Next
भाषांच्या जंजाळात अडकलेला फेसबुकचा ‘स्वच्छाग्रह’
BOI
Monday, May 06, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

द्वेषयुक्त साहित्य आणि अन्य आक्षेपार्ह मजकुराच्या विरोधात फेसबुकने जोरदार अभियान सुरू केले आहे; मात्र आता या अभियानाला भाषांमुळे खीळ बसत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या स्मार्टफोनमुळे फेसबुकला अनेक नवे वापरकर्ते मिळाले खरे; मात्र त्यातून फेसबुकवरील साहित्यात नवनवीन भाषांची भर पडत आहे. यातूनच मजकुराची किंवा साहित्याची पडताळणी करण्याचे कामही अधिकाधिक जिकिरीचे बनत चालले आहे. त्यासाठी यंत्रांवर पूर्णपणे अवलंबून राहता येत नाही.
..........
घृणा आणि हिंसाचाराने भरलेल्या साहित्यावर पुरेसे निर्बंध न लादल्याबद्दल फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सातत्याने टीका होत असते. त्याला उत्तर म्हणून फेसबुकने द्वेषयुक्त साहित्य आणि अन्य आक्षेपार्ह मजकुराच्या विरोधात जोरदार अभियान सुरू केले आहे; मात्र आता या अभियानाला भाषांमुळे खीळ बसत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या स्मार्टफोनमुळे फेसबुकला अनेक नवे वापरकर्ते मिळाले खरे; मात्र त्यातून फेसबुकवरील साहित्यात नवनवीन भाषांची भर पडत आहे. यातूनच मजकुराची किंवा साहित्याची पडताळणी करण्याचे कामही अधिकाधिक जिकिरीचे बनत चालले आहे. 

आजच्या घडीला फेसबुकचे २.३ अब्ज वापरकर्ते आहेत आणि त्यांना १११ वेगवेगळ्या भाषांतून सेवा पुरवली जाते. या झाल्या अधिकृत भाषा. रॉयटर्स वृत्तसंस्थेने केलेल्या पाहणीत या व्यतिरिक्त ३१ मोठ्या भाषा आढळून आल्या. या भाषांना फेसबुकने अधिकृत मान्यता दिलेली नाही; मात्र या भाषांचा व्यवहारात वापर होतो. फेसबुकची मान्यता असलेल्या भाषा बोलणाऱ्या, परंतु त्या भाषेत नियम नसलेल्या भाषा बोलणाऱ्यांची जगभरातील संख्या ६५ कोटी २० लाख आहे, अशी एथ्नोलॉग या भाषिक विश्वकोशाची माहिती आहे. आता हीच गुंतागुंत कंपनीच्या जिवाशी आली आहे. कारण त्यामुळे फेसबुकला आर्थिक नुकसान होत आहे. आक्षेपार्ह मजकूर त्वरित काढला नाही, तर फेसबुकच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि ब्रिटन यांसारख्या देशांनी जाहीर केले आहे. यामध्ये तुरुंगवास आणि आर्थिक दंड यांसारख्या शिक्षांचा समावेश आहे. 

फेसबुकच्या वापरकर्त्यांनी कशी भाषा वापरावी किंवा आक्षेपार्ह मजकूर म्हणजे काय, हे सांगणाऱ्या मार्गदर्शक सूचना (कम्युनिटी स्टँडर्डस्) केवळ ४१ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या मार्गदर्शक सूचना महिन्यातून एकदा अद्ययावत करण्यात येतात. एखाद्या भाषेत वापरकर्ते या नियमांचा किती वापर करतात, या आधारावर त्यांचा अनुवाद करण्यात येतो. (मराठीत मला तरी या मार्गदर्शक सूचना सापडल्या नाहीत). 

कंबोडियाची अधिकृत भाषा ख्मेर आणि श्रीलंकेची सिंहली भाषा यांना फेसबुकच्या वतीने सध्या अनुवादासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे या देशांतील अशांत परिस्थिती. कंबोडिया गृहयुद्धातून नुकताच सावरला आहे, तर श्रीलंकेत गेल्या वर्षी झालेल्या दंगलीमागे फेसबुकवरून प्रसृत करण्यात आलेल्या खोट्या बातम्या होत्या, असे तेथील सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. अगदी गेल्या आठवड्यात कोलंबोत इस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अफवा पसरू नयेत यासाठी श्रीलंका सरकारने फेसबुकवर थेट निर्बंध घातले होते. 

भारतातही काही वर्षांपूर्वी ईशान्य भागातील हिंसाचाराबाबत विखारी अपप्रचार केल्याची बाब उघडकीला आली होती. बनावट छायाचित्रे, चित्रफिती आणि चिथावणीखोर मजकूर फेसबुकवर अपलोड करून हिंसाचाराला प्रवृत्त केल्याचा आरोप तेव्हा करण्यात आला होता. तसेच गेल्या वर्षी म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारामागेही फेसबुकवरून प्रसृत झालेले विखारी साहित्यच होते, असा ठपका राष्ट्रसंघाच्या चौकशी समितीने ठेवला होता. त्यानंतर फेसबुकने आपले नियम बर्मिज भाषेत उपलब्ध करून दिले असून, ही भाषा बोलणाऱ्या १००हून अधिक लोकांना कामावर ठेवले आहे. अशा प्रकारचे संघर्ष सुरू असलेल्या अन्य देशांमध्येही म्यानमारसाखीच परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. उदाहरणार्थ, आफ्रिकी देशांमध्ये सध्या अशीच परिस्थिती आहे. इथियोपियासारख्या देशात वांशिक संघर्षाची झळ पोहोचलेल्या देशात फेसबुकवरील विखारी प्रचार ही सर्वसामान्य गोष्ट आहे. यातील बहुतांश साहित्य हे अॅम्हारिक या भाषेत असते. फेसबुकची या भाषेला मान्यता आहे. परंतु त्या भाषेत मार्गदर्शक सूचना उपलब्ध नाहीत. 

आपल्या संकेतस्थळावरील साहित्याची पडताळणी करण्यासाठी फेसबुकने १५ हजार कर्मचाऱ्यांची फौज बाळगली आहे. ते निरनिराळ्या ५० भाषा बोलतात; मात्र गरज पडल्यास कंपनीच्या वतीने व्यावसायिक अनुवादकांची मदत घेण्यात येते. तसेच ३० भाषांमधील मजकुराची निश्चिती करण्यासाठी यांत्रिक साधनांची मदत घेण्यात येते. मनाई असलेल्या किंवा आक्षेपार्ह मजकुराला रोखण्यासाठी मुख्यतः स्वयंचलित सॉफ्टवेअरची मदत घेण्यात येते. या उपकरणांद्वारे सुमारे ३० भाषांमधील द्वेषपूर्ण सामग्री आणि १९ भाषांमधील दहशतवादी प्रचार निश्चित केला जातो. 

मग अडचण कुठे आहे? तर या यंत्रांनी उत्तम काम करायचे झाल्यास त्यांना प्रचंड प्रमाणावर डाटा पुरवावा लागतो. उदाहरणार्थ, एखाद्या भाषेतील शिवीगाळ, वाईट शब्द हे वेगवेगळ्या आवाजांत, वेगवेगळ्या पट्टीत आधी फीड करावे लागतात. त्याचे विश्लेषण करून संगणक त्याचा एक माहितीसाठा तयार करतो आणि त्या आधारे तसेच साहित्य पुन्हा आढळल्यास त्यावर कारवाई करतो; मात्र दुर्दैवाने आजच्या घडीला इंग्रजी किंवा स्पॅनिश यांसारख्या भाषा वगळल्या, तर असा प्रचंड माहितीसाठा उपलब्ध नाही, किंबहुना माहितीची टंचाईच आहे. त्यामुळे त्या भाषेत असे सॉफ्टवेअर विकसित करण्यास मर्यादा येतात, असे फेसबुकचे उपाध्यक्ष गाय रोसेन यांचे म्हणणे आहे. 

त्यामुळे अखेर फेसबुकची भिस्त राहते ती वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींवर. ज्या भाषांमध्ये कम्युनिटी स्टँडर्डस् उपलब्ध नाहीत किंवा त्यांचे आकलन चुकीचे होऊ शकते, त्या भाषांमध्ये अशा वेळी मोठी समस्या निर्माण होते. अन् याचा तोटा साहजिकच भारतासारख्या भाषांची विपुलता असलेल्या देशाला बसतो. 

फार दिवस नाही झाले.. गेल्या ऑक्टोबरमधील गोष्ट आहे. त्या वेळी अनेक पत्रकारांनी आपल्या पोस्टना स्पॅम म्हणून दाखविण्यात आल्याची तक्रार केली होती, राजकीय साहित्य सेन्सॉर करण्याचा आरोप केला होता. त्या वेळी अनेक खाती तात्पुरती निलंबितही करण्यात आली होती. ‘आमच्या प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह मजकुरावर अंकुश लावण्यासाठी आम्ही आमची यंत्रणा हाय अलर्टवर ठेवली आहे. ज्या देशांमध्ये निवडणुका आहेत अशा ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. हे काम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही पाने चुकून स्पॅममध्ये दाखविण्यात येत आहेत; मात्र अशा प्रकरणांमध्ये अपीलची प्रक्रिया अवलंबण्यात येऊ शकते,' असे त्या वेळी फेसबुकच्या वतीने सांगण्यात आले होते. 

हे महत्त्वाचे यासाठी, की फेसबुकचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात असल्याचे कंपनीने २०१७मध्ये जाहीर केले होते. म्हणून भारतात फेसबुकने १४०० कंटेंट मॉडरेटर्स ठेवले आहेत. ते आठ तासांच्या पाळीत काम करतात आणि प्रत्येक पाळीत फेसबुक व इन्स्टाग्रामवरील सुमारे दोन हजार पोस्टची पडताळणी करतात. याचाच अर्थ प्रत्येक पोस्टवर ते चार मिनिटे खर्च करतात; मात्र यासाठी त्यांना कमी पगार देण्यात येतो आणि अत्यंत तणावात काम करावे लागते, अशी त्यांची तक्रार असते. या संबंधातील बातम्या गेल्या वर्षी गाजल्या होत्या. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक दर दिवशी १० लाख खाती काढून टाकत आहे किंवा प्रतिबंधित करत आहे, असे ‘फेसबुक इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. 

गेल्या वर्षभरात फेसबुकला विविध वादांना सामोरे जावे लागले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी कंपनीची आजही धडपड चालू आहे; मात्र त्या बहुतेक समस्या यंत्रांशी संबंधित होत्या. भाषेची ही समस्या खऱ्या अर्थाने मानवी व्यवहाराशी संबंधित आहे. त्यातून फेसबुक कसे मार्ग काढते, यावरच त्याची वापरकर्त्यांशी मैत्री कायम राहील का नाही, हे अवलंबून आहे!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search