Next
जिद्दीची वीण घालून ‘तिने’ साकारले स्वप्न!
गरीब कुटुंबातील सावित्री बड्या कंपनीत फॅशन डिझायनर
BOI
Wednesday, July 10, 2019 | 02:02 PM
15 0 0
Share this article:

सावित्री बाळासो ममदापुरे

पुणे : मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा लढा सार्थ ठरवला आहे आणखी एका सावित्रीने. शेतमजुरी करून आयुष्य जगणाऱ्या, कुडाच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील सावित्री बाळासो ममदापुरे आज एका मोठ्या टेक्स्टाइल कंपनीत फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे. तिची जिद्द तिला इथपर्यंत घेऊन आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुललाट येथील बालोद्यान या संस्थेने केलेल्या सहकार्यामुळे सावित्रीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या खेडेगावात शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब घरात जन्मलेल्या सावित्रीला पहिल्यापासूनच शिकण्याची प्रचंड ओढ होती. कुडाच्या घरात राहणाऱ्या या सावित्रीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही दहावी, बारावीला चांगले गुण मिळविले. तंत्रज्ञ व्हायचे स्वप्न ती पाहत होती; पण घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आणि लहान भावाच्या शिक्षणासाठी तिला आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले. 


पुढे शिकण्याची तळमळ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिने २०१७मध्ये ‘बीए’ला प्रवेश घेतला. वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षा देण्याची वेळ आली, तेव्हा परीक्षेची फी भरण्यासाठी तिच्याकडे ३५० रुपयेसुद्धा नव्हते. ही गोष्ट बालोद्यान संस्थेचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार संजय खूळ यांच्या लक्षात आली. त्याच दिवशी सुदैवाने एक सुंदर योग जुळून आला. इचलकरंजी येथील ‘डीकेटीई’ या विख्यात संस्थेत फॅशन डिझायनिंगच्या अभ्यासक्रमासाठीची एक जागा प्रवेश रद्द केला गेल्यामुळे रिक्त झाली होती. याची माहिती संजय खूळ यांना मिळाली. अर्थात, ८० हजार रुपये फी आणि इतर शैक्षणिक खर्चाचा मोठा प्रश्न आ वासून उभा होता आणि निर्णय कळवायला हातात वेळसुद्धा नव्हता. त्या एका जागेसाठी खूप विद्यार्थी इच्छुक होते. त्या वेळी ‘बालोद्यान’ने तत्काळ निर्णय घेतला आणि सावित्रीचा प्रवेश निश्चित केला. 

अतिशय मेहनत घेऊन सावित्रीने दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम उत्तम रीतीने पूर्ण केला आणि आज तिला तमिळनाडूमधील तिरुपूर इथल्या स्टालवर्ट टेक्सटाईल्स या मोठ्या टेक्स्टाइल कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे.  

कुलभूषण बिरनाळे
‘सावित्रीच्या या प्रवासाला ‘बालोद्यान’ला साथ देता आली, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. येथून पुढच्या काळात अशा किमान १०० सावित्रींना घडवायचे स्वप्न उराशी बाळगून आहोत. त्यासाठी गरज आहे ती समाजाच्या सहकार्याची. अशी साथ मिळाली, तर दोन-चारशे रुपये फी भरायला, बसचा पास काढायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणाऱ्या सावित्रीच्या लेकी वाचतील, शिकून स्वावलंबी होतील. स्वतःच्या प्रगतीबरोबर कुटुंबाची, पर्यायाने देशाची प्रगती करतील,’ अशी भावना ‘बालोद्यान’चे कुलभूषण बिरनाळे यांनी व्यक्त केली. 


(‘बालोद्यान’च्या कार्याची ओळख करून देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search