पुणे : सोमवार पेठेतील तब्बल तीनशे वर्षे जुन्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेली राही, रखुमाईसमवेतची श्री विठ्ठलाची मूर्ती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमात यंदाही गोकुळाष्टमीनिमित्त नऊ दिवसांचा कीर्तन महोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. सोमवारी काल्याचे कीर्तन होऊन या महोत्सवाची सांगता झाली. गेली २१ वर्षे या कीर्तन महोत्सवाची परंपरा लोकसहभागातून अखंड सुरू आहे. नामांकित कीर्तनकार, आजच्या काळाशी सुसंगत कीर्तनाचे विषय, काल्याचे पारंपरिक खेळ हे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे.

‘१९५६ पासून कण्वसंघ ट्रस्टच्या वतीने गोकुळाष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानंतर १९९८ पासून मिलींदबुवा बडवे यांच्या प्रेरणेने नऊ दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची सुरुवात झाली. ती अव्याहत सुरू आहे. यंदा या महोत्सवाचे २१वे वर्ष होते. या वर्षी वासुदेवबुवा बुरसे यांची कीर्तने झाली. मानवी मन आणि परमेश्वर साधना या विषयावर त्यांनी आजच्या काळातील घडामोडींची सांगड घालत लोकांना संदेश दिला. त्यांना पेटीवर भूषण कुलकर्णी आणि तबला साथ योगेश देशपांडे यांनी केली. आतापर्यंत मकरंद बुवा सुमंत, मोहनबुवा कुबेर, पुरुषोत्तम बुवा कुलकर्णी, माधुरी ओक आदी नामवंत कीर्तनकारांनी येथे हजेरी लावली आहे,’ अशी माहिती या उत्सवाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग असलेले सुहास देशपांडे यांनी दिली.
‘दर वर्षी रंगणाऱ्या या सोहळ्यात परिसरातले आबालवृद्ध मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. मंदिर फुलांनी, रांगोळ्यांनी सजवणे, प्रसादाची तयारी यासाठी लोक उत्स्फूर्तपणे हातभार लावतात. त्यामुळे नऊ दिवस मोठ्या चैतन्यदायी वातावरणात हा सोहळा साजरा होतो. दररोज श्री विठ्ठलाच्या, राही आणि रखुमाईच्या मूर्तींना वेगवेगळा साजशृंगार केला जातो. फुलांची आरास, दिव्यांच्या माळा आणि रांगोळ्यांनी मंदिर सजवले जाते. नऊ दिवस रोज मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात, साजऱ्या मूर्तीच्या दर्शनाने प्रसन्न होत, कीर्तनात रंगून जात या सोहळ्याचा आनंद घेतात. कृष्णजन्माचा सोहळाही पारंपरिक पद्धतीने साजरा होतो.

दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होते. या दिवशीचा सोहळा खास असतो. काल्याचे पारंपरिक खेळ हम्मामा, रणघोडा, हात कोपर, फुगडी, खो खो विलक्षण रंगतात. मोठ्या संख्येने महिलावर्ग यात सहभागी होतो. दहीहंडी फोडली जाते मग काल्याचा प्रसाद होऊन हा महोत्सव संपतो,’ असेही देशपांडे म्हणाले.
‘लोकांचा उत्साहात सहभाग हे या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून लोक या महोत्सवाचे नियोजन, कार्यक्रमाची तयारी या कामात आवर्जून भाग घेतात. त्यामुळे गेली २१ वर्षे हा सोहळा अखंड सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहणार यात शंका नाही,’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.