Next
अद्भुत गलापागोज बेटे
BOI
Friday, July 06, 2018 | 09:40 AM
15 0 0
Share this story

गलापागोजचे बार्तलोमी बेट

चार्ल्स डार्विन १८३५मध्ये ‘बीगल’ नावाच्या जहाजातून गलापागोज बेटांवर आला, तेव्हा तिथले फिंच पक्षी बघून त्याला उत्क्रांतिवादाचा सिद्धांत सुचला. येथील जैववैविध्यामुळे गलापागोजला १९७८ साली ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. ‘विश्वगामिनी सरिता’ सदराच्या आजच्या भागात सैर याच अद्भुत गलापागोज बेटांवर...
........
पॅसिफिक महासागरातील इक्वेडोर देशातील गलापागोज बेटे अद्भुत आहेत. ती दक्षिण अमेरिकेच्या मुख्य खंडापासून ६३० मैल दूर आहेत. काही वर्षांपूर्वी आम्ही इक्वेडोरची राजधानी किटो (Quito) येथे गेलो होतो. तिथून विमानाने गलापागोजच्या सांताक्रूज बेटावर गेलो. आम्ही गलापागोज बेटांची क्रूझ आधीपासून आरक्षित केली होती. सांताक्रूजहून छोट्या याटसारख्या जहाजातून सात दिवसांची सफर केली. गलापागोजची वेगवेगळी बेटे व तेथील अद्भुत प्राणी-पक्षी पाहिले. 

गलापागोजला १९ मुख्य बेटे आहेत. त्यापैकी फक्त पाच बेटांवर मनुष्यवस्ती आहे. सांताक्रूजचे बेट सोडून इतर चार बेटांवर अगदी तुरळक वस्ती आहे. पूर्वीच्या काळी तिथे जाणे तेवढे सोपे नसल्याने या बेटांवर मनुष्यवस्ती नव्हती. सोळाव्या शतकात गलबत वादळात आडकल्यामुळे स्पेनमधले खलाशी इथे प्रथम येऊन गेले; मात्र तेव्हा इथे कोणाचे कायमचे वास्तव्य नव्हते. नंतर क्वचित इंग्लिश पायरेट (चाचे) इथे लपत आणि दक्षिण अमेरिकेहून स्पेनला सोने-चांदी घेऊन जाणाऱ्या जहाजांवर झडप घालत. पुढे इथल्या मोठ्या कासवांच्या व व्हेलच्या चरबीसाठी खलाशी येऊ लागले. परंतु तेही बेटांवर कायमची वस्ती करत नसत. 

चार्ल्स डार्विन १८३५मध्ये ‘बीगल’ नावाच्या जहाजातून गलापागोज बेटांवर आला, तेव्हा तिथले फिंच पक्षी बघून त्याला ‘थिअरी ऑफ इव्हॉल्युशन’ (उत्क्रांतिवादाचा सिद्धांत) सुचली. येथील जैववैविध्यामुळे गलापागोजला १९७८ साली ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले.  

तर आशा या अजब बेटांवर जायचे आम्ही ठरवले. आमचे याट (yacht) सकाळ-दुपार मिळून रोज एका किंवा दोन बेटांशी थांबत असे. आम्ही मग याटवरील रबरी पांगामधून बेटांवर जात होतो. बरोबर जहाजाचे नॅचर्लिस्ट असत. ते आम्हाला बेटांवरील वनस्पती, प्राणी, पक्षी यांची माहिती देत. या बेटांचा मुख्य खंडांशी संबंध आला नसल्याने या बेटांवर असलेली जैवविविधता आम्हाला अनोखी वाटली. आम्हाला पक्षी अगदी जवळून बघायला मिळाले. मुख्य खंडावरील मनुष्यवस्तीपासून इतके दूर असल्याने तिथल्या पक्ष्यांना माणसाची भीती माहिती नाही. आम्ही त्यांच्या बाजूला उभे राहिलो तरी ते घाबरत नव्हते. इथल्या बऱ्याच पक्ष्यांना उंच उडता येत नाही. इथे फारशी झाडेही नसल्याने पक्षी व त्यांची पिल्ले असलेली घरटी जमिनीवरच होती.

आम्ही याटवरील (Yacht) रबरी पांगामधून बेटांवर जात होतो. दूरवर आमची याट दिसत आहे.

नऊ जातींचे प्राणी, पक्षी गलापागोज बेटांच्या बाहेर जगात इतर कुठेही दिसत नाहीत. ते म्हणजे गलापागोज इग्वाना (जमिनीवरील व पाण्यातील), डार्विन फिंच, फ्रिगेट बर्ड, ब्लू फूटेड बुबी, न उडणारे कॉरमोरांट, जायंट टॉरटॉइज आणि सॅली लाइटफूट क्रॅब. ते आमच्या नॅचर्लिस्टने आम्हाला दाखवले. रोज धक्क्याला लागायच्या आधी बोटीवर लेक्चर व स्लाइड शोद्वारे आम्ही त्या दिवशी काय बघणार आहोत, याची माहिती दिली जाई. त्यामुळे ते सगळे नंतर प्रत्यक्षात बघताना आणखी मजा येत असे. नॉर्थ सिमूर आयलंड, साउथ प्लाझा, लाबाचास, सॅन्ताफे, बार्तलोमी व इतर काही बेटांवरही जाऊन आलो.

सॅन्ताफे बेटावरची प्रिक्ली पेर झाडे.

आम्ही बोटीच्या प्रवासाची सुरुवात सांताक्रूज बेटावरील ‘जायंट टॉरटॉइज सेंटर’ला जाऊन केली. ही कासवे भली मोठी म्हणजे ४१७ किलोपर्यंतच्या वजनाची असून, १०० ते १५० वर्षे जगतात. ती सध्या फक्त गलापागोज बेटे आणि हिंदी महासागरामधील सेशेल्स बेटांजवळील अल्दाब्रा बेटावर आहेत; मात्र या दोन्ही ठिकाणच्या कासवांत काही फरक आहेत. पूर्वी गलापागोज बेटावर येणारे खलाशी त्यांची चरबी व तेलासाठी त्यांना मारत. आता मात्र ही कासवे ‘एनडेंजर्ड स्पेसीज’ असल्यानं त्यांना सरकारतर्फे संरक्षण आहे. या कासवांचा आकार बघून आम्ही आवाक झालो. तिथल्या कुरणात हळूहळू चालत ती सतत चरत होती. त्यांना दात नसतात; पण तोंड व जिभेने तोडून त्यांना जमिनीवरचे गवत व इतर वनस्पती खाता येतात. त्याचबरोबर ती शरीरात अन्न-पाणी साठवू शकतात आणि वेळ आली तर जवळजवळ वर्षभर न खाता-पिताही राहू शकतात. 

जायंट टॉरटॉइज

नॉर्थ सिमूर आयलंडवर दोन अनोखे पक्षी दिसतात. ते म्हणजे ब्लू फूटेड बुबी आणि फ्रिगेट बर्ड.

ब्लू फूटेड बुबी हा मस्त पक्षी या बेटांवरच बघायला मिळतो. हे पक्षी त्यांच्या निळ्या पावलांनी नाच करत मादीला आकर्षित करत असतात. मग एखादी मादी जवळ जाऊन त्यांची पावले, त्यांचा निळा रंग वगैरेचे नीट निरीक्षण करून तिची संमती देते. तो नाचाचा सोहळा बघायला खूप मजा आली. या पक्षाचे नाव ‘बोबो’ या स्पॅनिश शब्दावरून आलं आहे. बोबो म्हणजे विदूषक. त्यांचे चालणे मजेशीर डुलत डुलत असते. त्यामुळे ते नाव या पक्ष्याला मिळाले असेल.

ब्लू फुटेड बुबी पक्षी आपली निळी पावले त्याच्या सखीला दाखवताना...

ब्लू फूटेड बुबीची पिल्लेही अगदी गोड दिसतात, एखाद्या स्टफ्ड खेळण्यासारखी गुबगुबीत आणि मऊमऊ.

‘बुबीण’ आणि तिची गोड पिल्ले.

तिथल्या फ्रिगेट पक्ष्यांची एखाद्या सुंदरीला आकर्षित करायची तऱ्हा आगळीच असते. तसाच त्यांचा पेहराव असतो. आम्ही गेलो, तेव्हा त्यांचा ‘मेटिंग सीझन’ होता. त्यांच्यातले होतकरू तरुण मानेच्या खाली मोठमोठे लाल-लाल फुगे असलेल्या माना हलवत, पंखांची उघडझाप करत, तोंडाने प्रेमगीत गात येणाऱ्या जाणाऱ्या माद्यांचे लक्ष आपल्याकडे वेधत होते. हा फुगा ते एका वेळी वीस मिनिटांपर्यंत मानेवर फुगवून ठेवू शकतात. त्यांना बघून पूर्वीचे आपल्याकडचे ‘रोडसाइड रोमिओ’ शम्मी कपूर स्टाइलने लाल स्कार्फ लावून प्रेमगीते आळवत, त्याची आठवण येऊन हसू आले!

लाल फुगेवाले फ्रिगेट

मेटिंगनंतर मादी फ्रिगेट एकच अंडे घालते. मग आई-बाप दोघेही काळजीपूर्वक आळीपाळीने आपल्या पिलाचे संगोपन करतात.

आई फ्रिगेट बाळाला भरवताना.

सॅन्ताफे बेट अतिशय जुने आहे. बॅरिंग्टन लँड इग्वाना जगात फक्त इथेच दिसतात. ते दिसायला इतके ओबडधोबड होते, की त्या कुरूपतेतही सौंदर्य होते! निवडुंग वर्गातील ‘प्रिक्ली पेर’ म्हणून झाड असते, त्याची पाने हे त्यांचे आवडते खाद्य. या इग्वानांच्या पाठीवर फिंच पक्षी बसतात आणि त्यांच्या अंगावरचे कीटक खातात.

बॅरिंग्टन लँड इग्वाना.
नुकतंच नखांना मॅनिक्युर केलेलं दिसतंय!

इथले मरीन इग्वानाही अनोखे आहेत आणि ते फक्त गलापागोजमध्येच असतात. ते समुद्रात जाऊन पाण्यातील शेवाळ खातात. तीस फूट खोल पाण्यातही ते जाऊ शकतात.

मरीन इग्वाना

सॅन्ताफे बेटावर पुष्कळ सी-लायन्स (Sea lions) होते. ते अक्षरशः कोरिओग्राफी केल्यासारखे एका तालात माना हलवत होते. इथल्या माद्या एकत्र येऊन पिल्लांचे संगोपन करतात. छोटी पिल्ले खूप खेळकर असतात. भूक लागली, की विशिष्ट आवाज काढतात आणि त्या पिल्लांच्या घोळक्यात त्यांची आई त्यांना बरोबर ओळखते. 

मादी सी-लायन आणि तिचे भुकेले पिल्लू.
खाऊन-पिऊन खेळायला तयार.

नर सी-लायन आपल्या जनानखान्यावर अगदी बारीक लक्ष ठेवून असतात. तरीसुद्धा एखादा उमदा, देखणा तरुण हळूच येऊन एखाद्या मादीला भुरळ पाडून उपद्व्याप करतोच!

‘माझ्या बायकोकडे पाहिलंस तर याद राख!’ मोठा सी-लायन एका चालू तरुणाला दम भरतोय.

मला साउथ प्लाझा बेट खूपच आवडले. तिथे बऱ्याच जातीचे पक्षी, इग्वाना, सी-लायन्स होते. या बेटाला निवडुंगामुळे सुरेख लाल रंग आला होता आणि तो संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात फारच रंगतदार दिसत होता. 

साउथ प्लाझा बेट

ला बाचास हे एक अतिशय सुंदर बेट आहे. छान पांढरी वाळू आणि अगदी निळे पाणी. स्नॉर्क्लिंगसाठी हे उत्तम बेट आहे.

पती आनंद नेने स्नॉरक्लिंग करताना.

ला बाचासला सॅली लाइटफूट क्रॅब खूप दिसले. ते रंगीबेरंगी व अतिशय चपळ असतात. त्यांचे फोटो काढायला मजा आली. या बेटावर सुंदर गुलाबी फ्लेमिंगोही दिसले. 

सॅली लाइटफूट क्रॅब

बार्तलोमी बेट सगळ्यात ‘ड्रामॅटिक’ वाटले. बेटावर काळी, लाल, हिरवी, ज्वालामुखीच्या लाव्हातून तयार झालेली शिखरे होती. पिनॅकल रॉक म्हणजे तर उंच आणि टोकदार सुळकाच होता. बार्तलोमी बेटाच्या एका शिखरावर आम्ही चढून गेलो. वरून पिनॅकल रॉक व आजूबाजूंच्या बेटांचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले. या बेटावर आम्हाला गलापागोजचे पेंग्विन दिसले. ते आकाराने इतर जातींच्या पेंग्विनपेक्षा लहान असतात. 

पिनॅकल रॉक

सान्तियागो बेटावर १०० वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या  उद्रेकामध्ये जो लाव्हा बाहेर आला होता, त्याच्या जाळीदार वळणावळणाच्या लाटांचे आकार सगळीकडे होते. त्याच्यावर चालायला मजा वाटली.

सान्तियागो बेटावरच्या लाव्हाच्या थिजलेल्या लाटा.

मी इथे लेखात लिहिलेले आणि फोटोत दर्शविले आहेत, त्याव्यतिरिक्तही  खूप वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले. 

गलापागोज बेटे म्हणजे निसर्गप्रेमींसाठी खजिनाच आहे. खूप काही अनोखे बघायला मिळेल. जमल्यास तिथे जाऊन बुबी, फ्रिगेट, सॅली लाइटफूट वगैरे मंडळींचा समाचार घेऊन याच. 

सरिता नेने- सरिता नेने, कॅलिफोर्निया

(लेखिका हौशी आणि अभ्यासू पर्यटक असून, अमेरिकेतील पर्यटन क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमधील दीर्घ अनुभवानंतर अलीकडेच निवृत्त झाल्या आहेत. लेखातील फोटो त्यांनी स्वतः काढलेले आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘विश्वगामिनी सरिता’ या पाक्षिक सदरातील त्यांचे लेख  https://goo.gl/TjepRF या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)

उन्हात लोळत पडलेले सी-लायन.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Asmita About 226 Days ago
Beautiful pics.griping narrative.thanks
0
0
Anagha Pabalkar About 229 Days ago
वर्णन इतके ‘ realistic’ आहे की आम्हीच सफर करून आलो 🙋🏻
0
0
मेधा सुदुंबरेकर About 232 Days ago
सरिता.... तू आम्हाला खरंचच एका अदभूत अश्या बेटाची सफर करून आणलीस.... बेटाचे, विषयाचे सौंदर्य आहेच.... पण तुझ्या भाषेतही सौंदर्य आहे....
1
0

Select Language
Share Link