Next
प्रशांत दामले, मधुरा दातार यांच्या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
‘गंगा भाग्योदय’मध्ये रंगली ‘सुखकर्ता’ मैफल
BOI
Wednesday, September 11, 2019 | 12:10 PM
15 0 0
Share this article:

प्रशांत दामले आणि मधुरा दातार यांनी आपल्या सुमधुर गीतांनी ‘गंगा भाग्योदय’मध्ये  ‘सुखकर्ता’ मैफल रंगवली.

पुणे : श्री गणेशाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. या उत्सवी वातावरणात ऋतू हिरवा-ऋतू बरवा, धुंदी कळ्यांना-धुंदी फुलांना, जाळीमंदी पिकली करवंदं यांसारख्या सदाबहार गीतांची सुरेल मैफल रसिक पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते गोयल गंगा फाउंडेशनतर्फे झालेल्या सुखकर्ता मैफलीचे. मराठी रंगभूमीचे सुपरस्टार प्रशांत दामले आणि प्रसिद्ध गायिका मधुरा दातार यांनी मराठी, हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सिंहगड रस्त्यावरील ‘गंगा भाग्योदय’मध्ये ही मैफल पार पडली. या वेळी गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल उपस्थित होते.


‘श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर’ या मंगलमूर्तींच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मराठी-हिंदी चित्रपटातील गाजलेली गाणी सादर करत त्यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘रूप तेरा मस्ताना’ या गाण्याला रसिकांची विशेष वाहवा मिळाली. मधुरा दातार यांच्या ‘पिया बावरी’ या गाण्याला रसिकांची विशेष दाद मिळाली. 


या गाण्याची खास आठवण सांगताना निवेदक मिलिंद कुलकर्णी म्हणाले, ‘एका मैफिलीत मधुराने हे गाणे सादर केले होते तेव्हा स्वत: ह्रदयनाथ मंगेशकर यांनी मधुराच्या गाण्याला कौतुकाची थाप देत, मधुराने आशाच्या गाण्याची आठवण करून दिली, असे सांगितले. प्रशांत दामले यांनी ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत’ या गाण्यातून रसिक श्रोत्यांची फर्माईश पूर्ण केली. या वेळी केदार परांजपे (की बोर्ड), सचिन जांबेकर (संवादिनी), अजय अत्रे आणि विक्रम भट (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.

निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या खुमासदार शैलीतून प्रशांत दामले यांचा अभिनेते, गायक, निवेदक असा जीवनप्रवास रसिकांसमोर उलगडला. यात ब्रम्हचारी, एका लग्नाची गोष्ट, टूरटूर यांसारख्या नाटकातील अनेक गमतीदार किस्से त्यांनी रसिकांना समोर उलगडले. 

प्रशांत दामले यांचे स्वागत करताना गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल

‘माझी जडणघडण, या क्षेत्रातला प्रवासदेखील संघर्षातूनच झाला. पोटाला जोपर्यंत चिमटा बसत नाही तोपर्यंत चांगले काम करता येत नाही. त्यामुळे तुमचे कार्यक्षेत्र कोणतेही असो संघर्ष हा हवाच. मला या क्षेत्रात अनेक दिग्गज, नामवंत कलाकारांच्या सान्निध्यात काम करण्याची संधी प्राप्त झाली. मी जे काही अल्प योगदान या क्षेत्रासाठी देऊ शकलो ते या महान कलाकारांमुळेच,’ असे सांगत दामले यांनी आपला प्रवास उलगडला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search