Next
गतिमान अर्थव्यवस्थेमुळे शेअर बाजारही तेजीत
BOI
Sunday, September 02, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

गेल्या आठवड्यात शेअर बाजार स्थिर होता; मात्र जून २०१८ तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा दर ८.२ टक्क्यांवर गेल्याची बातमी आल्याने येत्या आठवड्यात बाजारात तेजीच राहावी. पेट्रोलचे जागतिक भाव वाढण्याची शक्यता असल्याने आपल्याकडे महागाई वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल, याबाबत माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ....
........
शुक्रवारी, ३१ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) अनुक्रमे ३६ हजार ६४५ व ११ हजार ६८० अंशांवर बंद झाला. पेट्रोलचे जागतिक भाव अमेरिका व इराण यांच्यामधील वादामुळे येत्या भविष्यकाळात बॅरलला १०० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आपली ७० टक्के गरज पेट्रोल आयात करून भागत असते. त्यामुळे या दरवाढीचा आपल्याला फटका बसून, महागाई वाढू शकेल. परिणामी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रिझर्व्ह बँक रेपो दर वाढवण्याची शक्यता आहे. 

या पार्श्वभूमीवर, गुंतवणुकीच्या दृष्टीने ओएनजीसी व ऑइल इंडिया या शेअर्सची खरेदी सध्या योग्य ठरेल. ओएनजीसी कंपनीचा शेअर सध्या १८० रुपयांना मिळत आहे. तो सहा महिन्यांत २१० रुपयांवर आणि वर्षभरात २५० रुपयांवर जावा. सध्याच्या गुंतवणुकीवर वर्षभरात ३५ ते ४० टक्के परतावा मिळावा. ओएनजीसी ‘अपस्ट्रीम’ कंपनी आहे. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा शेअर १५६ रुपयांना सध्या जरूर घेण्याजोगा आहे. कंपनी येत्या वर्षात २२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 

जून २०१८ तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनवाढीचा दर ८.२ टक्क्यांवर गेल्याची बातमी आल्याने येत्या आठवड्यात बाजारात तेजीच राहावी. यापूर्वी त्यापेक्षा जास्त म्हणजे ९.३ टक्के वाढ जानेवारी-मार्च २०१६ तिमाहीत झाली होती. ग्राहकांची खर्च करण्याची वाढती तयारी व उत्पादनातही वाढ अशा दोन गोष्टींमुळे ही वाढ आहे. भारताची अर्थव्यवस्था आता चीनपेक्षा जास्त जोमाने वाढत आहे. वर्षभरात आपण ग्रेट ब्रिटनला मागे टाकून पाचव्या स्थानावर जाऊ. याआधी गेल्या वर्षी आपण फ्रान्सलाही मागे टाकले आहे. (अर्थात, आपल्या वाढत्या लोकसंख्येमुळे ही गणिती करामत दिसते; पण बाजाराला अशा सकारात्मक गोष्टींचे खतपाणी मिळाले, की चांगल्या शेअर्सचे भाव वाढतात.)

जगात आता खनिज धातूंचे भाव वाढत आहेत. त्यामुळे वेदान्त, मॅंगनीज ओअर अशा कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढतील. ग्राफाइट धातूंच्या वाढत्या किंमतीचा फायदा ग्राफाइट इंडिया व हेग या कंपन्यांना व्हावा. हे दोन्ही शेअर्स सध्याच्या भावात घेतले, तरी वर्षभरात त्यात ३५ टक्के नफा सहज मिळावा. त्याचबरोबर स्टरलाइट टेक्नोलॉजी कंपनीचा शेअरही घ्यावा. गुंतवणुकीसाठी आयटीडी सिमेंटेशन व आयओएल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स हे शेअर्सही उत्तम आहेत.

भारताची अर्थव्यवस्था वाढायला वस्तू व सेवा कराने (जीएसटी) मदत केली आहे, असे वित्तसचिव हसमुख अधिया व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आतापर्यंत तेजीच्या वाहत्या गंगेत ज्यांनी स्नान केले नसेल, त्यांनी अजूनही या गंगेत स्नान नाही तरी किमान हात ओले करून घ्यावेत. त्याचबरोबर, घी तिथे बडगाही असतो, ही म्हण विसरू नये. 

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search