Next
डॉर्नियर विमानाचे रत्नागिरीत यशस्वी लँडिंग
रत्नागिरीची धावपट्टी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज
BOI
Friday, August 10, 2018 | 03:50 PM
15 1 0
Share this article:

रत्नागिरी विमानतळावर प्रथम यशस्वी लॅंडिंग केल्यानंतर महानिरीक्षक विजय चाफेकर यांचे स्वागत करताना कमांडंट एस. आर. पाटील, कमांडंट ए. सी. दांडेकर व इतर अधिकारी

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरी विमानतळावर प्रथम यशस्वी लँडिंग करीत तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक विजय चाफेकर यांचे नऊ ऑगस्ट २०१८ रोजी डॉर्नियर विमानाने आगमन झाले. तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रत्नागिरी दौरा आहे.

सन २०१५पासून धावपट्टीच्या नूतनीकरणासाठी विमानतळावरून विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. यादरम्यान केवळ अत्यावश्यक वेळी हेलिकॉप्टर उड्डाणे चालू होती. हे काम पूर्ण झाले असून, त्यावर चाचणी उड्डाणे हाती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या सागरी गस्तीसाठी तटरक्षक दलाची विमाने व हेलिकॉप्टर रत्नागिरी विमानतळ येथून नियमित भरारी घेतील. आजचे उड्डाण हे प्रथम चाचणी उड्डाण असल्यामुळे यास महत्त्व प्राप्त आहे.

धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्याची पाहणी करण्यासाठी व रत्नागिरी येथे स्वतंत्र तटरक्षक वायू अवस्थान कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर महानिरीक्षक चाफेकर यांनी विमानतळ येथे कार्यरत त्यांच्या भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी या कार्यालयास भेट दिली.

रत्नागिरी कार्यालयाने हाती घेतलेल्या सागरी सुरक्षा उपाय योजना, सागरी शोध व बचाव मोहिमा, समुदाय संवाद कार्यक्रम, प्रशिक्षण उपक्रम, प्रशासकीय इमारत, रहिवाशी सदनिका, भगवती येथे उभारले जाणारे जहाज दुरुस्ती केंद्र व जेट्टी, भाटे येथे उभारले जाणारे होवरपोर्ट, प्रस्तावित विमान हँगर, धावपट्टी विद्युतीकरण आदी सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण केल्या जाणाऱ्या पायाभूत विकासकामे यांबद्दल कमांडंट एस. आर. पाटील यांनी चाफेकर यांना सविस्तर माहिती दिली; तसेच त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन विमानतळाच्या आणि नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाचा आढावा घेतला. झाडगाव, भगवती बंदर व भाट्ये किनारा येथील तटरक्षक दलाच्या भूखंडांवर जाऊन त्यांना आगामी काळात सुरू होणार्‍या प्रकल्पाचीही माहिती देण्यात आली.

लक्षद्वीपसहित दमण ते कन्याकुमारीपर्यंतचे कार्यक्षेत्र असणार्‍या संपूर्ण देशाच्या तटरक्षक पश्चिम क्षेत्राचे प्रमुख कमांडर म्हणून १० एप्रिल २०१८ रोजी चाफेकर यांनी मुंबई येथील वरळी स्थित मुख्यालयात पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांना तटरक्षक दलातील सेवेसाठी दिली जाणारी राष्ट्रपती पदक व तटरक्षक पदक यांनी सन्मानित केलेले आहे. ते एक निष्णात वैमानिक असून, त्यांनी शीघ्रगती गस्ती नौका, ऑफशोअर शीघ्रगती गस्ती नौका, प्रगत ऑफशोअर शीघ्रगती गस्ती नौका यांवर यशस्वीरीत्या नेतृत्व केले आहे; तसेच चेन्नई व कोची येथील तटरक्षक जिल्हा मुख्यालयांचे आणि नाविक ब्युरोचे प्रमुख म्हणूनदेखील त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. त्यांनी अमेरिकेतील न्यू पोर्ट येथील नेव्हल स्टाफ कॉलेजमधून विशेष प्रावीण्यासाह ग्रॅज्युएशन आणि नौदल उच्च शिक्षण  कोर्स पूर्ण केलेले आहेत. सागरी कायद्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि संरक्षण व धोरणात्मक अभ्यास यांत त्यांनी एम. फिल. केले आहे.  

नऊ ऑगस्टला दुपारी १२ वाजता त्यांनी येथील तटरक्षक दलाच्या सर्व कर्मचार्‍यांशी संवाद साधला. रत्नागिरी येथे सुरू विकास कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि रत्नागिरी हे लवकरच तटरक्षक दलाचे एक आद्ययावत व प्रमुख तळ बनविण्यासाठी आवश्यक सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या हेतूने प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी येथे कार्यरत असताना दलातील सैनिकांना भेडसावणार्‍या समस्यांबद्दल त्यांनी जाणून घेतल्या.

तटरक्षक दलाच्या रहिवासी सदनिका व सेना दलातील जवानांना दिल्या जाणार्‍या सर्व सोयीसुविधा रत्नागिरी येथे लवकरात लवकर उभारण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. दुपारी पावणेदोन वाजता त्यांच्या विमानाने मुंबईसाठी यशस्वी उड्डाण केले. या वेळी वायू अवस्थानाचे कमान अधिकारी कमांडंट ए. सी. दांडेकर, कमांडंट आचार्युलु, तांत्रिक अधिकारी उप समादेशक सुनील चौहान, चिकित्सा अधिकारी प्रशांत, उप समादेशक अभिषेक करुणाकर आदी उपस्थित होते.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search