Next
रत्नागिरीच्या आकाशात झेपावली ‘राफेल’ आणि ‘तेजस’
पहिल्याच एरोमॉडेलिंग शोला मुलांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
BOI
Monday, January 07, 2019 | 12:16 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलेले ‘राफेल’, भारतीय बनावटीचे ‘तेजस’ या लढाऊ विमानांच्या प्रतिकृतींबरोबरच उडती तबकडी, माशाच्या आकाराचे विमान, ग्लायडर अशी वेगवेगळी अकरा विमाने रत्नागिरीच्या आकाशात झेपावली आणि ही गम्मत पाहताना उपस्थित हजारो मुलांना आकाश ठेंगणे झाले. निमित्त होते ते रत्नागिरी नगरपालिका आणि श्री इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एरोमॉडेलिंग शोचे.रत्नागिरीत प्रथमच आयोजित करण्यात आलेला हा शो छत्रपती‍ शिवाजी स्टेडिअमवर सहा जानेवारी २०१९ रोजी  झाला. गेली ३५ वर्षे देशाच्या विविध शहरांमध्ये हा शो करत असलेले सदानंद काळे, अथर्व काळे आणि त्यांच्या टीमने हा शो सादर केला. सलग दोन तास झालेल्या या शोने मुलांसह पालकांनाही एकच जागी खिळवून ठेवले. प्रत्येक विमानाचे मॉडेल आकाशात झेप घेण्यापूर्वी ते कोणते विमान आहे, ते कसे उडणार, कसे लँड होणार, त्याचे तंत्रज्ञान, तसेच आकाशात असताना ते कोणत्या प्रकारच्या कसरती करत असून, त्याला काय म्हणतात याची इथंभूत माहिती उपस्थितांना दिली.आकाशात झेप घेणाऱ्या प्रत्येक विमानागणिक मुलांची आणि पालकांची उत्कंठा शिगेला पोचत होती. अथर्व काळे याने न थांबता सलग ११ विमानांची यशस्वी प्रात्याक्षिके उपस्थितांसमोर सादर केली. विमान आकाशात गेल्यावर त्यांच्या कसरती दाखवताना, आकाशात विमानाची मोटर बंद करून त्याला पक्ष्याप्रमाणे संथ विहार करताना, तसेच ते यशस्वी लँड करताना अथर्वचे कौशल्य आणि त्याचे या विमानांवरील प्रभुत्व दिसून आले.   या शोचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांनी श्रीफळ वाढवून केले. या वेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, खासदार विनायक राऊत, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रांताधिकारी अमित शेडगे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, या शोचे औचित्य साधून आणि या शोला मुलांसह पालकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनबाबत मतदार जनजागृती कार्यक्रम राबविला. या वर्षी निवडणुकीच्यावेळी प्रथमच ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात असल्यामुळे नागरिकांना या मशीनची माहिती मिळावी यासाठी या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी स्टेडिअमच्या तीन प्रवेशद्वारांजवळ, तसेच स्टेडिअम परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सहा स्टॉल उभारण्यात आले होते.या वेळी चव्हाण यांनी नागरिकांनी या स्टॉलना भेट देऊन मशीनद्वारे कशा पद्धतीने मतदान करावे याची माहिती करून घेण्याचे आवाहन केले; तसेच एरोमॉडेलिंग शोला शुभेच्छा दिल्या. म्हाडाचे अध्यक्ष सामंत यांनी एरो मॉडेलिंग शोमुळे लहान मुलांना विविध विमानांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. प्रारंभी ग्रामजीवन आधार समाजसेवा संस्थेतर्फे मतदान जनजागृतीबाबत पथनाट्य सादर करण्यात आले.

(या एरोमॉडेलिंग शोची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search