Next
शेअर बाजारात अस्थिरतेचा कल
BOI
Sunday, September 23, 2018 | 03:45 PM
15 1 0
Share this article:

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात झालेली मोठी पडझड बघता, आता द्रवता, ‘सेबी’चे कडक नियम, दलालांची कसरत आणि आपले व जागतिक अर्थकारण यावर बाजार हेलकावे खाईल. अनेक शेअर्सचे भाव पडल्यामुळे खरेदीसाठी संधी असली, तरी निवडक शेअर्स घेणेच लाभदायी ठरेल. अशा शेअर्सबाबत माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
....
शेअर बाजारात शुक्रवारी (२२ सप्टेंबर २०१८) प्रचंड पडझड झाली. विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा भडिमार केल्याने अशी परिस्थिती आली. असा अंदाज असला, तरी अनेक बँकांवर कार्यकारी संचालकांची नियुक्ती, येस बँकेच्या राणा कपूर यांना रिझर्व्ह बँकेने तीन वर्षांची मुदतवाढ न देता फक्त चार-पाच महिन्यांची दिलेली मुदत, अशी इतरही अनेक कारणे या पडझडीमागे असवीत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३५ हजार ९९३पर्यंत गडगडला; पण दुपारच्या दुसऱ्या सत्रात सावरून तो ३६ हजार ८४१वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११ हजार २७१वर उघडला, १० हजार ८६६पर्यंत घसरला व शेवटी ११ हजार १४३वर बंद झाला. अनेक शेअर्स पाच टक्क्यांपासून ६० टक्क्यांपर्यंत घसरले व नंतर सावरले. 

येस बँकेचा शेअर २८७ रुपयांवर उघडला होता; पण त्याने गेल्या बारा महिन्यांतील नीचांक असलेली २१८ रुपयांची पातळीही गाठली होती. त्यात नंतर सुधारणा झाली. या शेअरचा भाव खाली राहिला, तर गुंतवणूकदारांनी तो जरूर खरेदी करावा. कारण बँकेची परिस्थिती चांगली आहे. त्याचा उच्चांक ४०४ रुपयांचा होता. तेव्हा वर्षभरात तो निदान २८० रुपयांपर्यंत चढेल. 

दिवाण हाउसिंगचा शेअरही अकस्मात एक वेळ २६६ रुपयांपर्यंत उतरला होता. बाजार बंद होताना तो ३५२ रुपयांपर्यंत चढला. सोमवारी तो ३२५ रुपयांच्या आसपास मिळाला, तर जरूर घ्यावा. या शेअरमध्ये व येस बँकेमध्ये जोखीम असली, तरी निधड्या छातीच्या गुंतवणूकदारांनी ते अवश्य घेतले, तर वर्षभरात दिवाण हाउसिंग पुन्हा ५०० रुपयांवर, तर येस बँक ३६० रुपयांवर गेलेला दिसेल. येस बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांची निवड २६ सप्टेंबरला अपेक्षित आहे. 

या दोन शेअर्ससह बजाज फायनान्स शेअरमध्येही सध्याच्या भावात अवश्य गुंतवणूक हवी. तो २३५४ रुपयांपर्यंत खाली आला आहे; पण पुढील दोन तिमाह्यांचे आकडे आले, की तो तीन हजार रुपयांची पातळी ओलांडेल व २० टक्के नफा देऊन जाईल. अन्य नॉन बँकिंग फायनान्स शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल व एल अँड टी फायनान्स या शेअर्समध्ये गुंतवणूक हवी. 

शुक्रवारचा अनुभव बघता गुंतवणूक करताना लगेच खूप मोठा नफा मिळेल अशा भ्रमात राहू नये. द्रवता, ‘सेबी’चे  कडक नियम, दलालांची कसरत आणि आपले व जागतिक अर्थकारण यावर बाजार आता हेलकावे खाईल. त्यामुळे खरेदीच्या भावात २५ टक्के वाढ दिसली, तर ताबडतोब विक्री करून नफा पदरात पाडून घ्यावा. बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक व विजया बँक याचे विलिनीकरण होणार असले, तरी राष्ट्रीयीकृत बँकांची परिस्थिती अजून तिथे गुंतवणूक करावी अशी नाही. त्यापेक्षा पूर्वी सूचित केल्याप्रमाणे, के. एन. आर कन्स्ट्रक्शन्स, एच. जी इन्फ्रा, दिवाण हाउसिंग फायनान्स, बजाज फायनान्स या शेअर्समध्येच भक्कमपणे पाय रोवावेत.

डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search