Next
पोटच्या मुलांप्रमाणे रयतेचा सांभाळ करणारे राजर्षी शाहू महाराज
BOI
Wednesday, June 26, 2019 | 03:30 PM
15 0 0
Share this article:

समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांची आज (२६ जून) जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कार्यावर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख...
...........
राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या कार्याची ओळख नव्याने करून देण्याची गरज नाही; पण आजची तरुण पिढी त्यांना केवळ नावाने ओळखते. त्यांचे कार्य, त्यांनी मांडलेले विचार यांची त्यांना म्हणावी तितकी माहिती नाही. वाळीत टाकल्याप्रमाणे जगणाऱ्या दलित समाजाच्या पाठीशी त्या काळी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या या लोकनायकाची आज पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे.

राजर्षी शाहू महाराज म्हणजेच चौथे शाहू महाराज होते. महाराजांचा जन्म २६ जून १८७४चा! कागलच्या घाटगे घराण्यातील अप्पासाहेब आणि राधाबाई यांच्या पोटी यशवंत या नावाने त्यांनी जन्म घेतला. तेव्हा कोल्हापुरात राजे चौथे शिवाजी महाराज कारभार पाहत होते; पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपश्चात १७ मार्च १८८४ रोजी चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंताला दत्तक घेतले आणि नव्याने त्यांचे ‘शाहू’ असे नामकरण केले.

दोन एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ पार पडला आणि शाहू कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी शाहू महाराज झाले. शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती. ज्या दिवसापासून शाहू महाराजांनी पदभार स्वीकारला, तेव्हापासून १९२२ सालापर्यंत त्यांनी तब्बल २८ वर्षे कारभार करत कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण केले.

शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता. विशेष करून बहुजन समाजाची तत्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. त्या दृष्टीने पावले टाकीत त्यांनी सर्वप्रथम त्या समाजातील घटकांना साक्षर करण्याचे शिवधनुष्य उचलले. समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला.

संपूर्ण कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मुख्य म्हणजे मोफत केले. अस्पृश्यता निर्मूलन हेदेखील त्यांच्यासमोरचे मोठे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी उच्च वर्णाच्या आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा चालवण्याची पद्धत बंद करायला लावली.

मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल, तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली होती. ती कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरवली. सहा जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना ५० टक्के जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला.

समाजातील सर्व घटकांना समानतेने वागवावे असा जाणून त्यांनी आदेशच जाहीर केला. शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या. डेक्कन रयत असोसिएशन हीदेखील शाहू महाराजांचीच देण. १९१७ साली शाहू महाराजांनी विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता देऊन पुनर्विवाहाचा कायदा केला आणि खऱ्या अर्थाने समाजाला पुरोगामी युगाची दिशा दाखवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कृषिक्षेत्रावरदेखील विशेष भर दिला.

‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहूपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था, शेतीविषयक तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ यांसारख्या संस्था शाहू महाराजांनी स्थापन केल्या. राधानगरी धरणाची उभारणी करून आणि शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करून त्यांनी बळीराजाला सक्षम केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाकरिता आणि ‘मूकनायक’ वर्तमानपत्राच्या उभारणीमध्ये शाहू महाराजांनी स्वत:हून सहकार्य केले. केवळ समाजसुधारणेपुरता राज्यकारभार न करता शाहू महाराजांनी कला क्षेत्रालादेखील राजाश्रय देऊन आपण संपूर्ण समाजाचे राजे असल्याचे सिद्ध केले. संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या कलांचा विकास आणि विस्तार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात घडवला.

अशा या थोर राजाने सहा मे १९२२ रोजी अखेरचा श्वास घेतला; पण त्यांचे विचार आणि कार्ये मात्र नेहमीच समाजाला प्रेरणा देत राहिले आहेत आणि यापुढेही देत राहतील हे नक्की!

- योगिता विलास पडवेकर
संपर्क : ८६५५२ १०३६०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search