Next
वेदप्रणित अग्निहोत्र उपासना
सुख-समृद्धी, स्वास्थ्य आणि मन:शांतीसाठी आवश्यक
BOI
Sunday, October 07, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

‘अग्निहोत्र’ हा आपल्या घरी नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळी करण्याचा यज्ञविधी आहे. स्थानिक वेळेनुसार सूर्योदय व सूर्यास्ताला तो करावयाचा असतो. भारताबरोबरच जगातील बहुसंख्य देशांमध्ये त्याचा प्रसार झाला असून, लाखो लोक श्रद्धापूर्वक हे अग्निपूजन करतात. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात या वेळी लिहीत आहेत अग्निहोत्र उपासनेबद्दल...
............
दोन पायांवर उभा राहणारा मानव पृथ्वीवर वावरू लागला, त्याला लाखो वर्षे होऊन गेली. सुरुवातीचा मोठा कालखंड प्राण्यांची शिकार आणि उपलब्ध फळे यांच्यावर उदरनिर्वाह करण्यात गेला. ग्रह-तारे, वनस्पती आणि प्राणी यांनाच माणूस - भीतीपोटी का होईना - देव मानत आला. अग्नीचा शोध अपघाताने लागला आणि मानवी संस्कृतीचा विकास वेगाने होऊ लागला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे पूजन होतच होते. त्यातील तेज म्हणजेच अग्नी. फक्त अन्न गरम करण्यापुरता त्याचा उपयोग नसून, त्यात प्रचंड सामर्थ्य आहे, हे हळूहळू लक्षात आले. त्यातूनच औद्योगिक क्रांतीचा पाया रचला गेला. अणुशक्ती, अग्निबाण हे त्याच ऊर्जेवर निर्माण होतात, चालतात.

मूळ स्वरूपातील वेद-वाङ्‌मय (श्रुती) सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. त्याचेच पुढे महर्षी वेदव्यासांनी सोयीसाठी चार विभाग केले. त्यातील यजुर्वेद हा यज्ञसंस्थेचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. यज्ञांचे प्रकार, ते कसे करावेत, त्यासाठी लागणारे मंत्र, कालावधी इत्यादी माहिती त्यात आहे. अश्वमेध, राजसूय, पुत्रकामेष्टी, गाईस्पत्य (वैश्वदेव), आहवनीय (यज्ञासाठी तयार करावयाचा अग्नी) इत्यादी नावे आपल्याला ठाऊक आहेत. नित्य, नैमित्तिक आणि काम्य (विशिष्ट कामना ठेवून केलेले) असे त्यांचे तीन प्रकार आहेत. यज्ञात अग्नीला निरनिराळ्या गोष्टींचे हवन (अर्पण) दिले, की विशिष्ट देवता प्रसन्न होतात, असा विश्वास आणि अनुभव लोकांना होता. ‘अग्निहोत्र’ हा आपल्या घरी नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळी करण्याचा यज्ञविधी आहे. स्थानिक वेळेनुसार सूर्योदय व सूर्यास्ताला तो करावयाचा असतो. भारताबरोबरच जगातील बहुसंख्य देशांमध्ये त्याचा प्रसार झाला असून, लाखो लोक श्रद्धापूर्वक हे अग्निपूजन करतात. त्याला अत्यंत अल्प कालावधी लागतो.

अक्कलकोट येथील श्री बाळाप्पा महाराजांच्या मठात पूज्य श्री गजानन महाराज (शेगावचे वेगळे) यांचे वास्तव्य होते. लहानपणी त्यांच्या दर्शनाचा योग आला होता. त्याच जागी भगवान परशुराम यांनी सन १९४४मध्ये महाराजांना दर्शन देऊन, ‘तू श्रुतींचे पुनरुज्जीवन कर,’ असा आदेश दिला. तो शिरसावंद्य मानून त्यांचे वेदकार्य सुरू झाले. त्याचबरोबर, वेदांच्या अंतर्गत येणाऱ्या अग्निहोत्र उपासनेचा जगभर प्रसार करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली. तेही काम वेगाने सुरू झाले; आणि महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि जगभर लाखो घरांपर्यंत ही नित्य उपासना जाऊन पोहोचली. या यज्ञाचे आचारण करणाऱ्या यजमानांचे आणि उपासकाचे अग्निनारायण कल्याण करतो; आपल्या भक्तांना धन-धान्य, पुत्र-पौत्र प्रदान करतो आणि ऐहिक व पारलौकिक कामनांची पूर्ती करतो. अग्नी हे देवतांचे मुख असून, तो शक्तीचा पुत्र आणि देवांचा दूत आहे.

अग्निहोत्र म्हणजे ज्या विधीने अग्नीला उद्देशून होम केला जातो ते कर्म. अग्नीला दिली जाणारी आहुती, तेच अग्निहोत्र. रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताला होम करून ही उपासना करावी. सकाळी सूर्य आणि प्रजापती यांना आणि संध्याकाळी अग्नी व प्रजापती यांना उद्देशून तांदूळ किंवा यव यांची आहुती दिली जाते. एका अग्निहोत्राच्या उपासनेमुळे सर्व देवतांची उपासना साध्य होते. देवतांनाही अग्निहोत्र अनिवार्य आहे, असे उपनिषदांत सांगितले आहे. श्री गजानन महाराज (शिवपुरी, अक्कलकोट) यांना ‘अग्निहोत्राचे उद्गाते आणि प्रवर्तक’ म्हणून विश्वभर ओळखले जाते. ‘यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय’ या पंचसाधन मार्गाचे त्यांनी दिग्दर्शन केले. यज्ञ म्हणजे, परमात्म्याला उद्देशून अग्निमुखी द्रव्याचा त्याग करणे. अग्निहोत्राच्या आचरणाने मानवात शरणागत वृत्ती निर्माण होऊन मन प्रेममय आणि अनासक्त होते. सर्वांसाठी ते अनिवार्य कर्तव्य-कर्म आहे. कालमानाप्रमाणे आपल्या भोवताली प्रदूषण, तणाव, अशांती, रोगराई, निसर्गाचे असंतुलन असे भयानक प्रश्न उभे राहिलेले आहेत. त्या सर्वांचे निराकरण करण्याचे सामर्थ्य अग्निहोत्रात आहे. परमात्म्याने असे अभिवचन दिले आहे, की ‘यज्ञ ही सर्वांना इष्ट ते देणारी कामधेनू आहे. त्याच्या आचरणाने सुख-समृद्धी मिळते, पंचमहाभूते संतुलित होतात.’ देव आणि निसर्ग यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा सहजसुलभ मार्ग म्हणजे अग्निहोत्र होय. ते मुक्तीचे साधन आहे. त्याने अभ्युदय आणि नि:श्रेयस या दोन्हींची प्राप्ती होते.

पिरॅमिडसारखा आकार असलेल्या तांब्याच्या किंवा मातीच्या पात्रात, गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार केलेल्या अग्नीत, मंत्रोच्चारण करून गायीचे तूप माखलेल्या दोन-दोन चिमटी तांदळाच्या आहुती देणे, म्हणजे अग्निहोत्र होय. त्याने वातावरणशुद्धी होऊन, दिवसभर त्याचा परिणाम राहतो. ज्या घरात, जागेत किंवा शेतात अग्निहोत्र केले जाते, तेथे शुद्धतेचे व पावित्र्याचे कल्याणकारी चक्र कार्यरत होते. त्याचा परिणाम तिथले सर्व सदस्य, प्राणी आणि वनस्पतींवर होतो. अग्नीमध्ये अर्पण केलेला घनपदार्थ जळून जाताना सूक्ष्म ऊर्जातरंग धूम व वायुरूप धारण करून आसमंतात सुगंधी आणि पुष्टिदायक तत्त्वांच्या रूपाने पसरतात. या उपासनेचा अन्य कोणत्याही उपासनेशी विरोधाभास नाही. त्याने पर्जन्यचक्राचेही संतुलन होते. त्याच्या भस्माचा शेती व वनस्पतींच्या वाढीवर उत्तम परिणाम होतो. परिणामत: अधिक सकस व स्वादिष्ट अन्न, धान्य, फळे-फुले आणि भाजीपाला पिकतो. त्या वातावरणात रोगजंतूंच्या वाढीसही प्रतिबंध होतो, असे संशोधनात आढळून आले आहे. स्थिर-चर, सजीव-निर्जीव अशा सर्व वस्तूंमधील प्राणशक्ती विकसित होते. मन प्रसन्न आणि आनंदी होते. मुलांच्या मनावरही त्यामुळे उत्तम परिणाम होतो व त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. अभ्यासात एकाग्रता साधते. व्यसनांपासून मुक्तता होऊन, दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होते, हे अनुभव सिद्ध झाले आहे.

अग्निहोत्र विधी

हा यज्ञ रोज करताना पाच नियमांचे पालन करावयाचे असते; म्हणजे त्याचे इष्ट परिणाम दिसून येतात.

- वेळ : आपण ज्या गावी असू, तिथली सूर्योदय आणि सूर्यास्ताची अचूक वेळ जाणून घ्यावी. तशी वेळापत्रके उपलब्ध असतात. त्या मुहूर्तावर उपासना केल्याने वैश्विक ऊर्जेचा फायदा मिळतो. त्याने आपले मानसिक आणि शारीरिक संतुलन साधते.

- अग्निहोत्र पात्र : पिरॅमिडसारख्या आकाराचे तांब्याचे किंवा मातीचे पात्र (कुंड) वापरणे आवश्यक आहे. विधी करताना उष्णता आणि विद्युत-चुंबकीय ऊर्जेचे तरंग निर्माण होतात. हे शुद्धिकारक तरंग भोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित होतात.

- आहुती : दोन चिमटीत मावतील इतके अखंड (न शिजवलेले) तांदळाचे दाणे आहुतीसाठी वापरावेत. ते तुटलेले, अर्धे असू नयेत. तांदूळ जगात कुठेही सहज उपलब्ध असतात.

- गोघृत, गोमय : गायीच्या दुधापासून तयार केलेले तूप अग्निहोत्रात आहुतीसाठी वापरले जाते. तांदळाच्या दाण्यांना हे तूप व्यवस्थित लावावे. दुसरे तूप वापरू नये. त्यात पुष्टि-तुष्टिदायक, विषाचा नाश करणारे आणि ओज देणारे गुणधर्म आहेत. त्याच्या ज्वलनाने हे सर्व औषधी गुणधर्म सूक्ष्म तरंगांच्या द्वारे वातावरणात वेगाने पसरतात. त्यायोगे वातावरण शुद्ध प्राणशक्तीने भारले जाते. अग्निहोत्राचा अग्नी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या वापरून तयार केला जातो. गोवरीचा लांबसर पातळ तुकडा घेऊन त्याला तूप लावावे आणि तो अग्निहोत्राच्या पात्रात, नीट रचलेल्या गोवऱ्यांत मधोमध ठेवून पात्र प्रज्ज्वलित करावे. त्याला हाताने किंवा पातळ पुठ्ठ्याने हवा द्यावी. फुंकर मात्र मारू नये.

- मंत्र : 
सूर्योदयाचे मंत्र :
(पहिला मंत्र) सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम॥
(दुसरा मंत्र) प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम॥

सूर्यास्ताचे मंत्र :
(पहिला मंत्र) अग्नये स्वाहा, अग्नये इदं न मम॥
(दुसरा मंत्र) प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम॥

हे संस्कृतमधील वेदमंत्र आहेत. म्हणायला सोपे आहेत. मंत्र म्हणजे विशिष्ट अर्थ आणि ध्वनिलहरी यांच्यापासून वेदांनी तयार केलेले सूत्र. त्याच्या जपाने, त्यावर मनन-चिंतन केल्याने मन:शांती आणि शक्ती प्राप्त होते. सजीव प्राणी व वनस्पतींवरही मंत्र विलक्षण परिणाम करतात. सूर्योदयाला दोन आणि सूर्यास्ताला दोन असे स्पष्ट, शुद्ध स्वरूपातील मंत्र उच्चारून आहुती दिली, की अग्निहोत्राचा विधी पूर्ण होतो.

नित्य अग्निहोत्र आचरणाने घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहते; सुगंधी पुष्टितत्त्वाने भारले जाते. दोन्ही वेळेस विधी केल्याने २४ तास त्याचा इष्ट परिणाम टिकून राहतो. ताणतणाव दूर होऊन मन प्रसन्न राहते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते. रोगजंतूंच्या वाढीला प्रतिबंध होतो. घरातील मुलेही शांत होतात. होमाचे भस्म बागेतील झाडांना खत म्हणून वापरावे. त्यांची उत्तम वाढ होते. अग्निहोत्र आध्यात्मिक प्रगतीला पूरक ठरते. कुटुंबातील सदस्य समंजसपणे एकमेकांशी बांधले जातात.

जगातील कोणतीही व्यक्ती अग्निहोत्र करू शकते. जात-पात, धर्म-पंथ, वर्ण, स्त्री-पुरुष, देश असे कुठलेही बंधन त्याला नाही. घरात कुठेही योग्य जागी किंवा बाहेरगावी गेल्यास सोयीस्कर ठिकाणी, बागेत, शेतातही हा विधी करता येतो. जगभर लाखो लोकांनी अग्निहोत्राचे लाभ आणि उत्तम परिणाम अनुभवलेले आहेत. १२ मार्च हा जागतिक अग्निहोत्र दिन असतो.

अग्निहोत्राचे साहित्य आणि सविस्तर माहिती मिळण्यासाठी पुढील पत्त्यांवर संपर्क साधता येईल.

- विश्व फाउंडेशन, शिवपुरी, अक्कलकोट, जि. सोलापूर, (महाराष्ट्र) - ४१३२१६ 
फोन : (०२१८१) २२०७०८, २२०८७१  
वेबसाइट : www.vishwafoundation.com 
ई-मेल : info@vishwafoudation.com

- अग्निव्हिजन, ३०२-३०३ महालक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेट, डी. पी. एल. रोड, गांधीनगर, लोअर परेल (प.), मुंबई - ४०००१३  
फोन : (०२२) ४०२०३६६०

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(
बुकगंगा डॉट कॉमवरून अग्निहोत्र या विषयावरील पुस्तक मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search