Next
संवेदनशीलतेतून बहरतेय ‘स्नेहवन’
BOI
Thursday, November 09, 2017 | 03:45 PM
15 0 0
Share this story

स्नेहवन
ऐन उमेदीच्या काळात आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून समाजसेवेचा खडतर मार्ग निवडून एका तरुणाने ‘स्नेहवन’ची स्थापना केली. अशोक देशमाने असे त्याचे नाव. आत्महत्या केलेल्या, तसेच गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी, त्यांचे शिक्षण सोपे व्हावे, यासाठी त्याने ही संस्था स्थापन केली. ‘लेणे समाजाचे’मध्ये आज पाहू या त्या संस्थेविषयी...

.........
आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण सुखाच्या आणि यशाच्या मागे लागला आहे. नोकरी मिळणे, आयुष्यात स्थैर्य मिळणे यातच आयुष्याचे यश असल्याचे मानणाराही एक वर्ग आहे. या सगळ्या प्रस्थापित यशाच्या संकल्पनांना धक्का देत एक तरुणाने वेगळी वाट निवडली. ऐन उमेदीच्या काळात आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून त्याने खडतर मार्ग निवडला, तो म्हणजे समाजसेवेचा. आज हा तरुण अनेकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. त्याचे नाव आहे अशोक बाबाराव देशमाने. परभणी जिल्ह्यातील मानवतमधील मंगळूर हे त्याचे मूळ गाव.

एक चांगली नोकरी असतानाही अशोकचे मन स्वस्थ बसत नव्हते. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळात होरपळून निघाला होता. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांची कुटुंबे वाऱ्यावर पडली. अशोकचे संवेदनशील मन या शेतकरी कुटुंबांसाठी काहीतरी केले पाहिजे, असे सांगत होते. दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुले, तसेच आत्महत्या झालेल्या कुटुंबातील मुलांसाठी काम करायचे त्याने ठरवलं. या मुलांनी केवळ शहरात स्थलांतर करून चालणार नाही, तर त्यांचे दारिद्र्य संपवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे शिक्षण, निवासाची सोय करणे गरजेचे होते; पण नोकरी करत असताना हे काम करणे त्याला शक्य नव्हते. त्याला पूर्ण वेळ काम करायचे होते. त्यामुळे त्याने ऐन उमेदीत असताना नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला; पण हा प्रवास फार संघर्षमय होता. घरच्यांना पटवणार कसे, हा मोठा प्रश्न होता; पण त्याची तळमळ आणि कामाचे महत्त्व पाहून अशोकच्या कुटुंबाने त्याला पाठिंबा दिला. आणि अशोकच्या खऱ्याखुऱ्या संघर्षाला सुरुवात झाली.

उपेक्षित आणि परिस्थितीने गांजलेल्या मुलांसाठी काम करायचे ठरले खरे; पण सुरुवात कशी आणि कोठून करणार? सुरुवातीला अशोकचा कविमित्र अनिल कोठे याने पुण्यातील भोसरी येथील स्वतःची बांधलेली, एक हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची जागा कोणतेही भाडे किंवा अनामत रक्कम न घेता वापरायला दिली. शिवाय अनेक मित्रांनीही त्याला मदत केली. या सर्व प्रवासात त्याने अनेक माणसे जोडली. यातूनच स्नेहवन नावाची संकल्पना आकाराला आली.

अशोकने डिसेंबर २०१५मध्ये स्नेहवन संस्थेची स्थापना केली. दुष्काळग्रस्त भागातील खरी गरजू मुले शोधण्यासाठी तो वणवण फिरला. मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, नंदीसमाज, आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचा शोध त्याने घेतला. सुरुवातीला स्नेहवन संस्थेत १८ गरजू मुलांना आधार मिळाला. त्यात नऊ ते १४ या वयोगटातील मुले आहेत. आता स्नेहवन संस्थेच्या मार्फत अशोकने २५  मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्याचप्रमाणे स्नेहवन संस्थेच्या शेजारच्या झोपड्यांतील १५ मुलींची शैक्षणिक जबाबदारीही ‘स्नेहवन’ने घेतली आहे.

या सर्व प्रवासात अशोकच्या कुटुंबानेही साथ दिली आणि कुटुंबानेही या कार्यात स्वत:ला झोकून दिलं. अशोकची आई, पत्नी या मुलांसोबतच राहतात. त्याचे आई आणि वडील आपल्या मुलाप्रमाणेच ‘स्नेहवना’तील चिमुरड्यांची काळजी घेतात. अशोकची पदवीधर असलेली पत्नी अर्चना स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळते. अशोकला अर्चनाचे स्थळ आले, तेव्हा अशोकने अर्चनाला परिस्थिती समजावून सांगितली. अर्चनानेही होकार दिला. अशोकच्या तळमळीने आणि प्रामाणिक धडपडीने अर्चनाच्या कुटुंबाचे मन जिंकले होते.

‘स्नेहवन’मधील मुले राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील सहा जिल्ह्यांतून आली आहेत. आज  ही मुले भोसरी येथील एका मराठी शाळेत शिकायला जातात. ती उत्तम मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत आहेत. ‘स्नेहवन’मध्ये एक हजार पुस्तकांचे वाचनालयही तयार करण्यात आले आहे. यात ‘वन बुक वन मूव्ही’ अशी संकल्पना राबविली जाते. मुलांनी कोणत्याही विषयावरचे एक पुस्तक आठवड्यात वाचावे आणि आठवड्यातून एकदा आवडीचा सिनेमा पाहावा अशी ती संकल्पना आहे. तेथे अभ्यासासह भरपूर खेळ आणि मूल्यशिक्षणावर भर दिला जातो. तसेच मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा व बाहेरच्या जगात त्यांना वावरता यावे म्हणून सूर्यनमस्कार, योग, कराटे आदींचे प्रशिक्षण दररोज देण्यात येते. त्याचप्रमाणे गाणी, चित्रकला, तबलावादन आदी कलांचेही शिक्षण दिले जाते.

या मुलांचा महिन्याचा खर्च ६० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे अशोकला मदतीसाठी नेहमी धावाधाव करावी लागते. अशी बिकट परिस्थिती येणार हे माहिती असतानाही अशोकने मळलेली वाट सोडून आपल्यातील माणुसकीचा ओलावा आणि सकारात्मक दृष्टिकोन जागृत ठेवून आपल्या आयुष्याचेच जणू ‘स्नेहवन’ करून घेतले आहे. समाजातील अनेक संवेदनशील माणसांचे हात पुढे आले, तरच हे ‘स्नेहवन’ बहरू शकेल.संपर्क :
अशोक देशमाने, स्नेहवन, हनुमान कॉलनी, हनुमान मंदिराजवळ, चक्रपाणी वसाहत भोसरी, पुणे.
मोबाइल : ८७९६४ ००४८४ 
वेबसाइट : www.snehwan.in

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link