Next
अपघात विमा पॉलिसी
BOI
Saturday, August 04, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

‘समृद्धीची वाट’ सदरात या वेळी माहिती घेऊ या अपघात विमा पॉलिसी अर्थात पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीबद्दल... 
..........
आपल्याला कधीही अपघात होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते; मात्र आपण रोजचा पेपर वाचायला घेतला, की आजूबाजूला किमान दोन-तीन अपघात झाल्याच्या बातम्या वाचनात येतात. होणारा अपघात कधी गंभीर, तर कधी किरकोळ असतो. गंभीर अपघातात कधी दुर्दैवी मृत्यू, तर कधी गंभीर दुखापत, तर कधी किरकोळ दुखापत झाल्याचे दिसून येते. अशा वेळी संबंधिताची शारीरिक व आर्थिक हानी होत असते. यातील शारीरिक हानी भरून काढता येईलच असे नाही; मात्र  संबंधिताने योग्य ती पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसी घेतली असेल, तर आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात भरून काढले जाऊ शकते. असे असले तरी अद्यापही बहुतेकांना याबाबत फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. म्हणून आज आपण याबबत आवश्यक ती माहिती घेऊ.

पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीच्या नावातच या पॉलिसीचा उद्देश दिसून येतो. अपघातानंतर प्रसंगी अपघातग्रस्त व्यक्ती मृत्युमुखी पडते, तर प्रसंगी पूर्णत: अपंग किंवा अंशत: अपंग होते. काही वेळा गंभीर जखमी झाल्याने अल्प अथवा दीर्घ काळासाठी ती व्यक्ती रुग्णालयात असते. पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीमुळे या सर्व प्रसंगांत परिस्थितीनुसार होणाऱ्या आर्थिक नुकसानाची अपघातग्रस्त व्यक्तीच्या असणाऱ्या पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसीच्या कव्हरनुसार भरपाई केली जाते. ही नुकसानभरपाई लाइफ इन्शुरन्स, तसेच मेडिक्लेम पॉलिसीच्या मिळणाऱ्या क्लेमच्या व्यतिरिक्त असते. म्हणून पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीचे आर्थिक नियोजनात एक विशेष महत्त्व आहे.

पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी साधारणपणे वयाच्या १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान घेता येते. मिळणारे कव्हर एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत असू शकते.  (किमान व कमाल कव्हर इन्शुरन्स कंपनीनुसार कमी-अधिक असू शकते.) दहा ते २५ लाख रुपयांच्या कव्हरसाठी दीड ते अडीच हजार रुपये इतका हप्ता पडतो. कंपन्यांनुसार त्यात बदल होतो.पर्सनल अॅक्सिडेंट पॉलिसीचा कालावधी सामान्यत: एक वर्षाचा असून, दर वर्षी पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागते. (काही कंपन्या दोन ते तीन वर्षे कालावधी असणारी पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी देऊ करत आहेत.)

पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीच्या कव्हरनुसार खालीलप्रमाणे क्लेम मिळू शकतो.
- पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास संपूर्ण कव्हरइतकी रक्कम वारसास क्लेम म्हणून दिली जाते.
- पॉलिसीधारक अपघातात पूर्णत: अपंग झाल्यास संपूर्ण कव्हरइतकी रक्कम पॉलिसीधारकाला क्लेम म्हणून दिली जाते. अंशत: अपंग झाला असेल, तर अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार क्लेमची रक्कम पॉलिसीधारकास दिली जाते. उदा. कव्हर १५ लाख रुपये असून, अपघातात पॉलिसीधारकास ४० टक्के अपंगत्व आले, तर त्याला क्लेमपोटी सहा लाख रुपये दिले जातील.
- पॉलिसीधारक अपघातात जखमी होऊन त्याला काही काळ रुग्णालयात राहावे लागले, तर प्रति दिन २५० रुपये (जास्तीत जास्त ३० दिवसांपर्यंत) दिले जातात. याशिवाय रुग्णवाहिका खर्चाइतकी रक्कम क्लेमपोटी दिली जाते. (रुग्णालयात राहावे लागल्यानंतर प्रति दिनी मिळणारी रक्कम व कालावधी हा इन्शुरन्स कंपनीनुसार कमी-अधिक असू शकतो.)
- पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी स्वत:साठी, कुटुंबासाठी (पत्नी व १८ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांसाठी), तसेच आई-वडिलांसाठीसुद्धा घेता येते.

काही प्रमुख इन्शुरन्स कंपन्या देत असलेल्या पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीची तुलनात्मक कल्पना खालील तक्त्यावरून येईल.

यावरून आपल्या असे लक्षात येईल, की कंपनीनुसार मिळणारे कव्हर, कालावधी व वयोमर्यादा बदलत असते.

पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीची उपयुक्तता विचारात घेता प्रत्येकाने पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी घेणे निश्चितच हितावह आहे; मात्र ही पॉलिसी घेताना सर्व अटी, समाविष्ट असलेल्या व नसलेल्या बाबी समजावून घेणे जरूरीचे असते.

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search