Next
बिमल रॉय, छबी बिस्वास
BOI
Thursday, July 12, 2018 | 03:45 AM
15 0 1
Share this story

अनेक अजरामर चित्रपट देणारे प्रतिभावान आणि संवेदनशील दिग्दर्शक, निर्माते बिमल रॉय आणि आपल्या एकाहून एक अलौकिक भूमिकांमुळे भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनयासाठी नावाजले गेलेले बंगाली अभिनेते छबी बिस्वास यांचा १२ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....... 
बिमल रॉय

१२ जुलै १९०९ रोजी ढाक्यामध्ये जन्मलेले बिमल रॉय हे भारतीय चित्रपटसृष्टीतल्या अतिशय प्रतिभावान आणि संवेदनशील दिग्दर्शकांमधले आघाडीचे दिग्दर्शक. मानवी नातेसंबंध अतिशय तरलपणे उलगडून दाखवणारे त्यांचे आशयघन सिनेमे कालातीत म्हणावे लागतील. त्यांना संगीताची उत्तम जाण होती आणि त्यामुळे त्यांच्या सिनेमांमधल्या संगीताने कथेला एक वेगळीच उंची मिळत असे. त्यांनी दिग्दर्शनाबरोबरच उत्तमोत्तम सिनेमांची निर्मितीही केली. त्यांचे सर्वच सिनेमे म्हणजे उच्च अभिरुचीच्या एकाहून एक सरस कलाकृती! त्यांच्या प्रतिभेची पावती म्हणजे त्यांच्या चित्रपटांना मिळालेले दोन राष्ट्रीय पुरस्कार, ११ फिल्मफेअर पुरस्कार आणि कान्स फिल्म फेस्टिव्हलचा एक पुरस्कार! त्यांच्या सिनेमांची नावं बघितली, की एकाहून एक थोर कलाकारांनी जिवंत केलेल्या व्यक्तिरेखा आपल्यासमोर उभ्या राहतात. दो बीघा जमीन, परिणिता, सुजाता, बंदिनी, परख, बिराज बहू, देवदास, मधुमती, प्रेमपत्र, बेनझीर, यहुदी, नौकरी, उसने कहा था - असे त्यांचे सिनेमे आणि नूतन, बलराज साहनी, अशोक कुमार, मीनाकुमारी, मोतीलाल, दिलीपकुमार, वैजयंतीमाला, सुचित्रा सेन, शशी कपूर, साधना यांच्यासारख्यांनी गाजवलेल्या त्या सर्व भूमिका डोळ्यांसमोर फेर धरतात. हृषीकेश मुखर्जी, असित सेनसारखे दिग्दर्शक आणि सलील चौधरी, सचिनदेव बर्मन यांसारख्या संगीतकारांना साथीला घेऊन बिमल रॉय यांनी एकाहून एक अजरामर माइलस्टोन सिनेमे तयार केलेत. आठ जानेवारी १९६५ रोजी त्यांचं मुंबईत निधन झालं. 
....

छबी बिस्वास 

१२ जुलै १९०० रोजी कोलकात्यात जन्मलेले छबी बिस्वास हे उत्कृष्ट बंगाली अभिनेते म्हणून, विख्यात आहेत. तपन सिन्हा यांच्या ‘काबुलीवाला’मध्ये त्यांनी साकारलेला अब्दुल रेहमान खान हा सहृदयी अफगाण पठाण त्यांच्या अफाट आणि अलौकिक प्रतिभेची साक्ष ठरला. दर्शकांच्या हृदयात जाऊन बसलेली आणि जिवंत अभिनयाने अक्षरशः रडवणारी त्यांची ती जबरदस्त भूमिका! राज कपूरच्या ‘जागते रहो’च्या बंगाली रिमेकमधला त्यांनी रंगवलेला दारुडा (जो हिंदीत मोतीलाल यांनी रंगवला होता) हा त्यांचा आणखी एक अविस्मरणीय रोल. सत्यजित रे यांच्या ‘जलसाघर’मधल्या वृद्धत्वाकडे झुकलेल्या जमीनदाराच्या भूमिकेने बिस्वास यांना आंतराष्ट्रीय स्तरावर असामन्य अभिनेता म्हणून मान्यता मिळाली आणि प्रचंड कौतुक झालं. दादा ठाकूर, हेडमास्टर, कांचनगंगा, अशोक, परिणिता, दुई पुरुष, इंद्राणी, सप्तपदी, देवी, अशा अनेक सिनेमांमधून त्यांचा अप्रतिम अभिनय पाहून स्तिमित व्हायला होतं. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ११ जून १९६२ रोजी त्यांचा अपघातात मृत्यू झाला. 
......

यांचाही आज जन्मदिन :
महान इतिहासाचार्य वि. का. राजवाडे (१२ जुलै १८६४ - ३१ डिसेंबर १९२६ ) 
थोर अमेरिकन तत्त्ववेत्ता हेन्री डेव्हिड थोरो (१२ जुलै १८१७ - सहा मे १८६२) 
जागतिक कीर्तीचे कवी पाब्लो नेरुदा (१२ जुलै १९०४ - २३ सप्टेंबर १९७३) 
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
माजी सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड (१२ जुलै १९२० -  १४ जुलै २००८) 
प्रख्यात लेखक मनोहर माळगावकर (१२ जुलै १९१३ - १४ जून २०१०)   
गायिका-अभिनेत्री सुलक्षणा पंडित (१२ जुलै १९५४) 
फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर (१२ जुलै १९६५) 
प्रख्यात कॉमेडीयन आणि गायक बिल कॉझ्बी (१२  जुलै १९३७) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 1
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link