Next
मधुबन खुशबू देता है...
BOI
Thursday, January 03, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:अमित गोडसे 
नावाचा एक तरुण चक्क आयटी क्षेत्रातली नोकरी सोडून मधमाश्या संवर्धनाच्या कामाला वाहून घेतो, त्याची ही गोष्ट. त्याच्या कामामुळे त्याला ‘बी मॅन’ अशी ओळख मिळाली आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज जाणून घेऊ या, त्याच्या या अनोख्या प्रवासाबद्दल...
............
१९७८ साली इंदिवर या कवीनं लिहिलेलं ‘मधुबन खुशबू देता है...’ हे गाणं येसूदासनं गायलं. हे गाणं चित्रपटसृष्टीतले गुणी अभिनेते राजेंद्रकुमार आणि नूतन यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. हे गाणं पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मी शाळेत होते; पण त्यानंतर कित्येकदा हे गाणं ऐकलं, तरी त्याची गोडी आजही तितकीच अवीट आहे. हे गाणं ऐकताना मन भरून येतं. ‘सूरज ना बन पाये, तो बन के दीपक जलता चल...’ ही ओळ, ‘तुझ्या हातून खूप भव्यदिव्य घडणार नाही म्हणून काहीच करायचं नाही, असंही नाही. तुझी एक लहानशी कृतीच खूप काही करू शकते,’ हा या गीतातला संदेश मला आजही तितकाच भावतो. या गीतातल्या ‘मधु’ या शब्दानं माझं मन एका तरुणाच्या कामात जाऊन अडकलं. या तरुणाचं नाव अमित गोडसे!

अमित आपल्या आई-वडिलांबरोबर छत्तीसगडमधल्या रायपूरमध्ये राहणारा एक शाळकरी मुलगा! वडिलांच्या सतत होणाऱ्या बदल्यांमुळे अनेक ठिकाणी त्याचीही भटकंती होत असे. या भटकंतीतून त्याला रायपूरनं मात्र जास्त लळा लावला. जंगलाजवळ घर असल्यामुळे फावल्या वेळात झाडावर चढायचं, मधमाश्या असोत वा फुलपाखरं, त्यांचं निरीक्षण करायचं त्याला खूपच आवडायचं. इतकंच काय, पण आई रागावली तर अमित चक्क झाडावर चढून रुसून बसायचा. अनिल अवचटांनी ‘मस्त मस्त उतार’ या काव्यसंग्रहातल्या त्यांच्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, ‘एकदा मन रुसलं, झाडावर जाऊन बसलं’

आईनं समजूत काढल्यावर मग कुठे अमित महाशय झाडावरून खाली उतरायचे. निसर्गाचं हे वेड वाढतच होतं. सहावीच्या वर्गात असताना एकदा सगळ्या मित्रांनी आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडायचं ठरवलं. त्याच दिवशी संस्कृतची चाचणी परीक्षादेखील होती. झाडावर चढलेला अमित इतका रमून गेला, की आपली आज परीक्षा आहे ही गोष्टदेखील तो विसरून गेला. मग शाळेत जे व्हायचं ते सगळं रामायण झालं; मात्र उनाडक्या काही थांबल्या नाहीत. अमितला मासे पकडायलाही खूप आवडायचं. आईला वाटलं, आपल्या पोराची संगत बरोबर नाही. त्यामुळे तिनं त्याला दुसऱ्या शाळेत घातलं; पण तिथंही तेच घडत होतं. हळूहळू अमित मोठा होत होता. शाळेत असताना त्याला गणित विषय आवडायला लागला होता; मात्र पुढची दिशा ठाऊक नव्हती. दहावीत असताना चांगले गुण मिळाले. मग आई-वडिलांनी त्याला ‘तू इंजिनीअर हो’ असं सांगितलं. अमितनं इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला आणि तो मेकॅनिकल इंजिनीअर झाला. पहिलीच नोकरी मुंबईसारख्या महानगरीत आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात मिळाली. पाच वर्षं अमितनं ही नोकरी इमानेइतबारे केली; मात्र त्याला मुंबई आवडायची नाही. आपण कुठून या काँक्रीटच्या जंगलात आलो, असं वाटून त्याला मग रायपूरचं जंगल आठवायचं. आपल्या टेबलवरून त्याला आपल्या बॉसची केबिन दिसायची. काही वर्षांनी आपणही बढती मिळून त्या केबिनमध्ये बंदिस्त जागेत बसलेलो असू, असे विचार मनात येताच तो अस्वस्थ व्हायचा. 

वेध कार्यक्रमात बोलताना अमित गोडसे

त्याचदरम्यान अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशभर भ्रष्टाचारविरोधी चळवळ सुरू झाली होती. निषेध, मोर्चे, घोषणा या सगळ्यांत अमितनंही भाग घेतला. त्या वेळी त्याला ७०-७५ वर्षं वयाची अनेक माणसंही भेटली. त्यांच्याशी बोलताना त्याला कळलं, की यातल्या प्रत्येकाला आयुष्यात वेगळंच काहीतरी करायचं होतं; पण ते राहूनच गेलं आणि ती खंत उराशी घेऊन ते जगत होते... अमितच्या मनात त्या वेळी विचार आला, की आपण राजकारणात जाऊ शकतो का? त्याचं उत्तर मनानं ‘नाही’ असं दिलं. मग त्यानं मनाला दुसरा प्रश्न विचारला, ‘आपण आहे ती नोकरी आयुष्याच्या अखेरपर्यंत करू शकतो का?’ त्याचंही उत्तर ‘नाही’ असंच येत होतं; पण करायचं काय हे मात्र काही केल्या कळत नव्हतं. मुंबईतली गर्दी, जागांचे आकाशाला भिडलेले भाव हे सगळं बघून अमितनं पुण्यात वारजे या भागात एक ब्लॉक विकत घेतला. शनिवार, रविवारी तो मुंबईहून पुण्यात येऊ लागला. एकदा सुट्टीच्या दिवशी असाच तो आला असताना त्यानं बघितलं, की त्याच्या सोसायटीत मधमाश्यांचं पोळं लागलेलं होतं आणि आपल्या मुलांना या मधमाश्या चावतील या भीतीनं लोकांनी ‘पेस्ट कंट्रोल’वाल्यांना बोलावलं होतं. ‘पेस्ट कंट्रोल’च्या लोकांनी येऊन तिथे फवारणी केली आणि बघता बघता मृत मधमाश्यांचा सडा खाली पडला. त्या मधमाश्यांकडे पाहून अमितचा जीव कळवळला. त्याला इवल्याश्या बाटल्यांतला मध विकत घेणारे लोक दिसायला लागले. लोकांना मध हवा आहे, पण मधमाश्या नको आहेत, या विचारांनी त्याला अस्वस्थ वाटायला लागलं. कोणीतरी या मधमाश्यांना वाचवायला हवं. आज आपल्या सोसायटीत घडलंय, उद्या आणखी कुठेही हे घडणार, घडतही असेल.... हे सगळे बेचैन करणारे विचारच अमितला पुढल्या आयुष्याचं वळण दाखवणार होते. अशा मनःस्थितीत असताना अमित आपल्या मित्राबरोबरच त्याच्या वडिलांची सेंद्रिय शेती बघण्यासाठी मालेगावला गेला. तिथे त्याला एका बाजूला मधमाश्यांच्या पेट्या दिसल्या. सेंद्रिय शेतीची माहिती विचारायचं सोडून अमित त्यांच्याजवळ मधमाश्यांच्या पेट्यांबद्दल चौकशी करत बसला. ते मधुमक्षिकापालन करत होते; मात्र त्यांच्याजवळही अमितच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. त्यांनी त्याला मधुमक्षिकापालन केंद्राचं राज्यस्तरीय ऑफिस महाबळेश्वरला असल्याचं सांगितलं. तसंच केंद्रीय मधुमक्षिकापालन केंद्र पुण्यात असल्याचंही अमितला समजलं. अमितच्या डोक्यात आता मधमाश्यांनी गुणगुण करायला सुरुवात केली होती. त्यानं गुगलवर शोध घेऊन आणखी माहिती मिळवली. तेव्हा त्याला या मधुमक्षिकापालनाचा पाच दिवसांचा प्राथमिक कोर्स असल्याचंही कळलं. अर्थातच त्यानं हा कोर्स केला. त्यानंतर महाबळेश्वरला जाऊन त्यानं एक महिन्याचा कोर्स केला. या वेळी कंपनीत त्यानं आपण आजारी असल्याचं सांगितलं होतं. कोर्समुळे अमितला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. पुण्यातच नव्हे, तर भारतात शेकडो, हजारो, लाखो मधमाश्या केवळ लोकांच्या अज्ञानामुळे मरताहेत हे त्याला समजलं होतं. अमित या काळात केरळ, गुजरात अशा अनेक राज्यांत झपाटल्यासारखा फिरला. तिथल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन राहिला. आदिवासींकडून, स्थानिक लोकांकडून त्यानं मधमाश्यांविषयी आणखी माहिती जाणून घेतली. हे सगळं करत असताना त्यानं कंपनीत आपल्याला स्वाइन फ्ल्यू झाल्याचं सांगून सुट्टी मिळवली होती. आता मात्र आपण जास्त दिवस असं खोटं बोलू शकणार नाही हे लक्षात येताच अमितनं कंपनीत जाऊन सरळ आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. नोकरीतले पगारातले काही पैसे वाचवून त्यानं बचत केली होती. त्यामुळे, ‘बघू पुढलं पुढे’ असा विचार मनाशी होता. याच काळात अमितचे आई-वडील पुण्यात आले. अमित त्यांना सारखा घरातच दिसत होता. अमितनं त्यांनादेखील आपण नोकरी सोडल्याचं सांगितलं नव्हतं. या वास्तव्यात त्याला ते सांगावंच लागलं. आपला मुलगा चांगली नोकरी सोडून आता घरोघरी जाऊन मधमाश्यांचं पोळं काढणार या कल्पनेनं त्याच्या आईला रडू फुटलं आणि त्याचा रागही आला. हे काय आपल्यासारख्या पांढरपेशा लोकांचं काम आहे का, इतरांची मुलं सुटाबुटात वावरताहेत, अमेरिका, इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक होताहेत आणि आपला मुलगा मात्र कामगाराच्या गबाळ्या वेशात दारोदार मधमाश्यांच्या मागे फिरतोय, या विचारांनी तिला असह्य व्हायचं. कधी ती अमितची समजूत घालायचा प्रयत्न करायची, तर कधी त्याला रागवायची; पण अमितचा निर्धार ठाम होता. अमितचे वडील मात्र या प्रकारात तटस्थ होते. त्याची बहीण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. नातेवाइकांना कळल्यावर त्यांना ‘अमितला वेड लागलंय’ असंच वाटायला लागलं. इंजिनीअर होऊन चांगली आयटी क्षेत्रातली नोकरी मिळालेली असताना हे कसलं खूळ यानं डोक्यात घेतलंय, असं ते बोलायला लागले. अमितनं मात्र या कोणाच्याही बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. सुरुवातीला त्यानं शाळा, कॉलेजेस, सोसायट्या असं सगळीकडे जाऊन मधमाश्यांवर व्याख्यानं दिली. कोणाला मधमाश्यांचं पोळं काढायचं असलं तर आपल्याशी संपर्क साधायला सांगितलं. सुरुवातीच्या काळात अमित हे सगळं मोफतच करायचा. यातूनच त्याचं नाव घराघरांत जाऊन पोहोचलं. मधमाश्यांचं पोळं काढताना मधमाश्यांना पेटीत जमा करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवणं आणि मध मिळवणं असं अमितचं काम सुरू झालं. हळूहळू अमितनं या कामासाठी काही शुल्क आकारायला सुरुवात केली. मधामधला अर्धा हिस्साही तो सोसायटी किंवा बंगल्याच्या मालकांना देऊ लागला. याच काळात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रात ‘बी मॅन’ म्हणून त्याच्या कामावरचा लेख प्रसिद्ध झाला. त्यानंतर लोक त्याला ‘बी मॅन’ म्हणूनच ओळखायला लागले. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, लोकमत अशा अनेक मराठी वृत्तपत्रांमधूनदेखील अमितच्या कामावरचे लेख प्रसिद्ध झाले. आपण एकटे पुरेसे ठरणार नाही, याची अमितला कल्पना असल्यानं त्यानं आपल्यासारखेच अनेक मधुमक्षिकामित्र तयार करण्याचं ठरवलं आणि त्यानं ठिकठिकाणी तशी प्रशिक्षणं आयोजित केली. यातूनच अमितची ‘बी बास्केट’ नावाची वेबसाइटदेखील उदयाला आली. तसंच त्यानं ‘बी बास्केट’ नावाची स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली. याच दरम्यान आदिवासींच्या संपर्कात असल्यानं त्यांच्याकडूनही अमितला शुद्ध मध मिळायला लागला. आदिवासींच्या मधाला बाजारपेठ आणि त्यातून त्यांना आणि अमितला आर्थिक कमाई व्हायला लागली. आता विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातूनही अमितकडे मध येतो. सध्या पाच टन मधाची विक्री अमित करतो आहे, तेही मधमाश्यांना न मारता! 

खरं तर आज शुद्ध मध म्हणून अनेक ठिकाणी चक्क गुळाचा पाक विकला जातो. मधाच्या शुद्धतेवर कोणाचंही नियंत्रण नाही. आज चांगल्या मधासाठी कुठला कायदाही अस्तित्वात नाही. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अमितचं काम वाखाणण्याजोगं आहे. पुणे, मुंबई, बेंगळुरूबरोबरच लवकरच औरंगाबादमध्येही अमितचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. अमितचं काम महाराष्ट्रच नव्हे, तर राज्याची सीमा ओलांडून बाहेर गेलं आहे. अमितबरोबर आज सहा जण काम करताहेत. 

टीमसह अमित गोडसे

विशेष म्हणजे काम करत असताना अमितला मधमाश्या चावत नाहीत. आता त्याच्या शरीरावर मधमाश्यांच्या चावण्याचा अनिष्ट परिणाम होत नाही. याचं कारण एखाद-दुसरी मधमाशी चावली, तर ते माणसासाठी उपकारक आहे. मधमाश्यांच्या विषामध्ये मेलेटिन नावाचा एक प्रकार असतो. त्यामुळे त्या माणसाला संधिवात, पॅरालिसिस होत नाही. तसंच कॅन्सरवरदेखील मेलेटिनचा काय प्रभाव पडतो, याविषयी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. त्यामुळे मधमाश्या आपल्या आयुष्यात आणि एकूणच निसर्गात किती महत्त्वाची भूमिका बजावताहेत हे लक्षात येईल.
 


जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइननं म्हटलंय, ‘मधमाश्या संपल्या, तर त्यानंतरच्या चारच वर्षांत संपूर्ण  मानवजातही संपेल.’ याचं कारण म्हणजे मधमाश्या नसतील तर परागीभवन होणार नाही. परागीभवन झालं नाही, तर झाडं तगणार नाहीत. झाडं नसतील, तर जनावरं नाही आणि म्हणून मग माणूसही नाही. मधमाश्या निसर्गाचा समतोल राखायला मदत करतात. मधमाश्या आणि झाडं यांच्यातलं सहजीवन खूप महत्त्वाचं आहे. जंगलं अबाधित राखण्यासाठी, जनुकीय जैवविविधता जपण्यासाठी मधमाश्यांचं असणं किती आवश्यक आहे हे अमित खूप तळमळीनं सांगत असतो. 

मधमाश्यांच्या अनेक जाती असून, त्या त्या जातीप्रमाणे त्यांचं कामही आहे. छोटी माशी ५०० मीटर अंतरातच फिरते, तर आग्या माशी पाच किलोमीटर अंतराच्या परिसरात वावर करते. छोट्या मधमाश्या छोट्या-छोट्या फुलांमधला, तर मोठ्या मधमाश्या मोठ्या फुलांमधला मकरंद गोळा करतात. पूर्वी देवराया असत. ही जंगलं राखून ठेवली जात. देवराई नष्ट केली, तर देवाचा कोप होईल अशी भीतीही त्या काळी माणसाच्या मनात असायची; मात्र हळूहळू देवराया नष्ट होऊ लागल्या आणि त्याचाही घातक परिणाम पर्यावरणावर होऊ लागला. देवराया वाढायला हव्यात. मधमाश्यांना जपण्यात, त्यांना वाढवण्यात निसर्गाचं, पर्यायानं मानवजातीचं हित आहे. मधमाश्यांमुळेच शेतीच्या उत्पादनात वाढ होते. तेलबिया, तीळ, कांदा बियाणं, डाळिंब अशी अनेक पिकं मधमाश्यांमुळे जास्त चांगल्या प्रतीची मिळण्यास मदत होते. मधमाश्यांच्या कामामुळे शेतीचं उत्पादन वाढतं. ‘दुसऱ्यांचं भलं करा, आपोआप आपलं भलंच होईल,’ असं मधमाश्या सांगतात. आज अनेक लोक अमितमुळे मधमाश्या पाळताहेत.

मधमाश्यांसाठी आणि त्यांचं संवर्धन करणाऱ्या अमितसाठी या गीताच्या ओळी किती समर्पक आहेत हे पुन्हा पुन्हा जाणवत राहतं. 

मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है
जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है...

संपर्क : अमित गोडसे – ८३०८३ ००००८
ई-मेल : contact@beebasket.in
वेबसाइट : https://www.beebasket.in

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shirin Kulkarni About 231 Days ago
अत्यंत प्रेरणादायी लेख. असं एखाद्या ध्येयाने झपाटून जाणं खूप कष्टदायक तरीही आनंददायी आणि समाधानकारक असतं. अभिनंदन अमित आणि धन्यवाद दीपा ताई!
0
0
एस.एम. देशमुख , सोलापुर About 231 Days ago
चांगली बातमी आहे . आनंद वाटता
0
0

Select Language
Share Link
 
Search