सुमारे सव्वादोन लाख पुस्तके असलेले, सरकारी अनुदान न घेणारे आणि मराठी साहित्यिक व संशोधकांचे हक्काचे आश्रयस्थान म्हणजे बदलापूरचे ग्रंथसखा वाचनालय. श्यामराव जोशी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी या दाम्पत्याने उभ्या केलेल्या या अप्रतिम ग्रंथालयाबद्दल सांगत आहेत ज्येष्ठ लेखक-अनुवादक रवींद्र गुर्जर.... त्यांच्या ‘किमया’ या सदरातून............
जगात काही लोकविलक्षण, चाकोरीबाहेरचे काम करणारे, मैलाचे दगड ठरणारे (वेडे) लोक असतात. त्यांच्यासमोर आपोआप आपले कर जुळतात. असेच एक वेडे गृहस्थ म्हणजे बदलापूरचे श्यामसुंदर जोशी. पुणे-मुंबईच्या साधारण मध्यावर, पुण्याकडून गेल्यास कर्जतहून पुढे पाचवे लोकल स्टेशन म्हणजे बदलापूर. पूर्वेला स्टेशनसमोरच (कुळगाव) हे ग्रंथसखा वाचनालय आहे. सुमारे सव्वादोन लाख पुस्तके असलेले, सरकारी अनुदान न घेणारे हे असे देशातील एकमेवाद्वितीय ग्रंथालय ठरू शकेल. मराठी साहित्यिक आणि संशोधकांचे ते हक्काचे आश्रयस्थान!
बदलापुरात आमचे जवळचे एक नातलग राहतात. सुमारे चार वर्षांपूर्वी मी त्यांच्याकडे गेलो होतो. तिथे एखादे वाचनालय आहे का, अशी विचारणा केल्यावर ‘ग्रंथसखा’बद्दल माहिती समजली. संध्याकाळी तिकडे चक्कर मारली आणि सुमारे अडीच तास तिथेच रमलो-रंगून गेलो. आणि त्या दिवसापासून श्यामराव आणि समस्त ग्रंथालय परिवाराचा ‘सखा’ बनलो. गेल्या चार वर्षांत किमान पंचवीस वेळा बदलापूरला जाणे झाले. सन २०१५मध्ये २७ फेब्रुवारीला मराठी दिनाच्या मुहूर्तावर तिथे स्वायत्त मराठी विद्यापीठाची स्थापना झाली. त्याच्या मार्गदर्शक मंडळात माझी वर्णी लागली.

श्यामराव जोशींचा जन्म १९५१मधला. मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मधून त्यांनी ‘टेक्स्टाइल डिझायनर’ची पदविका घेतली. त्यानंतर कल्याणच्या एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करली. साहित्य आणि कला हे त्यांचे अत्यंत आवडते विषय. गिर्यारोहण, ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास आणि छायाचित्रण हे जोपासलेले छंद. त्यांचा वडिलांचा मोठा ग्रंथसंग्रह होता. श्यामरावांचीही चोखंदळपणे ग्रंथखरेदी सुरू झाली. वडिलांना अंमळनेर येथे साने गुरुजींचा सहवास लाभला होता. ते संस्कार मुलांनाही आपोआप मिळाले.
२००६ साली शाळेच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन श्यामरावांनी ‘वाचन संस्कृती अभियान’ सुरू केले. त्याचा एक भाग म्हणून बदलापुरात ग्रंथसखा वाचनालयाची स्थापना त्यांनी केली. यंदा त्याला बारा वर्षे पूर्ण होतील. निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे तर त्यांनी ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी घातलेच, जोडीला राहता बंगला विकला. शिवाय ग्रंथखरेदीसाठी गरज पडेल तसे ते कर्ज काढत राहिले. वर्गणी अत्यंत कमी आणि पुस्तक कितीही दिवस ठेवावे, ही सवलत. त्यामुळे सभासदांची संख्या बघता बघता पाच हजारांवर गेली. बदलापूरसारख्या (शहरांच्या तुलनेत) छोट्या गावी ही गोष्टी नक्कीच विशेष होती. ठाणे-डोंबिवली ते कर्जतमधून वाचक त्यांच्या सोयीच्या वेळी वाचनालयात येतात. श्यामराव यांच्या सुविद्य पत्नी रोहिणी याही शाळेत नोकरी करत होत्या. ग्रंथालयाच्या कामात त्या दिवस-रात्र गुंतलेल्या असतात. त्यांच्या निवासस्थानी हजारो पुस्तके ठेवलेली आहेत. या दाम्पत्याला खासगी असे जीवनच नाही. त्यांना भेटायला कोणी ना कोणी सारखे येतच असतात.

आज वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासामुळे नियमित वर्गणीदार कमी झाले असले, तरी नवनवीन चांगली पुस्तके आणि नियतकालिकांची भर तिथे पडतच आहे. समजा असे कळले, की नागपूरला कोणाला १५०-२०० पुस्तके भेट द्यायची आहेत किंवा कोल्हापूरला काही दुर्मीळ पुस्तके उपलब्ध आहेत, की लगेच श्यामराव निघाले तिकडे जायला! विश्वलस्त आणि मित्रपरिवार एवढा चांगला आहे, की गरज पडल्यास कितीही (उसने) पैसे उभे राहतात. अशा रीतीने आजमितीला ‘ग्रंथसखा’त दोन लाखांहून अधिक पुस्तके, दहा हजार दुर्मीळ मासिके (१९०९ सालच्या ‘मनोरंजन’ मासिकाच्या पहिल्या अंकापासून) आणि ५५ दोलामुद्रिते असा अफाट ग्रंथसंग्रह उपलब्ध आहे. दोलामुद्रिते म्हणजे सन १८६७मध्ये मुद्रणविषयक कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीची पुस्तके. सन १८०५पासून पहिल्या छापील मराठी ग्रंथासह सर्व नावाजलेली पुस्तके आणि दुर्मीळ मासिके तिथे अभ्यासायला मिळतात. संदर्भग्रंथांची संख्या एक लाखाच्या वर आहे. हीच खरी कुबेरालाही लाजवील अशी श्रीमंती आणि श्यामराव तसे भाग्यवान ‘ग्रंथश्रीमंत’ आहेत.
अभ्यासकांसाठी आवश्यक असल्यास ग्रंथालयातर्फे राहण्याची व्यवस्था होते. कोणत्याही विषयावर मराठीतून संशोधन करावयाचे असेल, तर बव्हंशी सर्व पुस्तके तिथे मिळतात. नसली तरी अन्य ठिकाणांहून ती उपलब्ध केली जातात. ज्यांनी आपला ग्रंथसंग्रह ‘सखा’ला भेट दिलेला आहे, अशा लेखकांची स्वतंत्र दालने तिथे आहेत. (प्रा. द. भि. कुलकर्णी, रवींद्र पिंगे, गंगाधर गाडगीळ, वि. आ. बुवा, जयवंत चुनेकर, निरंजन उजगरे इत्यादी इत्यादी). ख्यातनाम साहित्यिक आणि साहित्य संमेलनांचे अध्यक्ष यांची सुंदर रेखाचित्रे भिंतींवर झळकलेली आहेत. भाषा, व्याकरण, विविध प्रकारचे कोश, तत्त्वज्ञान, सामाजिक शास्त्रे, नाट्य-चित्र, नकाशे, मासिके - कोणताही विषय घ्या, त्यावरची सर्व महत्त्वाची पुस्तके तिथे असतातच. श्यामराव काही काळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी होते. बदलापूरच्या शाखेत ते कार्यरत आहेतच. त्या अनुषंगाने वर्षभर तिथे साहित्यिक कार्यक्रम साजरे होत असतात.
ज्यांना नवीन ग्रंथालय उभे करायचे असेल, त्यांना श्यामरावांचे बहुमोल मार्गदर्शन मिळते. त्याचबरोबर ते ग्रंथही भेट म्हणून देतात. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून पाचगणीजवळ ‘भिलार’ हे पुस्तकांचे गाव उभे राहिले. त्यात श्यामराव जोशींचे मौलिक सहकार्य लाभले. वर्षभर ते काम चालू होते. चार मे २०१८ रोजी पुस्तकांच्या गावाच्या उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम तिथे होते. बदलापूरहून भिलारला वारंवार जाणे, हेसुद्धा जिकिरीचे काम आहे. सध्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक न्यासातर्फे उभारण्यात येणाऱ्या तीन मजली ग्रंथालयाची जबाबदारी श्यामरावांनी समर्थपणे पेललेली आहे. त्याचे उद्घाटन लवकरच होईल. ग्रंथालयांसंबंधी कोणत्याही कामात, कसलीही अपेक्षा न ठेवता, ते निःस्वार्थपणे दिवसरात्र दंग असतात.
‘स्वायत्त मराठी विद्यापीठा’चे काम बदलापुरात सुरू झालेले आहे. अनेक अभ्यासक्रमसुद्धा तयार होत आहेत. ख्रिस्ती मराठी साहित्य, जैन व बौद्ध वाङ्मयाच्या अभ्यासासाठी दालने उघडलेली आहेत. अनेक प्रकारच्या कार्यशाळा नियोजित आहेत. या सर्व कामांना मोठ्या प्रमाणात निधी आवश्यक आहे. अद्याप कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान ‘ग्रंथसखा’ने स्वीकारलेले नाही. अडचणी अनेक असतात; पण कोणतेही काम अडत नाही, हे विशेष.
श्यामराव जोशींनी केलेल्या अफाट कार्याच्या गौरवार्थ त्यांना आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी मराठी भाषा दिनी महाराष्ट्र शासनाचा मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार त्यांना मिळाला. (हा पुरस्कार एक लाखाचा आहे.) त्याशिवाय, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, रोटरी क्लब, कोकण मराठी साहित्य परिषद, पुणे मराठी ग्रंथालय, बाळशास्त्री जांभेकर, व्यासरत्न इत्यादी अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलेले आहे. जागतिक स्तरावर मान्यता मिळू शकेल, अशी जी काही निवडक ग्रंथालये आहेत, त्यात ‘ग्रंथसखा’चा समावेश निश्चि,तपणे करावा लागेल.
ज्या कोणाला ग्रंथसखा वाचनालयाला ग्रंथ भेट किंवा अन्य कोणत्याही प्रकारची मदत करण्याची इच्छा असेल, त्यांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.
पत्ता : ग्रंथसखा, १० अर्जुनसागर कॉम्प्लेक्स, पाटीलपाडा, रेल्वे स्टेशनजवळ, बदलापूर (पूर्व), जि. ठाणे – ४२१५०३
मोबाइल : ९३२०० ३४१५६
ई-मेल : egranthsakha@gmail.com