Next
मायलेकी हाकताहेत गावगाडा
पुण्यातील मेदनकरवाडीत मुलगी सरपंच आणि आई उपसरपंच
BOI
Saturday, October 13, 2018 | 11:45 AM
15 1 0
Share this article:

पुणे : आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, अगदी राजकारणातही. घरातला कारभार तर महिलाच चालवतात; पण आई आणि मुलगी मिळून एखाद्या गावाचा कारभार चालवत असल्याचे उदाहरण मात्र तसे विरळेच. पुण्यातील मेदनकरवाडी गावाची युवा सरपंच प्रियांका मेदनकर आणि तिची आई उपसरपंच सुरेखा मेदनकर यांनी हा आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या या मायलेकींचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या ग्रामीण परिसरातील मेदनकरवाडी या गावाच्या सरपंचपदी प्रियांका मेदनकर आणि उपसरपंचपदी तिची आई सुरेखा मेदनकर कार्यरत आहेत. प्रियांकाचे वडील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवत प्रियांकाने गावाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. मुलगी म्हणून तिला मागे राहावे लागले नाही. तिने धडाडीने ग्रामीण भागातील संकुचित मानसिकतेला तोंड देत राजकारणात प्रवेश केला, एवढेच नव्हे तर यशही मिळवले. 

‘स्मार्ट सिटी’ योजना राबवली जाऊ शकते, तर मग ‘स्मार्ट व्हिलेज’ का नाही, असा विचार करून तिने गावाचा कायापालट करायला सुरुवात केली. सीसीटीव्ही यंत्रणा, काँक्रीटचे रस्ते, महिलांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या. महिलांच्या आरोग्यासाठी स्मार्ट कार्ड योजना आणली. त्याद्वारे ‘आरओ फिल्टर’चे पाणी माफक दरात पुरवण्यात येत आहे. महिलांसाठी सॅनिटरी पॅड एका रुपयात एटीएमद्वारे उपलब्ध करून दिली जातात. याशिवाय व्यवसाय प्रशिक्षण केंद्र अशा योजनाही गावात आणल्या आहेत.

घर सांभाळता सांभाळता गावाच्या विकासासाठी आपणही सक्रिय राजकारणात उतरावे, असा विचार प्रियांकाच्या आईने केला आणि मुलीसह त्याही हिरीरीने या क्षेत्रात उतरल्या. त्यांना उपसरपंच होण्याची संधी मिळाली.

आज या दोघीही सामंजस्याने निर्णय घेऊन गावाचा विकास साधत आहेत. नवीन पिढीची आधुनिक विचारसरणी आणि जुन्या पिढीचा अनुभव यांचा मिलाफ झाल्याने गाव विकासाच्या वाटेवर वेगाने प्रगती करत आहे. महिलांच्या हाती गावाची सूत्रे असल्याने महिलांच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. 

आई आणि मुलगी गावाचा विकास करत असतील तर घरच्यांना त्याचा अभिमान वाटणारच यात काही शंका नाही. प्रियांका आणि तिच्या आईचे हे यश बघून त्यांना राजकारणाचे धडे देणाऱ्या श्री. मेदनकर यांनाही अभिमान वाटत आहे. 

मुलगी झाल्यावर आजही नाराजी व्यक्त करणाऱ्या पारंपरिक संकुचित विचारसरणीला या स्त्री-शक्तीने चोख उत्तर दिले आहे. ‘मुलगी शिकली प्रगती झाली,’ ही उक्ती सार्थ करून दाखवली आहे. या मायलेकींना मानाचा मुजरा आणि शुभेच्छा! 

(मेदनकरवाडीत केलेल्या सुधारणांची झलक दर्शविणारा आणि तेथील महिलांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘तुजऐसी नाही’ या मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/idhJdV या लिंकवर उपलब्ध आहेत. ) 

 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search