Next
राग आणि गानसमय
BOI
Tuesday, April 09, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


तुम्हांला ऐकून माहिती असेल, की आपल्या भारतीय संगीतात गायल्या जाणाऱ्या प्रत्येक रागासाठी दिवसातील ठरावीक वेळ निश्चित केलेली असते. ‘हिंदुस्थानी’ आणि ‘कर्नाटक’ या भारतातल्या दोन्ही संगीत पद्धतींमध्ये अनेक राग गायले-वाजवले जातात. त्या प्रत्येक रागाच्या सादरीकरणासाठी, ठराविक वेळ सुचवलेली असते. काय असतात या वेळा? त्या त्या वेळेला ते ते राग गाण्याचं काय बरं महत्त्व आहे? ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत रागांच्या गानसमयाबद्दल...
......................
दिवसाचे २४ तास आठ प्रहरांमध्ये विभागलेले असतात. प्रहर म्हणजे तीन तासांचा कालावधी. म्हणून दिवसाचे आठ प्रहर असतात. सकाळी सूर्योदयापासून विचार केला, तर अंदाजे सकाळी सहा ते नऊ हा दिवसाचा पहिला प्रहर म्हणता येईल. याप्रमाणे नऊ ते १२ हा दुसरा प्रहर, १२ ते तीन हा तिसरा प्रहर आणि तीन ते सायंकाळी सहा हा चौथा प्रहर. असे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसाचे चार प्रहर मानले आहेत. 

सूर्यास्तानंतर सहा ते नऊ हा रात्रीचा पहिला प्रहर, नऊ ते १२ दुसरा प्रहर, १२ ते तीन तिसरा प्रहर आणि पहाटे तीन ते सहा हा रात्रीचा चौथा प्रहर. याप्रमाणे एक वर्तुळ पूर्ण होतं. म्हणूनच एखादा माणूस दिवस-रात्र कामाचा विचार करत असला, तर तो अष्टौप्रहर कामाचाच विचार करतो, असं म्हणण्याची पद्धत आहे. या प्रत्येक प्रहरानुसार आपल्या भवतालच्या निसर्गात बदल होत असतात. त्यानुसार आपल्या शरीरावर त्याचे परिणाम जाणवतात. त्याचप्रमाणे मनातील भावभावनांमध्येही दिवसभरात बदल होत असतात. 

निरनिराळ्या रागांमध्ये लागणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या स्वरांमुळे, रागाच्या सादरीकरणात प्रत्येक रागाचा एक विशिष्ट मूड तयार होत असतो. त्यालाच रस असंही म्हणतात. शांतरस, करुणरस, शृंगाररस, वीररस असे वेगवेगळे रस (मूड्स) वेगवेगळ्या रागातील स्वरांमुळे तयार होतात. विशिष्ट रागातून निर्माण होणारा रस आणि दिवसाच्या विशिष्ट प्रहरी मनातील भावभावना यांचं नातं पाहता, कोणता राग कोणत्या वेळी गायला-वाजवला, तर तो अधिक परिणामकारक होतो, याबद्दलचं मार्गदर्शन म्हणजेच रागाच्या प्रस्तुतीकरणासाठी सुचवलेला समय.

आपण जेव्हा शहरी कोलाहलापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात असतो, त्या वेळी हे परिणाम आपल्याला अधिक प्रकर्षानं जाणवतात. कल्पना करा, की सूर्योदयाची वेळ आहे, गावाबाहेर मोकळ्या जागी किंवा नदीकिनारी तुम्ही उभे आहात आणि भैरव रागाचे धीरगंभीर स्वर कानी पडले. अशा वेळी भैरवातल्या त्या कोमल ऋषभ आणि कोमल धैवतामुळे साऱ्या आसमंतात एक प्रकारची प्रसन्नता, एक ताजेपण भरून राहिल्यासारखं वाटतं. सूर्याच्या कोवळ्या किरणांतली प्रसन्नता सुरांमुळे अधिक गहिरी होऊन जाते. अतिशय तरल मनाने अनुभवण्याची ही स्पंदनं आहेत. सकाळच्या वेळी ‘तोडी’, ‘ललत’, ‘बिभास’ हे राग सादर केते जातात.

दिवस अधिक वर आला, की ‘बिलावल’, ‘जौनपुरी’, ‘आसावरी’, तर दुपारी ‘भीमपलास’, ‘सारंग’, ‘गौडसारंग’ यांसारखे राग मनाला आनंद देतात. याउलट संध्याकाळच्या कातरवेळी, आपल्याला आपल्या प्रियजनांची जास्तच आठवण येत असते. समजा आपण कामानिमित्त एकटेच बाहेरगावी आहोत, आपली प्रिय व्यक्ती दूर आहे. तिच्या आठवणीनं मन व्याकूळ झालंय. मनात एक प्रकारची हुरहूर आहे. अशा वेळी ‘मारवा’ किंवा ‘पूरिया धनाश्री’चे स्वर आपल्याला अधिकच व्याकूळ करतात. म्हणजेच त्या रागांच्या स्वरांमधून ती कातरता, व्याकुळता, हुरहूर व्यक्त होते. ती भावना आपल्या मनाला भिडते. कलाकाराचं मन खूपच संवेदनशील असतं किंवा असावं असं म्हटलं जातं. कारण तरच या भावना त्याच्या मनाला जाणवू शकतात. मग तो त्या भावना रागाच्या स्वरांच्या माध्यमातून अधिक गहिऱ्या करून व्यक्त करू शकतो. असं झालं तरच त्या ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांच्या मनाला भिडू शकतात. 

ज्याप्रमाणे एकरूप झालेल्या दोन तानपुऱ्यांमध्ये ‘समगती स्पंदनं’ (रेझोनन्स) तयार होतात, त्याचप्रमाणे एखाद्या रागाच्या आविष्कारानं, कलाकार आणि रसिक एकाच भावनेनं एकरूप होतात. अशा स्थितीला उच्च कोटीचा भावानुभव म्हणता येईल. कसलेल्या कलाकाराची स्वरसाधना आणि मनापासून श्रवण करणारा श्रोता यांच्यात हे तादात्म्य अनुभवास येतं.

दिवेलागणीच्या वेळी ‘यमन’, ‘भूप’ यांसारखे शांतरसाचे राग, मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळवून देतात. त्यानंतर ‘बिहाग’, ‘केदार’, ‘जयवंती’ हे राग येतात. रात्रीच्या शांत वेळी शृंगाररसप्रधान राग गायले - वाजवले जातात. ‘बागेश्री’, ‘रागेश्री’, ‘मालकंस’, ‘चंद्रकंस’ यांसारखे राग सादर केले जातात. तर उत्तररात्री ‘दरबारी कानडा’, ‘सोहनी’ हे राग येतात. त्या त्या रागाचे हे गानसमय लक्षात घेऊनच त्यातील बंदिशींचे विषय घेतले जातात. 
सकाळच्या भैरवातील बंदिशीत असे शब्द येतात....

ब्रह्मादिक धरत ध्यान। सूर नर मुनी करत गान। 
जागनकी बेर भई। नैन पलक खोले।।’

तर ललतच्या बंदिशीतील नायिका म्हणते...
‘रैन का सपना मैं कांसे कहूँ आली री। 
सोवत सोवत आँखे खोली कबहूँ मैं पिया।।’
तर सायंकालीन मारवामध्ये ती म्हणते....
‘पियाबिन जियरा निकसो जात, 
मैं कासे कहूँ अपने मनकी बात।’ 
किंवा
‘हो गई सांझ, अब नही आये पिया। 
छाई काली घटा घनघोर।।
पपीहा पियु पियु करे चहूं ओर।
अब कैसे धीर धरे मन, सखी री।।’

रात्रीच्या बागेश्रीमध्ये वर्णन येतं..
कैसे आऊँ तोरे मिलना रे।।
जाग रही मोरी सास ननंदरी। 
जिया डर पावत, रैन अंधेरी।।’

तर रात्रभर वाट पाहून वैतागलेली ती, सकाळी तो परतल्यावर त्याला म्हणते. देसकार बंदीश...
‘हूं तो तोरे कारन जागी, 
प्यारे बलमा आईला। कर रही भोर।।
रात सोतन घर बिरम रहे हो। बतियां बतावत जोर।।’ 

अशा सर्व बंदिशी, त्या त्या रागांच्या स्वरांमुळे अधिक अर्थपूर्ण आणि परिणामकारक होतात. रागाचा स्वरभाव आणि शब्दांतून व्यक्त होणारा भाव यांचा संगम झाल्यामुळे रसिकांना त्या अधिक भावतात. म्हणूनच राग आणि त्यांचा गानसमय यांचं बंधन अर्थपूर्ण वाटतं.

भैरवी’, ‘पिलू’ यांसारखे राग सार्वकालिक राग म्हणून ओळखले जातात. म्हणजेच ते कोणत्याही वेळेस गायले - वाजवले जातात. त्यांना समयाचं बंधन नाही, तर काही राग हे ऋतुकालीन राग आहेत. वर्षा ऋतूसाठी ‘मियां मल्हार’ आणि ‘मल्हार’चे सर्व प्रकार आहेत. त्यांत वर्षा ऋतूसंबंधी वर्णनं असतात. तसंच ‘बसंत’, ‘बहार’ हे राग वसंत ऋतूसाठी आहेत. त्यांना त्या ऋतूत गाताना समयाचं बंधन नाही. 

कधी निसर्गाच्या सान्निध्यात शहराबाहेर गेलात, तर सकाळच्या वेळी ‘भैरव’ राग ऐकून पाहा आणि रात्रीच्या शांत वेळी खुल्या आकाशाखाली बसून ‘दरबारी कानडा’ ऐका...
काय अनुभव येतो ते एकदा पाहाच..

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Soman About 164 Days ago
Toooo good..
0
0

Select Language
Share Link
 
Search