Next
देणे सद्भावनेचे
BOI
Thursday, November 02, 2017 | 03:45 PM
15 0 0
Share this story

वीणा गोखले यांच्यासारख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती समाजात असतात, ज्या वैयक्तिक दु:खावर उपाय शोधता शोधता इतरही हजारो पीडितांसाठी बहुमोल मदत करून जात असतात. सामाजिक काम करणाऱ्या चांगल्या संस्थांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्याद्वारे त्यांना मदत मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम वीणाताई त्यांच्या ‘आर्टिस्ट्री’ या संस्थेच्या माध्यमातून गेली १२ वर्षं करतात. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज पाहू या त्यांच्याबद्दल...
..........
समाजात अनेकांना अनेक प्रकारच्या व्याधी किंवा शारीरिक समस्या असतात आणि त्यांच्याशी झगडता झगडता माणसं हतबल होऊन जातात. बहुतेकांची उमेद खचून जातेच; पण पुण्यातल्या वीणा गोखले यांच्यासारख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या व्यक्तीही समाजात असतात, ज्या वैयक्तिक दु:खावर उपाय शोधता शोधता इतरही हजारो पीडितांसाठी बहुमोल मदत करून जात असतात.

आपल्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल कन्येच्या उपचारांसाठी मार्ग शोधत असताना वीणाताईंच्या लक्षात आलं, की अशा प्रकारच्या समस्येला तोंड देण्यासाठी काही संस्था मदतकार्य करत आहेत. अधिक शोध घेता घेता त्यांच्या लक्षात आलं, की फक्त ‘स्पेशल चिल्ड्रेन’ची समस्याच नव्हे, तर इतरही अनेक प्रकारच्या समस्या अनेक स्तरांतल्या मंडळींसमोर असतात. त्यासंबंधी कार्य करणाऱ्या अनेक संस्था अशा आहेत, ज्या कित्येक लोकांना माहीतही नाहीत. वंचित, पीडित मुलामुलींपासून ते गरीब, परित्यक्त्या महिला किंवा कष्टकरी, आदिवासी समाज यांच्यासाठीसुद्धा अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने काम करत आहेत. ते काम अधिक चांगल्या प्रकारे करता येण्यासाठी आणि अधिकाधिक गरिबांपर्यंत, वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते. 

मग अशी आर्थिक मदत कशी उभी करता येईल, यावर विचार करताना त्यांना ‘प्रदर्शन’ हे माध्यम योग्य वाटले. अशा संस्थांच्या प्रतिनिधींना एका छत्राखाली बोलावून त्यांनी स्टॉल्स लावून आपल्या कार्याची माहिती जनतेसमोर ठेवली, तर अशा संस्थांना जनतेकडून थेट मदत नक्की मिळू शकेल, हे त्यांनी ओळखलं. त्यातूनच २००५ साली त्यांनी आपल्या ‘आर्टिस्ट्री’ या संस्थेतर्फे ‘देणे समाजाचे’ अशा समर्पक शीर्षकाखाली एक मेळावा भरवून त्या उपक्रमाची सुरुवात केली. 

वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सामाजिक संस्थांचं कार्य समाजासमोर आणणं, त्यांच्या कार्याचा जनतेला परिचय करून देणं आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देऊन त्यायोगे आर्थिक आणि इतर मदत मिळवून देणं एवढाच त्यांचा निखळ आणि प्रामाणिक हेतू. त्यामुळेच ‘देणे समाजाचे’मध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही संस्थेकडून शुल्क आकारलं जात नाही. समाजामधल्या इच्छुक दात्यांकडूनच त्या संस्थांना थेट मदतीचे धनादेश मिळण्याची व्यवस्था होते. 

२००५ साली पुण्यात प्रतिज्ञा मंगल कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर अगदी मोजक्या संस्थांना आमंत्रण देऊन सुरू केलेला ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम आता मुख्यतः ग्रामीण आणि निमशहरी ३० संस्थांच्या सहभागापर्यंत येऊन पोहोचला आहे. यंदाचं प्रदर्शन १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत पुण्यात हर्षल हॉलमध्ये झालं. संस्था खरोखर काम करणारी हवी, तिचा कारभार पारदर्शक हवा या निकषांच्या आधारे संस्थेची निवड केली जाते. वीणाताई स्वतः संस्थेचं काम पाहतात आणि मगच त्या संस्थेची प्रदर्शनासाठी निवड करतात. प्रदर्शनात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असणार नाही, याचीही काळजी घेतली जाते. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर सुरू असलेल्या ‘लेणे समाजाचे’ या लेखमालेत या प्रदर्शनातील संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला जात आहे. 

आर्टिस्ट्री संस्थेच्या या उपक्रमाला लोकांनी आतापर्यंत चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल वीणाताई कृतज्ञ आहेत. भविष्यातही लोक असाच भरभरून प्रतिसाद देतील, अशी आशाही त्यांना आहे. 

संपर्क : वीणा गोखले, आर्टिस्ट्री, फ्लॅट नं नऊ, ऐश्वर्या हाइट्स, चिंतामणी सोसायटी, कर्वेनगर, पुणे-५२ 
फोन : (०२०) २५४३३१५० 
मोबाइल : ९८२२० ६४१२९ 
ई-मेल : gokhaleveena@yahoo.co.in
वेबसाइट : http://www.artistrypune.in/

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.

(संस्थेची माहिती देणारे व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(आर्टिस्ट्री संस्थेच्या वीणा गोखले यांचे मनोगत)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link