेचा मुलगा जयसिंह आंग्रे याने मानाजी आंग्रेचाही कडेलोट केला. अशा तऱ्हेने भाऊबंदकीत हा किल्ला रक्ताने न्हाऊन निघाला. इ. स. १८१८मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व आल्हाददायक वातावरण यावर खूश होऊन जनरल फूलर व काही इंग्रज अधिकाऱ्यांनी येथे विश्रामगृहे बांधली होती. 

कसे जाल अलिबागला?
जवळचे रेल्वे स्टेशन - वडखळ व पेण ३० किलोमीटर. जवळचा विमानतळ - मुंबई १०० किलोमीटर. जवळचे बंदर - मांडवा २० किलोमीटर. अलिबाग येथे साधी, तसेच पंचतारांकित हॉटेल्सही उपलब्ध आहेत. वर्षभर कधीही या भागात जाता येते. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जयश्री चारेकर About 102 Days ago
अतिशय छान माहिती. सर्व परत अनुभवायला मिळाले वाचताना🙏🏼
1
0

Select Language
Share Link
 
Search