Next
भारतीय यंत्रणेची कमाल; भयानक ‘फणी’ चक्रीवादळात वाचवले लाखो जणांचे प्राण
BOI
Saturday, May 04, 2019 | 01:20 PM
15 0 0
Share this article:

भारतीय नौदलाच्या डॉर्नियर या विमानातून टिपलेले हे छायाचित्र फणी चक्रीवादळाची तीव्रता दर्शविते.

नवी दिल्ली/भुवनेश्वर : 
हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे; विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशाकोन सारे या कविवर्य कुसुमाग्रजांनी ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेत लिहिल्यासारखीच परिस्थिती ओडिशात तीन मे २०१९ रोजी धडकलेल्या चक्रीवादळामुळे निर्माण झाली होती; मात्र भारतीय यंत्रणेने अत्यंत नेटाने आणि नियोजनपूर्वक काम करून ‘किनारा तुला पामराला’ असे सांगत परिस्थितीशी दोन हात केले. 

फणी (फनी किंवा फोनी असाही उच्चार करतात) हे चक्रीवादळ ओडिशात (म्हणजेच पर्यायाने देशात) धडकलेले गेल्या २० वर्षांतील भयानक चक्रीवादळ होते. १९९९च्या चक्रीवादळाने १० हजार जणांचे बळी घेतले होते. त्यापासून धडा घेऊन राज्याने उभारलेली यंत्रणा, तसेच भारतीय हवामान खात्याने अत्यंत अचूकपणे वर्तविलेले अंदाज आणि केंद्र व राज्य सरकारांच्या सुयोग्य समन्वयातून या वेळच्या चक्रीवादळाची परिस्थिती हाताळली गेली. त्यामुळेच ताशी दोनशे किलोमीटर वेगाने वारे वाहणारे चक्रीवादळ पुरी किनाऱ्यावर धडकूनही जीवितहानीचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. सुमारे १५० जण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. एकही बळी जाऊ नये, असे ध्येय ठेवून सगळी यंत्रणा राबली. ते ध्येय शब्दशः साध्य झाले नाही; पण शेकडो घरे उद्ध्वस्त करणाऱ्या, हजारो झाडे उन्मळून पाडणाऱ्या एवढ्या प्रचंड उत्पातात आतापर्यंत केवळ सहा ते आठ जणांचा बळी गेल्याचे वृत्त आहे. जीवितहानी होणे दुर्दैवीच; पण वीस वर्षांपूर्वीच्या वादळात १० हजार बळी गेले होते, हे लक्षात घेता या वेळी यंत्रणांनी बजावलेल्या कामगिरीचे महत्त्व लक्षात येते. संयुक्त राष्ट्रसंघानेही या कामगिरीचे कौतुक केले आहे.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील महत्त्वाच्या वृत्तपत्रानेदेखील भारतीय यंत्रणांच्या या उततम कामगिरीची दखल घेतली आहे. ‘चक्रीवादळातून लाखो लोकांना कसे वाचवावे, ते भारतातल्या या राज्याला विचारा’ अशा आशयाचे शीर्षक असलेला वृत्तांत ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केला आहे. भारतासारख्या विकसनशील देशाने आणि ओडिशासारख्या तुलनेने मागास असलेल्या राज्याने ही गंभीर परिस्थिती ज्या कुशलतेने हाताळली, त्याची दखल या वृत्तांतात घेण्यात आली आहे. 
२६ लाख टेक्स्ट मेसेज, ४३ हजार स्वयंसेवक, एक हजार कार्यकर्ते, टीव्हीसह सर्व माध्यमांतील जाहिराती या सगळ्यांद्वारे स्थानिक भाषेतून या चक्रीवादळाची पूर्वसूचना नागरिकांना देण्यात आली. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. १० लाखांहून अधिक नागरिकांचे दोन-तीन दिवसांत सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे ही निश्चितच सोपी गोष्ट नाही; मात्र सर्व यंत्रणांच्या समन्वयातून ही अवघड गोष्ट शक्य झाली. राज्याचे मदतकार्यासाठीचे विशेष आयुक्त विष्णुपद सेठी यांनी एका स्थानिक माध्यमाला दिलेल्या मुलाखतीनुसार, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची २५, तर ओडिशाच्या आपत्ती निवारण दलाची १८ पथके आधीपासूनच तैनात करण्यात आली होती. साडेअकरा लाख नागरिकांच्या स्थलांतराचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले होते आणि त्यांनी ते पूर्ण केले. 

अशा प्रकारे या आपत्तीचे आव्हान स्वीकारणे हे गेल्या वीस वर्षांतील परिश्रमांचे फलित आहे. ओडिशाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे चक्रीवादळांचा फटका अनेकदा या राज्याला बसतो. १९९९च्या वादळानंतर ओडिशाने धडा घेऊन समुद्रकिनाऱ्यापासून दूर, सुरक्षित ठिकाणी निवारे बांधले. आपत्कालीन परिस्थितीवेळी नागरिकांना तेथे हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी हे निवारे बांधण्यात आले. खरगपूर येथील आयआयटी या संस्थेने या निवाऱ्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आराखडे तयार केले आहेत. त्या ठिकाणी सर्व नागरिकांना हलविण्यात आले. त्यामुळेच जीवितहानी रोखणे शक्य झाले. या सगळ्यासाठी नेमके कृती आराखडे आखण्यात आले होते आणि त्यांची योग्य वेळी अंमलबजावणी करण्यात आली. सुरक्षित स्थळी हलविलेल्या सर्व नागरिकांना खाद्यपदार्थही पुरविण्यात आले.

आयएमडी अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाची भूमिकाही या सगळ्यात महत्त्वाची आहे. ‘आयएमडी’ने तयार केलेले रीजनल हरिकेन फोरकास्ट मॉडेल अर्थात चक्रीवादळाची पूर्वसूचना देणारे प्रादेशिक मॉडेल यासाठी कामी आले. २५ एप्रिल रोजी विषुववृत्ताजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्या वेळपासूनच भारतीय हवामानशास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवून होते. उपग्रह, स्थानिक वेधशाळा यांसह अन्य अनेक स्रोतांतून मिळालेल्या नोंदींच्या आधारे कम्प्युटरच्या साह्याने आगामी हवामानाचा अंदाज काढण्यात येतो. तुलनेसाठी पूर्वीच्या नोंदींचाही आधार घेण्यात येतो. या सगळ्यात कम्प्युटरचा वाटा महत्त्वाचा असतोच; पण मानवी बुद्धिमत्ताही तितकीच महत्त्वाची असते. कारण कम्प्युटरने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे नेमके तर्क बांधणे महत्त्वाचे असते आणि तेच या वेळी उपयोगी ठरले, असे ‘आयएमडी’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि चक्रीवादळ पूर्वसूचना तज्ज्ञ मृत्युंजय मोहापात्रा यांनी ‘टेलिग्राफ’ला सांगितले.

फणी चक्रीवादळाचा मार्ग सरळ असेल आणि तसेच ते किनाऱ्याला धडकेल, असे कम्प्युटरच्या आकडेवारीवरून दिसत होते; मात्र तुलनात्मक अभ्यासाच्या आधारे शास्त्रज्ञांनी तर्क बांधला, की हा मार्ग वळण घेऊन मग ते वादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्या वळणामुळे त्याचा धोका आणखी वाढणार होता. शास्त्रज्ञांनी वर्तविलेला हा अंदाज अचूक ठरला आणि त्यानुसारच तीन मे रोजी चक्रीवादळ पुरीच्या किनाऱ्यावर धडकले. या तारखेचा आणि जागेचा पहिला अंदाज शास्त्रज्ञांनी २९ एप्रिल रोजी वर्तविला होता. त्यामुळे त्या अंदाजानुसार आपत्कालीन यंत्रणा कामाला लागली आणि दोन-तीन दिवसांत त्यांना नागरिकांचे स्थलांतर किंवा अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कामकाज आणि नियोजन करता आले.

एका चमूत ४५ जवान असलेले ६८ चमू ‘एनडीआरएफ’ या वेळी तैनात केले होते. ‘एनडीआरएफ’चे एवढे चमू एका वेळी मोहिमेवर असण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यापैकी ३८ चमू एकट्या ओडिशात होते. या सगळ्या चमूंनी ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील साडेअकरा लाख नागरिकांचे तीन दिवसांत स्थलांतर केले. त्यांना खाद्यपदार्थ पुरविण्याची व्यवस्था केली. तसेच रस्ते, महामार्ग वगैरे मोकळे करण्यासाठीही अतिरिक्त चमू कार्यरत होते. त्याशिवाय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे जवान, विमाने, नौका, हेलिकॉप्टर्सही सज्ज ठेवण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक हजार कोटी रुपयांची तातडीची मदत चक्रीवादळ धडकण्याच्या एक दिवस आधीच संबंधित राज्यांकडे पाठवली होती. 

या सगळ्या एकत्रित प्रयत्नांतून चक्रीवादळाला धीराने तोंड देण्याची कामगिरी भारताने केली आहे. त्याबद्दल भारतीय हवामानशास्त्रज्ञ, जवान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व स्थानिक यंत्रणांचे कौतुक देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही केले जात आहे. या कौतुकात मग्न न राहता यंत्रणा पुढील कामाला लागली आहे. चक्रीवादळात जीवितहानी झाली नसली, तरी मालमत्तेची हानी मोठी झाली आहे. त्यातून सावरण्यासाठी नागरिकांना मदतीबरोबरच धीराची गरज आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस प्रचंड कामाचे असणार आहेत. 

(भारतीय यंत्रणा कशी सज्ज होती, हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
alka godbole About 138 Days ago
सर्व कार्यकर्ता और यंत्रणाओंका काम अभिनंदनीय. हमे उनपर गर्व है'
0
0
Umakant konkar About 138 Days ago
Very good job
0
0

Select Language
Share Link
 
Search