Next
स्वप्न आगामी विश्वकरंडकाचे..
BOI
Friday, February 09, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


आगामी, म्हणजेच २०२१मध्ये होणाऱ्या महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेत आपणच जिंकणार असा दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारी क्रिकेटपटू स्मृती मानधना ही सध्या विशेष चर्चेत आहे. मूळची सांगलीची असलेली ही नवोदित फलंदाज सध्या भारतीय महिला क्रिकेटचे विश्व गाजवत आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या मालिकेत स्मृतीने चमकदार कामगिरी केली आहे.... ‘क्रीडारत्ने’ या सदरात आज तिची मुलाखत...
................
स्मृती मानधनासध्या भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, सात फेब्रुवारीला किम्बर्ली येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मानधनाने चमकदार कामगिरी केली आहे. या मालिकेतील दुसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात भारताने १७८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. शिवाय मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली. स्मृती मानधनाचे शतक आणि वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने पूर्ण केलेल्या २०० बळींचा टप्पा, ही भारताच्या विजयी डावाची वैशिष्ट्ये ठरली. १४ चौकार आणि एका षटकारासह स्मृतीने शतकी खेळी केली. तिची ही वन-डे क्रिकेटमधील तिसरी शतकी खेळी ठरली. याआधी, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने शतक ठोकले आहे. दक्षिण आफ्रिकेतील हे तिचे पहिलेच शतक आहे. या धडाकेबाज खेळाडूची काही दिवसांपूर्वी घेतलेली मुलाखत तिच्या या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करत आहोत.

विश्वकरंडक विजेतेपदापासून वंचित राहिल्याचे दुःख आहे का?
- शल्य निश्चितच आहे. कारण बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केल्यानंतर इंग्लंड संघासमोर आम्ही पूर्ण सकारात्मकतेने उतरलो होतो. त्यांच्या धावसंख्येसमोर मात्र आमची मात्रा चालली नाही. चाळिसाव्या षटकापर्यंत आम्हाला विजयाच्या आशा होत्या; मात्र त्याच वेळी भरात असलेली पूनम राऊत बाद झाली आणि आमच्या उरल्या-सुरल्या आशाही संपुष्टात आल्या.

मिताली राज आणि झुलान गोस्वामीपहिल्याच विश्वकरंडकाचा अनुभव कसा होता..?
- भारताची कर्णधार आणि विश्वविक्रमी खेळाडू मिताली राज, तसेच सर्वाधिक बळी घेणारी झूलन गोस्वामी यांच्याबरोबर खेळायची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून बरेच काही शिकता आले, ही माझी या स्पर्धेतील सर्वांत मोठी कमाई आहे, असे मी समजते. या स्पर्धेत आलेला अनुभव मला आगामी कारकिर्दीसाठी बहुमोल ठरणार आहे. खास करून मितालीने दिलेल्या टिप्स विशेष महत्त्वाच्या होत्या. ही स्पर्धा केवळ काही शिकवणारीच ठरणार नव्हती, तर अपयशावर आणि नैराश्यावर सकारात्मकतेने कशी मात करायची, हे शिकवणारीही होती.

स्मृती मानधनामहिलांसाठी आयपीएल ही संकल्पना कशी वाटते?
- घरातून मुलींना पोषक वातावरण मिळाले, तर क्रिकेटच नव्हे इतर कोणत्याही खेळात मुली आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात. साक्षी मलिक, पी. व्ही. सिंधू, सानिया मिर्झा, ललिता बाबर ही आपल्या डोळ्यांसमोर असलेली उदाहरणे आहेत. मग हेच क्रिकेटमध्ये घडले, तर अनेक नवीन खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळेल. माझ्या आई-वडिलांबरोबरच माझे प्रशिक्षक अनंत तांबवेकर यांनी मला प्रोत्साहन दिले, म्हणून मी हा पल्ला गाठू शकले. महिलांसाठी आयपीएल सुरू करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला खेळाडूंना प्रोत्साहन दिले, तर देशाला आगामी विश्वकरंडकापूर्वी अधिक सरस खेळाडू गवसतील. रांचीसारख्या छोट्या शहरातून आलेला खेळाडू भारतीय संघाचा विश्वविक्रमी कर्णधार होऊ शकतो व महेंद्रसिंह धोनी म्हणून जगभरात नावाजला जाऊ शकतो, तर हेच भारतीय महिला क्रिकेटबाबतही घडू शकते.  गुणवत्ता शोध मोहीम, आयपीएल, महिला क्रिकेटप्रति थोडी आस्था यातून हेही घडू शकते.

दुखापतीतून सावरून तू विश्वकरंडकाच्या उर्वरित स्पर्धेत चांगली कामगिरी केलीस त्याबद्दल काय सांगशील..?
- पहिल्या काही सामन्यांत मला दुखापतीने सतावले होते. गेली चार वर्षे मी या स्पर्धेची वाट पाहत होते. पहिल्या दोन सामन्यांत माझ्या धावा झाल्या नाहीत आणि मी पूर्ण निराश झाले होते. त्याच वेळी संघातील जागा गमावणार का अशीही भीती माझ्यासमोर उभी राहिली होती; पण कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी मला धीर दिला, विश्वास दिला. पुढील सामन्यांत मला खेळायची संधी दिली. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात मी दुखापतीवर मात करून अत्यंत महत्त्वाची लढत जिंकून देऊ शकले. अर्थात मी दुखापतीतून बाहेर आले, याचे सर्व श्रेय संघ प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांना जाते. इथूनच माझी बॅट तळपू लागली. साखळीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव आम्हाला सलत होता. याच संघाशी आमचा उपांत्य सामना होणार होता. 

भारतीय महिला क्रिकेट संघसंपूर्ण संघ दडपणाखाली होता. याच वेळी कर्णधार मिताली राज हिने आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण असल्याचे आमच्या मनावर बिंबवले आणि एखादा चमत्कार घडावा तसे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात घडले. आम्ही स्वप्नवत जिंकून अंतिम फेरी गाठली. त्या दिवशी आमच्यापैकी कोणीही झोपले नाही. आम्ही जवळपास बाजी मारली होती. भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विश्वकरंडक जिंकण्यासाठी आम्हाला आता केवळ यजमान इंग्लंड संघाला पराभूत करायचे होते. ऑस्ट्रेलियाचा संघ पाहता, इंग्लंडचा संघ फारसा तुल्यबळ नव्हता. याच भ्रमात आम्ही फसलो आणि हाता-तोंडाशी आलेला विजय गमावून बसलो. कर्णधार मिताली राजचं स्वप्न आमच्या बेजबाबदार फलंदाजीमुळे धुळीला मिळालं. आता पुढील विश्वकरंडक स्पर्धा आणखी चार वर्षांनी होत आहे. त्या संघात मिताली असेल का निवृत्त झाली असेल, हे सांगू शकत नाही; मात्र संपूर्ण सकारात्मकतेने इतकं आश्वासन नक्कीच देऊ शकते, की आगामी विश्वकरंडक भारतीय संघच जिंकणार.

पुरुष खेळाडूंप्रमाणे लोकप्रियता मिळत नाही याची खंत वाटते का?
- खंत वगैरे अजिबात वाटत नाही. उलट आम्ही जेव्हा उपविजेतेपदाचा करंडक घेऊन मायदेशी परतलो तेव्हा आमच्या स्वागताला उभे असलेले हजारो क्रिकेटप्रेमी पाहून एक क्षण आम्ही भारावून गेलो. विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर आजतागायत आमच्याबाबत स्तंभ, मुलाखती, बातम्या वगैरे जे काही प्रकाशित होत आहे, त्यामुळे आगामी विश्वकरंडकासाठी आमचा हुरूप वाढला आहे.  यश आणि अपयश या खेळाच्या दोन बाजू असतात. यंदा आम्ही अपयशी ठरलो; मात्र पुढच्या वेळी यश खेचून आणू. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या चार देशांत येत्या चार वर्षांमध्ये असे ठराविक सराव सामने खेळवले गेले, तर तेथील खेळपट्टी, वातावरण, गोलंदाजी त्यांचे फलंदाज यांचा काटेकोर अभ्यास करून चार वर्षांनंतर होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होणे अधिक सोपे ठरेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search