Next
गुंतवणूकही क्रिकेटप्रमाणेच... चेंडू बघून निर्णय घ्यावा...
BOI
Sunday, September 16, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

पेट्रोलचे वाढते भाव, अमेरिका-चीन व्यापार युद्ध, रुपयाची घसरण या सगळ्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर होत आहे. रुपयातील घसरणीचा फायदा भारतातील संगणन क्षेत्रातील निर्यातदार कंपन्यांना होईल. त्यामुळे सध्या पेट्रोलियम कंपन्या, संगणन क्षेत्रातील कंपन्या, धातू कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत. याविषयी सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
......
गेल्या आठवड्यात गणेश चतुर्थीची सुट्टी आल्याने शेअरबाजार चारच दिवस चालू राहिला. शुक्रवारी, १४ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३८ हजार २०वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११ हजार ५१५वर बंद झाला. ‘मदर्सन सुमी’ने दोनास एक या प्रमाणात बक्षीस भाग दिल्यानंतर या शेअरचा भाव २७२ रुपयांवर स्थिरावला. या भावाला किं/उ. ४२.७ पट इतके दिसते.

जगात पेट्रोलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे भारतातही पेट्रोल महाग झाले आहे. पेट्रोल, डिझेल वस्तू-सेवा करात नाही. त्यामुळे महाराष्ट्रासारखी अनेक राज्ये त्यावर कर लावून ते आणखी महाग करत आहेत. या पेट्रोलची झळ येत्या काही महिन्यांत होणाऱ्या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाला बसेल. राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे दूरदृष्टीने राजस्थान सरकारने आपले इंधनावरील कर कमी केले आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जावे म्हणून इथेनॉलच्या किमती वाढवून दिल्या गेल्या आहेत.

जागतिक स्तरावर अमेरिकेचे चीनशी शीतयुद्ध सुरू आहे. त्याचा फायदा भारतीय निर्यातदारांनी घेऊन निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रुपया डॉलरचा विनिमय दर आता ७२ रुपयांपर्यंत आल्याने त्यांना फायदाच होणार आहे. अमेरिकेत ज्यांची विक्री व व्यवसाय जास्त आहे; त्या संगणन, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचा नफा यापुढे वाढत राहील. जगात अनेक धातूंचे भाव वाढत आहेत. त्याचाही फायदा अॅल्युमिनिअम, मँगनीज, जस्त, तांबे या क्षेत्रातील कंपन्यांना होईल. ग्राफाइट इंडिया, हेग, एमओआयएल, हिंदाल्को, नाल्को, वेदांत, साँडूर, मँगनीज या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव त्यामुळे वाढत राहतील. वेदांत कंपनीचा शेअर २२६ रुपयांना जरूर घ्यावा. 

पेट्रोलचे दर वाढत असल्यामुळे ओएनजीसी, ऑइल इंडिया, चेन्नई पेट्रो या कंपन्यांचे शेअर्स सध्या गुंतवणुकीला आकर्षक आहेत. तेलशुद्धीकरण कंपन्या आणि महामार्गावर पेट्रोल पंप असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कार्पोरेशन या कंपन्यांनादेखील पुढील सहा महिन्यांत चांगला फायदा होईल. त्यातही गुंतवणूक हितावह ठरेल.

बाजार हा केवळ कंपन्यांच्या कामगिरीवर अवलंबून नसतो. जागतिक हवामान, आर्थिक व्यवहार धोरणे, देशातील करपद्धती, राजकीय स्थैर्य यावर बऱ्याच गोष्टी ठरत असतात. दर तिमाहीचे कंपन्यांचे विक्री व नफ्याचे आकडे बघूनच आपले निर्णय ठरवावे लागतात. या लेखमालेतून या गोष्टीचा थोडक्यात परामर्श घेतला जातो. तरीही प्रत्येक गुंतवणूकदाराने थोडा अभ्यास करायलाच हवा. नफ्याचे फूल हे सोनचाफ्यासारखे अनेक वर्षांनंतर उमलते. घाई करून खरेदी किंवा विक्री करू नये. अर्थसंकल्पाच्या आधी वा नंतर, पावसाळ्याच्या आधी व नंतर, दसरा, दिवाळीचे दिवस या वेळी गुंतवणूकदाराने अभ्यास करावा. अर्थविषयक वृत्तपत्रे, नियतकालिके वाचावीत. आपल्या दलालाचा (शेअर ब्रोकर) सल्ला घ्यावा. दर एप्रिल, जुलै, ऑक्टोबर व जानेवारीमध्ये प्रसिद्ध होणारे विक्री व नफ्याचे आकडे बघावेत. त्यानंतरच जाणीवपूर्वक निर्णय घ्यावेत. क्रिकेटमध्ये फलंदाजाला समोरच्या गोलंदाजाचा प्रत्येक चेंडू कसा असेल याचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो, तसेच गुंतवणुकीबाबत आहे. प्रत्येक सामन्यात शतक होईलच असे नसते.

डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search