Next
कस्में, वादे, प्यार, वफा सब...
BOI
Sunday, February 17, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

सुप्रसिद्ध अभिनेते प्राण यांचे जन्मशताब्दी वर्ष १२ फेब्रुवारी २०१९पासून सुरू झाले. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांच्यावर चित्रित झालेल्या एका सुंदर गीताचा...
..........
लहान मुलांना भीतीची गोष्ट सांगायची असेल, तर ‘त्याच्या’ ‘उग्रनारायण’सारख्या भूमिकांच्या कथा सांगायला लागतील. उमेदीच्या तरुणांना जीवनात कसे जगायचे, अडचणींशी कसे लढायचे हे सांगण्यासाठी ‘त्याच्याच’ चित्रपट प्रवेशाच्या आणि तेथे टिकून राहण्यासाठी घेतलेल्या कष्टाच्या कथा सांगाव्या लागतील. अभिनयात कर्तृत्व करू इच्छिणाऱ्यांना ‘त्याच्या’ ढीगभर भूमिका म्हणजे अभ्यासाचे धडे आहेत. आणि त्यागाचा वसा कसा घ्यायचा व टिकवायचा, हे प्रौढावस्थेतील प्रत्येक व्यक्तीला शिकण्यासाठी ‘त्याची’ नऊ दशकांची जीवनगाथा मार्गदर्शक ठरेल. 

असे बरेच काही सांगण्यासाठी आणि हिंदी चित्रपटाचा इतिहास लिहिण्यासाठी बसल्यावर ‘एक होता प्राण...’ अशी सुरुवात करून खूप काही सांगता येण्यासारखे आहे. होय, रसिकहो! सुप्रसिद्ध अभिनेते ‘प्राण’ यांचे जन्मशताब्दी वर्ष १२ फेब्रुवारी २०१९पासून सुरू झाले. १२ फेब्रुवारी १९२० ही त्यांची जन्मतारीख! त्या निमित्ताने ‘प्राण’ यांच्याबद्दल काही लिहावे म्हणून त्यांच्या कारकिर्दीवर एक दृष्टिक्षेप टाकला, तेव्हा हे लक्षात आले, की त्यांचे व्यक्तिमत्त्व दहा-बारा चित्रपटांतील भूमिकांबद्दल सांगून पूर्ण करण्यासारखे नाही. 

तसे तर प्राण १९४२च्या सुमारास ‘नूरजहाँ’ चे नायक म्हणून ‘खानदान’ चित्रपटाद्वारे पडद्यावर झळकले होते; पण नायक प्राण असलेला तो चित्रपट पाहावयास मिळणे शक्य नव्हते. प्राण यांची प्रतिमा मनात ठसली ती ‘मधुमती’तील उग्रनारायणाच्या भूमिकेने, ‘जिस देश में गंगा बहती है’मधील राकाच्या भूमिकेमुळे, ‘राम और श्याम’मधील गजेंद्रच्या भूमिकेमुळे! या भूमिका नुसत्या मनावर ठसल्या नाहीत, तर मनात भय आणि चीड, संताप अशा संमिश्र भावना निर्माण करून गेल्या!

‘दूरदर्शन’च्या सुरुवातीच्या काळात एकदा रात्री ‘अदालत’ हा जुना चित्रपट दाखवला जाणार होता. म्हणून मी ‘यूँ हसरतों के दाग...’ या राजेंद्रकृष्ण-मदनमोहन-लता मंगेशकर यांच्या गीतासाठी जागत बसलो होतो. त्या संपूर्ण चित्रपटात ‘हा क्रूरकर्मा’ अक्षरशः हात धुऊन नायिका नर्गिसच्या मागे लागतो, नायिकेच्या जीवनाची फरफट होते ती याच्यामुळेच! त्याची ती क्रूर भूमिका - त्याचे डोळे, चेहरा व संवाद सारेच मनात चीड निर्माण करून गेले होते. 

खलप्रवृत्ती दर्शवण्यासाठी प्रत्येक वेळी त्यांचे संवादच असायचे असे नाही, तर त्यांची नजर व चेहरा ते कृष्णकृत्य करण्यामागचे मनसुबे दाखवून जायचा! त्यांच्या नजरेतील विखार बघून ‘मधुमती’ची नायिका घाबरून गेली होती, त्याच वेळी थिएटरच्या काळोखात मीही शहारून गेलो होतो. ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात शम्मी कपूर पोटतिडकीने ‘दिल के झरोखे में तुझ को बिठाकर...’ पडद्यावर गात होता. ते ऐकून असहाय बनलेली नायिका राजश्री मनाला खूप आवरते. त्या वेळी तिचेच काय, तर माझेसुद्धा डोळे भरून आले होते आणि त्या वेळी चेहऱ्यावर छद्मी हास्याची लकेर दाखवत ‘प्राण’ तिला डोळे पुसण्यासाठी रुमाल काढून देतात. एका क्षणात आपल्या मनातील करुणा भाव जाऊन संताप येतो. 

‘दिल तेरा दिवाना’मध्ये शम्मी कपूर-माला सिन्हा या दोघांना आनंदाने गाणे म्हणताना बघून, ट्रक ड्रायव्हर असलेले ‘प्राण’ तोंडातील बिडी इकडून तिकडे फिरवत असा एक कटाक्ष टाकतात, की आता हा बाबा मिठाचा खडा टाकून हे दूध नसवणार अशी धास्ती प्रेक्षकांना बसते. 

प्राण यांच्या खलनायकीचे असे अनेक प्रसंग सांगता येतील! के. एन. सिंग, जीवन, मदनपुरी, कन्हैयालाल असे मातब्बर खलनायक पडद्यावर वावरत असताना खलनायक म्हणून पडद्यावर आलेल्या ‘प्राण’ यांनी प्रत्येक भूमिकेत वेगळेपण आणून, एखादी वेगळी लकब दाखवून अनेक स्त्रियांचे व पुरुषांचेही शिव्याशाप घेतले. हलकट, नालायक, नीच अशा शब्दांचा साठा संपून जावा, अशा दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा ते रंगवत राहिले. 

खरे तर ते एक उत्तम अभिनेते होते. खलनायकाचा शिक्का त्यांच्यावर बसला होता. राज कपूर यांनी ते ओळखले आणि त्यामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी ‘आह’ चित्रपटात डॉ. कैलाशची भूमिका त्यांना दिली; पण प्रेक्षकांना त्यांचे ते रूप भावले नाही. परंतु कधी कधी एखादा कुशल कारागीर करू शकणार नाही अशी मूर्ती एखादा दुय्यम कलावंत तयार करतो, तद्वत ‘प्राण’ यांना खलनायकाच्या प्रतिमेतून बाहेर काढण्याचे काम निर्माता-दिग्दर्शक मनोजकुमार यांच्याकडून घडले. ‘उपकार’ चित्रपटातील ‘मलंगचाचा’ ही प्राण यांनी साकारलेली भूमिका अप्रतिम अभिनयाचे दर्शन घडवून गेलीच; पण त्याचबरोबर अभिनयाचे विविध पैलू दाखवणाऱ्या या अभिनेत्याच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करणारी ठरली. 

वडील, काका, गुरू अशा चरित्र भूमिकांतील प्राणही प्रचंड लोकप्रिय ठरले. चित्रपटाचे नायक-नायिका कोणीही असोत; पण चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्या नायक-नायिकांच्या नावांबरोबर अखेरीस ‘और प्राण’ अशी अक्षरे दाखवून प्राण यांचे महत्त्व अधोरेखित केले जात असे. अर्थात त्यांची भूमिका खलनायकाची असली, तरीही ते तसेच दर्शविले जात असे.

‘सुधारलेला बदमाष’ या शीर्षकाने त्यांच्या सेकंड इनिंगचा इतिहास लिहिताना त्यांच्या अनेक भूमिकांचा जसा उल्लेख करावा लागेल, तसाच त्यांनी पडद्यावर गायलेल्या गीतांचाही उल्लेख करावा लागतो. खलनायक म्हणून वावरताना प्राण यांना पडद्यावर गाताना दाखवणे शक्य नव्हते. तरीही ‘दिल की उमंगे है जवाँ...’ या ‘मुनीमजी’ चित्रपटातील गीतात नायक-नायिका त्यांची टर उडवत असतात व नायक देव आनंद त्यांना गायला लावतो. विनोदी प्रसंगातील त्या गीताच्या ओळी प्राण यांनी स्वतः गायल्या होत्या! तसेच राज कपूर यांनी ‘जिस देश में गंगा बहती है’ चित्रपटात त्यांना गाण्याच्या काही ओळी दिल्या होत्या! 

पडद्यावर संपूर्ण गाणी गाणारे प्राण आपल्याला त्यांच्या सेकंड इनिंगमध्ये दिसतात. त्यामध्ये उपकार, व्हिक्टोरिया नंबर २०३, कसोटी, जंजीर, गंगा तेरा पानी अमृत, मजबूर, धर्मा, दस नंबरी अशा काही सिनेमांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो.

दुसऱ्या इनिंगमध्ये सज्जन व्यक्तिरेखा रंगवत असताना आणि त्यापूर्वी खलनायक उभा करतानाही प्रत्यक्ष जीवनात हा कलावंत प्रेमळ व सज्जन व्यक्ती म्हणूनच जीवन जगला होता. एवढेच नव्हे, तर स्पष्टवक्ते असलेल्या व आपल्या तत्त्वांशी ठाम राहणाऱ्या प्राण यांनी आणीबाणीच्या काळात राज्यकर्त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. सुपरस्टारच्या बेशिस्तपणामुळे त्याच्याबरोबर भूमिका न करण्याचा निश्चय पाळला होता आणि १९७३च्या फिल्मफेअर सोहळ्यात मिळालेला पुरस्कार नाकारून त्या पुरस्कार सोहळ्यामधील ‘बेईमानी’चा निषेध केला होता. प्राण यांना क्रिकेट खेळाची फार आवड होती. १९५२पासून त्यांनी कलावंतांच्या क्रिकेट मॅच आयोजित करून, आपत्तीत सापडलेल्यांसाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला होता. 

चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दीर्घकालीन कारकिर्दीचा व कर्तृत्वाचा विचार करून २०१३मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नंतर अवघ्या दोन महिन्यांत, १२ जुलै २०१३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

प्राण यांच्या विविध भूमिका, त्या वेळचा गेटअप, संवाद आणि अभिनय यांबाबत खूप काही सांगता येईल. तसेच त्यांनी पडद्यावर गायलेल्या गीतांमधील आशय काही ठिकाणी बरा वाटतो. परंतु त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला वेगळे वळण देण्यास कारणीभूत ठरलेल्या ‘उपकार’ चित्रपटात त्यांच्या तोंडी असलेले गीत मात्र सहजासहजी विसरण्यासारखे नाही. आज आपण तेच गीत पाहू! 

‘सुनहरी’ गीते सुखद असतात? या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे नाही. सुखद प्रेमभावना असलेले प्रेमिकांचे मनोगत अगर भक्तिरस अगर देशप्रेम यांनी संपन्न असलेली गीते ‘सुनहरी’ असतात. प्रेमातील अपयश, दु:ख व्यक्त करणारेही गीत आपण ‘सुनहरे’ म्हणू! मात्र हे प्रेम, आणाभाका, शपथा, निष्ठा या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, हे सांगणारे गीत - कटू वास्तव मांडणारे गीत? होय. तरीही ते ‘सुनहरे’च वाटावे. कारण संगीत, स्वर व पडद्यावरील प्राण यांचे बदललेले रूप, दिग्दर्शक मनोजकुमार यांचे कौशल्य - यामुळेच हे गीत मनाला भिडते, काळजात जाऊन बसते. जेव्हा जेव्हा या जगात फसवणारी, प्रतारणा करणारी, प्रेमाचे नाटक करणारी माणसे भेटतात, तेव्हा तेव्हा आपसूक ते आपल्या ओठावर येते. हिंदी चित्रपटांत कोणत्याही प्रकारच्या, कोणत्याही आशयाच्या गीतांची कमतरता नाही, हे पुन्हा एकवार सिद्ध करणारे हे सुनहरे गीत! इंदिवर यांचे शब्द कसे जळजळीत आहेत बघा - 

कस्में, वादे, प्यार, वफा सब, बाते है.. बातों का क्या? 
कोई किसी का नहीं, ये झूठे नाते है.. नातों का क्या? 

आणा-शपथा, प्रेम, निष्ठा या साऱ्या गोष्टी फक्त गोष्टीच आहेत. (हे सारे शब्द फसवे आहेत. प्रत्यक्षात तसे काहीच नसते, असतात ते फक्त भास, बाकी काही नाही. या जगात) कोणी कोणाचे नसते. नाती असतात; पण त्या नात्यांचे काय (ती नाममात्रच असतात.) 

होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा 
तेरा अपना खूनही आखिर तुझ को आग लगाएगा 
आसमान में उडनेवाला मिट्टी में मिल जाएगा 

(हे धोकेबाज, दगाबाज वरवर गोड बोलून शेवटी फक्त स्वार्थ साधणारे लोक तुला भेटल्यावर) परमेश्वर जरी तुझ्यापुढे उभा असला, तरीसुद्धा (त्या स्वार्थी माणसांच्या कृत्यापासून) तू वाचू शकणार नाहीस. तू जी रक्ताची नाती समजतोस, तीच रक्ताची नाती असणारी माणसे अखेरीस तुला जाळून टाकतील, तुला संपवतील. (पण स्वार्थापोटी, खोट्या अभिमानाने वागणाऱ्या त्या स्वार्थी लोकांच्या हे लक्षात कसे येत नाही, की) आकाशातून उडणाऱ्यालासुद्धा (एक दिवस) या मातीतच मिसळून जावे लागते. (मग जमिनीवरून चालणाऱ्याची काय वेगळी कथा?) 

मतलबी, स्वार्थी माणसांच्या बाबतीत सांगताना इंदिवर पुढे लिहितात, की - 

सुख में तेरे साथ चलेंगे, दुख में सब मुख मोडेंगे
दुनियावाले तेरे बनकर तेरा ही दिल तोडेंगे
देते है भगवान को धोखा, इन्सां को क्या छोडेंगे

(तू जी सारी आपली आपली, तुझी माणसे म्हणतो आहेस ना, ती सारी माणसे) सुखामध्ये तुझ्यासमवेत चालतील (पण एकदा तुझे दु:खाचे दिवस सुरू झाले, की ही तुझीच माणसे तुझ्या) दु:खाच्या दिवसांत तुला बघून तोंड फिरवतील. ही या जगातील माणसे ‘आम्ही तुझेच आहोत’ असे सांगून तुझ्या हृदयाला, मनाला दु:ख होईल असे कृत्य करतील (अरे बाबा) जे प्रत्यक्ष परमेश्वराला धोका देतात, ते काय माणसांना सोडणार आहेत?

आणि या दोन कडव्यांनी एका दृश्यात संपणारे हे गीत याच चित्रपटात पुन्हा एकदा पुढचे कडवे घेऊन आपल्यापुढे येते. जातीय तेढ, त्यातून होणारे दंगे व उद्ध्वस्त होणाऱ्या वास्तू यांवर भाष्य करताना कवी म्हणतो -

काम अगर ये हिंदू का है, मंदिर किसने लूटा है?
मुस्लिम का है काम अगर ये खुदा का घर क्यूँ टूटा है?
जिस मजहब में जायज है ये वो मजहब तो झूठा है

एकमेकांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करणे ज्या धर्मात मान्य केले जाते, तो धर्मच खोटा आहे, असा या तीन ओळींचा मथितार्थ आहे. 

अत्यंत कटू सत्य सांगणाऱ्या विचारांनी भरलेले हे गीत माणसाला अंतर्मुख करते. ‘फक्त स्वार्थाने जगू नका’ हे उपरोधिकपणे सुचवते. म्हणूनच ते आशयसंपन्न बनते. कवीने पोटतिडकीने सांगितलेला हा उपदेश गीतातून व्यक्त करताना मन्ना डे यांचा स्वर शब्दांना पुरेसा न्याय देतो. ‘होगा मसीहा’ अगर ‘सुख में तेरे’ या शब्दांनंतर घेतलेला आलाप लांबवलेला स्वर गीताला मनात खोलवर रुजवण्यास साह्य करतो. या सर्वांबरोबरच संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांची गीताची चाल, धीरगंभीर संगीत व प्राण यांचा बोलका चेहरा गीत ‘सुनहरे’च बनवतो. आज ५१ वर्षांनंतरही या गीताची गोडी कमी झालेली नाही. ओघानेच ‘प्राण’ यांचेही स्मरण कायम राहिले आहे. जन्मशताब्दीनिमित्ताने या कलावंतास विनम्र अभिवादन! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search