Next
निसर्गापासून प्रेरणा घेतलेले जैव वास्तुशास्त्र
BOI
Friday, May 17, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

निसर्गात असंख्य आकार दडलेले आहेत. निसर्गातील प्रत्येक वस्तूत सौंदर्य व गुणविशेष दडलेले आहेत. परंतु ते पाहण्यासाठी कला-सौंदर्यदृष्टी हवी, तरच गुणवैशिष्ट्यातील उपयुक्तता समजते. निसर्गात आढळणारे अनेक आकार प्रथमदर्शनी साधे वाटतात; पण त्यांचे रीतसर अवलोकन व अभ्यास केल्यास मानवी जीवनातील जटिल समस्यांचे उत्तर सहजपणे मिळून जाते. जैव अनुकृतीवर (बायो मिमिक्री) आधारित असलेली वास्तुशास्त्राची शाखा ‘जैव वास्तुशास्त्र’ या नावाने ओळखली जाते. त्याबद्दल लिहीत आहेत मुंबईतील ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे...
...........
निसर्ग हेच मानवाचे प्रेरणास्थान आहे. निसर्गात असंख्य आकार दडलेले आहेत. निसर्गातील प्रत्येक वस्तूत सौंदर्य व गुणविशेष दडलेले आहेत. परंतु ते पाहण्यासाठी कला-सौंदर्यदृष्टी हवी, तरच गुणवैशिष्ट्यातील उपयुक्तता आपणास कळून येईल. निसर्गात आढळणारे अनेक आकार प्रथमदर्शनी साधे वाटतात; पण त्यांचे रीतसर अवलोकन व अभ्यास केल्यास मानवी जीवनातील जटिल समस्यांचे उत्तर सहजपणे मिळून जाते. या साध्या-सोप्या रचनांतून टिकाऊ  (शाश्वत - सस्टेनेबल) व आरोग्यास लाभदायी ठरणारा पर्यायही सहजगत्या मिळू शकतो. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हवा तसा असलेला नेमका आकार शोधणे कठीण आहे; पण अशक्य नाही. अपेक्षित कल्पनेशी मिळताजुळता आकार मिळाला, की तडजोडीचा प्रश्न उरत नाही. कारण, मूळ नैसर्गिक आकारच परिपूर्ण असतो व तो आपल्या विचारावर स्थिर राहण्यास सहायक ठरतो. म्हणूनच, मानवी सर्जनशक्ती ही त्या मूलभूत विश्वशक्तीचा आविष्कार आहे. निरीक्षणातून मिळवलेला नैसर्गिक आकार विरूपित न करता त्याचा योग्य वापर करण्यात रचनाकाराचे कौशल्य असते! आपले जीवन अधिक सुखद करणाऱ्या सोप्या मार्गाचा शोध घेण्याची जिज्ञासा निर्माण करणारी वास्तुशास्त्राची नवीन शाखा ‘जैव वास्तुशास्त्र’ नावाने ओळखली जाते. (Biomimetic architecture)

साधारणतः १९८०च्या दशकापासून तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत चालले आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांत जलद गतीने बदल घडत आहेत. तंत्रज्ञानाच्या या वाटचालीमध्ये संगणक, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान (नॅनो टेक्नॉलॉजी), जनुक तंत्रज्ञान (जेनेटिक्स) आणि आण्विक शस्त्रे इत्यादींचा समावेश आहे. वाढत्या मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी एखाद्या इमारतीची रचना करताना अपेक्षित अंतर्रचना व आकर्षक बाह्याकार साधण्यासाठी वास्तुविशारद रूढीबद्ध भौमितिक आकार शोधतात. परंतु ठराविक साच्यातील आकारांमध्ये उद्दिष्टांची पूर्तता व सौंदर्याकार साध्य होतीलच, याची खात्री देता येत नाही. गैरसोय, तोडमोड व तडजोडीतून साधलेली जडणघडण वर्तमान शहररचनेतून दिसून येते. त्यामुळे एकमेकांवर अवलंबून असलेल्या शहर यंत्रणेवर दबाव पडून सर्व व्यवस्था कोलमडून पडतात! अंततः समस्याग्रस्त जीवन जगावे लागते. परंतु खासगी आणि व्यावसायिक इमारती जैव वास्तुशास्त्राला धरून बनवल्या, तर समाधानकारक उत्तर हमखास मिळते! 

पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव राहतात. मुंग्याही मानवाप्रमाणे मोठ्या संख्येत वसाहत करून राहतात. मानवाप्रमाणे त्यांनाही लहानमोठ्या नैसर्गिक बदलांमुळे घातपातासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा समस्यांवर मात करण्यासाठी त्यांनी अवलंबलेले उपाय शाश्वत व टिकाऊ आहेत, हे निरीक्षणातून सिद्ध झाले आहे. मुंगी किंवा मधमाशी या कीटकांच्या कार्यपद्धतीतून खूप शिकण्यासारखे आहे. मुंग्यांची वारुळे, शंख, शिंपले, विशिष्ट वृक्षांची पाने, तसेच फुले-फळांचा आकार व वैशिष्ट्यपूर्ण रचनेतून प्रेरित होऊन विदेशी वास्तुविशारदांनी जैवअनुकृतीवर (Bio Mimicry – बायो मिमिक्री) इमारतींची रचना करून पर्यावरण संतुलनातून मानवी जीवन सुकर केले आहे. असा प्रगतीशील विचार मांडणारी काही उदाहरणे पाहू या. 

इस्टगेट सेंटर आणि मुंग्यांचे वारूळ

आर्किटेक्ट माइक पीयरसलने आरेखित केलेले हरारे (झिम्बाब्वे) येथील ‘इस्टगेट सेंटर’ ही जैवअनुकृतीवर आरेखित केलेली जगातील पहिली इमारत असावी! निसर्गातील कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर करून मुंगीसारखे कीटक सुरक्षित घराची निर्मिती करतात. इस्टगेट सेंटर या बहुमजली व्यावसायिक इमारतीतील ‘वायुविजन’ व्यवस्था व तापमान वारुळात असते तशा नैसर्गिक वायुगमन नियंत्रण पद्धतीचा वापर करून नियंत्रित करण्यात आले आहे. 

लंडनमधील ‘द घेरकीन’ ही इमारत घेरकीन या एका प्रकारच्या काकडीच्या आकारावर आधारित आहे.

आर्किटेक्ट नॉर्मन फोस्टरने आरेखित केलेली लंडनमधील ‘द घेरकीन’ ही इमारत घेरकीन या एका प्रकारच्या काकडीच्या आकारावर आधारित आहे. इमारतीतील वायुविजन व्यवस्था समुद्री स्पंजमधील वायुविजन व्यवस्थेवर आधारित आहे. अद्वितीय वायुगमन व्यवस्थेमुळे इमारतीमध्ये होणारा ऊर्जेचा खर्च अन्य इमारतींतील उर्जेवर होणाऱ्या खर्चापेक्षा पन्नास टक्के कमी आहे. 

बाय द बे नेचर पार्कसिंगापूर येथील काँझर्व्हेशन आर्किटेक्ट विल्किन्सन आयरगार्डन याने नैसर्गिक वृक्षांच्या अनुकृतीवर आधारित ‘बाय द बे-नेचर पार्क’ साकारले आहे. त्याने शहरात बाग निर्माण करण्याऐवजी २३० एकर दलदलीच्या जागेतच शहर वसवले आहे! पावसाचे पाणी साठवून त्याच्या पुनर्प्रसारणाद्वारे बागेतील तापमान थंड ठेवण्यात आले आहे! याठिकाणाला २०१४मध्ये ६४ लाख पर्यटकांनी भेट दिली होती! 

लोटस टेम्पल आणि कमलपुष्प

आर्किटेक्ट फरिबोर्ज शाब याने नवी दिल्ली येथील लोटस टेम्पल कमलपुष्पाच्या आकारानुसार आरेखित केले आले आहे. स्वतःच्या आधारावर साकारलेल्या २७ संगमरवरी पाकळ्यांतून जो आकार साधला आहे, तो बहाई समाजाच्या धार्मिक विधीत वापरल्या जाणाऱ्या नऊ दिशांतील गोलाकारावर आधारित आहे. 

विश्वातील सर्व घटक पृथ्वी, आकाश, जल, अग्नी व वायू या पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत व ते स्वयंभू आहेत. ते निर्माण करता येत नाहीत की नाशही पावत नाहीत. मानवी शरीर व पृथ्वीवरील आठ दिशांचे गणित याच पाच तत्त्वांनी बनले आहे. भू-विज्ञानानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू या तत्त्वातूनच साकारली गेली आहे व अंततः ती निसर्गात विलीन होते, हा निसर्गनियम आहे. भारताच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनाऱ्याला लागून असलेल्या प्रांतांवर जलतत्त्वाची समृद्धी आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील पट्ट्यात नद्या, तलाव, पाणथळ जागा व कोंडपाणी असे अनेक जलस्रोत आहेत.

पृथ्वीच्या उत्पत्तीपासून पंचमहाभूतासंबंधी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचे कार्य मानवाकडून अविरत चालू आहे. भू-विज्ञान किंवा भू-रचनाशास्त्राच्या सखोल अभ्यासातून मानवाने आपले जीवन सुसह्य केले आहे. दूरवर निरीक्षण करू शकणाऱ्या दुर्बिणींच्या साह्याने आकाशातील सूर्यमालेचे व तारकांचे मानवी जीवनातील महत्त्व माणसाने जाणून घेतले. आकाशतत्त्वासंबंधी माहिती पुरवणाऱ्या इमारतीला तारामंडल (Planetarium) म्हणतात. जलतत्त्वासंबंधी आणि त्याच्या भौतिक व जैविक विविधतेची माहिती करून देणारे शास्त्र म्हणजे सागरीशास्त्र (Oceanology). आकाशाप्रमाणेच अथांग महासागरात दडलेल्या संपत्तीचे मानवास नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. सागरातील सजीव-निर्जीवांच्या अभ्यासाशी संबंधित शास्त्रास ओशनोग्राफी असेही म्हणतात. ओशनेरियम शब्दाची उत्पत्ती ओशन+अॅक्वेरियम या शब्दांपासून झाली आहे. ओशनेरियम म्हणजे जलजीवालय. सदैव पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना व वनस्पतींना नैसर्गिक पोषकतत्त्वे पुरवणारी, त्यांच्या वाढीस व प्रजोत्पादनास मदत करणारी कृत्रिम पेटी वा तत्सम इमारत. ही संकल्पना केवळ प्रत्यक्षदर्शनी जलजीवालयाशी (Oceanarium) निगडित आहे. 

पृथ्वीचा तीन-चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. भूगर्भात दडलेल्या खजिन्याप्रमाणेच महासागर हीदेखील नैसर्गिक संपत्तीची भांडारे आहेत. समुद्राच्या पाण्यात अनेक प्रकारचे जीव, वनस्पती, त्याचबरोबर खनिज तेल व वायूचे साठेही मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांचे जीवन समुद्री खाद्यान्नावर अवलंबून आहे. मासे, तसेच असंख्य सजीवांचा समावेश मानवी आहारात केला जातो. त्यात माशांचे प्रमाण सर्वाधिक आहे. समुद्रातील महाकाय प्राण्यांत शार्क, देवमासे व मानवाशी मैत्रीपूर्ण संवाद साधणारे डॉल्फिन यांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथील ‘तारापोरवाला मत्स्यालय’ लहान मुलांसाठी आकर्षण बनून राहिले आहे. पुण्यातील संभाजी पार्क येथेही मत्स्यालय उभे करणायत आले आहे. परंतु मनोरंजनापलीकडे या इमारतींना फारसे महत्त्व नाही. 

ओशनेरियममधील दृश्य

महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांब समुद्रकिनारा लाभला आहे. लांबीच्या तुलनेत रुढीबद्ध जलजीवालयांची संख्या खूपच कमी आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विदेशात विविध संकल्पनांवर आधारित जलजीवालये बांधण्यात आली आहेत. परंतु अधिकांश जलजीवालये केवळ पर्यटकांचे मनोरंजन करण्याइतपतच मर्यादित आहेत. आपल्याकडे अद्यापही जैविक विषयांत म्हणावा तितका अभ्यास किंवा संशोधन झालेले नाही. संपूर्णतः विदेशी संकल्पनांचे अनुकरण करण्याऐवजी भारतीय जीवनशैलीवर आधारित संकल्पना विकसित केल्यास, पूर्वजांनी जोपासलेल्या जैव विचारधारेला बळकटी देऊन तिला मान्यता दिल्यासारखे ठरेल. कोणतीही नवीन प्रणाली, प्रक्रिया, साहित्य, बांधणी किंवा सौंदर्य असो, त्याची शिकवण आपणास निसर्गातून मिळत असते. निसर्गातील जैव पैलूंचा बारकाईने शोध घेतल्यास आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अनेक जटिल प्रश्नांचे उत्तर सहजपणे मिळू शकते. समुद्र शाखेशी निगडित अभ्यासक व संशोधकांनी नैसर्गिक जलसमृद्धीची विशेष माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अनेक माध्यमांतून केला आहे. परंतु देश-विदेशातील महासागरातील जैविक संपत्तीची माहिती डिजिटल माध्यमाद्वारे देऊ शकेल, असा प्रकल्प महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर भारतासही नवीन आहे. समुद्रकिनारा लाभलेल्या बहुतांश राज्य सरकारांनी जलजीवालय (ओशनेरियम) बांधण्याचे घोषित केले आहे. परंतु आर्थिक वा इतर कारणांमुळे ती आजतागायत कार्यान्वित होऊ शकली नाहीत! अशा परिस्थितीत ‘डिजिटल ओशनेरियम’  हा पर्याय ठरू शकतो! 

सागरी कासव

मुंगी, मधमाशी व कासव यांसारख्या सजीवांची नैसर्गिक जीवनपद्धती, आकार व त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेच्या अभ्यासातून मानवी जीवन अधिकाधिक सक्षम व शाश्वत बनवता येते. मानवी वसाहत व मुंग्यांची वारूळरूपी वसाहत या रचनांत खूपच साधर्म्य आढळते. परंतु मुंग्यांचे वारूळ मानवी वसाहतीपेक्षा अधिक टिकाऊ व सक्षम आहे, हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. विदेशात समुद्रात आढळणाऱ्या विविध आकारांवर आधारित विदेशी आर्किटेक्ट्सनी जलजीवालये आरेखित केली आहेत. आपल्या पूर्वजांनी कासवाचे अनेक गुण हेरून त्याला मानवी जीवनातील प्रतीक म्हणून स्वीकारले आहे. जलतत्त्वाशी निगडित माहितीचे महत्त्व जाणून कासवाच्या अंतर्बाह्य शरीररचनेच्या अनुकृतीतून अत्याधुनिक अंकात्मक माहिती-तंत्रज्ञानावर आधारित असलेला जलजीवालयाचा आराखडा आरेखित करण्यात आला आहे. जैव वास्तुशास्त्रात निसर्ग व मानवाचे नाते किती जवळ आहे, याची प्रचिती या रचनेतून प्रस्तुत लेखकाने (वास्तुविशारद) अनुभवली आहे. 

बार्सिलोनामधील अॅक्वेरियम

मुंगी, मधमाशी, कासव अथवा असंख्य ज्ञात-अज्ञात जीव पृथ्वीवरील पर्यावरण संतुलित राहावे, म्हणून निरंतर कार्यरत असतात. ही दोन जगांना जोडणारी प्रतीकात्मक माध्यमे म्हणजे एकाच विश्वातील दोन टोके आहेत. पृथ्वीच्या गोल आकारामुळे एकाच क्षितिजाने ती जोडल्याचे दिसून येते. या दोन्ही जीवनपद्धती म्हणजे एकाच विश्वाच्या पाठीवर नांदणाऱ्या दोन व्यवस्था आहेत. ती एकाच क्षितिजाने जोडलेली आहेत, याचा प्रत्यय मोकळ्या मैदानात दिसून येतो! 

इडन प्रोजेक्ट, कॉर्नवॉल, इंग्लंड

आपणास योग्य वाटणाऱ्या नैसर्गिक जैव आकाराचा अभ्यास करून व्यावहारिक गणिते साधल्यास जीवनातील कठीण समस्या सोडवण्यास व पर्यावरण संतुलन टिकून राहण्यास मदत होते. प्रकल्पाची भव्यता, आकारमान, त्याचे व्यावहारिक फायदे यावर त्याचे यश आजमावण्यापेक्षा त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना व इतर सजीवांना नियोजित प्रकल्प सुसह्य आहे की नाही, याचा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. कोकणासारख्या नैसर्गिक वातावरणात जैतापूर किंवा नाणारसारख्या प्रकल्पापासून मानवी जीवन व जैवसृष्टी धोक्यात येणार असल्याची जाणीव अभ्यासक, संवेदनशील पर्यावरणतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमींना वेळीच झाली. त्यांनी वेळीच कडाडून विरोध केल्यामुळेच महाराष्ट्र शासनाला फेरविचार करणे भाग पडले. लोकजागृतीतून पर्यावरण जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न स्तुत्य आहे. 

जलजीवालय

माहितीलेखन हे योगदानाचे कार्य आहे असे मी मानतो. १६ मार्च २०१९ रोजी मुंबई विद्यापीठ, मुंबईतील विज्ञान भारती आणि पुण्यातील इंडियन मेरिटाइम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात समुद्री ध्वनिविज्ञान, प्राचीन ते वर्तमान अद्ययावत सागरी परिवहन आणि पाणबुडी तंत्रज्ञान यांची माहिती, या विषयात रुची असलेल्या विद्यापीठातील विद्यार्थीवर्गापुढे आणि अभ्यासक व तज्ज्ञांसमोर विस्तृतपणे मांडण्यात आली. प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी अभ्यासलेल्या गोष्टींचे पाठबळ, तसेच अनेक वर्षांपासून चालत आलेली भारतीय जीवनशैली, वर्तमान अत्याधुनिक अंकात्मक माहिती तंत्रज्ञान व जैव वास्तुशास्त्रावर आधारित स्थापत्याचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांतील घटकांपर्यंत पोहोचावे, या जाणिवेतून केलेला हा प्रयत्न!

संपर्क : चंद्रशेखर बुरांडे – fifthwall123@gmail.com

(चंद्रशेखर बुरांडे यांचे अन्य लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

हेही जरूर वाचा

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sushma Deodhar About 97 Days ago
खूपच छान उपक्रम..congrats
0
0
vivek garud About 97 Days ago
well researched article
0
0

Select Language
Share Link
 
Search