Next
मनात घर करून राहिलेली अमेरिकेतली दिवाळी
BOI
Thursday, November 08, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

दिवाळीचा उत्साह सगळीकडेच अगदी ओसंडून वाहत असतो. त्यातूनही आपल्या देशापासून, घरापासून दूरवर परदेशात स्थायिक झालेल्या मराठी मनाला तर आपले सण साजरे करायची ओढ अधिकच तीव्र असते. त्यामुळेच तिकडेही दिवाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी होती. ज्येष्ठ गायिका, संगीतकार मधुवंती पेठे लिहीत आहेत, त्यांनी अमेरिकेत आपल्या मुलाकडे अनुभवलेल्या दिवाळीच्या आठवणी...
..........

लाख दिवे लखलखती । तारा जणू नभी हसती।।
दीपावली येई आज । आनंदा ये भरती ।

कवयित्री शांता शेळके यांनी दिवाळीच्या उत्साही वातावरणाचं असं वर्णन करून ठेवलंय. खरंच आपल्या मराठी मनाला दिवाळीची ओढ काही वेगळीच असते. अगदी लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत आणि लहानशा गावापासून मोठ्या शहरांपर्यंत हा दिवाळीचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. त्यातूनही आपल्या देशापासून, घरापासून दूरवर परदेशात स्थायिक झालेल्या मराठी मनाला तर आपले सण साजरे करायची ओढ अधिकच तीव्र असते. अशी आपली दिवाळी परदेशात साजरी करण्याचा आनंद आम्ही स्वत: अनुभवला आणि तो अगदी मनात घर करून राहिला.

आमचा मुलगा राहुल, सून वरदा आणि नातू आर्यन अमेरिकेत टेक्सास राज्यातील डलास शहरी राहतात. शहर तसं अगदी मोठं. दहा-बारा मोठाली इंडियन स्टोअर्स असलेलं. अगदी मोदकाच्या पिठीपासून पूजेसाठी लागणाऱ्या आंब्याच्या पानांपर्यंत सगळं काही मिळतं तिथे. दिवाळीचा फराळ, फटाके, एवढंच नाही, तर अगदी चितळ्यांचं श्रीखंडसुद्धा मिळतं; पण मुलाचा आणि सुनेचा उत्साहच भारी दांडगा. 

त्यांची दिवाळीची तयारी सुरू होते, ती आकाशकंदील घरी बनवण्यापासून. अगदी काड्यांचा सांगाडा बनवून, लांब लांब शेपट्यांचा पारंपरिक कंदील तयार होतो. संपूर्ण बंगल्याला दिव्याच्या माळांनी सजवलं जातं. पूर्ण कम्युनिटीमध्ये आपला बंगला दिवाळीचं भारतीयत्व मिरवायला लागतो. इकडून नेलेल्या पणत्या रंगवल्या जातात. रंग, रांगोळी जमवून सूनबाई मोठमोठ्या रांगोळ्या काढते. 

सगळा फराळ घरी करण्याची लगबग सुरू होते. ऑफिसची कामं सांभाळून रोज संध्याकाळी एकेक पदार्थ तयार होऊ लागतो. (आणि आपल्याकडे मात्र हा फराळ घरी करण्याचा उत्साह दिवसेंदिवस कमी होत चाललाय.) तिकडे एवढं बरंय, की ऑफिसची वेळ नऊ ते पाच असल्यानं, पाच म्हणजे पाचला ऑफिसातनं निघून, साडेपाच-सहाला दोघं घरी येतात. त्यामुळे कुटुंबाला वेळ देता येतो. ही गोष्ट मला फार आवडते.

माझा मुलगा लहान असताना मला चकल्या पाडून द्यायचा, लाडू वळायचा. आता तिकडेही सगळी कामं करतो. सर्व कामं दोघांनी मिळून करण्याची आपल्या मुलाची तयारी पाहून अगदी सार्थ अभिमान वाटतो. (कसं ‘मुलाला’ छान वळण लावलंय आईनं, असं म्हंटलं जातं तिकडे.) गमतीचा भाग सोडा; पण खरोखरच मुलगा आणि सून दोघांचाही उत्साह बघून खूप छान वाटतं. एवढी सगळी जय्यत तयारी केली, तरी ऐन दिवाळीच्या दिवशी मात्र त्यांना ऑफिसला जावं लागतं. आधीच त्यांचा दिवस आपल्या भारतातल्यापेक्षा बारा तास उशिराच सुरू होतो. त्यामुळे आपण आपलं कालनिर्णय पाहून ‘इकडे दिवाळी सुरू झाली म्हणतो’ आणि तिकडे मात्र ऑफिसच्या कामाला प्राधान्य द्यावंच लागतं. त्यामुळे त्यांना त्यांचा ‘काल’निर्णय वीकेंडवर ढकलावा लागतो. 

दिवाळीच्या एकेका दिवशी वेळ मिळेल तसा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो; पण मग शुक्रवारी ऑफिसमधल्या प्रोजेक्टला ‘गो’ करून, वीकेंडला ही मित्रमंडळी एकत्र जमून सण साजरे करतात. कम्युनिटी -ऑॅफिसमधून रीतसर परवानगी घेऊन, एक तास फटाक्यांचा आनंद घेतला जातो. आवाजाचे कमी, पण शोभेचे फटाके जास्त उडवले जातात. लगेच फटाक्यांचा कचरा साफसफाई करून उचलतात. सगळं कसं नीटनेटकं.

एकमेकांनी आणलेला फराळ मांडून, चवीचवीनं गप्पा रंगतात. प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात साठवलेल्या, लहानपणच्या दिवाळीच्या आठवणी शेअर केल्या जातात. आमच्यासारख्या तिकडे गेलेल्या सीनिअर सिटीझन्सना खूप मान दिला जातो. सगळी जोडपी, त्यांची लहान मुलं पटापटा वाकून नमस्कार करतात. ही गोष्ट इथे भारतात आपल्याकडे दुर्मीळ होत चाललीय, असं वाटून आमचं मन भरून येतं. एक चिमुरडी तर माझ्याजवळ येऊन म्हणते, ‘आजी तुझे पाय दाखव, मला नमस्कार करायचाय.’ मला हसूच येतं. मग मी माझी साडी थोडी वर उचलून, तिला पाय दाखवते. त्यावर दुसरी चिमुरडी म्हणते, ‘ओह्.... आज्जीनं बघ पायाला नेलपेंट लावलंय..’ त्यांचे गोड गोड घागरे बघून मला आमच्या लहानपणची खणाची परकर-पोलकी आठवतात. 

मुलाच्या सगळ्या मित्रांनी अगदी छान पारंपरिक झब्बे घातलेले असतात. त्यांच्या बायकाही मस्त मस्त साड्या, दागिने घालून नटलेल्या असतात. एक मोठ्ठं विस्तारित कुटुंबच तिथं जमलेलं असतं. हेही पुन्हा इकडे दुर्मीळ होत चाललंय, असं जाणवतं. (नाही तरी तिकडे गेल्यापासून, अगदी डॉलर-रुपया यांपासून सर्व बाबतीत सारखी इकडची आणि तिकडची तुलना मनात चालूच असते.)

मग करमणुकीचे कार्यक्रम रंगतात. आश्चर्य म्हणजे आपल्याकडच्यासारखं ‘सिनेमाच्या धांगडधिंगा गाण्यांवर डान्स करणं म्हणजे करमणूक’ हे समीकरण अगदी खोटं पाडतात ही मंडळी. चक्क ‘पुलं’च्या कॅसेट्स ऐकतात. आयत्या वेळी विषय देऊन, एक मिनिट बोलायच्या स्पर्धा घेतात. अभिनय करून नावं ओळखायचा ‘डम्ब शेराड्स’सारखा खेळ खेळतात. पत्त्यांचे डाव रंगतात. आधुनिक पद्धतीने उखाणे घेऊन नावं घेतात. त्यात मुलंही मागे नसतात. लहान मुलांचेही खेळ घेतले जातात.

पुन्हा विशेष म्हणजे, एवढं सगळं एंजॉय करून घरी जाताना, यजमानाच्या घरातला सगळा पसारा आवरायला मदत करतात. कारण दुसऱ्या दिवशी सगळ्यांनाच रूटीन फॉलो करायचं असतं ना. स्वावलंबन म्हणजे काय ते खरं तर या मुलांकडे पाहून कळतं.

आता तिकडे राहणाऱ्या भारतीयांची संख्या वाढते आहे, तसं हे सण सामूहिकरित्या साजरे करण्याचं प्रमाणही वाढतं आहे. तिथल्या प्रत्येक शहरात मराठी मंडळं आहेत आणि अशा सणासुदीनिमित्त त्या मंडळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. आपल्या मुलांना आवर्जून मराठी गाणी, संस्कृत स्तोत्रं, मराठी नाटकं यांची ओळख करून दिली जाते. त्याचप्रमाणे ऑफिसमध्येही सगळे इंडियन्स मिळून (फक्त मराठीच नाही बरं का..) दिवाळी साजरी करतात. ‘पॉट लक’ पद्धतीनं भारतीय पदार्थांची चव चाखतात. त्या दिवशी ट्रॅडिशनल पोशाखातले इंडियन्स ऑफिसमध्ये उठून दिसतात. त्यातून अमेरिकन लोकांना भारतीय साडीची मोठी नवलाई. एखादी फॉरीनर मैत्रीणसुद्धा साडी नेसून आपल्यात उत्साहानं सामील होते. विशेष म्हणजे दिवाळीच्या सणाच्या लोकप्रियतेची दखल घेऊन, अमेरिकेच्या पोस्ट खात्यानं दोन वर्षांपूर्वी दिवाळीचा खास स्टँप काढला होता.

‘भारतात राहून आम्हीच काय ते आपल्या संस्कृतीचं रक्षण करतो,’ असा समज मनात ठेवून, परदेशी राहणाऱ्या तरुण पिढीला सतत नाकं मुरडणाऱ्यांना ही मुलं संस्कृतीचं खरं जतन म्हणजे काय हे दाखवून देतात आणि अंधारलेल्या आपल्या मनात आशेचा किरणच नाही, तर लख्ख प्रकाश पाडून जातात. 

संपर्क : मधुवंती पेठे, मुंबई
मोबाइल : ९८६९१ ७०१३६
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(‘आठवणीतली दिवाळी’ या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी https://goo.gl/riz56x या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
H.N.POTDAR About 261 Days ago
अमेरिकेतील आठवणीतील दिवाळी फारच सुरेख वर्णन । हरिश्र्चंद्र पोतदार 😀
0
0
Surendra Kelkar About 316 Days ago
Sunder American Diwali
0
0
Surendra Kelkar About 316 Days ago
Sunder American Diwali
0
0

Select Language
Share Link
 
Search