Next
मुलांसमोर नको भांडण...
BOI
Saturday, January 13 | 06:45 AM
15 0 0
Share this story


सुकन्या खूप हुशार आणि चुणचुणीत मुलगी. ती अभ्यासातही खूपच हुशार होती. तिचं पाठांतर खूप उत्तम होतं. ती नृत्य उत्तम करायची, पण हे सगळं असताना तिची एक समस्या अशी होती, की ती वर्गात सतत भांडण करायची. मारामाऱ्या करायची. मोठमोठ्याने रडायची. एका जागी अजिबात स्थिर बसायची नाही. सतत कोणालातरी त्रास देत राहायची.... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या आई-वडिलांच्या वर्तनचुकांमुळे मुलांवर होणाऱ्या परिणामांबद्दल...
.............................................
एका नामांकित शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षिका एकदा भेटायला आल्या. त्यांच्याबरोबर आधीपासूनच ओळख असल्यामुळे सुरुवातीला बऱ्याच विषयांवर गप्पा झाल्या. मुलांच्या वाढत चाललेल्या समस्या, रोज येणाऱ्या नवनव्या अडचणी, शाळेतील शिक्षक, मुलांमधील बदलत चाललेली नातं ही संकल्पना. अशा अनेक विषयांवर गप्पा झाल्या आणि या गप्पांच्या ओघातच त्यांनी त्यांच्या वर्गातल्या मुलीची समस्या सांगायला सुरुवात केली. खरं तर या मुलीबद्दलंच बोलायला त्या आज आवर्जून आल्याचं त्यांनी सांगितलं. 

त्यांच्या वर्गातली सुकन्या खूप हुशार आणि चुणचुणीत मुलगी. ती अभ्यासातही खूपच हुशार होती. तिचं पाठांतर खूप उत्तम होतं. ती नृत्य उत्तम करायची, पण हे सगळं असताना तिची एक समस्या अशी होती, की ती वर्गात सतत भांडण करायची. मारामाऱ्या करायची. मोठमोठ्याने रडायची. एका जागी अजिबात स्थिर बसायची नाही. सतत कोणालातरी त्रास देत राहायची. रोज दोन-तीन पालकांची तरी तिच्याविरोधात तक्रार येत असत. त्यांच्या मुलांना सुकन्यानं मारलं, बोचकारलं, त्यांची पुस्तक वही फाडली अशा काही ना काही तक्रारी  सतत असायच्याच. सुरुवातीला बाईंनी तिला जवळ घेऊन प्रेमाने समजावलं, कधी रागावल्या, कधी शिक्षा केली, पण कशाचाच उपयोग झाला नाही. म्हणून त्यांनी तिच्या पालकांना भेटण्यासाठी येण्याचे निरोप पाठवले.  वरवर निरोप पाठवला पण ते आले नाहीत. तिच्या समस्येचं गांभीर्य लक्षात आल्याने आवश्यक ती चर्चा करून त्या शिक्षिका स्वतःच्या तिच्या पालकांना भेटायला तिच्या घरी गेल्या. तिच्या आईला भेटून या भेटीमागच्या कारणांचे गांभीर्य समजावून सांगितले. 

मुलीच्या अशा वर्तन समस्या ऐकून आईला धक्काच बसला. बाईंनी त्यांना सांगितलेल्या गोष्टीमुळे त्या चांगल्याच चिंतेत पडल्या. बाईंनी माझा संदर्भ दिल्याने त्या ताबडतोप वेळ घेवून भेटायला आल्या. मुलीच्या समस्येबद्दल त्या अगदी मोकळेपणाने बोलल्या. त्यांच्या कौटुंबिक वातावरणाबद्दलचीही कल्पना त्यांच्या बोलण्यातून आली. परंतु त्याबद्दल त्या फार बोलल्या नाहीत. कौटुंबिक वातावरणाबद्दल त्या तुटक तुटकंच बोलत होत्या. पुढच्या सत्रात ठरल्याप्रमाणे त्या सुकन्याला घेऊन आल्या. तिचा विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने तिच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. या सत्रात केवळ हाच उद्देश ठेवून संवाद साधला. 

यानंतरच्या सत्रामध्ये तिच्या समस्यांमागील कारणे शोधण्याच्या दृष्टीने संवाद साधला, तसेच तिच्या वयाला अनुसरून काही चित्र चाचण्या घेतल्या. या चाचण्यांच्या विश्लेषणातून आणि तिच्याबरोबर झालेल्या चर्चेतून तिच्या समस्येचे मूळ कारण लक्षात आले. सुरुवातीला आईबरोबर झालेल्या सत्रातून त्यांच्या कुटुंबात काही समस्या असाव्यात असे वाटले होते. त्याचप्रमाणे त्याचा परिणाम सुकन्यावर होत असावा असे लक्षात आले. त्यामुळे तिच्या आई-वडिलांना सत्रासाठी बोलावून घेतलं. वडिलांनी सुरुवातीला भेटायला येण्यास नकार दिला, पण नंतर ते बायकोच्या समजावण्यामुळे भेटायला आले. 

सुकन्याच्या समस्येचं खरं मुळ आई-वडिलांच्या नातेसंबंधांमध्येच होते. सुकन्याच्या वडिलांचा स्वभाव खुप तापट होता. त्यामुळे तिच्या आई-वडिलांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वाद व्हायचे. त्यामुळे घरात सतत गंभीर वातावरण असायचं. अनेकदा आई-वडिल एकमेकांशी बोलायचे नाहीत. त्यांचे वाद झाले, की अनेकदा त्यांच्याही नकळत तो राग छोट्याश्या सुकन्यावर निघायचा किंवा मग रागाच्या भरात काही वेळा तिच्याकडे दुर्लक्षदेखील व्हायचं. या साऱ्याचा तिच्या कोवळ्या मनावर वाईट परिणाम होत होता. मग मनातली भीती, राग, असुरक्षितता ही तिच्या या वर्तन समस्यांमधून बाहेर पडायची. हे सारे लक्षात आले आणि सुकन्याच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी आवश्यक बदल करण्याची तयारी दाखवली. त्यांचे नातेसंबंध सुधारण्यासाठी ते दोघेही नियमितपणे समुपदेशनासाठी येऊ लागले. यामुळे हळूहळू त्यांच्यातील तणाव कमी होत गेले आणि पालक-बालक नातेसंबंध आपोआपच सुधारले. ज्याचा परिणाम म्हणून सुकन्याच्या समस्याही आपोआपचं सुटत गेल्या. तिच्या स्वभावात बदल होत गेला.  

(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
मोबाइल : ८८८८३ ०४७५९ 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या  https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link