Next
रामन राघव २.० : गुन्हेगारी मनोवृत्तीचा थरारक-तपशीलवार वेध
BOI
Tuesday, April 30, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


डार्क स्वरूपाचे विषय, ‘सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर ड्रामा’ हा अनुराग कश्यपचा खास आवडता प्रांत. ‘निओ-न्वार’ विभागात काम करण्यात त्याची हातोटी आहे. कश्यपच्या चित्रपटांचे विषय कितीही विचित्र, विकृत असले, त्यातली पात्रं चित्रविचित्र हरकती करणारी असली, तरीही हे चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवतात.  विषयाची मांडणी हटके पद्धतीची असते. ‘रामन राघव २.०’ पाहतानाही त्यात अक्षरशः गुरफटून जायला होतं... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘रामन राघव २.०’ या बॉलिवूडपटाबद्दल...
.................................
१९६०च्या दशकात, रामन राघव या माथेफिरू गुन्हेगारानं मुंबई परिसरात सुमारे ४० लोकांना ठार करून कमालीची दहशत माजवली होती. हा गुन्हेगार रस्त्यावर अथवा गरीब वस्तीत झोपणाऱ्या व्यक्तींचे खून करी. या हत्याकांडांमागे त्याचा उद्देश काय होता, हे शेवटपर्यंत कळू शकलं नाही. तो खरंच माथेफिरू होता की नाही, हेसुद्धा वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकलं नाही. ४० हा आकडासुद्धा सरकारदफ्तरी नोंद असलेला आहे. रामननं याहून अधिक लोकांना मारलं असल्याचीही शक्यता वर्तवली जाते. 

पेपरमध्ये अशा स्वरूपाच्या बातम्या वाचून आपण तेवढ्यापुरते गंभीर होतो, नंतर विसरतो किंवा दुर्लक्ष करतो. काही लोक मात्र यापुढे जाऊन त्यावर सखोल विचार करतात. अशा घटनांमागची कारणमीमांसा काय असावी? अशा गुन्हेगारांची मानसिकता नेमकी काय प्रकारची असावी, इत्यादी प्रश्नांची, तपशीलात जाऊन उकल करू पाहतात. यांसारख्या वेगळ्या आणि काहीशा विचित्र विषयावर आधारलेला, अत्यंत कन्व्हिन्सिंग पद्धतीची ट्रीटमेंट असणारा सिनेमा बनवणं, हे निश्चितच सोपं काम नव्हे. मनीष गुप्ता दिग्दर्शित ‘द स्टोनमॅन मर्डर्स’ नावाचा सिनेमा २००९मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमादेखील, ‘स्टोनमॅन’ नावाच्या सीरियल किलरवर आधारलेला होता. हा सिनेमा, बांधीव पटकथा, दिग्दर्शन आणि उत्तम अभिनयाने परिपूर्ण असणारा होता. दिग्दर्शकानं, गुन्हेगाराच्या मानसिकतेचा वेध घेत-घेत, त्यानं केलेल्या गुन्ह्यांमागचं एक वेगळंच कारण प्रेक्षकांसमोर मांडलं होतं. ‘द स्टोनमॅन मर्डर्स’चा पूर्ण डोलारा के. के. मेनन या प्रतिभावान अभिनेत्यानं आपल्या खांद्यांवर व्यवस्थित तोलून धरला आहे. एखादा सिनेमा पाहून काही वर्षं लोटल्यानंतरही, दीर्घकाळ आपल्या स्मरणात राहतो. साधारण स्टोनमॅनसारख्याच स्वरूपाचा विषय, ‘रामन राघव २.०’च्या प्रोमोजमध्ये पाहायला मिळत होता. त्यामुळे, ‘द स्टोनमॅन मर्डर्स’च्या तुलनेत हा सिनेमा कसा आहे याची उत्सुकता होती.

अनुराग कश्यपस्टोनमॅन आणि रामन राघव या वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. त्यांची गुन्हा करण्याची पद्धत आणि स्वरूप मात्र साधारणपणे एकसारखं होतं. रामन राघवनं १९६०च्या आसपास मुंबई पोलिसांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं, तर स्टोनमॅनने १९८०च्या सुमारास हाहाकार माजवला होता. ‘रामन राघव’ या विषयाला ‘अनुराग कश्यप टच’ कसा मिळतो, याबद्दल कुतुहल होतं. अनुराग कश्यप हे एक अजब रसायन आहे. ‘निओ न्वार’ हा त्याचा आवडता प्रांत. महत्त्वाकांक्षी आणि काहीशा प्रायोगिक धाटणीच्या ‘बॉम्बे वेलवेट’च्या मोठ्या अपयशानंतर खचून न जाता, बरोबर एक वर्षानंतर, कश्यपने आपली पूर्ण ताकद लावून ‘रामन राघव २.०’ बनवला. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि ‘मसान’ या चित्रपटामधून चित्रसृष्टीत पदार्पण केलेला विकी कौशल हे प्रमुख कलावंत आणि रामन राघव या मनोविकृत गुन्हेगाराचा संदर्भ घेऊन कश्यपनं ‘रामन राघव २.०’ची निर्मिती केली. 

डार्क स्वरूपाचे विषय, ‘सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर ड्रामा’ हा अनुराग कश्यपचा खास आवडता प्रांत. ‘निओ-न्वार’ विभागात काम करण्यात त्याची हातोटी आहे. कश्यपच्या चित्रपटांचे विषय कितीही विचित्र, विकृत असले, त्यातली पात्रं चित्रविचित्र हरकती करणारी असली, तरीही हे चित्रपट प्रेक्षकाला खिळवून ठेवतात. विषयाची मांडणी हटके पद्धतीची असते. ‘रामन राघव २.०’ पाहतानाही त्यात अक्षरशः गुरफटून जायला होतं. सिनेमातली दोन्हींही मुख्य भूमिका वठवणारी पात्रं कमालीची विकृत आहेत. अशी कॅरेक्टर्स आपण प्रत्यक्षात कधीही पाहिलेली नसतात किंवा पाहण्याची फारशी शक्यताही नसते. ती पात्रं सिनेमात ज्या प्रकारच्या कृती करतात तशा कृतींचा आणि त्यामागे असणाऱ्या त्यांच्या स्वभावांचा आपण साधा विचारही करू शकत नाही. निर्माता व दिग्दर्शक अनुराग कश्यप अशी विकृत पात्रं, त्यांची मनोभूमिका आणि त्यांचे स्वभाव अशा सर्व बारीकसारीक तपशीलांसह समोर उभी करतो. 

रामन राघव या गुन्हेगाराशी या सिनेमाचा कसलाही संबंध नाही, असं जरी सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं असलं, तरीसुद्धा, रामन राघवनं प्रत्यक्ष आयुष्यात केलेल्या कृत्यांपासून स्फुरलेली प्रमुख व्यक्तिरेखा, ‘रामण्णा’ या नावाने आपल्याला पाहायला मिळते. प्रत्यक्ष जगात, रामन राघव, ही एकच व्यक्ती असली, तरी चित्रपटात मात्र रामण्णा (नवाजुद्दीन सिद्दिकी) आणि राघव (विकी कौशल) अशी दोन प्रमुख पात्रं उभी केली गेली आहेत. रामण्णा एक मनोविकृत गुन्हेगार आहे. तो न बिचकता कुणालाही यमसदनास धाडतो. अत्यंत निर्घृण स्वरूपाचे खून पाडताना तो जराही बिचकत नाही. राघव एक तरुण इन्स्पेक्टर आहे. राघवला ड्रग्जचं व्यसन आहे. तो सदैव कुठल्या न कुठल्या स्वरूपाची नशा करताना दिसून येतो. रामण्णा आणि राघव, जागेपणीही सतत एक प्रकारच्या स्वप्नात असतात, तारेत असतात. रामण्णाला, त्याच्या म्हणण्याप्रमाणे देवाकडून संदेश येत राहतात. ते ऐकून, संदेशात सांगितल्यानुसार रामण्णा कुठलाही विचार न करता, कुठल्याही कारणाशिवाय, बिनदिक्कत खून पाडत असतो, तर राघव सततच्या ड्रग्सच्या सवयीमुळे कायमच नशेच्या आधीन असल्यामुळे बेभान असतो. दिवसा जमेल तशी पोलिस ड्युटी आणि रात्री पार्टी करणे, डिस्कोला जाणे, नवनवीन मुलींबरोबर ओळखी प्रस्थापित करणे, त्यांच्यासोबत ड्रग्स घेणे, उत्तेजना निर्माण करणारी औषधं घेऊन त्यांच्यासोबत तऱ्हेतऱ्हेचे प्रकार करणे, या प्रकारचा त्याचा दिनक्रम असतो. 

आता, या दोन्हीं पात्रांना जोडणारा दुवा काय, तर त्यांचं वर्तन! सततच्या ड्रग्सच्या नशेमुळे डोकं भरकटलेला इन्स्पेक्टर राघवही वर्दीच्या आड खून पाडत असतो. त्यानं केलेल्या खुनांची संख्या रामण्णाच्या मानानं कमी असते इतकंच! हा समान असणारा दुवा, कश्यप आणि वासन बाला या पटकथाकारांनी वेळ देऊन, विचारपूर्वक विणला आहे आणि उत्तम रीतीने विकसित केला आहे.

नवाजुद्दिन सिद्दिकीसिनेमाच्या सुरुवातीलाच, रामण्णा पोलिस स्टेशनला येऊन आधी केलेल्या नऊ खुनांची कबुली देतो. पोलिस त्याला गांभीर्यानं घेत नाहीत आणि एका आडबाजूच्या ठिकाणी कैद करून ठेवतात. रामण्णा कबुलीजबाब देत असताना इन्स्पेक्टर राघवही उपस्थित असतो. रामण्णा त्या ठिकाणाहून सुटतो आणि त्याचं नेहमीचं खूनसत्र सुरू करतो. घडलेल्या खुनांशी रामण्णाचा संबंध नसून, खरा खुनी कोणीतरी वेगळा आहे असं समजून पोलीसही आपला शोध वेगळ्या दिशेनं सुरू ठेवतात. घटना कमालीच्या वेगाने घडतात. पुन्हा काही निर्घृण खून होतात आणि रामण्णाच या सगळ्याच्या मागे आहे हे यथावकाश स्पष्ट होत जातं. सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये रामण्णा आणि राघव ही दोन्हींही विकृत स्वरूपाची कॅरेक्टर्स संपूर्णपणे उलगडतात. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन याबरोबरच ध्वनी, संगीत, चित्रीकरण स्थळे आणि छायांकन ही या चित्रपटाची फार महत्त्वाची अंगं आहेत. राम संपथ या अत्यंत गुणी संगीतकारानं संगीत आणि पार्श्वसंगीत अशी दुहेरी जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली आहे. इतका विचित्र विषय असूनही या सिनेमाच्या अल्बममध्ये गाणी असणं आणि तीसुद्धा इतकी श्रवणीय असणं हे एक आश्चर्यच म्हणावं लागेल. ही गाणी सिनेमात तुकड्यांच्या स्वरूपात जागोजाग पेरली आहेत. 

‘तलाश’ या आमीरच्या सिनेमातही राम संपतनं अशीच चमक दाखवून दिली होती. अत्यंत गुणी असूनही दुर्लक्षित असणारा हा संगीतकार आहे. राजकुमार संतोषींचा ‘खाकी’ हा रामचा संगीत दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा. याआधी त्याने बऱ्याच सिनेमांसाठी संगीत संयोजक म्हणून काम पाहिलं होतं. ‘रामन राघव २.०’मध्ये अनुराग कश्यपनं बऱ्याच प्रसंगांमध्ये प्रत्यक्ष हिंसा न दाखवता अप्रत्यक्ष हिंसा दाखवली आहे. या पद्धतीचा वापर बऱ्याच जागी केल्यामुळे हा चित्रपट बघवतो, फारसा अंगावर येत नाही. हिंसा घडतानाच्या प्रसंगांत, काय घडलं असेल, याचा अंदाज येतो तो फक्त साउंडमुळे. पार्श्वसंगीत आणि ध्वनी आरेखन या दोन्हींही गोष्टी एकत्रितपणे अपेक्षित परिणाम साधतात. ‘रामन राघव’ पाहताना, त्यात वापरलेल्या ध्वनी परिणामांमुळे, भीती अथवा ताण निर्माण होणं, अंगावर काटा येणं हे वारंवार अनुभवायला मिळतं.

जय ओझांचं छायांकनही जबरदस्त आहे. रामन राघवचं थ्रिल, प्रभावी छायांकनामुळे अजूनच वाढतं. छायांकनाचं सुप्रसिद्ध ‘गरीला टेक्निक’ रामन राघव २.० पाहताना अनुभवायला मिळतं. या पद्धतीमध्ये कॅमेरे नेहमीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीनं लावले जातात. प्रेक्षकाला अनपेक्षित असणाऱ्या ठिकाणी लपून हे कॅमेरे चित्रीकरण करत असतात. या पद्धतीचं चित्रीकरण बघताना, अमुक एक शॉट अथवा सीन चित्रित करण्याकरता कॅमेरा नेमका कुठे ठेवला असेल, इत्यादी विचार प्रेक्षकांच्या मनात आपोआप येऊ लागतात. छायांकनकार आणि दिग्दर्शकाप्रती अधिकच आदर वाटू लागतो. छायांकन अभ्यासण्याकरिता सिनेमा पुन्हा एकदा तरी पाहावा असं वाटू लागतं. ‘गरीला टेक्निक’शिवाय या चित्रपटात ‘ओझांनी, मॅक्रो’, हाय-स्पीड आणि फिल्टर्ड पद्धतीचं छायांकनही केलेलं आहे. एकदम अस्सल स्वरूपाची लोकेशन्स हे ‘रामन राघव २.०’चं खास नमूद करावं असं वैशिष्ट्य.

मुंबईतल्या बकाल झोपडपट्ट्या, कळकट अपार्टमेंट्स, पोटमाळे, तिथे चालणारे तऱ्हेतऱ्हेचे उद्योग, वळचणीला असलेली वर्कशॉप्स, तिथं कामाला असलेली माणसं, त्यांचे दैनंदिन व्यवहार हे सगळं उभं करताना लोकेशन हंटिंग टीमचा मोलाचा हातभार लागला आहे. नवाजुद्दीन सिद्दिकीचा अभिनय अफलातून आहे. हा गुणी अभिनेता दिलेल्या कॅरेक्टरमध्ये अक्षरश: शिरतो आणि भूमिका समरसून जगतो. थंडपणा, हताशपणा, क्रूरपणा, क्वचित एक अजब तऱ्हेचा विकृत निरागसपणा, कठोरपणा, निर्विकारपणा, बेडरपणा हे सगळे भाव त्यानं कमालीच्या सहजतेने दाखवले आहेत. एक अत्यंत नीच, विकृत, फाटका, भणंग रामण्णा त्यानं जीव तोडून उभा केलाय. नवाज हा माणूस अफाट आहे. प्रेक्षक आणि समीक्षक त्याच्या कामाची दखल आपोआप घेतोच.

विकी कौशलआजवर रामन राघवच्या आधी आलेल्या एकाही सिनेमात, नवाजुद्दीनने वाईट काम केल्याचं स्मरत नाही. भूमिकेचा टोन परफेक्ट पकडणं आणि त्यानुसार योग्य तसं बेअरिंग घेणं, हे नवाज खुबीनं करतो. नवोदित सोभिता धुलिपाला दिसायला सुंदर आहे. भूमिका छोटी असूनही तिने चांगली केली आहे; मात्र अमृता सुभाषसारख्या ताकदीच्या आणि गुणवान अभिनेत्रीनं ‘रामण्णा’च्या बहिणीची भूमिका का स्वीकारली असावी याचं नवल वाटतं. कथेच्या दृष्टीनंही या भूमिकेला विशेष अर्थ नाही. ‘मसान’मधून पदार्पण केलेला विकी कौशल नवाजसारख्या मुरलेल्या अभिनेत्यासमोर कसा उभा राहतोय हे पाहायची अतिशय उत्सुकता होती. वाट्याला आलेली भूमिका विकी चोखपणे निभावतो; पण ‘रामन राघव’मध्ये इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी केलेलं त्याचं कास्टिंग खटकतं. तो एक माथेफिरू, ड्रग अॅडिक्ट तरुण म्हणून परफेक्ट वाटतो; पण कुठल्याच अँगलमधून इन्स्पेक्टर वाटत नाही. त्याची देहबोली, डायलॉग डिलिव्हरी, त्याचे कपडे हे नक्कीच इन्स्पेक्टरच्या पात्राला शोभणारे नाहीत; मात्र ‘मसान’मध्ये, एका निरागस कॉलेजवयीन मुलाची भूमिका साकारल्यानंतर लगेचच पुढच्या सिनेमात, अशी अत्यंत अवघड स्वरूपाची, अनेक पदरी भूमिका साकारणं, हे नक्कीच आव्हानात्मक आहे. ते आव्हान विकीनं नक्कीच चांगलं पेललं आहे. परंतु या इन्स्पेक्टरच्या पात्राला, एखाद्या मुरलेल्या अभिनेत्यानं अजून चांगला न्याय दिला असता, असं राहून राहून वाटतं. यामुळे हा सिनेमा फक्त नवाजुद्दिनचा म्हणून लक्षात राहतो. 

अमृता सुभाषबेफाम हिंसा, रक्तपात, विकृत पात्रं, त्यांचे आपापसांतले किळसवाणे व्यवहार आणि घटना, या सर्वांना मजबूत पाठिंबा देणारी ‘अनरिअॅलिस्टिकली रिअॅलिस्टिक ट्रीटमेंट’ या कश्यपच्या चित्रपटातल्या अविभाज्य गोष्टी याही सिनेमात आहेत. कश्यपचे सिनेमे पाहताना, प्रेक्षकाचा दृष्टिकोन हा, ‘हे काय चाललंय, हे असं असू शकतं आणि शेवटी, हे असंच असतं’ अशा पद्धतीनं बदलत जातो. ‘गुलाल’, ‘नो-स्मोकिंग’, ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘अग्ली’ या चित्रपटांत ‘मेक-बिलीव्ह’ लॉजिक कश्यपनं फारच परिणामकारक पद्धतीनं वापरलं होतं, ‘रामन राघव २.०’ पाहताना मात्र माझा दृष्टिकोन - ‘हे काय चाललंय, हे असं असू शकतं, आपण हे का पाहिलं, यातून आपल्याला नक्की काय मिळालं, हे पाहिलं नसतं तरी चाललं असतं’ असा होत गेला. अनुराग, नक्कीच एक प्रतिभावान दिग्दर्शक आहे. समाजातल्या डार्क घटना, डार्क पात्र तपशिलात जाऊन तो दाखवतो; पण इतका प्रतिभावान दिग्दर्शक जेव्हा अत्यंत प्रभावी पद्धतीनं हे सगळं मांडतो आणि कायमच ऑबसेस्ड असल्याप्रमाणे अशा विकृत विषयांवर सिनेमे काढत सुटतो, तेव्हा या सगळ्या निर्मितीमागचा त्याचा नेमका उद्देश काय ते कळेनासं होतं. 

चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असून, समाजमनावर त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या नक्कीच परिणाम होत असतो. असं असताना सातत्याने विकृती आणि हिंसा याचा समावेश असलेले हे सिनेमे काढून आपण समाजाला नक्की काय देतोय? काय शिकवतोय? त्यातून काही चांगलं घडणार आहे, की लोक भलतंसलतं काही शिकणार आहेत, त्यांच्या सबकॉन्शसमध्ये काही भलतं घेऊन बसणार आहेत, याचा थोडा तरी विचार सिनेकर्त्यानं करायला हवा, असं माझं प्रामाणिक मत आहे. कश्यपच्या या भूमिकेमागेही, ‘रामन राघव २.०’च्या क्लायमॅक्समध्ये उलगडणाऱ्या डार्क, वियर्ड लॉजिक प्रमाणेच एखादं क्रेझी लॉजिक असावं कदाचित!

एकुणात, ‘रामन राघव २.०’ हा नक्कीच एक वेगळा, विशेष म्हणता येईल असा सिनेमा आहे. कश्यप फॅन्सकरिता तर ही ट्रीटच आहे. कश्यपचा आजवरचा टेक्निकलदृष्ट्या सर्वोत्कृष्ट असणारा हा सिनेमा आहे. साउंड, म्युझिक स्कोअर्स, एडीट, स्क्रीनप्ले, प्रॉडक्शन डिझाईन, दिग्दर्शन अशी सगळीच अंगं अभ्यासण्यासाठी हा सिनेमा जरूर पाहावा असा आहे; पण याचबरोबर हा सिनेमा प्रचंड डार्क आहे. तो प्रेक्षकाचं डोकं बधिर करतो; मात्र ‘निओ न्वार’ जान्र असणारे हिंसक सिनेमे पाहायची फारशी सवय नसल्यास हा सिनेमा पाहायचं टाळलेलं बरं... 

(टीप : पराकोटीचा हिंसाचार आणि विकृत दृश्यं असणारा हा चित्रपट प्रौढांकरिता आहे. लहान मुलांना दाखवण्याजोगा नाही. )

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search