Next
चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम्...
BOI
Saturday, July 14, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


मानसिक किंवा भावनिक अस्वस्थता दूर करण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न करणारे आपणच आहोत. या नैराश्यापासून आपणच स्वत:ला दूर ठेवू शकतो. त्यासाठी आपल्याला स्वत:च्या क्षमता, मर्यादा, वास्तव या साऱ्याची उत्तम जाण हवी... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या स्वतःला सकारात्मक कसं ठेवायचं, याबद्दल...
...................
भावना! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक अविभाज्य घटक आणि या भावना निर्माण करणारा शरीरातील एक काल्पनिक अवयव म्हणजे मन. आपण जर खरंच नीट, बारकाईने विचार केला, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, की आपण जसा विचार करतो, तशा भावना आपल्या मनात निर्माण होतात.  

मनुष्याचं आयुष्यच मुळी विचार-भावना-वर्तन या साखळीतून फिरत असतं. हे विचार जर चांगले असतील, तर भावनाही चांगली आणि अर्थातच वर्तनही चांगलेच; पण एखादा वाईट अनुभव आला आणि त्यामुळे आपल्या मनात वाईट विचार आले, तर भावना नक्कीच नकारात्मक होऊ शकतात आणि मग वर्तनातूनही तेच दिसतं. आपण आजवर या लेखमालिकेतून बघितलेल्या केसेसमध्ये या साऱ्यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. समोरून आलेली प्रतिक्रिया नकारात्मक आली, की विचार-भावना-वर्तन सगळंच नकारात्मक होऊन जातं. सत्य, वास्तव याचाशी त्यांचं नातंच तुटतं आणि मग नैराश्याच्या  भावनेने त्यांचं आयुष्य झाकोळून जातं. 

असं घडायला नको असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, की मानसिक किंवा भावनिक अस्वस्थता दूर करण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न करणारे आपणच आहोत. या नैराश्यापासून आपणच स्वत:ला दूर ठेवू शकतो. त्यासाठी आपल्याला स्वत:च्या क्षमता, मर्यादा, वास्तव या सगळ्यांची उत्तम जाण हवी. ही जाण चांगली असेल, तर समोरून कितीही नकारात्मक प्रतिसाद येवो किंवा अपयश अनुभवायला येवो, आपण कधीच डगमगणार नाही, खचणार नाही. उलट त्या परिस्थितीचा सामना करण्याचं बळ ते विचारच आपल्याला देतात. कारण स्वत:च्या क्षमतांची जाण असली, की आत्मविश्वास आपोआपच वाढतो.

सध्याच्या या स्पर्धेच्या युगात आपण नेमकं स्वत:ला वेळ देण्यात आणि ओळखण्यातच कमी पडतो. क्षमता, वास्तव यांकडे दुर्लक्ष करून यशाच्या मागे धावत सुटतो आणि अपयश आलं, की मग अस्वस्थ होतो, निराश होतो, पण यातून होणारं नुकसान केवळ आपलंच असतं. जर भावनांवर नियंत्रण मिळवता नाही आलं, तर प्रसंगी व्यक्ती आपला आत्मविश्वास, क्षमता, मानसिक स्थैर्य कायमचं गमावून बसते आणि अनुभवते निराशा आणि फक्त निराशा. 

त्यामुळे जर तुम्हाला या भावनिक, मानसिक अस्वस्थतेपासून दूर राहायचं असेल, तर पहिला उपाय म्हणजे स्वत:शी बोलायला शिका. दिवसातील किमान रोज १० मिनिटं तरी स्वत:साठी राखून ठेवा. या १० मिनिटांत स्वत:ला सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह सूचना द्या. स्वत:चा आत्मविश्वास वाढेल, अशी वाक्यं स्वत:शीच बोला. एखादं छोटसं का होईना, पण चांगलं काम केलंत, तर स्वत:लाच कौतुकाची थाप द्या. आपलं काही चुकलं का, ते तपासून पाहा आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे समोरून येणारी नकारात्मक प्रतिक्रिया वास्तवाला, स्वत:च्या क्षमतांना लागू होणारी आहे का, ती कोणी आणि कोणत्या भावनेतून दिली आहे, ते तपासा. यामुळे याचा तुमच्या भविष्यावर होणारा वाईट परिणाम कमी करता येईल. ज्यामुळे तुम्हाला वारंवार निराशा अनुभवावी लागणार नाही. तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर आणि आनंदी राहाल आणि तुमचे विचार, तुमच्या भावना आणि वर्तन सकारात्मक राहील. तुमच्या विचार-भावनांवर जर तुम्ही चांगले नियंत्रण मिळवू शकलात, तर तुम्ही निश्चित यशस्वी होऊ शकाल. समोर येणाऱ्या अनेक आव्हानांना तुम्ही समर्थपणे पेलू शकाल. 

स्वत:ला ओळखणं कठीण जात असेल किंवा स्वत:च्या विचार-भावनांवर नियंत्रण मिळवणं अवघड वाटत असेल, तर समुपदेशकाची मदत जरूर घ्या. ते तुम्हाला इतरही अनेक उपाय सुचवू शकतात. काही औषधे देऊ शकतात. कारण आजच्या या स्पर्धेच्या काळात तुमच्या आयुष्यातला भावना हा अविभाज्य घटक आरोग्यदायी राहणं अनिवार्य आहे.

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search