Next
‘दासबोध हा मॅनेजमेंट गुरू’
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Friday, January 12 | 12:45 PM
15 0 0
Share this story

१७व्या शतकात समर्थ रामदासांनी रचलेला ‘दासबोध’ आज २१व्या शतकातही प्रबोधन करतोय. आजही त्यातल्या ज्ञानाचा खजिना भल्याभल्या मॅनेजमेंट गुरूंना भुरळ घालतोय. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’चे माजी संचालक श्रीनिवास रायरीकर यांनी या ग्रंथाचं महत्त्व जाणलं, त्याचा अनेक वर्षं अभ्यास केला आणि ‘दासबोध : नेतृत्व आणि व्यक्तिविकास’ असा एक आगळा अभ्यासक्रम तयार करून विविध कंपन्यांचे व्यवस्थापक आणि कामगारांसाठी १२००हून अधिक सेमिनार्स त्यांनी घेतली आहेत. त्यांच्याशी ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी मारलेल्या या गप्पा...
...........

- तुम्ही या विषयाकडे कसे ओढले गेलात?
- मला लहानपणापासून वाचनाची आवड होती. गंभीर आणि अध्यात्मासारख्या विषयाचंही वाचन मी करत असे. विवेकानंद, योगी अरविंद वाचत होतो. शाळकरी वयात पुण्यातील रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये असताना आम्ही नदीकिनारी जात असू. मी कविता करत असे. तिथेच त्या काळी एक विलक्षण प्रसंग घडला. एसएससीच्या सुमाराला तिथे ओंकारेश्वराजवळ चितेवर जळणारं प्रेत पाहून मला एक कविता सुचली. ‘प्रेतास पाहून’ असं नाव मी त्या कवितेला दिलं. ‘ही क्षुद्र बाहुली कोण करी तयार, श्री परी पृथ्वीच्या असे फुका हा भार - कधी कोठे जन्मला हा मांसाचा गोळा, अन व्यर्थ व्यापले त्याने अवकाशा, बहू किती असेल हा सुंदरतेचा पुतळा, त्या सुंदरतेला कशास पुसती ज्वाळा, असेल जरी कितीही कुरूप हा देह, होणारच त्याची राख असा नि:संदेह..’ थोडक्यात म्हणजे मला काही वेगळा विचार करायची तेव्हा सवय लागली असावी. ही कविता आमच्या बीएमसीसी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लावली होती. पुढे वयाच्या १७व्या वर्षी मला गुरू भेटले ‘स्वामी चक्रजीत’ यांच्या रूपात. मग मी अध्यात्माकडे ओढला गेलो. ध्यानधारणा सुरू झाली. त्यातून पुढे मग दासबोधाचं वाचन आणि चिंतन सुरू झालं. 

- दासबोधाची आणि मॅनेजमेंटची सांगड कशी घातलीत?
- जसजसा मी दासबोधावर विचार करत गेलो आणि त्यातल्या श्लोकांमधल्या शब्दांच्या अंतरंगात पाहत गेलो, तसतसं जाणवत गेलं, की समर्थांनी ‘कम्युनिकेशन’ या विषयावर, शब्द कसे वापरावेत या विषयावरसुद्धा भरपूर लिहून ठेवलंय. समर्थानी लिहिलंय - 

उत्तम पदार्थ दुसऱ्यांसी द्यावा। शब्द निवडोनि बोलावा।
सावधपणे करीत जावा संसार! 

म्हणजेच व्यावहारिक ट्रान्झॅक्शन्समध्ये सावधपणा हवा!! यावर विचार करताना मला सुचलं ‘शब्द मनामनांमध्ये भिंती उभ्या करतात, तेच शब्द दोन मनांत पूलही बांधतात - शब्दांनी मनामनातल्या भिंतीही पडतात, नाहीतर असलेले पूलही उद्ध्वस्त होतात....’ म्हणजेच रोजच्या जीवनात शब्द जपून वापरण्यासाठी, निवडून वापरण्यासाठी आपल्याकडे अवेअरनेस हवा, अलर्टनेस हवा. आणि हे सर्व दासबोधात फार सुंदर प्रकारे सांगितलंय. त्यामुळे मला हे निरनिराळ्या कामगारांसमोर, कर्मचाऱ्यांसमोर मांडणं महत्त्वाचं वाटलं. मग दासबोध कशासाठी लिहिला गेला तेही लक्षात आलं. समर्थांनीच लिहून ठेवलंय – 

‘पहिले ते हरिकथा निरूपण (म्हणजे अध्यात्म), 
दुसरे ते राज्यकारण (म्हणजे मॅनेजमेंट), 
तिसरे ते सावधपण सर्व विषये!’ 

- गुरूंच्या सहवासात इतर कोणते विषय शिकायला मिळाले?
- महत्त्वाचं म्हणजे ध्यान आणि योगाभ्यास करायला शिकलो. तरुणपणात वाचन, सिनेमे बघणं, राजकारणावर चर्चा हे इतर मुलांप्रमाणे सहज प्रवृत्तीने करत होतो; पण गुरूंमुळे ठोस दिशा मिळाली. नाहीतर होतं असं, की आपण तेवढ्यापुरतं एखादं काही तरी वाचतो आणि सोडून देतो. जोपर्यंत आपण काही गोष्टी स्वतः प्रत्यक्ष करून बघत नाही, तोपर्यंत त्याला अर्थ नसतो. गुरू भेटल्यावर मग मी प्राणायाम करायला लागलो. तीन तीन तास प्राणायाम करायचो. गुरूंच्या सहवासात विलक्षण शिकायला मिळालं. 

- काही वेगळे अनुभव आले?

- हो. माझे गुरू मोठे हठयोगी होते आणि अगदी टास्कमास्टर होते; पण आम्ही त्यांच्याकडे तासंतास असायचो. त्या ध्यानाचा, एकाग्रतेचा फायदा इतर क्षेत्रातही झाला. मला असं वाटतं, की त्या उच्च दर्जाचं कॉन्सन्ट्रेशन असलं, तर जगात काहीही अशक्य नाही. मी चांगली चित्रं काढत होतो, मूर्ती बनवत होतो, चांगल्या प्रकारे व्हायोलिन वाजवत होतो. मी भस्रिका वेड्यासारखा करायचो... इतकं की वाड्यातल्या पार्टिशनपलीकडे भात्यासारखा आवाज जाऊन शेजारच्या बाई चिडायच्या, ‘अहो आमचा स्वयंपाक चालू असताना तुमच्याकडे पॉवशा काय मारता सकाळपासनं सारखा?’....असे काही गमतीदार अनुभव. काही जबरदस्त स्पिरिच्युअल! एकदा एका ध्यानात मी एका विलक्षण अत्यानंदाची अनुभूती घेतली. एक समाधी अवस्था असल्यासारखी ध्यानमग्नता आणि त्यादरम्यान एका उच्च, अभूतपूर्व आनंदाची अनुभूती. आणि पहाटेच्या त्या समाधीतून बाहेर आल्यावर झपाटल्यासारखी माझ्या हातून त्या अलौकिक आनंदाची अवस्था आपोआप शब्दबद्ध झाली होती. ‘हृदयी भरला आनंद, काठोकाठ भरला हृदयकलश, अन ओसंडुनि तो गेला गगनावरी...’ वगैरे. मी जेव्हा तितक्याच एकाग्रतेने दासबोधाचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्या २० दशकांत, २०० समासांमध्ये, ७७५१ ओव्यांमध्ये किती प्रचंड आणि प्रगाढ ज्ञान भरलं आहे ते जाणवत गेलं. ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ हे गीतेवरचं भाष्य आहे; पण समर्थांचा दासबोध हा संपूर्णपणे स्वतंत्र ग्रंथ आहे. माझ्या मते जगात असा ग्रंथ नाही. त्यात संपूर्ण आयुष्यावर भाष्य आहे. त्यापैकी सुमारे ३५ समासांत व्यवस्थापन, नेतृत्व आणि व्यवहारावर भाष्य आहे.

दासबोधावर आधारित सेमिनार्स कशी सुरू झाली? आणि त्याचे अनुभव? 

- रामदासस्वामी स्वतः मोठे योगी, ब्रह्मज्ञानी आणि दिशादर्शक नेते होते. आसेतुहिमाचल अगदी काबूल, कंदाहारपासून ते खाली रामेश्वरपर्यंत भारतभर फिरून त्यांनी आपली अचाट बुद्धिमत्ता आणि अपूर्व निरीक्षणशक्तीच्या जोरावर समाजाची स्थिती पाहिली आणि समाजाला दिशा देण्यासाठी संघटना हवी हे ओळखून त्यांनी भारतभर ११००च्या वर मठ स्थापन केले आणि आध्यात्मिक आणि दैनंदिन आयुष्यातल्या सोप्या नियमांची सांगड घालून तिथे काम करण्यासाठी प्रमुख महंत आणि स्वयंसेवक तयार केले. ती सर्व प्रशिक्षणाची केंद्रे होती. आजच्या जगात कुठल्याही कंपनीला इतक्या शाखा काढून व्यवस्थित चालवणं कठीण असताना समर्थांनी त्या काळी चाफळहून ते सर्व कसं चालवलं असेल? इतक्या अनुयायांना ट्रेनिंग देऊन आणि प्रेरणा देऊन त्यांनी तयार केलं, यात त्यांच्या विवेकबुद्धीचं सामर्थ्य दिसून येतं. (त्या वेळच्या उत्तर भारतातल्या शेकडो मठांचा वापर करून शिवाजी महाराज महाराष्ट्रात सुखरूप परत येऊ शकले होते हा इतिहास आहे). 

‘महंते महंत करावे। युक्तिबुद्धीने भरावे।। 
जाणते करून विखरावे। नाना देशी।।’ 

असं समर्थांनी सांगितलंय. म्हणजे आपले उत्तराधिकारी हे स्ट्रॅटेजी, नॉलेज, स्किल आणि इन्स्पिरेशन देऊन तयार करावेत (कॉम्पीटन्सी) आणि देशोदेशी (ग्लोबल ऑर्गनायझेशन) पाठवावेत! हे सर्व नियम आपल्याला आजच्या इकॉनॉमीमध्ये अत्यंत लागू पडतात आणि उपयोगीही आहेत. अगदी घरात, कामाच्या ठिकाणी, बाहेर, पार्लमेंटमध्ये.. कुठेही.. सगळीकडेच! हे सर्व समजून घेऊन मी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. रामदासांच्या ओव्यांमध्ये ठासून भरलेलं ज्ञान मी या प्रोग्राम्समधून सर्वांसमोर मांडत असतो. आणि आता हा ‘दासबोध : नेतृत्व आणि व्यक्तिविकास’ प्रोग्राम सर्वदूर अत्यंत लोकप्रिय झाला आहे. 

- तुमच्या प्रोग्रामचं स्वरूप कस असतं?
- मी हा प्रोग्राम तीन सत्रांमध्ये मांडतो. पहिल्या सत्रात ‘आत्मपरीक्षण (स्वॉट अॅनालिसिस)... आपले दोष शोधणे (मूर्खांची लक्षणे), दुसऱ्या सत्रात ‘व्यक्तिमत्त्व विकासांतर्गत’ मी माझं काम अधिक हुशारीनं, आळस झटकून चांगल्या पद्धतीनं कसं करीन (सेल्फ डेव्हलपमेंट)’ आणि तिसऱ्या सत्रात ‘माझं इतरांशी वागणं कसं असावं (इंटरपर्सनल रिलेशनशिप आणि नेटवर्किंग) यावर दासबोधातल्या ओव्यांच्या साह्याने निरूपण करतो. हाताचा, डोक्याचा आणि हृदयाचा एकत्रित वापर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. (3-H चा वापर - Hand, Head आणि Heart)..हे यातून आपल्यला समजतं. ‘समजले आणि वर्तले, तेचि भाग्यपुरुष।।’ असं त्यांनी सांगून ठेवलं आहे.

- जाताजाता आपण लोकांना काय सांगाल?
- प्रत्येकाने दासबोधाचा अवश्य अभ्यास करावा. आपण आज जे ज्ञान जगाकडून शिकू पाहतोय, अमेरिकेकडून, जपानकडून जे मॅनेजमेंटचे धडे शिकू पाहतोय, ते सर्व ज्ञान दासबोधात ठासून भरलेलं आहे आणि दासबोधातल्या सोप्या ओव्यांमधून रामदासांनी सांगितलेली तत्त्वं आपण स्वीकारली आणि अंगीकारली, त्यावर प्रयत्नपूर्वक काम केलं, तर आपलं आयुष्य एका वेगळ्या उच्च पातळीवर गेल्याचा अनुभव प्रत्येकाला जरूर येईल. समर्थांनी एका मजेशीर ओवीत सांगितलं आहे, की 

‘सकळ अवगुणांमध्ये अवगुण। 
आपुले अवगुण वाटती गुण।। 
मोठे पाप। करंटेपणा चुकेना।।’

 स्वतःच्या दोषांचे समर्थन करणे हे मोठे पाप आणि मग त्यात सुधारायची शक्यताच नसते; म्हणून त्यांनीच सांगितल्यानुसार – 

‘या कारणे अवगुण त्यागावे। उत्तम गुण समजोन घ्यावे।। 
तेणे मनासारिखे फावे। सकळ काही।।’....
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अनिल जोशी About 334 Days ago
अत्यंत महत्वपूर्ण विषय आवश्यक अशी माहिती आहे. अध्यात्म म्हणूनच दूर राहते.वाचणं समजून घेण्यासाठी आजच्या काळात कळेल असे आहे.
0
0
Mrs.Mrunalini M. Joshi. About 336 Days ago
Very interesting! Very useful & practical in day to day life.
0
0

Select Language
Share Link