Next
तू प्यार का सागर है...
BOI
Sunday, October 29, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मन्ना डेआपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वराने अनेक गाणी चिरस्मरणीय करणारे गायक म्हणजे मन्ना डे. २४ ऑक्टोबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज घेऊ या त्यांनी गायलेल्या ‘तू प्यार का सागर है’ या गीताचा आस्वाद...
...........
दिवाळीची चाहूल देत ऑक्टोबर महिना सुरू झाला आणि दिवाळीचा आनंद देऊन तो संपत आला आहे. हा महिना अनेक चित्रपट कलावंतांची आठवण जागृत करणारा महिना! दिवाळीसंदर्भात काही विशेष गीते बघताना या महिन्याशी संबंधित असलेले किशोरकुमार, अशोककुमार, मन्ना डे, अमिताभ, रेखा अशा काही कलावंतांची गीते बाजूला ठेवावी लागली. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या आजच्या अखेरच्या रविवारी या कलावंतांपैकी मन्ना डे यांच्या एका ‘सुनहऱ्या’ गीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. २४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या स्मृतिदिन होऊन गेला आहे. 

चित्रपटप्रेमींचे प्रकार किती किती वेगळे! कोणी ‘रफी’चा भक्त, कोणी मुकेशचा चाहता! कोणी ‘तलत’साठी वेडे, तर कोणी ‘किशोर’चे फॅन! मन्ना डेंचा फॅन सहजासहजी सापडणार नाही. तरीही ‘लागा चुनरी में दाग...’ आवर्जून ऐकणारे भेटतात. ‘ए मेरे प्यारे वतन...’ कसे छान जमले आहे हे सांगणारे भेटतात. राज कपूरला मुकेशचा आवाज सूट होत असला, तरी ‘श्री ४२०,’ ‘चोरी चोरी’मध्ये शंकर-जयकिशन यांनी मन्ना डे यांचा आवाज वापरून राज कपूरचा हाही आवाज आहे हे सिद्ध केले. 

मन्ना डे म्हणजे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक के. सी. डे यांचे पुतणे! प्रबोधचंद्र हे त्यांचे मूळ नाव. केवळ काकांकडून मिळालेला वारसा मन्ना डे गात राहिले नाहीत, तर ते तसे जगलेही! आयुष्यभर त्यांनी परमेश्वराची पूजा समजून स्वरसाधना केली आणि मग त्या स्वरांचा उपयोग कोणी ‘प्यार की आग में तन बदन जल गया...’ अथवा ‘मैं तेरे प्यार का बीमार हूँ.... ’ अशी गाणी गाऊन घेण्यासाठी केला, तर कोणी ‘धरती कहे पुकार के...’ अथवा ‘उपर गगन विशाल....’ अशी अर्थपूर्ण काव्ये स्वरबद्ध करण्यासाठी केला. 

‘लागा चुनरी में दाग....’ ‘फूल गेंदवा न मारो...’, ‘छम छम बाजे पायलिया...’ अशी काही ही गाणी ऐकल्यानंतर मन्ना डे म्हणजे शास्त्रीय गीते गाणारा गायक असा आपला समज होतो; पण ही गाणी गाणाऱ्या मन्नादांनी ‘न जाने कहाँ तुम थे...’, ‘दिल का हाल सुने दिलवाला...’, ‘ए भाय जरा देखके चलो...’, ‘जिंदगी कैसी है पहेली...’ ही अशी विविध भावदर्शनाची गीते गायली आहेत हे पाहिल्यावर जाणवते, की अरे आपण समजतो तसे नाही. हा स्वर आपल्या रफीच्या, मुकेशच्या, तलतच्या रांगेत बसणारा आहे. आणि मग ‘कस्मे वादे प्यार वफा सब...’ अस्वस्थ करते; ‘अब कहाँ जाए हम...’ हा सवाल आपल्या जीवनातही अनेक वेळा उभा राहतो, हे लक्षात येते. ‘तुझे सूरज कहूँ या चंदा...’ या गाण्याचे वेगळेपण नजरेत भरते. ‘ओ मेरी जोहरजबी...’च्या आधीचा स्वर कानावर येताच कान टवकारले जाऊ लागतात.

मन्ना डे यांच्या गीतांबद्दल सांगावे तेवढे थोडेच आहे. त्यांच्या स्वराने, त्यांच्या गीतांनीही मनाला आधार दिलेला आहे आणि आजही दिला जातो. एक अशीच कातरवेळ! आयुष्याच्या उतरणीच्या दिवसातील अगर जीवनाच्या मधल्या टप्प्यावरील! गत घटना, प्रसंग, सुखाचे, दुःखाचे, मानाचे, अपमानाचे... सारे फेर धरून मनाच्या अंगणात नाचू लागतात. काय घडले आपल्या हातून, हा प्रश्न स्वतःलाच विचारला जातो आणि उत्तरही लगेच मिळते; पण ते एक नसते! मी केले ते बरोबर? मी चुकलोच जरा! ही स्वतःच्या चुकांची जाणीव झाली, की मन अस्वस्थ होते. पश्चात्तापाने मन भरून येते. प्रश्नांची साखळी पुढे येते; पण आपण अयोग्य का वागलो? आपल्याकडून माणसे का दुखावली गेली? आपण नेमके कोठून चुकत गेलो? आणि आज तरी हा प्रवास कोठे थांबला आहे? कोठे थांबणार आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधात असतानाच या गूढ जीवनाचा व ते देणाऱ्या परमेश्वराचा विचार करत असताना मन्नादांचा स्वर कानावर येतो...

लौटा जो दिया तूने चले जाएंगे जहाँ से हम


हे दयाघना, तू प्रेमाचा अथांग सागर आहेस. आम्ही त्या सागरातील (फक्त) एका थेंबासाठी आसुसलेले आहोत (कारण त्या एका थेंबातही प्रचंड शक्ती आहे. आणि हा एक थेंबसुद्धा न देता तू आम्हाला परत पाठवलेस, तर आम्ही या तुझ्या जगात कशाला राहावे? (आमचे जीवन व्यर्थच आहे)

घायल मन का पागल पंछी उडने को बेकरार 
पंख है कोमल, आँख है धुंधली, जाना है सागरपार 
अब तू ही इसे समझा राह भूले थे कहाँ से हम 

(हे आमच्या) मनाचे वेडे पाखरू कधी लोभाच्या, तर कधी मोहाच्या फांदीवर बसते (आणि हे असे बसणे योग्य नाही हे जाणवून ते) अस्वस्थही होते. (पण ते दुबळे आहे, तसेच वेडेही आहे. त्यामुळेच) हा भवसागर पार करून जाण्याची ताकद त्याच्या पंखांत नाही आणि नजरेलाही पुढचे काही स्पष्ट दिसत नाही. (म्हणून) आता तूच आमच्या मनाला सांग, की ते कोठून रस्ता चुकले होते. 
कळत नकळत घडलेल्या चुका, नंतरची पश्चात्तापाची भावना हे सारे काव्यरूपाने साकार करताना कवी शैलेंद्रची प्रतिभा फुलून येते व तो पुढील कडव्यात लिहितो...

इधर झूम के गाए जिंदगी उधर है मौत खडी 
कोई क्या जाने कहाँ  है सीमा उलझन आन पडी  
कानों में जरा कह दे के आए कौन दिशासे हम

हे मानवी जीवन सुख-दुःखाने भरले आहे. आशा माणसाला जिवंत ठेवते. प्रेम, धन, कीर्ती, मान, सन्मान यांचे मोह सांगतात, की अरे आनंदाने मस्त व्हावे असे हे जीवन आहे; पण या मायेच्या पसाऱ्यात गुंतलेल्या जीवाला हेही कळते, की या सर्वांचा शेवट आहे, त्या टोकाला मृत्यू उभा आहे. तेव्हा या जीवनाची सीमा कोणती आहे (अर्थात मृत्यू कधी येणार?) हे कोणालाच कळत नाही. ते एक कोडेच असते, न सुटणारे! म्हणून या जीवनाची वाटचाल कशी करायची, कोणत्या दिशेने करायची हे तू आमच्या कानामध्ये सांग!

दोनच कडव्यांचे हे गीत, नव्हे, ही प्रार्थना ‘सीमा’ (१९५५) या चित्रपटातील! पडद्यावर ही प्रार्थना गातात - बलराज साहनी! या अभिनेत्याचे नाव काढताच एक आदर्श, सात्विक, धवल प्रतिमा डोळ्यापुढे उभी राहते. ‘सीमा’ चित्रपटातील त्यांची भूमिका तशीच... अनाथाश्रम चालकाची होती. क्षणिक मोहाच्या मागे लागून त्या आश्रमापासून दूर जाऊ इच्छिणारी चित्रपटाची नायिका ‘नूतन’- चिडखोर, संतापी! या दोन टोकांचा उत्कृष्ट अभिनय या दोन कलावंतांनी या चित्रपटात अप्रतिमपणे साकार केला होता. या चित्रपटाच्या कथानकास अनुसरून शैलेंद्रने गीते लिहिली होती.

ती संगीतात बांधताना शंकर-जयकिशन यांनीही आपले अप्रतिम कौशल्य दाखवले होते. या गीताच्या सुरुवातीचे व्हायोलीनचे स्वर, नंतर पुढे या गीताचा एक मंद ठेका आणि या सर्व गोष्टींना अनुरूप असा मन्ना डे यांचा स्वर! त्याबद्दल काही वाचण्याऐवजी तो ऐकणे हा वेगळाच आनंद!

भूलोकीचे शापित गंधर्व असलेले मन्ना डे अखेरच्या काळात चित्रपटसृष्टीपासून खूप दूर होते; पण त्यांच्या गाण्यांमुळे ते आजही खूप जवळचे वाटतात! ‘सुनहऱ्या गीतां’चा हाही एक प्रकार असतो, नाही का?

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search