Next
आम्ही नवयुगाच्या नारी...
BOI
Friday, March 09 | 01:46 PM
15 0 0
Share this story

आंतरराष्ट्रीय महिला दिन दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. मोठमोठे कार्यक्रम, सोहळे होतात; पण काही अपवाद वगळता या सोहळ्यांची व्याप्ती समाजाच्या प्रामुख्याने उच्च स्तरापुरती असते. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतल्या काही गृहिणींनी हातावर पोट असलेल्या महिलांना भेटून, त्यांच्याशी गप्पा मारून महिला दिन साजरा केला. त्यांचा हा उपक्रम अगदीच छोटेखानी असला, तरी वेगळा विचार देणारा होता, एवढं नक्की... त्याबद्दलचं हे मनोगत...
...........
आठ मार्चच्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘इनबॉक्स’मध्ये मेसेज आला  -

बाईपणा अनुभवताना -
उद्याचा एक दिवस कौतुकाचा 
बाकी ३६४ दिवस कसरतीचे 

खर तर हा मेसेज मला लागूच पडणारा नव्हता. मलाच काय, माझ्यासोबत असणाऱ्या माझ्यासारख्याच अनेकींना तो लागू नव्हता. आमचं बाईपण एकदम मुक्त आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातली पुसटशी सीमारेषा सहजपणे ओळखून सारासार विचार करून वागणारी माझी पिढी, म्हणजे माझ्या सख्या, मैत्रिणी वगैरे... त्यामुळे ‘दिवस कसरतीचे’ वगैरे नक्कीच नाहीत. ‘कसरत’ करणाऱ्यांना महिला दिनी भेटायचं हे मात्र आधीच ठरलेलं. 

माझं वास्तव्य काही दिवस मुंबईत, तर काही दिवस रत्नागिरीत असतं. त्यामुळे मी रत्नागिरीला आलेय, एवढं एकच कारण आम्हा मैत्रिणींना भेटायला पुरेसं असतं. लगेच मितालीने अनौपचारिक मीटिंग बोलावली आणि आम्ही भेटलोही. ‘हातावर पोट असलेल्या महिलांना भेटू या, अशी तिची कल्पना होती. मग चर्चा झाली आणि नियोजन केलं. कुठे, कसं, कधी भेटायचं, त्यांना काय द्यायचं, असं सारंच ठरून गेलं. आणि जगण्याची खरी ‘कसरत’ करणाऱ्यांना आम्ही एकत्रित भेटलोही. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या झोपडीवजा घरात ठाण मांडून बसलो... त्यांना कोण आनंद झाला होता! सोबत काही साहित्य नेलं होतं, ते त्यांना दिलं. आणि मग तास-दीड तास गप्पांचा फड रंगला. डोक्यावर गॉगल ठेवून, चकाचक ड्रेसमध्ये गेलेल्या आम्ही त्यांच्यासाठी जणू खास पाहुण्याच ठरलो. ‘महिला दिन’ नावाचा काही दिवस असतो, हे त्यांच्या गावीच नव्हतं. आधी थोडीशी बुजलेली ही मंडळी नंतर आमच्याशी दिलखुलास बोलत होती. दिलेल्या वस्तूंकडे आणि आम्हा सर्वांकडे बघताना त्यांच्या नजरा त्यांच्या जगण्यातली अगतिकता अधोरेखित करीत होत्या. 

आम्ही भेटलो त्यापैकी एक ज्येष्ठ महिला म्हणजे पार्वती. त्या २५ वर्षांपूर्वी बिहारमधून रत्नागिरीत आल्या. त्या कुंड्या, फुलझाडं, माठ विकण्याचा व्यवसाय करतात. येताना सोबत आपल्या बिरादरीच्या माणसांनाही घेऊन आल्या. प्रत्येकाचे व्यवसाय अशाच प्रकारचे, थोड्या-फार फरकाने. काही जणी कर्नाटकातल्या होत्या. बोलावलं तेव्हा एकत्रच आल्या... रामदुलारी, अम्रिता साहा, मंजुळा पवार (रजपूत), अनिता, शोभा अशा एकेक करत या लेकुरवाळ्यांना आम्ही भेटलो. एकेकीच्या पदरात तीन-चार मुलं. पार्वतीबाईंचा मुलगा तर अकरावीला आहे. कम्प्युटरचा कोर्स करतोय आणि इंग्लिश मीडियममधून शिकलाय, हे त्या फार अभिमानाने सांगत होत्या. बाकीच्यांची मुलं मराठी शाळेत आहेत. बिहारमधून एवढ्या दूर येऊन का व्यवसाय करता, असं विचारलं, तर तिथेही खूप गरिबी आहे. म्हणून पोटासाठी इथपर्यंत आल्याचं त्यांनी सांगितलं. इथे विक्रीसाठी लागणाऱ्या वस्तू कोल्हापूर, पुणे, राजस्थानमधून मागवून घेतल्या जातात. पूर्वी त्या आणण्यासाठी स्वतःला जावं लागायचं आता फोनवरच सगळं मागवता येतं, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. ‘बिहारमध्ये आवडतं की महाराष्ट्रात’ या प्रश्नाचं उत्तर एका चाणाक्ष बाईने ‘दोन्हीकडे’ असं दिलं. सगळं आटोपून त्यांचा निरोप घेऊन निघणार, एवढ्यात त्यातली एक बाई बाहेर येऊन एका माणसाला जोराजोरात बडबडत त्याच्या पाठी धावत गेली. विचारलं तर असं कळलं, की त्या बाईच्या नवऱ्यानं ती तिथं नाही असं पाहून एक झाड विकलं होतं आणि साहेब गुत्त्यावर तरातरा निघाले होते. आणि ती फक्त अगतिकतेने त्याच्यावर डाफरत होती.. बस्स! मग पुन्हा थांबलो... बोललो... ‘काय करणार बाई, दारूला पैसे नाही दिले तर मारझोड करतो नवरा,’ असं ऐकवून शरमेनं खाली मान घालून निघून गेली. आम्हीही तशाच परतलो. उन्हं वाढायला लागली होती आणि या बायकांच्या आयुष्यातल्या उन्हाच्या चटक्यांची झलक तेवढ्यात अनुभवायला मिळाली. महिला दिन... महिला मुक्ती दिन कष्टकरी स्त्रियांसाठी साजरा व्हायला हवा, असं मनोमन वाटलं. 

आम्ही काही खूप मोठं केलं असं अजिबातच नाही; पण अशा या कष्टकरी महिलांसोबत घालवलेल्या दोन क्षणांनी आम्हाला वेगळं काही अनुभवता आलं एवढं नक्कीच. नेहमीची दंगा-मस्ती सोडून एका वेगळ्या उपक्रमासाठी अनुजा, मिताली, नेहा, अस्मिता, समीक्षा, सुस्मिता, उज्ज्वला, रचना, नेहल, अरुणा या माझ्या सगळ्या मैत्रिणींनी एकत्र येऊन सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. 

स्वातंत्र्याचा खरा अर्थ आईने मला समजावला आणि नवऱ्याने ते स्वातंत्र्य जपण्यास अनमोल मदत केली आणि करतो आहे. त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर -

सावित्रीच्या लेकी आम्ही, नवयुगाच्या नारी
शपथ आम्हा जिजाऊंची, घेऊ उंच भरारी....
तूच कन्या, तूच दुर्गा, माता तू सहचारिणी..
तूच यमुना तूच गंगा, सकल संकटहारिणी,
तूच विद्या तूच शक्ती, काली माँ अन् सौदामिनी 
तूच माता तूच भक्ती, महिषासुरमर्दिनी...
तूच शक्ती तूच शुभदा झाशीची रणरागिणी...
भक्ती तू आदिशक्ती सकल ऊर्जादायिनी... 

- यशश्री पुरोहित, रत्नागिरी
मोबाइल : ८३९०८ ८५८२४

(या गृहिणींनी साजऱ्या केलेल्या महिला दिनाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...महिला दिनाबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सर्व विशेष लेख https://goo.gl/zuvB57 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत. )

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vaibhav About 314 Days ago
It's really a great thing. Our society really need this.
2
0
Ravindra Kakade About 315 Days ago
उत्तम !
2
0

Select Language
Share Link