Next
टप्प्याटप्प्याने करा शेअर्सची खरेदी
BOI
Sunday, June 24, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्थितीमुळे शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहेत. येत्या चार-पाच महिन्यांत शेअर बाजारात भाव लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेअर खरेदी टप्प्याटप्प्याने करणे योग्य राहील. सध्या कोणते शेअर्स घेणे योग्य आहे, याबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात.... 
......     
गेल्या आठवड्यात अमेरिकेने अनेक वस्तूंवर आयात कर वाढवल्याने भारतानेही अमेरिकेतील आयातीवर सीमा शुल्क वाढवले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने मेहबूबा मुफ्ती यांनी राजीनामा दिला व तिथे राज्यपाल राजवट सुरू झाली. केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांना नुकतीच एक वर्षाची मुदतवाढ दिली असताना, ते हे पद सोडून अमेरिकेला निघून गेले. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे विद्यमान आणि माजी अध्यक्षांना, तसेच अन्य अधिकाऱ्यांना अटक झाल्याने वातावरण दूषित झाले आहे. भरीला कोकण वगळता बाकी सर्वत्र पावसाची सुरुवात समाधानकारक नाही. या सगळ्या कारणांमुळे शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३५ हजार ६८९वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १० हजार ६२१ अंकांवर बंद झाला.

रिझर्व्ह बँकेने प्राधान्य कर्जातील गृहकर्जाची टक्केवारी वाढवली आहे. बँकांनी रेपो दर वाढल्यानंतर गृहकर्जे थोडी महाग केल्याने आता दिवाण हाउसिंग फायनान्स, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स, रेप्को होम फायनान्स, एलआयसी हाउसिंग फायनान्स या कंपन्या जास्त कर्जे वितरित करतील. त्या सर्व कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक उत्तम ठरेल. मध्य-पूर्वेतील राष्ट्रे पेट्रोलचे दर वाढवणार असल्याने हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, चेन्नई पेट्रो हे शेअर्स खरेदीसाठी योग्य ठरतील. सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्या लाभांशही चांगला देतात.

भारत फोर्ज, स्टील स्ट्रिप्स, रेडिंग्टन (इंडिया) इथेही गुंतवणूक फायदेशीर ठरेल; मात्र गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी आपली जोखीम घेण्याची शक्ती लक्षात घेऊन, दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली पाहिजे. ज्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे त्याच्या वेबसाइटवर जाऊन माहिती घेऊन, मगच खरेदी करायला हवी. सध्या निदान चार-पाच महिने बाजारात भाव लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे जी खरेदी करायची ती टप्प्याटप्प्याने करावी. कुठल्याही कंपनीचे एक हजार शेअर्स घ्यायचे असतील, तर दोनशे शेअर्सच्या पाच लॉटमध्ये ते घ्यावेत. सध्या विक्रीचे दिवस नाहीत. त्यामुळे रक्कम बराच काळ गुंतून राहणार आहे, हे ध्यानात ठेवणे जरूरीचे आहे. 

दिवाण हाउसिंग, हिंदुस्तान पेट्रोलियम, चेन्नई पेट्रो, इंडियाबुल्स हाउसिंग या शेअर्सवर भर हवा. हेग व ग्राफाइट इंडिया हे शेअर्स पुढील आठवड्यात पाच टक्के खाली आले, तर जरूर घ्यावेत.


- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search