Next
वैभवशाली साताऱ्याची सफर – भाग ९
BOI
Saturday, May 04, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

मेणवली घाट

‘करू या देशाटन’
या सदराच्या गेल्या भागात आपण वाईतील पर्यटनस्थळांची माहिती घेतली होती. आजच्या भागात माहिती घेऊ या वाईच्या आसपासच्या परिसराची...
............
मांढरदेवीवाईच्या आसपासचा परिसर निसर्गरम्य तर आहेच, पण इतिहासाचा साक्षीदारही आहे. वाई गावापासून बंगालच्या उपसागरापर्यंत कृष्णेची विविध रूपे पाहता येतात. वाईच्या आसपास नदीच्या उत्तर व दक्षिण बाजूला सह्याद्रीच्या उंच रांगा आहेत. वाईमध्ये शिरतानाच दिसतो तो पांडवगड जणू मुकुटमणी, बाजूला मांढरदेवी, पश्चिमेस केंजळगड, कमळगड, दक्षिणेस सोनजाईचा डोंगर, पूर्वेस वैराटगड.... हे सगळे गड वाई गावात शिरतानाच दिसतात. मांढरदेवी वगळता सर्व ठिकाणी पदभ्रमण (ट्रेकिंग) करीतच जावे लागते. वाईच्या पश्चिमेला नाना फडणवीसांची मेणवली, श्री क्षेत्र धोम व धोम धरण, रायरेश्वर, कमळगड ही ठिकाणे आहेत. 

मेणवलीतील नाना फडणवीसांचा वाडा

मेणवली :
येथे पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणवीसांचा भव्य वाडा आहे. सन १७६८मध्ये औंधचे पंतप्रतिनिधी यांनी मेणवली गाव नाना फडणवीसांना दिला. ही जागा नानांना खूप आवडली व त्यांनी १७८०मध्ये वाडा बांधून घेतला. यात नानांची कल्पकता, कलाप्रेम, निसर्गप्रेम दिसून येते. चौसोपी रचना असलेल्या वाड्यामध्ये तख्तपोशी, नाना फडणवीसांचा पलंग, भित्तिचित्रे बघण्यासारखी आहेत. भित्तिचित्रांमध्ये कृष्ण आणि गोपी यांची चित्रे आहेत. पूर्वी येथे पेशव्यांचे मोडी लिपीतील दफ्तर ठेवले होते. ते आता पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये हलविण्यात आले. तसेच एक वाळूचे घड्याळही होते. वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील दिवाणखान्यात काही जुनी पेंटिंग्जही आहेत. वाड्यातील मोठ्या आकाराच्या भिंतींमध्ये एका वेळी एक माणूस जाईल एवढे जिने आहेत. येथे नानांचा मुक्काम फार काळ झाला नसला, तरी विश्रांतीसाठी ते इथे येत असत. त्यांनी वाड्याच्या मागील बाजूस कृष्णा नदीवर बांधलेला घाट अप्रतिम असून अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे चालू असते.

मेणवली घंटा

घाटावर मेणेश्वराचे मंदिर असून, त्याच्या समोर एक घंटाघर असून, वसईच्या लढाईमध्ये चिमाजी अप्पांनी वसईच्या चर्चमधील काही घंटा आणल्या होत्या. त्यापैकी एक घंटा नानांनी मेणवलीच्या मेणेश्वराच्या देवळासमोरील या घंटाघरात आणून बसविली. ही घंटा हेही येथील एक आकर्षण आहे. एवढी मोठी घंटा महाराष्ट्रात दुसरीकडे कोठेही नाही. नाना फडणवीसांची मालमत्ता दुसऱ्या बाजीरावाने जप्त केली होती. ब्रिटिश गव्हर्नर ऑर्थर वेलस्ली याने ती २५ मार्च १८०४ रोजी नानांची पत्नी जिऊबाईला परत दिली. नाना फडणवीसांनी एकूण नऊ लग्ने केली होती. नाना वारले, तेव्हा त्यांची पत्नी वयातही आलेली नव्हती. त्यांच्या मृत्यूनंतर ५४ वर्षांनी तिचा मृत्यू झाला. ब्रिटिश लेखक मॅक्डोनल्ड याने तिची गाठ घेतली होती. 

फडणवीस वाड्यातील भित्तिचित्रे

धोम महादेव मंदिरपांडेवाडी : मेणवलीच्या उत्तरेस पांडवगडाच्या पायथ्याला पांडेवाडी नावाचे गाव आहे. पेशवाईतील न्यायमूर्ती नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर राघोबाशी मतभेद झाल्याने येथे येऊन राहिले होते. बारभाईंच्या यशस्वी कारस्थानांतर ते पुण्याला परतले. येथे कोणतीही ऐतिहासिक वास्तू नाही. 

भोगाव : मेणवलीच्या पुढेच भोगाव म्हणून छोटे गाव आहे. तेथे वामन पंडित यांची समाधी आहे, असे सांगितले जाते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांच्या मते वामन पंडित मराठवाड्यातील होते. काहींच्या मते त्यांचा जन्म नांदेड येथे झाला व निधन सांगलीजवळील कोरेगाव-भूगाव येथे झाले. त्यांच्या निधनाच्या तारखेबद्दलही मतभेद आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरेगावजवळील कुमठे येथे त्यांचे निधन झाले, असे काही लोकांचे म्हणणे आहे. मराठी ज्ञानकोशामध्ये पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. ‘वामन पंडिताबद्दल अनिश्चित माहिती मिळते. कोणी वामन पाच आहेत, असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. यथार्थ दीपिकाकार वामन व भर्तृहरीच्या श्लोकांचे भाषांतर करणारा वामन हे दोन भिन्न असेही कोणी म्हणतात. याबद्दल वाद आहे. समाधिस्थान वाईजवळ भोगांव नावाच्या खेड्यात आहे.’ यावर सविस्तर संशोधन होणे गरजेचे आहे. धोम पुष्करिणीनरसिंह मूर्तीधोम : येथे धौम्य ऋषींचे वास्तव्य होते. म्हणून धोम हे नाव पडले असावे, असे काही लोकांचे म्हणणे आहे. नरसिंहाचे सुंदर मंदिर येथे आहे. नरसिंह जयंतीचा मोठा उत्सव येथे साजरा होतो. मंदिराच्या प्रांगणात शंकराचे मंदिर आहे. देऊळ संपूर्ण घडीव पाषाणात बांधले आहे. देवळाचे खांब आखीव-रेखीव आहेत. मंदिरासमोर एक पुष्करिणी असून, त्याच्या मधोमध कोरलेल्या कासवाच्या पाठीवर मेघडंबरीप्रमाणे शिखरासह नंदी आहे. मंदिराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात एक भुयारी विहीर असून, त्यातील पाणी नदीच्या बाजूला असलेल्या गोमुखातून सतत पडत असते. देवळाच्या पश्चिमेला नवग्रह मंदिर आहे. त्याच्याही पश्चिमेस धोमधरण आहे. धोम हे गाव तांदळासाठी प्रसिद्ध आहे. शेजारील अभेपुरी व धोम या दोन्ही गावांतील आंबेमोहोर तांदूळ प्रसिद्ध आहे. 

रायरेश्वर : छत्रपती शिवरायांनी वयाच्या १६व्या वर्षी येथे स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील हे एक प्रमुख ठिकाण आहे. निसर्गरम्य असे हे ठिकाण असून, येथून पूर्वेकडे वैराटगडापर्यंतचा प्रदेश दिसतो. तसेच धोम धरणाचे विहंगम दृश्य दिसते. उत्तरेकडे तुंग-तिकोण्यापर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसतात. हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे; पण वाईच्या बाजूने वाशीवली-खावली मार्गे गाडीरस्ता झाला आहे. थोडे चालावे लागते. भोरकडूनही पायथ्यापर्यंत रस्ता आहे. पुण्याहून भोरमार्गे आंबवडे (भोर) गाव व तेथून टिटे धरण, कोर्ले बाजूने रायरेश्वरावर जाता येते. या मार्गाने गडावर जाण्यास साधारणपणे तीन तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे. 

रायरेश्वर

कमळगड :
रायरेश्वरावरूनच दक्षिणेस असलेल्या कमळगडाचे दर्शन होते. याचे नाव काही जण कमालगड असे उच्चारतात. धोम धरणाच्या जलाशयामुळे कमळगड एखाद्या बेटासारखा दिसतो. कमळगडावर इतर गडांप्रमाणे बुरुज, तटबंदी काही नाही. तसेच काही इतिहासही नाही. येथे एक कावेची (गेरू) विहीर आहे. ही विहीर ५० ते ५५ पायऱ्या उतरून खाली जावे लागते. तळाशी पोहोचल्यावर चहूबाजूंना खोल कपारी असून, सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते. गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथऱ्यांचे अवशेष दिसतात. हा किल्ला ट्रेकर्ससाठीच आहे. महाबळेश्वरहून गुरेघरवरून खाली उतरून नांदगणे गावापासून पुन्हा चढण घेत येथे पोहोचता येते. महाबळेश्वरचा केट्स पॉइंट, पाचगणीचा पारशी पॉइंट येथूनही हा किल्ला दिसतो. गडाला जोडून येणारी एक डोंगररांग लक्ष वेधून घेते. तिला नवरा-नवरीचे डोंगर म्हणतात. जलाशयाच्या मधोमध असलेल्या आकोशी गावातूनही येथे जाता येते. धोम धरण होण्याच्या अगोदर मी येथे जाऊन आलो होतो व बऱ्याचदा जात असे. तरुणांनी हा ट्रेक अवश्य करावा. 

कमळगड - कावेची विहीर

कोंडवली :
कमळगडाच्या दक्षिण उतारावर कोंडवली हे गाव आहे. प्रतापगडावर अफझलवधाच्या वेळी शिवाजी महाराजांना वाचविणारे जिवा महाला यांचे हे गाव. त्यांचे छोटे स्मारकही गावात आहे. 

केंजळगड

केंजळगड :
महादेवाच्या डोंगरातील रायरेश्वरनंतर दिसतो केंजळगड. या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजांनी १२व्या शतकाच्या उत्तरार्धात केली. केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे. दक्षिण बाजूला धोम जलाशय व उत्तरेला देवघर जलाशय आहे. मागे जवळच रायरेश्वराचे पठार आहे. येथून सर्व दिशांना नजर फिरवली की एक विहंगम दृश्य दिसते. येथून कमळगड, कोल्हेश्वर, तोरणा, पाचगणी, पांडवगड, पुरंदर, महाबळेश्वर, राजगड, रायगड, रोहिडा, लिंगाणा, वज्रगड, वैराटगड, सिंहगड हे दुर्ग दिसतात. नाकिंदा या रायरेश्वराच्या पश्चिम टोकावरून चंद्रगड, प्रतापगड, मंगळगडही दिसतात. केंजळगड घेरा केलंजा, आणि मनमोहनगड या नावांनीही ओळखला जातो. ‘मनमोहनगड’ हे शिवरायांनी दिलेले नाव आहे. या अशा दुर्गांनीच तर औरंगजेबाला २६ वर्षे कडवी झुंज दिली. त्यांच्याच आश्रयाने मराठे लढले. एका इंग्रजाने केंजळगडाबाबत लिहिले आहे, ‘जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला, तर तो जिंकणे फार अवघड आहे.
 
पांडवगड

पांडवगड :
समुद्रसपाटीपासून ४१७७ फूट (१२७३ मीटर) उंच असलेला हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात (११७८-९३) बांधला. किल्ला आकाराने खूप लहान आहे. या किल्ल्याचे क्षेत्रफळ फक्त १० एकर आहे. किल्ल्याला सर्व बाजूंनी ५० ते ६० फूट उंचीचा उभा कातळ आहे. त्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी मिळाली आहे. यादव राजांचे पतन झाल्यावर हा किल्ला बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेला. त्यानंतर आदिलशहा व त्यानंतर शिवाजी महाराजांनी १३ ऑक्टोबर १६७३मध्ये किल्ला ताब्यात घेतला. तो अखेरपर्यंत मराठेशाहीच्या ताब्यात राहिला. सन १७११मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे यांना त्या वेळचे सेनापती चंद्रसेन जाधव यांनी जेरीस आणले, त्या वेळी पिलाजीराव जाधवांनी बाळाजींना पांडवगडावर सुखरूप पोहोचविले. चंद्रसेन जाधवांनी शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथास आपल्या ताब्यात देण्यास सांगितले; पण शाहू महाराजांनी त्यास नकार दिला व हैबतराव निंबाळकर यांना चंद्रसेन जाधवांचा बंदोबस्त करण्यास सांगितले. त्या वेळी आदर्कीच्या लढाईत चंद्रसेन जाधवांचा पराभव झाला व ते पन्हाळ्यास गेले आणि ताराबाईंच्या गोटात सामील झाले. 

पांडवगड धावडी लेणीमेजर थॅचरने १८१८मध्ये तो कंपनी सरकारच्या ताब्यात घेतला. किल्ल्यावर जोत्याचे अवशेष शिल्लक आहेत. किल्ल्यावरून पाचगणी, कमळगड, केंजळगड व धोम जलाशयाचे विहंगम दर्शन होते. सध्या टीव्हीवर चालू असलेल्या ‘लागिरंझालं जी’ मालिकेच्या शीर्षकगीतावेळी धोम जलाशयाच्या पलीकडे असणाऱ्या गडकोटांचे दर्शन होते. हा किल्ला पदभ्रमण (ट्रेकिंग) करणारांसाठी पर्वणी आहे. 

पांडवगडाच्या उत्तर दिशेला भग्न दरवाजा असून, ती एकमेव वाट आहे. किल्ला आकाराने लहान आहे. गडावर फक्त पडलेल्या इमारतींची जोती दिसून येतात. पाण्याची दोन टाकी, हनुमंताची उघड्यावर असलेली मूर्ती व पांडवजाईचे मंदिर येथे आहे. गडाच्या चारही बाजूंना उभे नैसर्गिक कातळ आहेत. त्यामुळे फारशी तटबंदी बांधलेली दिसून येत नाही. या गडावरून २५ ते ३० किलोमीटर अंतराचा भूभाग दिसतो. पूर्वेला चंदनगड व वंदनगड, पूर्व-दक्षिण कोपऱ्यात वैराटगड, पश्चिमेस कमळगड, केंजळगड, पाचगणी, महाबळेश्वरचा केट्स पॉइंट, उत्तरेस मांढरदेवी दिसते. धोम जलाशयाचे विहंगम दृश्य येथून दिसते. गडाचा उपयोग टेहळणी व इशारतीसाठी होत होता. पांडवगडाला जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक मेणवलीमार्गे व दुसरी धावडीमार्गे. मेणवली मार्ग कठीण आहे; पण ट्रेकिंगचा अनुभव मिळतो. या वाटेने मी मित्रांसह गेलो होतो. दुसरा मार्ग धावडी /शेलारवाडीच्या बाजूने आहे. तो सोपा आहे. 

पांडवगड लेणी : पांडवगडाच्या ईशान्येला धावडी गावाच्या हद्दीत बाजूला दोन बौद्धकालीन लेणी आहेत. त्यांना धावडी लेणी असेही म्हणतात. येथे एक चैत्य आणि एक विहार प्रकारातील लेणे असून, छोटा स्तूपही आहे. 

लोहारे लेणी

लोहारे लेणी :
वाई गावाच्या ईशान्येस असलेल्या सुलतानपूर गावात सातवाहन काळातील नाणी सापडली होती. तसेच जवळच असलेल्या लोहारे लेण्यांचा वार्टर फ्रेअर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सन १८५०मध्ये प्रथम उल्लेख केला. येथे आठ लेण्यांचा समूह आहे. ही लेणी पालपेश्वर लेणी म्हणून ओळखली जातात. ही लेणी सातवाहन काळातील आहेत. या भागातील किवरा ओढ्याजवळ काही ठिकाणी अश्मयुगीन हत्यारेही सापडली आहेत. तसेच सातवाहन काळातील नाणीही सापडली आहेत.

सोनजाई मंदिरसोनजाई मंदिर : वाई शहराच्या दक्षिणेस एक भव्य डोंगर दिसतो. या डोंगरावर सोनजाईचे मंदिर आहे. नवरात्रात या मंदिरामध्ये वाईमधील भाविक पदभ्रमण करीत जातात. दमछाक करणारी वाट असली, तरी डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर सर्व शीण निघून जातो. विवाह समारंभ झाल्यावर अनेक कुटुंबामध्ये नवदाम्पत्याने देवीच्या दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. सोनजाईच्या डोंगरावर दक्षिणेस बावधनपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर दोन बौद्ध लेणी आहेत. ही हऱ्या-रामोशाची गुहा म्हणून ओळखली जाते. 

सोनेश्वर : बावधन व ओझर्डे गावातील सीमेवर कृष्णा नदीच्या तीरावर सोनेश्वराचे मंदिर आहे. ओझर्डे गावाच्या हद्दीत साधारण एक हजार वर्षांपूर्वी समाधिस्त झालेल्या अज्ञात सत्पुरुषांची समाधी सन १९७० ते ७५च्या दरम्यान सापडली आहे. सोनेश्वर मंदिरापासून बावधनच्या बगाडाची सुरुवात होते. काळजाचा ठोका चुकविणारे हे बगाड बघण्यासाठी प्रचंड गर्दी होते. 

वैराटगड

वैराटगड :
पुणे-सातारा रस्त्यावर पुण्याहून येताना उजव्या बाजूला पाचवडजवळ हा किल्ला आहे. भुईंजपासूनच हा किल्ला दिसू लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी पाचवड-वाई मार्गावर व्याजवडीपासून येथे जाता येते. दुसरा रस्ता पाचवड-मेढा रस्त्यावर सारातले गावातून आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने १२व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. गडावर पूर्वी तटबंदी होती. आदिलशहाकडून शिवरायांनी १६५९च्या सुमारास किल्ला ताब्यात घेतला. औरंगजेबाने इसवी सन १६९९मध्ये हा गड जिंकून घेतला. या काळातच गडाचे सर्जागड असेही नामकरण झाले होते. सातारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये याचा तट १७ फूट उंच आणि चांगलाच जाडजूड असल्याची नोंद आहे. १८९६मध्ये लिहिलेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या पुस्तकातही या तटाचे उल्लेख आले आहेत. किल्ल्यावर पुरातन अशी कोणतीही वास्तू अस्तित्वात नाही; मात्र इमारतींचे, वाड्यांचे, जोत्याचे अवशेष दिसून येतात. कातळाची नैसर्गिक तटबंदी किल्ल्याला लाभली आहे. किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी पाण्याची टाकी बघण्यास मिळतात. कातळावर मधाची पोळी असतात. त्यापासून सावध राहावे. गडावर वैराटेश्वराचे देऊळ आहे. देवळाच्या सभामंडपात उभे केलेले एक वीरगळ शिल्प (स्मारक) दिसते. हा वीरगळ यादव काळातील असावा. योद्ध्याच्या पराक्रमाची माहिती शिल्पपटातून त्यावर कोरलेली असते. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. 

पसरणी : पाचगणीला जाताना पायथ्याशीच दोन किलोमीटर अंतरावर पसरणी गाव आहे. येथे नबाब शेखमिरे यांचा वाडा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी हा गाव शेखमिरा यांना इनाम म्हणून दिला होता. प्रसिद्ध उद्योगपती बी. जी. शिर्के आणि शाहीर साबळे याच गावचे. या गावाच्या अलीकडेच खादी ग्रामोद्योग मंडळाचे रेशीम केंद्रही आहे. 

किकली भैरवनाथ मंदिर

किकली भैरवनाथ मंदिर :
वाई तालुक्याच्या पूर्व भागात किकली हे गाव आहे. येथील पुरातन भैरवनाथ मंदिर आवर्जून पाहावे असे आहे. हेमाडपंती शैलीतील या मंदिरामध्ये सभामंडपातील रंगशिळेवर शिल्पकलेने भरलेले चार खांब असून, त्यावर संपूर्ण रामायण कोरलेले आहे. काही ठिकाणी शिवतांडव, वामनावतार, सुरसुंदरी, क्षेत्रपाल अशी शिल्पे आहेत. शिल्पकलेने ओतप्रोत भरलेले हे मंदिर अद्याप पर्यटकांच्या यादीमध्ये समाविष्ट नाही, असे खेदाने म्हणावे लागेल. 

किकली वीरगळ (स्मारक शिल्प)

भव्य चौथऱ्यावर हे मंदिर साकारले आहे. सुमारे १८ पायऱ्या चढून गेल्यावर हा मंदिर समूह आहे. त्यातील दोन भग्नावस्थेत आहेत आणि एक मंदिर त्याचे वैभव टिकवून उभे आहे. हे गाव योद्ध्यांच्या स्मरणार्थ कोरलेल्या वीरगळांसाठी प्रसिद्ध आहे. तळघरात असलेला गाभारा, अंतराळ, सभामंडप अशी मंदिराची रचना आहे. चाळीसगावजवळील कन्हेरगड येथेही अशाच प्रकारचे मंदिर आहे. सभागृहाचे खांब साधारण मध्य कर्नाटकातील मंदिरांप्रमाणे वाटतात; पण यांचे वेगळेपण दिसून येते. गावाच्या पलीकडे चंदन व वंदन हे दोन किल्ले जुळ्या भावाप्रमाणे दिसून येतात. 

चंदन व वंदन किल्ले

कवठे :
माजी खासदार आबासाहेब तथा किसन वीर यांचे हे गाव. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरात स्वातंत्र्यसैनिक आहे. १९४२च्या लढ्यामध्ये आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या गावाने झोकून दिले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांच्या हालचालीचे हे एक प्रमुख ठिकाण होते. आबासाहेब वीर यांचे मोठे स्मारक पुणे-सातारा रस्त्याच्या पूर्वेला लागूनच आहे. शेजारी असलेले बोपेगाव हे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे गाव. 

भुईंज : कृष्णा नदीच्या काठावरचे हे गाव हायवेला लागूनच आहे. भृगू ऋषींची समाधी येथे आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे. माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचे हे गाव. 

किसन वीर साखर कारखाना : येथील मुख्य आकर्षण म्हणजे हुतात्म्यांचे स्मारक. मुंबईवरील हल्ल्यात वीरगती मिळालेल्या जवानांची शिल्पे येथे तयार करण्यात आली आहेत. तसेच वाई तालुक्यातील वीरगती मिळालेल्या जवानांचेही स्मारक आहे. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 138 Days ago
Capt . Macfomald wrote a biography of Nana .. Phadanavis , published in 1853 . He actually went to Menavali and talked to the widow . The book was translated into Marathi and published in 1854 .I saw a copy in the Bharat Itihas Sounshodhak Mandal ..i
1
0
आशा बोडस About 139 Days ago
खूप छान माहिती व फोटो
1
0

Select Language
Share Link
 
Search