Next
दक्षिणेतील राजधानी - जिंजी
BOI
Wednesday, May 30, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

जिंजी किल्ला
तमिळनाडूमधील जिंजी हे ठिकाण म्हणजे मराठी साम्राज्याची तिसरी राजधानी. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या जिंजी आणि आजूबाजूच्या पर्यटनस्थळांची...
............
जिंजी हे ठिकाण तमिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यामध्ये आहे. तमीळ भाषेमध्ये त्याचा उच्चार जिंजी असा न करता चेंजी किंवा सेंजी असा केला जातो. चोल राजांनी पुदुच्चेरीजवळ जिंजी येथे इ. स. ९००मध्ये हा किल्ला बांधला. काही इतिहासकारांच्या मते या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात कोनार समाजाच्या आनंद कोन याने केली. यामध्ये कृष्णगिरी, चंदरायदुर्ग व राजगिरी अशा तीन दुर्गांचा समावेश होतो. यांतील राजगिरी सर्वांत उंच (सुमारे १८३ मीटर) असून, त्याच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तट असून, वर जाण्याची वाट मजबूत, पण अरुंद आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष आहेत.

विजयनगरच्या राजांनी हा किल्ला अधिक भक्कम केला. या गडाची तटबंदी ११ किलोमीटर लांबीची आहे. इंग्रज याला ‘ट्रॉय ऑफ इस्ट’ असे म्हणत. पदभ्रमण करणाऱ्यांची पावले या किल्ल्याकडे हमखास वळतात. शिवाजी महाराजांनी १६७७मध्ये हा किल्ला ताब्यात घेतला. त्याची डागडुगजी करून तो अधिक भक्कम करून शिवाजीराजांनी तेथे आपली दक्षिणेतील राजधानी उभारली. त्याबाबत इंग्रजांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. संभाजींच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी येथूनच राज्यकारभार सुरू केला.

शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेताना आपल्या दूरदृष्टीचे उदाहरण ठेवले आहे. जिंजी येथे जाण्यासाठी गोवळकोंड्याच्या सुलतानांकडून रस्ता मिळविला. गोवळकोंड्याच्या सुलतानाचा कारभारी मादण्णा याने शिवाजी महाराज व सुलतान यांच्यात दिलजमाई घडवून आणली व दक्षिणेचा मार्ग सुकर करून दिला. या मोहिमेत कोणत्याही प्रकारचे युद्ध टाळण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. ही १६७७च्या मे महिन्यातीलच घटना आहे. यंदा त्या घटनेला ३३१ वर्षं होत आहेत. त्या वेळी या भागात येऊन गेलेला व्हेनिस येथील पर्यटक निकोलाय मनुची याने शिवाजी महाराज यांच्या कार्यशैलीचे वर्णन केले आहे.  

एका जेसुइट धर्मगुरूच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराज सुमारे १० हजार मावळ्यांसह अचानक जिंजीसमोर येऊन उभे ठाकले. अचानक आलेल्या आक्रमणाने आदिलशहाचा किल्लेदार नासीर मोहम्मद गडबडून गेला. महाराजांना किल्ला सहज ताब्यात आला तर हवाच होता. म्हणून महाराजांनी रघुनाथपंतांना नासिरकडे पाठविले. किल्ला तर ताब्यात घेतला गेलाच; पण महाराजांनी नासिरलाही आपल्याकडे वळवून घेतले.

 ‘साल्हेरी अहिवन्तापासून ते चंदी कावेरी तीरापर्यंत निश्कंठक राज्य. शतावधी दुर्ग, चाळीस हजार पागा, दोन लक्ष पदाती..ऐसी केवळ सृष्टीच निर्माण केली..’... या ओळी रामचंद्र अमात्यांच्या ‘शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र’ या ग्रंथातील असून, मराठी साम्राज्य कुठवर पोहोचले होते, हेच त्यातून कळते. वर उल्लेखलेला चंदी नावाचा किल्ला म्हणजे दक्षिणेतील जिंजीचा किल्ला होय.

राजाराम महाराज जिंजीला पोहोचल्यावर औरंगजेबाने पाठलाग सुरू केला. झुल्फिकारखानाला मोहिमेवर पाठविले. १६९०मध्ये त्याने किल्ल्याला वेढा घातला व १६९७-९८मध्ये किल्ला त्याच्या ताब्यात गेला. सात वर्षे मावळ्यांनी, रामचंद्र पंडित, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी प्रभृतींनी राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांशी चिवट झुंज दिली. मुघलांनी सात वर्षे वेढा देऊनही त्यांना तो सर करता आला नाही. नंतर १६९८मध्ये हा किल्ला जिंकण्यात औरंगजेबाला यश आले खरे; पण तोवर राजाराम महाराज निसटले होते. नंतर तो किल्ला अर्काटच्या नवाबांकडे आला. काही काळ तेथे हैदर अलीचेच राज्य होते. नंतरच्या काळात १७००मध्ये डुप्लेच्या नेतृत्वाखाली तो किल्ला फ्रेंचांनी घेतला. १७६१मध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पराभव करून हा किल्ला ताब्यात घेतला.

जिंजी किल्ला उत्तरेस कृष्णगिरी, पश्चिमेस राजगिरी आणि दक्षिणेस चंद्रगिरी अशी तीन दुर्गांनी बनला आहे. दिंडीवनमला जाणारा हमरस्ता या तिन्ही किल्ल्यांच्या मधूनच काढण्यात आला आहे. येथे व्यंकटरमणस्वामींचे सुंदर देवालय आहे. पूर्वी येथे मूर्ती नव्हती; पण अलीकडेच नरसिंहमूर्तीची स्थापना तेथे झाली आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर समुद्रमंथनाचे सुरेख शिल्प आहे. या मंदिराचे सुरेख खांब पोर्तुगीजांनी पळवले, असे सांगितले जाते.

राजगिरीराजगिरी : किल्ल्याचे मूळ बांधकाम कोनार राजवटीतील आनंद कोन याने १२०० साली केले. येथे घुमटाकार छते असलेली दोन कोठारे, दारूखाना, ध्वजाची जागा, रंगनाथाचे (कृष्णाचे) देऊळ, सेजी मातेचे मंदिर ही ठिकाणे अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत. सात मजली कल्याण महालासारखी (लग्नमंडप) उंच इमारत अजूनही दिमाखाने उभी आहे. त्या काळी गडावरील पाण्याची व्यवस्था केलेली होती. किल्ल्यावर साठवायच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, याची काळजीही त्या वेळच्या लोकांनी घेतली होती. तिथेही तळी, जुनी कोठारं होती. वेगळी होती ती कल्याण महाल (लग्नमंडप) ही इमारत. या किल्ल्यावर इमारतीचे पिरॅमिडसारखे छप्पर आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी सरकता लाकडी पूल आहे. विहिरीत पूर्वी युद्धप्रसंगी जखमांवर लावण्याकरिता तेल आणि तूप साठवले जाई. किल्ल्याच्या परिसरात मोठ्या शिळा पाहायला मिळतात.

कृष्णगिरीकृष्णगिरी (राणीचा किल्ला) : सर्व तिन्ही किल्ल्यांचा मार्गदर्शक फलक कृष्णगिरीच्या पायथ्याशी लावलेला आहे. पायऱ्या चढूनच किल्ल्यावर जावे लागते. कृष्णगिरीवर धान्याची कोठारे आहेत. त्याला लागून तेल साठवणीची एक विहीर आहे. दरबाराचे भग्न अवशेष येथे दिसतात. श्रीकृष्णाचे मंदिरही तेथे आहे. या गडाच्या बळकटीचे काम कृष्ण कोन या नंतरच्या राजाने १२४०मध्ये केले.

चंदरायदुर्ग (चांद्रायण) : चांद्रायण दुर्ग राजगिरीला खेटून आहे. राजगिरी चढताना त्यावरील वास्तू स्पष्ट दिसतात; पण हा किल्ला वनखात्याच्या अखत्यारीत असल्याने त्यावर प्रवेशबंदी आहे. त्यामुळे हा किल्ला आपल्याला पाहता येत नाही. या किल्ल्यावर स्थानिक तांत्रिक पंथाच्या लोकांचे देऊळ असल्याचे समजते.

जिंजीच्या आसपास : थिरुकोवल्लूर, थिरुवक्कराई ही धार्मिक स्थळेही विल्लुपुरम जिल्ह्यात आहेत.

वृंजीपुरम : येथील पालार नदीच्या काठावरील शिवमंदिर हे एक आकर्षण आहे. येथील पाषाणात कोरलेली शिल्पे सामाजिक जीवनाची ओळख करून देणारी आहेत.

मेल सिथामूर : जिंजीच्या पूर्वेला १० किलोमीटर अंतरावर हे दिगंबर जैन तीर्थक्षेत्र आहे. येथे दाक्षिणात्य गौर शैलीतील पार्श्वनाथाची दोन मंदिरे आहेत.

मरक्कानम : हे ठिकाण जिंजीपासून १७ मिलोमीटर अंतरावर आहे. पल्लवकालीन (इ. स. ५८० ते ६३०) राजा महेंद्रवर्मा याने एका छोट्या टेकडीवर गुंफा मंदिर उभारलेले आहे. सध्या हे मंदिर पुरातत्त्व विभागाकडे आहे.

कंदाचीपुरम : स्थानिक लोकांच्या मते येथील शिवमंदिरात शिवाची स्थापना प्रभू रामचंद्रांनी केली आहे.

कालरायन पर्वत : पूर्व घाटातील साधारणतः दोन ते तीन हजार फूट उंचीचे हे हिल स्टेशन आहे. कल्लाकुरुंची तालुक्यात जिंजीपासून पश्चिमेकडे अंदाजे ८० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

ओरोविल : (उषानगरी अथवा नवजीवनाची नगरी) तमिळनाडूत हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर गुरू अरविंद संस्थेमार्फत विकसित करण्यात आले आहे. ‘मां’ मीरा अल्फासा (‘मां’ मीरा रिचर्ड) यांच्या प्रेरणेतून हे शहर वसविण्यात आले आहे. माताजी योगीराज अरविंदांच्या बरोबर साधना करत असत. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १८७८ रोजी पॅरिसमध्ये झाला. १७ नोव्हेंबर १९७३ रोजी पुदुच्चेरी येथे त्यांचे निधन झाले. २८ फेब्रुवारी १९८८ रोजी याचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच १२४ देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. विश्वनगरीची कल्पना ठेवून सर्व जगातील जाती-धर्मांच्या लोकांनी सहजीवन जगावे व शांतीचा संदेश सर्वत्र जावा म्हणून या ठिकाणाची स्थापना करण्यात आली. जिंजीपासून हे ठिकाण पूर्वेस साधारण ७० किलोमीटरवर पुदुच्चेरीजवळ आहे.

ओरोविलजिंजी आणि वर उल्लेखलेली ठिकाणे विल्लुपुरम जिल्ह्यात असून, चेन्नई-विल्लुपुरम अंतर १७० किलोमीटर आहे. जिंजी येथे राहण्याची-जेवणाची चांगली व्यवस्था होऊ शकते. किल्ल्यावर मात्र खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था नाही. जवळचा विमानतळ चेन्नईला आहे. दिंडीवनम हे जवळचे रेल्वे स्टेशन ३० किलोमीटरवर आहे. येथे जाण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा चांगला काळ. साधारण नोव्हेंबरमध्ये येथे परतीचा पाऊस असतो. जिंजीबरोबरच तंजावर, पुदुच्चेरी, त्रिचनापल्ली, वेलोरे, तिरुपती, कांचीपुरम, चेन्नई ही ठिकाणे पाहता येतील.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

ओरोविल

( दक्षिणेतील राजधानी - जिंजी तसेच काही आसपासच्या ठिकाणांची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh Atre About
छान व ऐतिहासिक माहिती!
1
0
Milind Lad About
Fabulous writing...
0
0
सौ आरती चंद्रकांत लांजवळ About
बाइट्स आॕफ इंडीयामुळे भारतातील सर्वसामान्य जनतेला अनभिज्ञ असणारी ठिकाणे पहाण्याचा आगळाच आनंद उपभोगता येतो.चला पुढची सहल जिंजी.
0
0

Select Language
Share Link
 
Search