Next
केवळ हट्ट पुरविणे म्हणजे पालकत्व नव्हे!
BOI
Saturday, May 19, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:


आपले मूल हे प्रत्येक पालकाचेच लाडके असते. त्यामुळे मूल हा प्रत्येकाचाच ‘वीक पॉइंट’ असतो. मुलांचे हट्ट पुरविले जाणे साहजिकच असते; मात्र हट्ट पुरविण्यातही सारासार विचार करणे गरजेचे असते. मुलांना नकार, बंधने, नियम या गोष्टींचीही सवय आणि माहिती असायला हवी. त्यांच्याशी नियमितपणे संवाद असायला हवा आणि त्यांच्या चुका त्यांच्या वेळीच लक्षात आणून द्यायला हव्यात. मुलांच्या चांगल्या मानसिक विकासासाठी ते आवश्यक असते. केवळ हट्ट पुरविणे म्हणजे पालकत्व नव्हे. ‘मनी मानसी’ या सदरात या वेळी जाणून घेऊ या दुर्लक्षित पालकत्वाच्या समस्येबद्दल...
............
सहावीमध्ये शिकणाऱ्या पिनाकला त्याच्या बाई भेटायला घेऊन आल्या. त्यांनी त्याला बाहेर उभे केले. आणि बोलण्यासाठी त्या आत आल्या. बोलताना त्यांनी पिनाकची जुजबी ओळख करून दिली. पिनाक पाचवी आणि सहावी अशा दोन्ही इयत्तांमध्ये त्यांच्याच वर्गात शिकत होता. अभ्यासात खूप कच्चा होता; पण वर्गात सगळ्यांना खूप त्रास द्यायचा. भाषा, गणित यांपैकी कुठल्याच विषयाचा त्याचा पाया पक्का नव्हता. तो जेमतेम स्वतःचे नाव लिहू शकायचा. वाचन, लेखन या सर्व बाबतींत एकूण आनंदच होता. वर्गात सतत सगळ्यांना त्रास देणं, मारामाऱ्या करणं, आरडाओरडा करणं, दम देणं हाच त्याचा दिनक्रम होता. वर्गशिक्षिका म्हणून त्यांनी पिनाकला खूप सामावले, त्याच्या अभ्यासावर खूप मेहनत घेतली. त्याच्याकडे विशेष लक्ष दिले; पण उपयोग शून्यच! त्याच्या वागण्यात, अभ्यासात कशातच कोणतीही सुधारणा दिसली नाही. त्या दिवशीही त्याने एका मुलाला जोरात ढकलून दिले. त्याच्यामुळे तो पडला आणि त्याला बरेच लागले. बाईंनी पिनाकला त्या मुलाची माफी मागायला सांगितली; पण पिनाकने काही त्याची माफी मागितली नाही. उलट त्याच्याशी परत भांडायला सुरवात केली. म्हणून बाई त्याला माझ्याकडे घेऊन आल्या. बाईंना त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले, की त्याच्या घरी अनेक निरोप दिले, फोन केले; पण कोणीच भेटायला येत नाही. एवढे सांगून त्या वर्गात निघून गेल्या. 

बाई गेल्यावर पिनाकला आत बोलावून त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. ओळख नसल्याने तो जरा घाबरला. म्हणून त्याला मोकळे वाटण्यासाठी, त्याची भीती कमी होण्यासाठी वेगळ्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. त्यामुळे हळूहळू तो बोलायला लागला आणि भीती कमी होऊन मोकळा झाला. त्यानंतर त्याच्याबरोबर साधलेल्या संवादातून असे लक्षात आले, की पिनाकच्या पालकांचा त्याच्याशी विशेष संवाद घडत नसावा. कारण आपले वडील कुठे काम करतात, काय काम करतात, आई काय काम करते या प्रश्नांची उत्तरे तो देऊ शकला नाही. प्रत्येक प्रश्नाला ‘माहीत नाही’ हे एकच उत्तर देत होता; पण घरातली आवडती व्यक्ती कोण आणि का, हे जाणून घेताना, असे लक्षात आले, की आई-बाबा दोघेही त्याला खूप आवडतात. कारण ते त्याचे सगळे हट्ट पुरवतात, ते त्याला कधीच रागावत नाहीत. हेही लक्षात आले, की ते त्याचा कधीही अभ्यास घेत नाहीत, पालक सभेलासुद्धा ते आलेले नाहीत. शाळेत काय काय घडते किंवा इतर कोणत्याच गोष्टी तो घरी सांगत नाही. त्याच्या या साऱ्या बोलण्यातूनच त्याच्या समस्येचा आणि त्यामागच्या कारणांचा अंदाज आला होता. आई-वडील आवडते असण्यामागील कारण लक्षात आले होते. त्याच्याशी बोलून झाल्यावर त्याला आईला घेऊन यायला सांगितले.

अपेक्षेप्रमाणे आईने सुरुवातीला प्रतिसाद दिलाच नाही. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या सहकार्याने आईशी संपर्क साधून पालकांना ताबडतोब भेटीसाठी बोलवण्यात आले. त्यामुळे आई-वडील दोघेही भेटायला आले. ते जरा घाबरलेलेच होते. भेटायला आल्यावर प्रथम त्यांना थोडे शांत होऊ दिले आणि त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. या सत्रादरम्यान झालेल्या चर्चेतून लक्षात आलेले कारणच साऱ्या समस्यांना कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. पालकांशी संवाद साधताना असे लक्षात आले, की आपला मुलगा सध्या कोणत्या इयत्तेत आणि वर्गात शिकतो, हेही त्यांना नीट सांगता येईना. त्यामुळे अभ्यास, शैक्षणिक प्रगती, त्याच्या वर्तन समस्या याबाबत ते अनभिज्ञ होते, हे तर उघडच होते. मुलाचे सर्व हट्ट पुरवणे ही एकच पालकत्व पद्धती त्यांनी स्वीकारली होती, हे एकूण चर्चेतून स्पष्ट होत होते. हट्ट पुरवणे याव्यतिरिक्त इतर सर्वच गोष्टींत त्यांचे मुलाकडे दुर्लक्ष झाले होते. आणि याच दुर्लक्षित पालकत्व पद्धतीमुळे मुलामध्ये या समस्या निर्माण झाल्या होत्या. कारण बंधन, नकार, धाक, नियम या कशाचीच त्याला सवय नव्हती. त्यामुळे घरी हट्ट करून आणि शाळेत भांडणे, मारामाऱ्या करून आपल्याला हवे ते मिळवण्याची सवयच त्याला लागली होती.

त्याच्या या साऱ्या समस्यांची पालकांना जाणीव करून दिली. तसेच त्याचे कारण त्यांच्या केवळ हट्ट पुरविण्याच्या पालकत्व पद्धतीत आहे, हेही त्यांना सांगण्यात आले. त्याचे पुढे काय परिणाम होतील, याबाबतही मार्गदर्शन केले. समस्येचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आल्याने त्यानंतर ते नियमितपणे भेटीसाठी येत होते. सुचवल्याप्रमाणे आवश्यक ते बदल ते आपल्या पालकत्व पद्धतीत करत होते. हा बदल स्वीकारणे पालकांना, तसेच पिनाकलाही सुरुवातीला जरा अवघड गेले. परंतु नेटाने पर्यंत सुरू ठेवल्याने हळूहळू बदल घडून आले आणि पिनाकच्या समस्या आपोआपच कमी झाल्या. 

आपले मूल हे प्रत्येक पालकाचेच लाडके असते. त्यामुळे मूल हा प्रत्येकाचाच ‘वीक पॉइंट’ असतो. मुलांचे हट्ट पुरविले जाणे साहजिकच असते; मात्र हट्ट पुरविण्यातही सारासार विचार करणे गरजेचे असते. मुलांना नकार, बंधने, नियम या गोष्टींचीही सवय आणि माहिती असायला हवी. आवश्यक तिथे मुलांना नकारही दिला पाहिजे. कारण त्यांच्या हित-अहिताचा विचार पालकच जास्त करू शकतात. तसे झाले नाही तर मुले हट्टी होतात. मुलांशी नियमितपणे संवाद असायला हवा आणि त्यांच्या चुका त्यांच्या वेळीच लक्षात आणून द्यायला हव्यात. मुलांच्या चांगल्या मानसिक विकासासाठी ते आवश्यक असते. केवळ हट्ट पुरविणे म्हणजे पालकत्व नव्हे, या गोष्टीची स्पष्ट खूणगाठ आपल्या मनाशी बांधलेली हवी.

(केसमधील नाव बदलले आहे.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search