Next
शिस्तप्रिय, कृषिभूषण - बाबूराव कचरे
BOI
Friday, September 07, 2018 | 04:30 PM
15 0 0
Share this article:

बाबूराव कचरेकारंदवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी, कृषिभूषण बाबूराव राऊ कचरे (वय ८५) यांचे नुकतेच निधन झाले. शून्यातून सुरुवात करून त्यांनी रोपवाटिका व्यवसायात स्वतःचा वेगळा लौकिक महाराष्ट्रासह अनेक राज्यांत निर्माण केला होता. राज्य सरकारने त्यांना कृषिभूषण पुरस्कारानेही गौरविले होते. शेती आणि समाजकार्यात त्यांचे नाव होते. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
........
सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील कारंदवाडी हे छोटे गाव. या गावामध्ये एक शेतमजूर म्हणून रस्ते, धरणाच्या कामावर पत्नीसह गुजराण करणारे बाबूराव कचरे म्हणजे कारंदवाडी आणि तमदलगे परिसरात एक शिस्तप्रिय शेतकरी म्हणून लौकिकास पात्र ठरले होते. त्यांचा उमेदवारीचा काळ डोळ्यासमोर आणला तर ते आठवडी बाजारात फिरून बैल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. बैलांचा हौश्या म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते. पुढे रस्त्याच्या कडेला असणारी छोटीशी पण कोरडवाहू शेती. शिरस्त्याप्रमाणे आपल्याच रानात आपण तयार केलेली तंबाखू, मिरचीची रोपे लावण्याचा पूर्वापार प्रघात होता. रानाच्या एका कोपऱ्यात शेणखताच्या ढिगारा पसरून निवड पद्धतीने बियाणे टाकून ही रोपे तयार केली जात असत. बाबूराव कचरे शासकीय कामावर जाऊन आल्यानंतर घरची शेती करत. पुढे त्यांनी आपल्या शेताच्या बांधाकडेला मिरची, वांग्याची रोपे तयार केली. आपल्या रानात लावून उरलेली रोपे इतरांना मोफत दिली. त्यांना त्याचा खूप फायदा झाला. त्यामुळे शेजाऱ्याबरोबर इतरही शेतकरी त्यांच्याकडून भाजीपाल्याची रोपे मागू लागले. यातून त्यांचे रोपवाटिकेच्या व्यवसायात पदार्पण झाले. 

सांगलीत दै. केसरीचे कार्यालय होते. त्या वेळच्या विधान परिषदेचे सभापती असलेले जयंतराव टिळक सांगलीत कामाच्या निमित्ताने येत असत. एकदा त्यांनी कचरे यांच्या शेताजवळ गाडी थांबवुन त्यांच्याकडील भाजीपाल्याची रोपे खरेदी केली. ती पुण्यात नेऊन परसबागेत लावली. त्यांना त्याची खूप फळे मिळाली. ही गोष्ट त्यांनी एकदा दै. केसरीमध्ये बाबूराव कचरे यांच्या फोटोसह छापली होती आणि त्यानंतर त्यांना हजारो शेतकऱ्यांकडून रोपांसाठी मागणी येऊ लागली. पुढे कचरे यांनी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला बियाणे पुरवठा करण्यास सुरुवात केली. यातून त्यांनी मोलमजुरी सोडून स्वतःची शेती सुरू केली. तिचा विस्तार केला. त्याचबरोबर रस्त्याकडेच्या जमिनीत वाफे टाकून रोपांचा व्यवसाय सुरू केला. काळानुरूप व्यवसायाचे स्वरूप बदलले. काळाची पावले अचूक ओळखण्यात त्यांचा हातखंडा होता. 

त्यांनी अल्पावधीत रोपवाटिकेच्या व्यवसायात जम बसविला. शिस्तीचा आणि सचोटीचा व्यवसाय हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. ‘लबाडीचा धंदा मी कधीच केला नाही,’ असे ते अभिमानाने सांगत असत. त्यांना परिसराता त्यांना लोक कचरेनाना या नावाने आळखू लागले. तीन मुलांनाही त्यांनी याच व्यवसायात स्थिरस्थावर केले. यशवंत, संभाजी, शिवाजी या तिन्ही मुलांना मिरजवाडी, कारंदवाडी आणि तमदलगे येथे व्यवसायाचा पाया घालून दिला. स्वतः कडक शिस्तीत त्यांच्याकडून कामे करून घेत. तिन्ही मुलांनी या व्यवसायाला आधुनिकतेचे वलय प्राप्त करून दिले. ते अल्पशिक्षित होते; मात्र धोरणी आणि मुत्सद्दी होते. काळानुरूप या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला. मुलांना विदेशात पाठवून या व्यवसायाची माहिती करवून दिली. ‘या व्यवसायातील हे धाडस हीच माझी खरी गुंतवणूक आहे,’ असे ते अभिमानाने सांगत असत. 

कचरेनानांनी रोपवाटिका व्यवसायाचे ज्ञान कधी आपल्यापुरते सीमित ठेवले नाही. त्यांनी या व्यवसायात उभे राहण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनातून आज शेकडो रोपवाटिका व्यवसायिक तयार झाले आहेत. या रोपवाटिकेवर येणाऱ्यांना नाना सौजन्यशीलतेची वागणूक देत; मात्र कोणी त्याचा गैरफायदा घेताना दिसले, तर त्याला तिथल्या तिथे झापत असत. त्यामुळे त्यांच्याविषयी अनेकांना आदरयुक्त दरारा वाटत असे. यामुळे अनेकजण त्यांच्यापासून चार हात दूर राहताना दिसत होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना कृषिभूषण पुरस्काराने गौरविले होते. 

कारंदवाडी (ता. वाळवा) येथील विकास सेवा सोसायटीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. परिसराच्या विकासात त्यांनी मोलाची भर घातली आहे. त्यांचा शेतीविषयक सल्ला घेण्यासाठी अनेक लोक त्यांच्याकडे सतत येत असत. मुलगा, सून जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला होता. आपल्यामागे आपली मुले आपला लौकिक वाढवतील, असे ते अनेकांना सांगत असत. त्यांनीही शेतीच्या अभ्यासासाठी अनेक राज्यांचा दौरा केला होता. नावीन्याचा ते सतत शोध घेत असत. 

‘शेती-प्रगती’चे नियमित वाचक
शेती-प्रगती मासिकाचा जन्मच मुळी कचरे मळ्यात एका कार्यक्रमाने झाला. बाबूराव कचरेनानांना वाचनाचा फार नाद होता. कधी शेती-प्रगतीचा अंक यायला उशीर झाला, की लगेच त्यांचा फोन यायचा. ते शेती-प्रगती मासिकाचे पहिल्या अंकापासूनचे नियमित वाचक होते. मासिकातील चांगल्या गोष्टी ते आवर्जून सांगत असत. रोखठोक बोलण्यामुळे वेळीच डोळ्यात अंजन घातले जायचे. 

एकदा ‘शेती-प्रगतीत’ ‘एक जमीन विकणे आहे,’ अशी जाहिरात आली होती. ती पाहिल्यानंतर त्यांना राग आला. आपल्या अंकात अशी जाहिरात अजिबात द्यायची नाही, अशी ताकीद त्यांनी मला दिली. खऱ्या भूमिपुत्राचे ते लक्षण होते, असे मी मानतो. 

- रावसाहेब पुजारी
संपर्क : ९८८१ ७४७३२५

(लेखक कोल्हापूरच्या शेती-प्रगती या मासिकाचे संपादक आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search