Next
‘पर्यायी इंधनांवर आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल गरजेची’
नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, January 19, 2019 | 01:15 PM
15 0 0
Share this article:

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाला भेट देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी.

पुणे : ‘पेट्रोल आणि डिझेल या खर्चिक आणि प्रदूषण करणाऱ्या  इंधनांचा वापर कमी करत भारतीय अर्थव्यवस्था इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल यांसारख्या पर्यायी इंधनांवर प्रगत व्हावी यासाठी ठोस प्रयत्न आणि कृती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच पुण्यात केले. 

येथील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) ने आयोजित केलेल्या १६ व्या स्वयंचलित वाहन तंत्रज्ञान विषयक परिषदेत  (सिम्पोझिअम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी) गडकरी यांनी पर्यायी इंधने, इलेक्ट्रिक वाहने, देशातील वाहतूक समस्या याबाबत सरकारने योजलेल्या उपायांची, तसेच धोरणांची माहिती दिली. या वेळी संस्थेच्या संचालक डॉ. रश्मी ऊर्ध्वरेषे, केंद्रीय नीती आयोगाच्या मिथेनॉल विषयक समितीचे सदस्य प्रशांत गुरुश्रीनिवास, द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट (TERI ) चे महासंचालक अजय माथूर, तसेच परिषदेचे निमंत्रक ए. बादुशा उपस्थित होते. 

‘पर्यायी इंधने तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल (फीड स्टॉक ) भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, त्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. मिथेनॉल उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोळशाच्या राखेपासून, भाताच्या, तसेच अन्य पिकांच्या ताटापासून किंवा जंगलात उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींपासून मिथेनॉलची निर्मिती करता येईल. मिथेनॉल इंधन वापरणाऱ्या वाहनाचा प्रति किलोमीटर खर्च खूपच कमी आहे,’ असेही गडकरी यांनी नमूद केले. 


या वेळी पेट्रोलमध्ये १५ टक्के मिथेनॉल मिसळण्याच्या शक्यतेची पडताळणी करण्याच्या कार्यक्रमाचा गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. पुण्यात ‘एआरएआय’मध्ये मिथेनॉल विषयक संशोधनासाठी रस्ते वाहतूक खात्याच्या निधीतून एक प्रगत संशोधन केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स ) सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. 

‘देशात शेती क्षेत्रात अतिरिक्त उत्पादन होत असताना अशा उत्पादनाचा वापर इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल अशा पर्यायी इंधनाची निर्मिती करण्यासाठी केला पाहिजे. अशी पर्यायी इंधननिर्मिती करणे उद्योगांना आर्थिकदृष्ट्या आकर्षक व्हावे यासाठी सरकार उपाययोजना करेल. पर्यायी इंधनाचे एक हजार कारखाने सुरू करता येतील एवढा कच्चा माल भारताच्या शेतीक्षेत्रातून मिळू शकेल आणि त्यातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटायला मदत होईल,’ असे गडकरी म्हणाले.


पुण्यासाठी मिथेनॉलवर चालणाऱ्या दहा बसेस 
मिथेनॉलवर चालणाऱ्या बसेसचा सार्वजनिक वाहतुकीत वापर वाढविण्यासंदर्भात चाचपणी करण्याकरीता गडकरी यांनी देशातील गुवाहाटी, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या शहरात प्रत्येकी १० याप्रमाणे ४० बसेस देण्यात येणार असल्याची माहिती दिली.      
 
‘एआरएआय’च्या संचालक डॉ. रश्मी ऊर्ध्वरेषे यांनी पेट्रोलमध्ये १५ टक्के मिथेनॉल मिश्रण करण्यासाठी होत असलेल्या चाचण्यांची माहिती दिली. असे मिश्र इंधन वापरून चाललेल्या वाहनांतून उत्सर्जन कमी होते; तसेच ही वाहने प्रति लिटर जास्त अंतर कापतात, असे निदर्शनाला आल्याचे त्यांनी सांगितले. ‘खास पाहणीसाठी चालवलेल्या दुचाकी, तीनचाकी आणि मोटारी यांच्यावर या चाचण्या झाल्या आणि आता चालू वापरातल्या  वाहनांवर या चाचण्या होतील’, असे त्या म्हणाल्या. 

गुरुश्रीनिवास म्हणाले, ‘मिथेनॉलचा इंधन म्हणून वापर यशस्वी झाला, तर २०३० पर्यंत भारताची कच्चे तेल आयात करण्याची गरज २० टक्क्यांनी कमी होईल. वीजनिर्मितीनंतर तयार होणाऱ्या कोळशाच्या राखेपासून मिथेनॉल उत्पादन करणारा एक प्रकल्प येत्या तीन वर्षात सुरू होणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. 

परिषदेचे निमंत्रक अकबर बादुशा यांनी उपस्थितांचे आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search