Next
मालिकेतून उलगडणार बाबासाहेबांच्या मुंबई वास्तव्याची गोष्ट
प्रेस रिलीज
Thursday, July 11, 2019 | 02:04 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत बाबासाहेबांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणुकीनंतर आता सुभेदारांचे कुटुंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झाले आहे. बाबासाहेबांचे मुंबई शहराशी भावनिक नाते होते. या शहराच्या उभारणीसाठी त्यांनी भरभरून दिले आहे. त्यांच्या मुंबई वास्तव्यातल्या अनेक गोष्टी या मालिकेतून उलगडणार आहे.

अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केली जाते. बाबासाहेबांचे वडील म्हणजेच सुभेदार रामजीबाबांनी परेलमध्ये संपूर्ण परिवाराला राहण्यासाठी एक खोली आणि फक्त भिवाच्या अभ्यासासाठी म्हणून एक खोली घेतली होती. परेलच्या बीआयटी चाळीत आंबेडकरांचे कुटुंब तब्बल २२ वर्षे राहत होते. बाबासाहेबांच्या जीवनाच्या अणि सामाजिक आंदोलनांच्या धगधगत्या आठवणी या वास्तुशी निगडित आहेत. त्यापूर्वी आंबेडकर कुटुंबीय एल्फिन्स्टनच्या डबक चाळीत राहायचे. बीआयटी चाळीत राहून बाबासाहेबांनी बीए पूर्ण केले. खोली क्र. ५० मध्ये बाबासाहेब कंदिलाच्या प्रकाशात अहोरात्र अभ्यास करायचे. दुसरी खोली क्र. ५१ स्वयंपाकघर असल्याने रमाईने केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद ते येथे घ्यायचे. याच बीआयटी चाळीत राजर्षी शाहू महाराजदेखील बाबासाहेबांना प्रथम भेटण्यास आले होते. त्यावेळी रमाईंच्या हातचा चहा महाराजांनी घेतला व रमाईंना आपली छोटी बहीणदेखील मानले. बाबासाहेबांच्या मूकनायक तसेच लंडन येथील शिक्षणासाठी देखील अर्थसाह्य महाराजांनी केले.

बाबासाहेब पुढे सिडनेहॅम कॉलेजात प्राध्यापक झाले. नंतर  सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. महाडचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, जनता आणि बहिष्कृत भारत साप्ताहिकांची सुरुवात ते पुणे करारावरील स्वाक्षरी इतका बाबासाहेबांचा प्रदीर्घ सहवास परेल इथल्या बीआयटी चाळीतल्या वास्तूस लाभला. या चाळीतून बाबासाहेब १९३४ला दादरच्या नव्याने बांधलेल्या राजगृहात राहायला गेले. त्यानंतर ५०क्रमांकाची खोली ताडीलकर कुटुंबीयांनी, तर ५१क्रमांकाची खोली खैरे कुटुंबीयांनी खरेदी केल्या. दुसऱ्या मजल्यावर समोरासमोर या खोल्या आहेत. सध्या ५० नंबरच्या खोलीत रोहन ताडीलकर हा युवक आई आणि बहिणीसह राहतो. ५१ नंबरच्या खोलीत भागुराम खैरे पत्नी सविता आणि मुलगा कल्पीतसह राहतात. त्यांचे काका सखाराम खैरे यांच्याकडून त्यांना ही खोली मिळाली. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव यांचे खैरे हे जवळचे नातेवाईक. जगातील सर्वांत विद्वान व्यक्तीने जिथे काही काळ घालवला तिथे राहण्याची संधी मिळणे म्हणजे आम्ही खूपच भाग्यवान असल्याचे हे दोन्ही कुटुंबीय सांगतात. 

सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायी या वास्तूला अवश्य भेट देतात. विशेष म्हणजे ताडीलकर आणि खैरे कुटुंबीय प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करून माहितीही देतात. बरेच परदेशी अभ्यासकही या चाळीत येतात. भागुराम खैरे यांनी या ५१ क्रमांकाच्या खोलीत कोणताही बदल केलेला नाही. बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांनी खोलीत फरशीसुद्धा बसवली नाही. आजही या खोलीत सिमेंट आणि कोबा आहे. परळच्या बीआयटी चाळीने २०१२मध्ये शंभरी पार केली आहे. बाबासाहेबांच्या वास्त्व्याने पावन झालेली ही वास्तू म्हणजे आपल्या सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search