Next
भक्तीची श्रीमंती जवळून पाहिली...
BOI
Saturday, March 03 | 06:13 PM
15 0 0
Share this story

पिस्सू टॉप

तो अधू माणूस हातात कमंडलू घेऊन कुबडीच्या साहाय्याने चालत होता. ज्या पिस्सू टॉपने माझी शक्ती, शरीर पिळून घामरूपी रस बाहेर काढला होता. एक एक पाऊल टाकताना स्वर्ग आठवत होता, तिथे समोरील तो माणूस एका पायाच्या साहाय्याने इतक्या उंचावरील ठिकाणी चालत होता. माझा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो माणूस कोणाशीही काहीही न बोलता एकटा शांतपणे एका लयीत चालत होता.... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा अठरावा भाग.. 
.............................
‘तेरी जुस्तजू… सावरे सावरे.’ माझं आवडतं गाणं कानात सुरू होतं. पण माझी अवस्था बिकट होती. कानात काही वाजत असताना मुळातच लक्ष केंद्रित करणं कठीण होत असतं. म्हणूनच रस्ता ओलांडताना किंवा गाडी चालवताना फोनवर बोलायचं नसतं, गाणी ऐकायची नसतात. मनातल्या मनात मी सावरे.. सावरे.. म्हणत होतो. पाठीवरची बॅग काढून टाकली. हातातली काठी टाकून दिली आणि मग वर चढण्यासाठी मी प्रयत्न करू लागलो, पण वर जायला काहीही आधार मिळत नव्हता. आधाराला दगडही नीट नव्हता. खाली उतरणं कठीण होतं. 

इतक्या दूर एकटा आलो होतो. खरंतर ही काही काळजीची गोष्ट नव्हती. यापूर्वीही मी एकटा फिरायला गेलो होतो. एकदा तर घरी न सांगताच, पंधरा दिवस काश्मीरमध्ये स्नो स्किइंग शिकायला जाण्याचाही पराक्रम केला होता. त्यामुळे एकटा या अमरनाथ यात्रेला जाणं माझ्यासाठी मोठी गोष्ट नव्हती. उलट मलाच ही यात्रा एकट्यानेच करायची होती. परंतु यावेळी कधी नव्हे ती माझी प्रकृती बिघडली होती. अशा अवस्थेत मी चालत होतो आणि आता अडकलो होतो. एकटा. कोणाचंही माझ्याकडे लक्ष नव्हतं. इथेच कपाळमोक्ष होणार का असा विचार आला. मनात भीतीचं वादळ धडकलं.

अभिजीत पानसेतेवढ्यात दोन मोठी मुलं वरून जाताना दिसली. त्यांनाही मी दिसलो बहुधा. मी हसून त्यांना जरा हात द्यायला सांगितलं. त्यांनी ताबडतोब थोडं खाली येऊन माझा हात पकडला आणि मला वर ओढलं. हुश्श! एकदाचा वर आलो.. माणसात आलो. योग्य रस्त्यावर आलो. देवाचे आणि त्यांचे आभार मानले. ‘जय भोले’ म्हणून ते पुढे गेले. तेव्हापासून कानाला खडा लावला, की आता नो शॉर्टकट! पण माझा अगदी शक्तीपात झाला होता. संपूर्ण शक्ती जणू कोणी ओढून घेतलीए असं वाटत होतं. चालण्याचा सगळा त्राणच संपला होता. मी एका मोठ्या दगडावर पाठीवर पडून राहिलो. दुपारचे साडे बारा वाजले होते. पाच मिनिट तसाच पडून राहिलो. थंडीत सूर्यप्रकाश उबदार वाटत होता.

तेव्हा फक्त अर्धा रस्ता संपला होता. अजूनही माथा दिसत नव्हता. पिस्सू टॉपने संपूर्ण शरीर, मांसपेशी पिळून काढल्या होत्या. मी उठून एक एक पाऊल काठीच्या साहाय्याने टाकू लागलो. माझी काठीच आता माझ्या सोबतीला होती. थोडं अंतर चालत गेलो. तेव्हा मला एक दृश्य दिसलं, पायाने अधू असलेला एक माणूस कुबडी घेऊन चढत होता. ते पाहिलं आणि मला माझीच लाज वाटू लागली. मी खूप बाऊ करतोय असं प्रकर्षानं वाटू लागलं.

तो अधू माणूस हातात कमंडलू घेऊन कुबडीच्या साहाय्याने चालत होता. ज्या पिस्सू टॉपने माझी शक्ती, शरीर पिळून घामरूपी रस बाहेर काढला होता. एक एक पाऊल टाकताना स्वर्ग आठवत होता, तिथे समोरील तो माणूस एका पायाच्या साहाय्याने इतक्या उंचावरील ठिकाणी चालत होता. माझा डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो माणूस कोणाशीही काहीही न बोलता एकटा शांतपणे एका लयीत चालत होता. माझ्या अभिमानाच्या, अहंकाराच्या तिथेच ठिकऱ्या उडाल्या. त्या माणसाला मनोमन नमस्कार केला. मी त्या माणसाकडे बघत राहिलो. मी त्याच्या मागे होतो. त्याने एक जुनकट लुंगी घातली होती. ज्यावरून त्याची गरिबी दिसत होती. पण तो हिंमत आणि भक्तीच्या बाबतीत सगळ्यात श्रीमंत वाटत होता. 

शेषनाग तलावतो कोणाकडेही काहीही मागत नव्हता. लोकांनी आपल्याकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहावे, अशीही त्याची देहबोली नव्हती. तो आपला रस्ता चालत होता. अकरा हजार फुटांवर चढता चढता आमच्या छातीचा जणू भाता झाला होता. छातीचा कपालभाती आणि भस्रीका सतत सुरू होता. मी त्या माणसाकडे गेलो. माझ्याजवळ असलेली पाण्याची बाटली त्याला दिली. पन्नास रुपये दिले. त्यानेही काही न बोलता ते घेतले. मी पुन्हा थोडा वेळ दगडावर बसलो. छाती जोरात वर खाली होत होती. नाकाचे दोन भोक प्राणवायू आत ओढून घेण्यास छोटे ठरताएत, असं वाटत होतं. नाकाने श्वास घ्यायचा असतो, हे तर मी पार विसरूनच गेलो होतो. तोंडाने श्वास घेणं सुरू होतं. इतका श्वास कमी पडत होता. लवकरात लवकर वर पिस्सू टॉपवर पोहचणं गरजेचं होतं, कारण रस्ता खूप मोठा होता. त्या दिवशी लवकरात लवकर शेषनागला पोहचायचं होतं. त्या रात्री मुक्काम तिथे होणार होता. मुळातच मला उशीर झाला होता.

(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU  या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link