Next
वाढता वाढता वाढे... मराठीचा टक्का!
BOI
Monday, July 02 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सन २००१च्या जनगणनेच्या तुलनेत २०११च्या जनगणनेमध्ये मराठी ही मातृभाषा असलेल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणजेच मराठी ही माझी मातृभाषा आहे, हे सांगणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मराठी संपली, मराठी मृतप्राय झाली, अशी हाकाटी घालणाऱ्यांना ही चपराक आहे. भाषेच्या दृष्टीने विचार करण्यासारख्या आणखीही अनेक गोष्टी या अहवालात आहेत. त्यांचे विश्लेषण करणारा हा लेख... 
..............
देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीने तेलुगूला मागे टाकून तिसरे स्थान मिळवले आहे, अशी सर्व मराठी जनांना सुखावणारी एक बातमी गेल्या आठवड्यात झळकली. भारतीय जनगणनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली होती. देशामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा आणि मातृभाषा यांबाबत २०११ साली झालेल्या जनगणनेवर हा अहवाल आधारित आहे.

हा अहवाल सांगतो, की सन २००१च्या जनगणनेत मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. ते २०११ मध्ये ७.०९ टक्क्यांवर पोहोचले. या अहवालानुसार, तेलुगू भाषा चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. त्या आधीच्या म्हणजे २००१च्या जनगणनेनुसार तेलुगू भाषा बोलणारे ७.१९ टक्के लोक होते. ते आता ६.९३ टक्क्यांवर आले आहेत. अन् याच तेलुगू भाषेची जागा आपण घेतली आहे.

हिंदी आणि तिच्या विविध बोलीभाषा भारतात सर्वांत अधिक बोलल्या जातात आणि ५५ कोटींपेक्षा जास्त भारतीय ती आपली मातृभाषा असल्याचे सांगतात. अनेक दक्षिण भारतीय भाषा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषकही मागील दशकापेक्षा वेगाने वाढले असले, तरी देशातील एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीत त्यांचा टक्का घसरत आहे. 

हिंदी ही भारतातील सुमारे ४३ टक्के लोकांची  मातृभाषा असून, तिच्या खालोखाल क्रमांक असलेली बंगाली भाषा आपली मातृभाषा असल्याचे आठ टक्के लोकांनी सांगितले आहे. त्यानंतर आपल्या मराठीचा क्रमांक येतो आणि सात टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी ही आपली ‘माय’बोली असल्याचे सांगितले आहे. यामुळे मराठीच्या अभिमान्यांचा ऊर भरून यायला हरकत नाही. 

देशातील २२ अनुसूचित भाषांपैकी संस्कृत ही सर्वांत कमी बोलली जाते. फक्त २५ हजार लोकांनी ही आपली मातृभाषा असल्याचे म्हटले आहे. यात काही नवीन नाही. परंतु त्यामागची वस्तुस्थिती वेगळी आहे. ते कसे ते पुढे सांगतो. जनगणनेच्या दृष्टीने ‘मातृभाषा’ म्हणजे ‘एखाद्या व्यक्तीच्या आईने त्या व्यक्तीच्या बालपणी तिच्याशी संवाद साधण्यासाठी वापरलेली भाषा’ अशी व्याख्या केलेली आहे. या अहवालात अनुसूचित आणि बिगर अनुसूचित भाषांमध्ये फरक केला जातो. अनुसूचित भाषा म्हणजे राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भाषा. 

... मात्र या वरवरच्या माहितीपलीकडेही या अहवालात अनेक रंजक बाबी आहेत. भाषाप्रेमींनी त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. दक्षिणी राज्यांमध्ये हिंदी, बांगला आणि आसामी बोलणाऱ्यांची संख्या वाढल्याचेही हा अहवाल सांगतो. तसेच उत्तर भारतात तमिळ आणि मल्याळम भाषकांची संख्या घटल्याचे त्यातून दिसते. दक्षिणी राज्यांतून उत्तरेकडे रोजगाराच्या संधींमुळे लोंढे येण्याची आतापर्यंत प्रथा होती. ती मोडीत निघत असल्याचे त्यातून स्पष्टपणे दिसते. आता हे लोक कुठे जात आहेत, हेही या अहवालाचा अभ्यास केल्यावर दिसते. कर्नाटक राज्यात तमिळ आणि मल्याळम भाषकांचा ओढा वाढल्याचे त्यातून कळते. त्यामुळे हिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध बोलणाऱ्यांना आणखी एक संधी मिळाली आहे. 

तसेच या अहवालात आणखी एक गंमत आहे. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या देशातील सर्वांत जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहेत. यातील कन्नड वगळता बाकी सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे; मात्र या भाषांचा टक्का घसरला आहे. अन् याला कारण आहे हिंदीभाषक राज्यांमध्ये असलेला लोकसंख्येचा वाढता दर. दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकसंख्यावाढीचा दर कमी आहे. त्यामुळे त्या भाषांची वाढही कमी दराने होत आहे. याउलट हिंदी भाषक राज्यांची स्थिती आहे.

तेलुगुप्रमाणेच मल्याळम आणि तमिळ भाषकांचीही टक्केवारी घटली आहे. मल्याळम भाषकांची संख्या ३.२१ टक्क्यांवरून २.९७ टक्के आणि तमिळ भाषकांची संख्या ५.९१ टक्क्यांवरून ५.८९ टक्क्यांवर आली आहे. या क्रमवारीत तमिळला पाचवे, तर मल्याळमला दहावे स्थान मिळाले आहे.

वर संस्कृतचा उल्लेख केला आहे. संस्कृत ही सर्वांत कमी बोलली जाणारी भाषा असली, तरी २००१च्या जनगणनेच्या तुलनेत तिच्या भाषकांची संख्या ७५.६० टक्क्यांनी वाढली आहे. त्या वेळी संस्कृत भाषकांची संख्या १४ हजार एवढी होती. कोणत्याही अनुसूचित भाषेपैकी सर्वांत जास्त वाढ संस्कृतचीच आहे. 

ज्याप्रमाणे हिंदी भाषकांचा टक्का त्यांच्या लोकसंख्येच्या जास्त दरामुळे असू शकतो, तसाच बंगाली भाषकांचा टक्का वाढण्यामागेही बांगलादेशातून आलेले घुसखोर किंवा निर्वासित असू शकतात. ती शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे पहिल्या दोन भाषांच्या वाढीची कारणमीमांसा केल्यानंतर आपण मराठीकडे पाहतो, तेव्हा खरोखर आश्चर्याचा धक्का बसतो. मराठी संपली, मराठी मृतप्राय झाली अशी हाकाटी घालणाऱ्यांना ही मोठीच चपराक आहे. मराठी ही माझी मातृभाषा आहे, हे सांगणाऱ्यांची संख्या वाढते आहे, हेही त्यातून दिसून येते. 

एकेकाळी मुंबई ही दक्षिण भारतीय लोकांची पहिली पसंती असायची. मुंबईसोबतच उर्वरित महाराष्ट्रही त्यांना जवळ वाटायचा. शिवसेनेचे मराठी भाषकांच्या हितासाठी म्हणून झालेले पहिले आंदोलन दक्षिण भारतीयांविरोधातच झाले होते. परंतु मुंबई आणि महाराष्ट्रात कन्नड, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम या सर्व दक्षिण भारतीय लोकांची संख्या घटली आहे.

तसेच महाराष्ट्राच्या दृष्टीने या अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब आहे. त्याची चिंता करायची का नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. देशातील सुमारे २.६ लाख लोकांनी इंग्रजी ही आपली मातृभाषा असल्याचे नोंदविले आहे. सन २००१च्या तुलनेत ही वाढ तबब्ल १४.६७ टक्के एवढी आहे. या अडीच लाखांपैकी सुमारे एक लाख लोक महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल तमिळनाडूमध्ये २५ हजाप आणि कर्नाटकात सुमारे २३ हजार लोक असे सांगणारे होते.

याचाच अर्थ मराठी धोक्यात आहे, मराठीवर आक्रमण होत आहे, इत्यादी रडगाणे गाणाऱ्यांनी आता आपले मत तपासून पाहायची वेळ आली आहे. मराठी ही वर्धिष्णुच आहे. मराठीचा टक्का वाढतोच आहे – शाळांमध्येही आणि व्यवहारातही. गरज आहे ती फक्त तिचा न्यूनगंड मनातून काढून टाकण्याची.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link