Next
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए...
BOI
Thursday, August 30 | 06:45 AM
15 0 0
Share this storyसंतोष भूमकर‘दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए’ असा विचार करणारे अनेक तरुण आज तयार होत आहेत, ही देशाच्या दृष्टीनं सुदैवाची गोष्ट आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या अंबडवेट गावचा संतोष भूमकर हा तरुण पोलीस अधिकारीही त्यापैकीच एक. स्वतः प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलिस उपनिरीक्षक बनलेल्या संतोषने आपल्या गावातल्या मुलांनाही पोलिस विभाग आणि सैन्यात भरती होण्याच्या दृष्टीनं मोफत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. त्यातून अनेकांची पोलिसांत निवडही झाली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांची उन्नती हेच जीवनाचं ध्येय असलेल्या संतोष भूमकरची गोष्ट जाणून घेऊ या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
.............


मोठेपणी कोण होणार, असं लहानपणी कोणी विचारलं तर डॉक्टर, पायलट, पोलीस अशी ठरावीक उत्तरं ओठांवर यायची. विशेषतः पोलिसांचा तो ऐटबाज युनिफॉर्म, हातातलं पिस्तुल, खांद्यावरची ती पदकं... चोर-पोलीस खेळातही चोर व्हायचं की पोलीस यावरून भांडणं व्हायची. मग हळूहळू मोठं होत असताना हिंदी चित्रपटांनी पोलिसांची वेगवेगळी प्रतिमा चित्रपटांमधून दाखवली. कधी ‘दीवार’मधला कर्तव्यदक्ष, प्रामाणिक पोलीस अधिकारी (शशी कपूर), तर कधी ‘शक्ती’मधला कर्तव्यापुढे नातीगोती न बघणारा कडक अधिकारी (दिलीप कुमार). असं बघत असतानाच सदाशिव अमरापूरकरसारखा व्यवस्थेला न जुमानता भ्रष्टाचार करणारा पोलिस अधिकारीदेखील याच हिंदी चित्रपटसृष्टीनं दाखवला. चित्रपटातली संकटं, त्यातला थरार, मारामारी सगळं काही संपल्यावर येणारी पोलिसांची जीपही याच हिंदी चित्रपटसृष्टीनं दाखवली. असं चित्रपटांमध्ये असलं, तरी वास्तव जीवनात मात्र संमिश्र अनुभव येत होते, दिसत होते. त्यामुळेच पोलीस अधिकाऱ्यांविषयीची प्रतिमाही मनात गोंधळ निर्माण करणारीच होती. मन नकारात्मक विचारांकडे जास्त गतीनं धावतं आणि त्याचमुळे पोलीस भ्रष्टाचार न करता, खरंच प्रामाणिकपणे काम करत असतील का, असे प्रश्न मनात निर्माण होऊ लागले आणि माझ्यासमोर उभा राहिला एक सावळासा तरुण!पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या अंबडवेट या एका लहानशा गावात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला संतोष भूमकर नावाचा हा तरुण आज पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे. मला माहीत असलेल्या खाणाखुणा त्याच्या चेहऱ्यामध्ये शोधण्यात मी गर्क झाले होते; पण मला तसं काही सापडेचना. म्हणजे त्याच्या डोळ्यांवरून मला तो लबाड वाटेना, त्याच्या साध्या राहणीमानावरून मला तो भ्रष्टाचारी वाटेना... त्याच्या विनयशील वागण्यामुळे मला तो मस्तवाल वाटेना... शेवटी जास्त विचार न करता मी त्याला जाणून घ्यायला सुरुवात केली आणि मी चकितच झाले. अतिशय बिकट परिस्थितीला तोंड देत देत संतोषनं शिकायला सुरुवात केली. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेणंही तितकंसं सोपं नव्हतं. त्यानं पिरंगुट इथं शालेय शिक्षण घेतलं. दहावीत संतोष चक्क नापास झाला होता. अंगी प्रामाणिकपणा असल्यानं कॉपी करण्यासाठी अनुकूल वातावरण असतानाही त्यानं कॉपी केली नाही. याच वेळी तो जीवन नावाच्या संस्थेच्या संपर्कात आला. या संस्थेच्या कामातून त्याला सामाजिक कामाची माहिती झाली आणि गोडीही लागली. या दरम्यान त्याच्याकडे काही गावांतल्या धरणग्रस्त लोकांची यादी करायचं काम सोपवण्यात आलं. या कामाच्या निमित्तानं त्याचं फिरणं झालं आणि गावागावांतल्या लोकांचे प्रश्न खूप जवळून समजून घेता आले. तसंच या लोकांसाठी झटणाऱ्या अनेक संस्था आणि माणसं यांच्याबद्दलही जाणून घेता आलं. 

त्यानंतर संतोष दहावीची परीक्षा पास झाला. बारावीमध्ये ६९ टक्के गुण मिळवून संतोषनं त्यानंतर पुण्यात विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात राहून ‘कमवा आणि शिका’ या योजनेंतर्गत काम करत गरवारे कॉलेजमधून कला शाखेतलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असतानाच एनसीसी आणि एनएसएस यांचीही गोडी संतोषला लागली. तसंच लहानपणापासून संतोषला व्यायामाची आवड आणि सवय असल्यानं त्याला ‘हाय प्लेसेस’ या गरुडमाची इथल्या प्रशिक्षण संस्थेत अर्ध वेळ नोकरी मिळाली. तिथेच त्याची ट्रेकिंगची आवडही जोपासली गेली. त्यानं तिथं राहून सगळे कोर्सेसही पूर्ण केले. ‘हाय प्लेसेस’चे वसंत वसंत लिमये यांची कामाची पद्धत, कामात दिलेलं स्वातंत्र्य, आपल्या सहकाऱ्यांशी मिळूनमिसळून वागणं या गोष्टी संतोषवर खूप प्रभाव टाकून गेल्या. नोकरी करत असतानाच संतोषनं पोलिसांत भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. संतोषला त्यात यश मिळालं आणि पोलीस म्हणून काम करण्यासाठी तो दाखल झाला. पोलीस विभागातली कामाची पद्धती सुरुवातीला संतोषला गरुडमाचीतल्या कामापेक्षा वेगळी वाटू लागली; पण हळूहळू त्यानं स्वतःला त्या वातावरणात जुळवून घेतलं. एक पोलीस म्हणून काम करत असतानाच संतोषला पुढल्या वाटाही खुणावू लागल्या. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करून पीएसआय (पोलीस सब इन्स्पेक्टर) व्हायचं असं स्वप्न तो रंगवू लागला. खरं तर संतोषसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणंही सोपं नव्हतं. नोकरी, घरातली आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणासाठीच्या सुविधा या सगळ्यांची हातमिळवणी करताना अनेकदा बिकट प्रसंग यायचे; पण संतोषचा निश्चय ठाम होता. सगळ्या अडचणींमधून वाट काढत संतोष स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढल्या परीक्षांमध्ये निवड होऊन तो पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाला. संतोषनं बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं. एक दहावी नापास मुलगा एक पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाला. 

वसंत वसंत लिमये यांच्यासह संतोष भूमकर

या प्रवासात त्याला त्याचे शाळेतले शिक्षक, विख्यात साहित्यिक आणि ‘हाय प्लेसेस’चे संचालक वसंत वसंत लिमये, पोलिस अधिकारी लक्ष्मीनारायण अशा अनेक चांगल्या लोकांनी साहाय्य केलं होतं, प्रोत्साहन दिलं होतं. पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. या लोकांमुळेच आपलं स्वप्न पूर्ण झालं याची जाणीव संतोषला होती आणि आजही आहे. तो विचार करत होता. आपल्याला ही माणसं भेटली म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो; पण आपल्यासारखे अनेक मुलं-मुली इथपर्यंत पोहोचू शकतीलच असं नाही, या विचारानं संतोष अस्वस्थ व्हायचा. कामाची जबाबदारी वाढली. कामाचं स्वरूपही बदललं; मात्र संतोषमधल्या तरुणाला आपला सगळा प्रवास आठवत राहायचा. आपल्यासारखी शेकडो मुलं पोलिसांत भरती होण्यासाठी, सैन्यात जाण्यासाठी तयारी करत असतात; पण त्यांना पुरेशी माहिती नसल्यानं आणि योग्य मार्गदर्शन नसल्यानं ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, ही गोष्ट संतोषच्या लक्षात आली होती. अशा मुलांसाठी काहीतरी करायला हवं हे त्याला कळत होतं; पण नेमकं काय करायचं, याचा मार्ग दिसत नव्हता. अखेर एके दिवशी संतोषनं हे काम आपलंच आहे आणि आपल्यालाच करावं लागणार आहे हे मनाला सांगितलं आणि आपल्या जवळच्या मित्रांजवळ बोलून दाखवलं. संतोषच्या कष्ट करण्याच्या स्वभावाला त्याचे मित्र जाणून होते. त्यांनी संतोषला ‘आम्ही तुझ्याबरोबर आहोत’ असं आश्वासन दिलं आणि संतोषनं शून्यापासून सुरूवात करून एका एका गोष्टीची आखणी सुरू केली. यातूनच संतोष आणि त्याच्या सात मित्रांनी सर्वज्ञ विकास प्रबोधिनीची स्थापना केली. 
संतोषनं याच वेळी पोलीस भरती, सैन्यभरती, स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी करावयाची पूर्वतयारी लिहून काढली. मुलांचं सामान्यज्ञान वाढावं यासाठी त्यानं अनेक पुस्तकं विकत घेतली आणि इतरांकडून मिळवली. त्यानंतर त्यानं गावाजवळच्या घोटावडे फाट्यावरच्या एका टेकडीवर याच मुलांना शारीरिक तंदुरुस्तीसाठीचं प्रशिक्षण मोफत द्यायचं ठरवलं. त्यासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींकरिता परिश्रम, चारित्र्य, सातत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जाणीव हे निकष त्याने ठेवले. या गोष्टींचं पालन करणारेच यशस्वी होऊ शकतात, याचा विश्वास संतोषनं या मुलामुलींना दिला. 

यानंतर पुढला टप्पा होता, नियोजित टेकडीवरचा भाग सपाट करणं, त्यावरचे दगडधोंडे काढणं, तिथे प्रशिक्षणासाठीची साधनसामग्री उपलब्ध करणं, अशा अनेक गोष्टी करायला हव्या होत्या. संतोषनं काम सुरू केलं. पाऊल उचललं की आपोआप वाट तयार होते म्हणतात, तसं संतोषच्या मदतीला त्याचे मित्र आले. ज्यांना शिकायचं होतं, परीक्षेची तयारी करायची होती असे अनेक तरुण-तरुणी श्रमदानासाठी सज्ज झाले. या सगळ्यांमधून टेकडीवर छानसं मैदान तयार झालं. एका ओसाड, दगडधोंड्यांनी भरलेल्या टेकडीचं रूप आज पूर्णपणे पालटलं आहे. संतोष या मुलामुलींना प्रशिक्षण देऊ लागला. त्यांची शारीरिक क्षमता चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करू लागला. लहान गावातली मुलं शहरी मुलांपेक्षा काकणभर सरसच असतात; मात्र त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो ही गोष्ट संतोषच्या लक्षात आली होती. सुरुवातीला फक्त पाच मुलं दाखल झाली होती. हळूहळू तो आकडा पन्नासवर गेला. संतोषच्या नोकरीमुळे संतोष किंवा त्याचे मित्र रोजच वेळ देऊ शकत नव्हते. अशा वेळी संतोषनं ‘यूथ फॉर यूथ’ असं म्हणत यातल्याच मुलांना प्रशिक्षित करून नव्यानं दाखल होणाऱ्या मुलांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. त्यामुळे प्रशिक्षणात कुठेही खंड पडत नव्हता. 

संतोषचा प्रामाणिकपणा, साधा, प्रेमळ स्वभाव यामुळे गावातल्या लोकांचाही त्याच्यावर विश्वास होता. आपल्या मुलांसाठी हा धडपड करतोय म्हटल्यावर अनेकांनी आपल्या मुलींनाही शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. यातूनच संतोषच्या टेकडीवर अनेक मुलीही सायकलवरून, पायी येऊ लागल्या. त्यांच्या अडचणी त्या संतोषजवळ व्यक्त करू लागल्या. जणू काही त्यांचं पालकत्वच घेतलं आहे, या भावनेतून संतोष त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. इतकंच नाही, तर काही मुलींची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्यानं त्यांना संतोषनं आपल्या घरातच राहायला निमंत्रित केलं. त्याच्या पत्नीनंही अतिशय आनंदानं होकार दिला. प्रत्येक मुलाशी संवाद साधणं, त्याची सुखदुःख जाणून घेणं आणि त्यातून काही मार्ग काढता येतो का हे बघणं हा संतोषच्या जीवनाचा भाग होऊन बसलाय. संतोषच्या सहवासात आल्यानं अनेक मुला-मुलींचं जगणं बदललंय. 

संतोष आणि संदीप (मध्यभागी) यांना पुस्तके भेट देताना लेखिका दीपा देशमुख

संदीप नावाच्या एका तरुणाला त्याच्याच गावातली मंडळी हा वाया गेलेला, हा गुंड अशा नजरेनं बघत होती; मात्र संतोषच्या सहवासानं संदीपमध्ये आमूलाग्र बदल झाला. त्यानं टेकडीवर येऊन परिश्रम करायला सुरुवात केली. अभ्यास करायला सुरुवात केली आणि आज या संदीपची गावचा पोलीस पाटील म्हणून निवड झाली आहे. आज गावातले लोक संदीपकडे अभिमानानं आणि आदरानं बघायला लागले आहेत. संतोषच्या गावाला आज आदर्श गावाचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. संतोषच्या प्रयत्नांना आता यश येतंय. त्याच्या टेकडीवर शारीरिक प्रशिक्षण घेणारी मुलं कौशल्यं प्राप्त करताहेत. तसंच पुस्तकं आणि अधूनमधून येणारे त्या त्या विषयातले तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्यामुळे शैक्षणिक पातळीवरची कौशल्यंही ही मुलं-मुली आत्मसात करताहेत. यातल्या अनेक मुला-मुलींची पोलीस विभागात निवडही झाली आहे. आपल्या या सगळ्या यशाचं श्रेय संतोषदादालाच आहे असं ते सांगतात. फक्त आपल्यापुरतं न पाहता, पोलिस खात्यातील अनियमित वेळेची कसरत सांभाळत संतोष नोकरीही करतोय. दुसरीकडे शनिवार रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी तो या मुलांसाठी काम करतोय. आपल्या गरजा मर्यादित ठेवून यापुढलं आपलं जगणं ग्रामीण भागातल्या मुलांच्या उन्नतीसाठीच खर्च करायचं, असं संतोषनं ठरवलं आहे. ही सगळी कामं करताना संतोषला प्रसिद्धीचा सोस नाही. कुठलाही गाजावाजा न करता त्याचं काम सुरू आहे. 
आज मुळशी तालुक्यात पोलीस भरतीचं वातावरण तयार झालंय. इथली मुलं जास्त संख्येनं या विभागात दाखल होताहेत. संतोष आपल्या एवढ्याशा पगारातून काही रक्कम नियमितपणे या मुलांसाठी खर्च करतोय. संतोषनं गावात ग्रंथालय सुरू केलंय. अतिरिक्त वाचनानं गावातली मुलं सुसंस्कृत तर होतीलच, पण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होईल, त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढीला लागेल, जात-धर्म या पलीकडे बघण्याची दृष्टी त्यांना प्राप्त होईल, त्यांच्यामधून सुजाण नागरिकांची जडणघडण होईल, अशी खात्री संतोषला वाटते. संतोषच्या या कार्यानं आनंदित होऊन वसंत वसंत लिमये यांनी संतोषला स्वतः काही पुस्तकं विकत घेऊन दिली. गावातली मुलं-मुली आता वाचायला लागली आहेत. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करायला लागली आहेत. ग्रंथ हा केवळ आपल्या गुरूचंच काम करत नाही, तर आपल्या एका जिवलग मित्राचं काम करतो ही गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आलीय. सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे चित्रपटांतून किंवा वरवर बघता आपल्याला दिसणारी पोलिसांची प्रतिमा आणि त्यांचं प्रत्यक्ष जगणं यात खूप तफावत आहे. आज एकीकडे सातवा वेतन आयोग वगैरेंमुळे काहींचे पगार भरमसाठ वाढलेले आहेत, तर पोलीस खात्यातल्या मंडळींचे पगार मात्र अगदी तुटपुंजे नाममात्र आहेत. त्यांच्या कामाच्या अनियमित वेळा, सुविधांचा अभाव, कामाचा ताण, भ्रष्टाचाराची साखळी आणि चहूबाजूंनी येणारा दबाव या सगळ्या वातावरणात काम करणारा पोलीस आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ कसं अबाधित ठेवत असेल, ही गंभीरपणे विचार करण्याचीच गोष्ट आहे. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देतच संतोष भूमकरसारखे काही तरुण पोलीस खात्याची शान उंचावत आहेत. एक माणूस म्हणून आपलं कर्तव्य निभावत आहेत. संतोषसारख्या अनेक ध्येयवादी प्रामाणिक तरुण-तरुणींना खरोखरच मानाचा मुजरा!

संपर्क : संतोष भूमकर
ई-मेल : santoshbhumkar5555@gmail.com
मोबाइल : ९८२३३ ५४४६६

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rajendra Athare About 82 Days ago
मस्त कामगीरी सर
0
0
Deepak Shinde About 82 Days ago
Inspired story
1
0
Mahesh About 82 Days ago
प्रेरणादायी..
0
0

Select Language
Share Link