Next
संगीत सरित्सागर
BOI
Sunday, August 26, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:आपल्याला संगीताच्या शास्त्राचे ज्ञान नसले, तरी सुश्राव्य संगीतामुळे स्वर्गीय आनंद होतो. हृदय प्रफुल्लित होते आणि अंगावर रोमांच उभे राहतात. त्याचे थोडेफार ज्ञान मिळाले, समजून उमजून गाणे ऐकले, तर त्याच आनंदाची श्रेणी वाढते. हळूहळू राग ओळखता येतात आणि त्यावर आधारित कुठल्याही प्रकारची गाणी चटकन लक्षात येतात. संगीताची किमया आणि ‘कानसेन’ घडविण्यासाठी उपयुक्त अशी संगीताबद्दलची माहिती देत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
.......
पं. विष्णू दिगंबर पलुसकरआपली शास्त्रीय संगीताची परंपरा फार प्राचीन आहे. हिंदुस्तानी आणि दाक्षिणात्य असे त्याचे दोन विभाग आहेत. भगवान शंकराने संगीतशास्त्राची निर्मिती केली, असे मानले जाते. ॐ हे त्याचे मूळ आहे. त्यालाच अक्षरब्रह्म, शब्दब्रह्म आणि नादब्रह्म असे म्हणतात. म्हणजे त्यात शब्द, नाद (चाल) आणि लय या तिन्हींचा समावेश होतो. संगीत ऐकण्यासाठी श्रोता हवाच. त्याशिवाय त्याला पूर्ण मानले जात नाही. वेदकालात लोकांना रागदारीचे ज्ञान होते. सामवेदातील ऋचा संगीतबद्ध आहेत. त्या तशाच (रागांमध्ये) म्हणाव्या लागतात. ‘सारेगमपधनी’मधील सात शुद्ध आणि पाच (विकृत) कोमल व तीव्र अशा बारा स्वरांवर सगळे संगीतशास्त्र आधारलेले आहे. मूळ (प्राचीन) संगीत २२ श्रुतींवर (स्वरांवर) बांधलेले होते. तो स्वतंत्र विषय आहे. सा, रे, ग, म इत्यादी प्रत्येक स्वर ठराविक कंपनसंख्येचा असतो.

पं. वि. ना. भातखंडेसंगीत हे शास्त्र म्हणून हळूहळू विकसित झाले. हजारो वर्षांपूर्वी मानवाने पशु-पक्षी आणि निसर्गात निर्माण होणाऱ्या आवाजांच्या श्रवणामधून स्वर निश्चिेत केले. सुरुवातीला आनंद व दु:खाच्या प्रसंगी माणूस गळ्यामधून लकेरी काढत असेल. त्याचे पुढे ठराविक नियमांच्या आधारे शास्त्र बनत गेले. हा काळ फारच मोठा असणार. पाठशाळा आणि गुरुकुलांमधून जशी वेदपठणाची परंपरा देशभर पसरली, तसेच संगीतशास्त्रही जाऊन पोहोचले. आपल्याला शास्त्राचे ज्ञान जरी नसले, तरी सुश्राव्य संगीतामुळे स्वर्गीय आनंद होतो. हृदय प्रफुल्लित होते आणि अंगावर रोमांच उभे राहतात. त्याचे थोडेफार ज्ञान मिळाले, समजून उमजून गाणे ऐकले, तर त्याच आनंदाची श्रेणी वाढते. हळूहळू राग ओळखता येतात आणि त्यावर आधारित कुठल्याही प्रकारची गाणी चटकन लक्षात येतात. तो शिक्षणाचा एक भागच आहे.

एम. एस. सुब्बलक्ष्मीप्रत्यक्ष मैफलींबरोबरच शास्त्रीय संगीताचा सर्वत्र प्रसार आणि आवड निर्माण करण्यात ‘आकाशवाणी’चा फार मोठा वाटा आहे. पुढे दूरदर्शननेही ते काम चालू ठेवले. उपशास्त्रीय संगीत, हिंदी-मराठी चित्रपट संगीत, नाट्यगीत, भावगीता यांसारखे हलकेफुलके संगीत यांच्याद्वारे शास्त्रीय संगीत आज आपल्याला ज्ञात झाले आहे.

पं. भीमसेन जोशीशेकडो रागांची निर्मिती बारा स्वरांमधून झाली. यातील सा आणि प हे स्थिर (शुद्ध) स्वर आहेत. कोमल मध्यम (म्) हा शुद्ध स्वर मानला जातो, तर तीव्र मध्यम विकृत आहे. ऋषभ, गंधार, धैवत, निषाद हे शुद्ध आणि कोमल असतात. त्यातील कोमल स्वरांना विकृत म्हणतात. कोणत्याही रागाच्या आरोह-अवरोहात (वर चढत जाणारे व उतरत येणारे) किमान पाच स्वर असावे लागतात. चार स्वरांचा राग बनत नाही. संगीतामध्ये गायन, वादन आणि नृत्य या प्रकारांचा समावेश होतो. त्यातील कोणत्याही कलेचे शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला बाकीच्या कलांचेही ज्ञान असावे लागते. शेकडो वर्षांपासून संगीताचे शास्त्रीय ज्ञान देणाऱ्या ग्रंथांची निर्मिती होत आली. १९-२० व्या शतकात काही गायकांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अकबराच्या काळातील तानसेन, बैजूबावरा आपल्याला ठाऊक आहेत. दक्षिणेत १६व्या शतकात हरिदास स्वामी हे प्रसिद्ध गीतकार आणि गायक होते. त्यांच्या नावाने दर वर्षी महोत्सव चालतो. तसेच बंगालमध्ये जयदेव अत्यंत लोकप्रिय होते. शास्त्रीय संगीतामधील संशोधन, ग्रंथनिर्मिती, शिक्षण आणि प्रसार करणाऱ्या आघाडीच्या कलाकारांची मांदियाळी पाहा. पं. विष्णू दिगंबर पलुसकर, पं. वि. ना. भातखंडे, पं. इचलकरंजीकर, उस्ताद अल्लादियाँ खान, अब्दुल करीम खान, पं. भीमसेन जोशी, बालगंधर्व यांच्यापासून ते हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, प्रभा अत्रे, किशोरी आमोणकर आणि कौशिकी चक्रवर्ती असे शेकडो कलाकार आहेत. उदाहरणादाखल थोडीच नावे दिली आहेत.

शास्त्रीय गायनाचे अनेक प्रकार आहेत. धृपद, धमार, खयाल, ठुमरी, गझल, होरी, कजरी, रवींद्र संगीत इत्यादी इत्यादी. तसेच गायकांची किराणा, आग्रा, जयपूर, ग्वाल्हेर, मेवाती, दिल्ली, पतियाळा इत्यादी प्रसिद्ध घराणी आहेत. ख्यातनाम गायक त्यांच्या घराण्यांवरून ओळखले जातात. हिंदुस्तानी आणि कर्नाटकी (दाक्षिणात्य) संगीतामध्ये काही भेद आहेत. आपण येथे हिंदुस्तानी संगीताचा विचार करत आहोत.

बिस्मिल्ला खानपहाटे कुठलेही आकाशवाणी केंद्र सुरू होताना भारतरत्न बिस्मिल्ला खान यांची सनई लागते आणि आपल्या दिवसाची मंगल सुरुवात होते. वर्षानुवर्षे हा क्रम चालू आहे. त्या वेळी ललत, गुजरी तोडी, भैरव बहार, प्रभात, जौनपुरी, आसावरी, गुणकली, देसकार हे राग नेहमी ऐकायला मिळतात. ते आता रक्तात भिनलेले आहेत. त्या रागांवर आधारित कोणतेही गाणे असले, तर लगेच लक्षात येते. ‘विविध भारती’वरील ‘संगीत सरिता’ हा दैनंदिन कार्यक्रम शास्त्रीय संगीताचे धडे देतो.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा आनंद घेणारे श्रोतेदिल्ली, कोलकाता, बनारस, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणी दर वर्षी संगीत महोत्सव साजरे होतात. त्यातील पुण्याचा ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव’ सर्वांचा मुकुटमणी आहे. भारतामधील सर्व आघाडीचे गायक-वादक-नर्तक त्या संगीतमंचावर आपली कला सादर करण्यात धन्यता मानतात. साधारण १० ते १५ हजार रसिक त्याला उपस्थित असतात. शास्त्रीय संगीत लोकप्रिय होण्यात ‘सवाई गंधर्व’चा फार मोठा वाटा आहे. अलीकडे प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी ‘वसंतोत्सव’ सुरू केला आहे. विशेष म्हणजे तिथे सर्वांना मुक्त प्रवेश आहे. तमिळनाडूतील ‘त्यागराज आराधना महोत्सवा’त हजारो कलाकार भाग घेतात. शेकडो लोक एकाच वेळी शास्त्रीय राग गातात, ही मोठी विलक्षण श्रवणीय गोष्ट असते.

पं. रविशंकरकोणताही राग दिवसाच्या कोणत्या वेळी गावा, याचे संकेत आहेत. त्याच काळात तो राग परिणामकारक ठरतो. दिवसाचे एकूण आठ प्रहर असतात. प्रत्येक प्रहर तीन तासांचा. पहाटे चारला पहिला प्रहर सुरू होतो. सकाळी सातला दुसरा इत्यादी. दुपारी १२ ते रात्री १२ या काळात गायल्या जाणाऱ्या रागांना ‘पूर्व राग’ आणि रात्री १२ ते दुपारी १२ या काळात गायल्या जाणाऱ्या रागांना ‘उत्तर राग’ असे म्हटले जाते. प्रत्येक रागाचे (१२ स्वरांपैकी) ठराविक स्वर असतात. सारखे (जवळजवळचे) स्वर असलेल्या रागांचे दहा विभाग पाडलेले आहेत. त्यांना थाट असे म्हणतात. म्हणजेच प्रत्येक थाटात ठराविक रागांचा अंतर्भाव होतो. ते थाट असे आहेत : बिलावल, खमाज, कल्याण, काफी, भैरव, मारवा, आसावरी, पूर्वी, भैरवी, तोडी

आता प्रत्येक थाटाची थोडी माहिती घेऊ.

बिलावल : यात सर्व स्वर शुद्ध आहेत. यातील राग - बिलावल, बिहाग, शंकरा, देसकार, दुर्गा, हंसध्वनी, बिहागडा, नट. गाण्याचा समय - रात्रीचा दुसरा प्रहर.

खमाज : सर्व स्वर शुद्ध, फक्त निषाद कोमल. यातील राग - खमाज, झिंझोटी, तिलंग, तिलक कामोद, देस, जयजयवंती, कलावती, जनसंमोहिनी, मधमाद सारंग, गौडमल्हार, रागेश्री, गारा. गाण्याचा समय - रात्रीचा दुसरा प्रहर.

कल्याण : मध्यम स्वर तीव्र, बाकी सर्व शुद्ध. यातील राग - कल्याण, यमन, यमन कल्याण, कल्याणचे अनेक प्रकार, (श्याम, पूर्वा, गोरख, जैन), भूप, चंद्रकांत, मारुबिहाग, हिंडोल, हमीर, केदार, कामोद, नंद, सारंग. गाण्याचा समय - रात्रीचा पहिला प्रहर.

काफी : गंधार व निषाद कोमल, बाकी सर्व शुद्ध. यातील राग - काफी, पिलू, सिंदुरा, शिवरंजनी, धानी, भीमपलास, पटदीप, जोग, बहार, बागेश्री, अभोगी कानडा, मल्हार. गाण्याचा समय - मध्यान्ह

भैरव : ऋषभ व धैवत कोमल, बाकी शुद्ध. यातील राग - भैरव, रामकली, कालिंगडा, जोगिया, बिभास, प्रभात. गाण्याचा समय - प्रात:काल (रात्रीचा तिसरा प्रहर)

मारवा : ऋषभ कोमल व मध्यम तीव्र, बाकी शुद्ध. यातील राग - मारवा, जैन, मालीगौरी, पूरिया कल्याण, पंचम, सोहनी, ललत, पूर्वा कल्याण, भटियार. गाण्याचा समय - संध्याकाळ (रात्र पूर्व).

आसावरी : गंधार, धैवत व निषाद हे कोमल, बाकी शुद्ध. यातील राग - आसावरी, जीवनपुरी, देसी, खट, वसंत, दरबारी कानडा, अडाणा. गाण्याचा समय - रात्रीचा तिसरा प्रहर. 

पूर्वी : ऋषभ, धैवत कोमल आणि मध्यम तीव्र, बाकी शुद्ध. यातील राग - पूरिया, श्री, गौरी, पूरिया धनाश्री. गाण्याचा समय - सूर्यास्तानंतर 

भैरवी : ऋषभ, गंधार, धैवत आणि निषाद हे कोमल, बाकी शुद्ध. यातील राग - भैरवी, सिंध भैरवी, मालकंस, चंद्रकंस, जोगकंस, भूपाल तोडी, बिलासखानी तोडी, वसंत मुखारी. गाण्याचा समय - रात्रीचा तिसरा प्रहर.

तोडी : ऋषभ, गंधार व धैवत हे कोमल आणि मध्यम तीव्र, बाकी शुद्ध. यातील राग - तोडी, गुजरी तोडी, मुलतानी, मधुवंती. गाण्याचा समय - दिवसाचा दुसरा प्रहर.

कर्नाटक संगीत प्रकाराचा विचार येथे केलेला नाही. तथापि, या दक्षिणात्य शैलीतील काही राग हिंदुस्तानी संगीतामध्ये रुजलेले आहेत. उदा. हंसध्वनी, किरवाणी, नारायणी, जनसंमोहिनी, चारुकेशी, शिवरंजनी इत्यादी. कानडी रागांच्या आधाराने आपल्याकडे नाट्यगीते, भावगीते आणि चित्रपटातील गाणी विपुल प्रमाणात तयार झालेली आहेत.

संगीतप्रेमींना परिचित असलेल्या रागांची संख्या २००च्या पुढे सहज जाईल. क्वचितच ऐकायला मिळणाऱ्या रागांना ‘अनवट’ असे म्हणतात. चला तर, एखाद्या संगीतविषयक पुस्तकाच्या आधारे शास्त्रीय राग आणि त्यावर आधारलेली गाणी ओळखायला सुरुवात करू या.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr.Sham Badave About
Nice knowledge regarding classical Rages.👍👍
0
0

Select Language
Share Link
 
Search