Next
रस्त्यातील खड्डे त्वरित बुजविण्याचे निर्देश
प्रेस रिलीज
Thursday, July 27, 2017 | 02:53 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : गणेशोत्सव काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी या मार्गावरील रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करून, येत्या पाच ऑगस्टपर्यंत ही दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

गणेशोत्सव काळात रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या भाविकांसाठी रस्ते दुरुस्तीसंदर्भात विधान भवानमध्ये पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दीपक केसरकर, रवींद्र वायकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह कोकणातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील म्हणाले, ‘गणेशोत्सव काळात पनवेल ते झाराप मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच अतिवृष्टीमुळे या महामार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणात पडत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गणेशभक्तांना त्रास होतो. त्यामुळे येत्या पाच ऑगस्टपर्यंत या महामार्गावरील सर्व खड्डे युद्धपातळीवर बुजविण्यात यावेत. तसेच गणेशोत्सव काळात या मार्गावर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर खड्डे बुजविण्याची यंत्रणा व मनुष्यबळ तयार ठेवावे, जेणेकरून रस्त्यात खड्डे पडल्यास ते तातडीने भरून वाहतूक सुरळीत करता येईल. खड्डे बुजविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. येत्या पंधरा दिवसांत खड्डे बुजविण्याची कार्यवाही पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.’
‘मुंबई-गोवा महामार्गाच्या भूसंपादनाचे व इतर अनुषंगिक कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या चौपदरी महामार्गाचे काम वेगाने सुरू करण्यात येत असून, येत्या दोन वर्षांत ती कामे पूर्ण करण्यात येणार आहेत,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.

रावते म्हणाले, ‘गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा ८०० गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच अवैध वाहतुकीवरही कारवाई करण्यात येणार आहे.’

मंत्री कदम, केसरकर, वायकर यांनीही खड्डे बुजविण्यासंदर्भात या वेळी वेगवेगळ्या सूचना केल्या.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search