Next
रिक्षाचालक प्रकाश माने बनले वृक्षलागवडीचे प्रेरणादूत
BOI
Saturday, June 01, 2019 | 04:54 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : उपजीविकेसाठी प्रत्येक जणच वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय-नोकरी करतो; मात्र उपजीविकेच्या साधनाला सामाजिक जाणिवेची जोड देणारे फारच कमी असतात. दहिसर येथील रिक्षाचालक प्रकाश माने हे त्यातलेच एक आहेत. त्यांनी आपल्या रिक्षाला वेगवेगळी १० रोपे लावून अनोख्या पद्धतीने सजविले असून, या माध्यमातून ते वृक्ष लागवडीचा संदेशही देत आहेत. त्यामुळे ते वृक्षलागवडीचे प्रेरणादूत ठरले आहेत. 

आपल्या या आगळ्यावेगळ्या रिक्षाबद्दल सांगताना माने म्हणाले, ‘वेगवेगळ्या रोपांनी सजवलेली माझी रिक्षा जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा ती लोकांना खूपच आवडते. रिक्षात बसणारे लोक म्हणतात, आम्हाला रिक्षात नाही तर उद्यानात बसल्यासारखे वाटते. मनाला खूप प्रसन्नता आणि आनंद मिळतो. लोकांच्या या प्रतिक्रिया मला खूप प्रोत्साहित करतात. आपल्या सगळ्यांनाच झाडांची आणि निसर्गाची खूप ओढ असते. दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोक माझ्या रिक्षात कधी पंधरा मिनिटे, कधी अर्धा तास, तर कधी एक तास बसतात. मग मी त्यांना कुठल्या प्रकारे आनंद देऊ शकतो याचा मी विचार केला आणि मग प्लास्टिकचे फुले, रंगीबेरंगी पताका लावण्यापेक्षा ती अधिक सजीवपणे उठून दिसण्यासाठी माझ्या रिक्षाला वेगवेगळ्या ठिकाणी मध्यम आणि लहान उंचीची १० रोपे बांधून घेतली. यात पांढरे तगर आहे, जास्वंद आहे, तुळस आहे, मनीप्लांट आहे, कढीपत्त्याचे रोप आहे आणि इतरही रोपे आहेत.’

‘माझ्या घरात आईसह माझी पत्नी आणि तीन मुले असून, त्यांना सगळ्यांना झाडे लावण्याची खूप आवड आहे. आम्ही केतकीपाडा, दहिसर येथील आदिवासी पाड्यात राहातो. निसर्गाच्या सान्निध्यात राहात असल्याने झाडांची आवड होतीच. त्यातून ही कल्पना सुचली. लोकांना माझी रिक्षा खूप वेगळी वाटते. सिग्नलला थांबलो, तर लोक रिक्षाजवळ येऊन ‘सेल्फी’ काढतात, गाडीत बसलेले लोक गाडीतून हाताने ‘खूप सुंदर’ असे सांगतात. एवढेच कशाला, रिक्षात बसणारे लोक रोपांसाठी पैसे देतात. म्हणतात - आमच्या नावाने रिक्षात एक रोप लावा. एका प्रवाशाने ५० रुपये काढून दिले आणि म्हणाला, आणखी एखादे चांगले रोप विकत घ्या आणि रिक्षाला लावा. अशी ही माझी रिक्षा वेगळी असून, ती वृक्षलागवडीचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देते. तिला पाहून लोकांना आनंद होतो आणि त्यांच्या आनंदात मी आनंदी होतो.’

माने यांच्या या अनोख्या छंदाची दखल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. ते म्हणाले, ‘पोटापाण्यासाठी लोक विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय करतात; पण हे करत असताना सामाजिक भान जपून पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येणारे, हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्षलागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात.’ 


‘वन विभागाने तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून, आतापर्यंत १७ कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पांतर्गत राज्यात २१ कोटींहून अधिक लागवड झाली आहे. येत्या पावसाळ्यात आपल्या सर्वांना मिळून ३३ कोटी वृक्ष लागवड करावयाची आहे. राज्य दुष्काळाने त्रस्त असताना अधिकाधिक वृक्ष लावून पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीत मुरवण्यासाठी आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा होणे गरजेचे आहे. प्रकाश माने यांच्यासारखी माणसे या मोहिमेचा आधार असून, हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचे ते खरे शिल्पकार आहेत असे मला वाटते,’ असे मुनगंटीवार म्हणाले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search