Next
शब्दांची बजबजपुरी नको... अर्थाची नगरी पाहिजे!
BOI
Monday, August 19, 2019 | 12:00 AM
15 0 0
Share this article:

‘क्वीन्स इंग्लिश’ हा समस्त ब्रिटनवासीयांचा अभिमान, त्यांची अस्मिता! मात्र मुख्यतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, संवादाच्या बदललेल्या पद्धतींमुळे आणि तरुणांच्या नव्या जीवनशैलीमुळे या भाषेचा एक-एक चिरा कोसळताना इंग्रजांना पाहावा लागत आहे. असेच चालू राहिले आणि आपण काही हालचाल केली नाही, तर एक दिवस ही भाषा नष्ट होईल. हा विचार करून ‘प्लेन इंग्लिश’ नावाची एक चळवळ तेथे राबवली जात आहे. 
.............
सध्याचा जमाना हा मानवजातीसमोर उभ्या टाकलेल्या संकटांचा आहे. हवामान संकट, आर्थिक मंदी, सायबर सुरक्षा अशा अनेक समस्यांनी ठाण मांडले आहे. या समस्यांच्या यादीत एक आणखी आणि फार महत्त्वाची भर, म्हणजे भाषेची समस्या! एकीकडे आधुनिकतेच्या रेट्यात आपल्या देशी भाषा टिकतील का नाही, याची शंका आपल्याला भेडसावते. दुसरीकडे ज्या भाषेमुळे ही भीती आपल्याला ग्रासत आहे ती भाषाही त्याच भयगंडात वावरते आहे. येत्या काळात आपली भाषा टिकेल की नाही, ही शंका इंग्रजीभाषकांना सतावत आहे. टिकली तरी ती ‘माय इंग्रजी’ (मायमराठीच्या चालीवर!) असेल की नाही, ही चिंता त्यांना भेडसावत आहे. त्याचे कारण म्हणजे नुसती शब्दांची माजलेली बजबजपुरी आणि संकेतांना दिलेला फाटा!

भाषा ही मानवी इतिहासाच्या प्रारंभापासून माणसाला साथ करत आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आपण तिच्यावर अवलंबून आहोत. किंबहुना मानवी सभ्यतेचा पाया भाषा हाच आहे. आपले विचार शब्दांच्या माध्यमातूनच आपण मांडतो. महत्त्वाची माहिती देण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरतो; मात्र आपल्या भावनेला आणखी उठाव आणण्यासाठी शब्दांसोबत आणखी काही संकेत लागतात. आज ते संकेतच संकटात आहेत - भारतातील वेगवेगळ्या राज्यांपासून ब्रिटनच्या माजी साम्राज्यापर्यंत!

राणीची इंग्रजी किंवा क्वीन्स इंग्लिश हा समस्त ब्रिटनवासीयांचा अभिमान, त्यांची अस्मिता! मात्र मुख्यतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, संवादाच्या बदललेल्या पद्धतींमुळे आणि तरुणांच्या नव्या जीवनशैलीमुळे या भाषेचा एक-एक चिरा कोसळताना इंग्रजांना पाहावा लागत आहे. असेच चालू राहिले आणि आपण काही हालचाल केली नाही, तर एक दिवस ही भाषा नष्ट होईल. त्यासाठी काही काळ लागेल; मात्र काही वर्षे किंवा दशकांनी का होईना हे घडणारच, याबाबत अनेक तज्ज्ञांनी छातीठोकपणे अंदाज वर्तवले आहेत.

त्यामुळेच आपल्या भाषेच्या जपणुकीसाठी लोकही पुढे आले आहेत. ‘प्लेन इंग्लिश’ नावाची एक मोहीम हा त्याच चळवळीचा भाग! ही संस्था १९७९पासून सोपी इंग्रजी भाषा वापरण्यासाठी मोहीम चालवत आहे. संस्थेच्या संस्थापिका क्रॅसी मेहर यांनी लंडनमधील संसदेच्या चौकात (पार्लमेंट स्क्वेअर) सरकारी कागदपत्रे जाहीररीत्या जाळून या चळवळीची सुरुवात केली होती. शेकडो सरकारी कागदपत्रांचे त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तुकडे केले होते. तेव्हापासून या संस्थेने अनेक सरकारी विभागांना आणि इतर सार्वजनिक संस्थांना आपली कागदपत्रे, अहवाल आणि प्रकाशने तयार करण्यास मदत केली आहे. प्रत्येकाला स्पष्ट आणि संक्षिप्त माहिती मिळायला हवी, हा त्यांचा कटाक्ष आहे. सरकारी जडजंबाळ भाषेशी (जार्गन) लढत देणाऱ्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांना आता खुपते आहे ती लोकांच्या भाषा वापरातील अनास्था.

‘प्रौढ लोकही किशोरवयीन भाषणाची नक्कल करत आहेत. ते अपशब्द वापरत आहेत आणि व्याकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांची भाषा खालावत चालली आहे. ते भाषेचा दर्जा कमी करत आहेत, हे चिंताजनक वळण आहे,’ असे या मोहिमेच्या मेरी क्लेअर यांनी ‘डेली मेल’ वृत्तपत्राला सांगितले.

‘क्वीन्स इंग्रजी सोसायटी’ ही ब्रिटिश संस्थाही अशीच भाषेच्या या घसरगुंडीला अटकाव करण्यासाठी संघर्ष करीत आहे. कोणतीही भाषा नेहमी एकाच स्वरूपात जतन करता येऊ शकत नाही. तिच्यात बदल होणे अपरिहार्य आहे, हे या संस्थेलाही माहीत आहे; मात्र भाषेला जे वळण मिळत आहे त्यामुळे संवादाचा प्रभाव कमी होईल, अशी काळजी त्यांना आहे. 
जॉन हम्फ्रीज या आणखी एका ब्रिटिश पत्रकाराने ‘भाषिक स्थूलता’ (लँग्वेज ओबेसिटी) असे या प्रकाराचे वर्णन केले आहे. ‘ज्याप्रमाणे निकृष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने शरीराला लठ्ठपणा येतो आणि मांद्य वाढत जाते, त्याप्रमाणे निकृष्ट (जंक) शब्दांचा आहार घेतल्याचा हा परिणाम होय,’ असे ते म्हणतात.

भाषा वापरण्यातील आळशीपणा आणि ढोबळपणा यांच्यामुळे भाषा गुळगुळीत बनत जाते. आपल्याकडे याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. मराठी लिखाणात वाक्प्रचार आणि म्हणी वापरण्याचे प्रमाण कमी होत जात आहे, ही सहज लक्षात येणारी गोष्ट आहे. केवळ शब्द म्हणजे भाषा नव्हे. वाक्प्रचार, म्हणी, संकेत अशा अनेक गोष्टी या भाषेत येत असतात. त्यांच्या वापरामुळे भाषेला निव्वळ फुलोरा येत नाही, तर शब्दांना अनेक छटाही प्राप्त होतात. उदाहरणार्थ, धूळ चारणे हा केवळ दोन शब्दांचा गट नाही. त्यात एक इतिहास आहे. मराठा साम्राज्याचे सेनापती रणांगणावर झुंजत असत आणि शत्रूला लोळवत असत, तो सर्व इतिहास या दोन शब्दांत सामावला आहे. त्यामुळे एखाद्याला धूळ चारणे यात आपल्या पराक्रमाचे सार्थ वर्णन केलेले असते. तोच प्रकार कंठस्नान घालणे, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे किंवा विडा उचलणे अशा वाक्प्रचारांच्या बाबतीत आहे.

श्रीगणेशा करणे म्हणजे आरंभ करणे हा झाला वाच्यार्थ; मात्र छोट्या विद्यार्थ्याने हातात पाटी घेऊन श्री गणेश लिहून आपला विद्याभ्यास सुरू करणे असा एक सांस्कृतिक इतिहास त्यात दडलेला आहे. त्याच्या शालेय शिक्षणाला आणि अक्षर ओळखीला सुरुवात झाली, हे एवढे वाक्य या दोन शब्दांत आले आहे.

‘झारीतील शुक्राचार्य’ हा वाक्प्रचार तुम्ही शेवटचा कधी वाचला होतात? बळीराजाने बटू वामनाला तीन पावले भूमी देण्याचे वचन दिले होते. वामनरूपी विष्णूंनी त्याला संकल्प सोडायला सांगितले. त्यासाठी झारीतून पाणी सोडताना त्यातून पाणीच येईना. तेथे उपस्थित असलेल्या दैत्यांचे गुरू शुक्राचार्यांनी विष्णूला ओळखले. त्यांनी बळीराजाला ‘संकल्प सोडू नको,’ असे सांगितले; पण त्याने त्यांचे ऐकले नाही. म्हणून त्याचा संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून शुक्राचार्य सूक्ष्मरूप घेऊन झारीच्या तोंडाशी जाऊन बसले. तेव्हापासून चांगल्या कामात ऐन वेळी अडथळा आणणाऱ्या माणसाला ‘झारीतला शुक्राचार्य’ असे म्हणतात. आता यात झारी, संकल्प सोडणे आणि दानवृत्ती अशा तीन सांस्कृतिक गोष्टी एका वाक्प्रचारात समाविष्ट झाल्या आहेत. शिवाय चांगल्या कामात खोडा घालणे असा अर्थही त्याला लाभला आहे. भले मोठे उलगडून सांगण्याऐवजी दोन शब्दांत तो अर्थ पोहोचवला आहे.

क्रॅसी मेहर यांनी जी सरकारी कागदपत्रे जाळली त्या कागदपत्रांमध्ये नेमका यालाच फाटा दिला जातो. याचा अनुभव घेण्यासाठी कोणताही सरकारी दस्तऐवज वाचून पाहा. त्यात निव्वळ शब्दांची मांडणी असते, भाषिक सौंदर्याला वाव देणारे वाक्प्रचार, म्हणी किंवा काव्योक्ती यांचे जणू त्यांना वावडेच असते. सरकारी भाषेची जी टवाळी केली जाते ती यासाठीच. लोकांमध्ये भाषेबद्दल अनास्था निर्माण करण्याचे काम ही कागदपत्रे चोख बजावतात – मग ती मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्रजी असो. म्हणूनच भाषा जगवायची झाली तर शब्दांची बजबजपुरी नको, अर्थाची नगरीही पाहिजे! 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Makarand Deshpande About 33 Days ago
सरकारी मराठी लेखन व आपले बोलणे सुधारण्यासाठी अशाच चळवळीची गरज आहे.
0
0

Select Language
Share Link
 
Search