Next
‘लहानपणीची दिवाळी म्हणजे आनंदाचे महापर्व’
BOI
Wednesday, November 07, 2018 | 10:00 AM
15 0 0
Share this story

प्रातिनिधिक फोटो

लहानपणीची दिवाळी म्हणजे आनंदाचे महापर्व कसे होते, याबद्दलच्या आठवणी जागवल्या आहेत साखरप्याचे अमित केतकर यांनी...
..........
दिवाळी येणार अंगण सजणार..
आनंद येणार घरोघरी, 
तुमच्या घरी अन आमच्या घरी... 

खरेच, आमच्या लहानपणीची दिवाळी म्हणजे आनंदाचे महापर्व असे. चार दिवस अगोदर घरात फराळाचे पदार्थ करण्याची लगबग सुरू व्हायची. चकल्या, कडबोळी, अनारसे, शंकरपाळे, शेव, रवा, बेसन लाडू... एक एक पदार्थ तयार व्हायचे. वसुबारसेच्या दिवशी करंज्या आणि नंतर चिवडा. वसुबारसेला संध्याकाळी गाय-वासराला ओवाळायचे आणि मग घरात, अंगणात, तुळशीजवळ पणत्या लावायला सुरुवात. घरी केलेला पारंपरिक चिव्याचा (बांबूचा) आकाशकंदील टांगला जायचा. 

दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीदिवशी संध्याकाळी धनाची म्हणजे भाताची पूजा. कारण ते शेतातील धन घरी आलेले असायचे. माझे बाबा डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडे त्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा व्हायची. पिठीसाखर, धण्याची पूड, सुके खोबरे असा एकत्र प्रसाद असायचा. रात्री लवकर जेवून झोपण्याची तयारी. कारण दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून फटाके वाजवण्याची, पहिला बॉम्ब मी वाजवला, हे सांगण्याची चढाओढ. 

पहाटे साधारण चार वाजता आजोबा हाका मारायचे ‘चला रे उठा. दिवाळी आहे.’ तो दिवस नरक चतुर्दशीचा. पहाटे थंडी असायची; पण उत्साहही असायचा. आम्ही उठेपर्यंत बंब पेटलेला असायचा. मग दात घासत बंबाजवळ उभे राहून शेक घ्यायचा, त्याच वेळी पूर्वेकडे आकाशात शुक्रतारा दिसायचा. तो एरव्हीही त्या दिवसांत दिसायचा; पण एरव्ही आम्ही त्या वेळेत अंथरुणावर असायचो. नंतर दूध प्यायचे आणि मागच्या पडवीत पाट मांडलेला असायचा, त्यावर बसून आई अंगाला उटणे आणि सुगंधी तेल लावायची. पोटाला तेल लावताना खूप गुदगुल्या व्हायच्या. तोंडाला तेल लावताना आम्ही म्हणायचो, ‘तोंडाला नको लावू.’ मग त्यावर तिथे बसलेली आजी म्हणायची, ‘आज तोंडाला तेल लावायचे. नाही तर पुढचा जन्म माकडाचा येईल.’ 

नंतर गरम पाण्याने आंघोळ, मोती साबण लावून. मग बाहेर जाऊन कारीट फोडायचे, तेही डाव्या पायाच्या अंगठ्याने. नरकासुर वध करायचा, त्याच वेळी रेडिओवर नरकासुर वधाचे कीर्तन लागलेले असायचे. नवीन कपडे घालून आळीतील सगळी मुले निदानेश्वर मंदिरात जायची. तिथे फटाके वाजवायचे. १५ मिनिटे गप्पा मारून आपापल्या घरी यायचे. सगळ्यांनी एकत्र फराळ करायचा, अशी रीत होती. 

माझ्या घरी पणजी, आजोबा, बाबा आणि आम्ही अशा चार पिढ्यांनी १९९२पर्यंत एकत्र दिवाळी साजरी केली, हे आमचे भाग्यच. आमच्या भागात धनगर समाजाची मंडळी त्या दिवशी पोहे मागायला यायची, आजही येतात. त्यांना पोहे आणि शंकरपाळे द्यायचे. अगदीच कोणी खास ओळखीचा असेल, तर त्याला रव्याचा लाडू दिला जायचा. 

नंतर आम्ही सदरेच्या माळावर क्रिकेट खेळायला जायचो. तो दिवस आमच्या क्रिकेट हंगामाचा शुभारंभाचा दिवस असायचा. माझे आजोळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात. त्या दिवशी फराळाच्या पदार्थांत अनेक गोष्टी चावून खायच्या असतात. जाड पोह्यांचा चिवडा, कडबोळी इत्यादी इत्यादी. म्हणून त्या दिवसाला सिंधुदुर्गात चाव दिवस म्हणतात. आजही आम्ही त्याच पद्धतीने दिवाळी साजरी करतो. 

संपर्क : अमित केतकर, साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी
मोबाइल : ९४२११ ३८४५०

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link