Next
नयनची डोळ्यांत अंजन घालणारी गोष्ट!
BOI
Thursday, August 16, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:जन्माला आलं की मूल आपोआप वाढतं, त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायची गरज नसते, असे अनेक गैरसमज ग्रामीण भागात असतात. या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागातील शिक्षण सुटलेल्या मुलींना शिकवून आत्मनिर्भर करणं आणि बालसंगोपनाच्या दृष्टीने गावातील मातांच्या, पालकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणं, असा अतिशय सुंदर प्रकल्प पुण्यातल्या नयन कुलकर्णी यांनी स्वतःच्या निवृत्तीनंतरच्या वयात राबवला आहे. उद्याचे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी हातभार लावणाऱ्या या नयन कुलकर्णींची गोष्ट जाणून घेऊ या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
............


नयन ही माझी मैत्रीण! तिची ही गोष्ट! ठरवलं तर तिची ही गोष्ट आपल्या सगळ्यांची होऊ शकते; पण तरीही नयन मात्र सगळ्यांपेक्षा वेगळी; यासाठी की तिनं ठरवलं, तिनं ते कृतीत उतरवलं आणि त्याच वाटेवरून ती चालते आहे. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह नयन कुलकर्णीनयन कुलकर्णी... आई-वडिलांच्या फिरतीच्या नोकऱ्यांमुळे नागपूर, नाशिक, कोलकाता, राजकोट, नांदेड, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी फिरत राहिली. पुण्यातल्या एसपी कॉलेजमधून तिनं विज्ञान शाखेतली पदवी मिळवली. मग लग्न झालं. मुलं झाली. आयुष्यात अनेक चढ-उतार येत गेले... त्यांना तोंड देत असताना मुलं मोठी झाली आणि आपापल्या मार्गात स्थिरावली. नयननं ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये १९९० ते १९९५ या कालावधीत काम केलं. तसंच ती पुण्यातल्या हुजुरपागा शाळेत विश्वस्त म्हणूनही काम बघत होती. मुलं मार्गी लागल्यावर नयनला छान सुखी, स्थिर, आरामात जगणं सहज शक्य होतं; पण ते तिच्या स्वभावात नसावं. नयनच्या मेरी डिसूझा या शेजारणीनं नयनला कामशेतजवळ असलेल्या स्वतःच्या जागेबद्दल सांगितलं आणि तिथे तिला शिक्षकांसाठी एखादं प्रशिक्षण सेंटर उभारावं असं वाटत असल्याचं सांगितलं. एके दिवशी नयन आणि मेरी कामशेतच्या जागेला भेट देऊन आल्या. आपल्याला या जागेत काय करता येईल याची चाचपणी सुरू केली. सर्वेक्षण केल्यावर लक्षात आलं, की इथं शिक्षण सुटलेल्या खूप मुली आहेत. कधी लहान भावंडांना सांभाळायला घरी कोणी हवं म्हणून, तर कधी मुलींनी शिकून करायचंय काय अशा विचारांमुळे, तर कधी नापास झाल्यामुळे शिक्षण सुटलं अशा अनेक कारणांनी या मुली घरातच बसून होत्या. अशा मुलींसाठी काहीतरी करायला हवं हे नयनमधल्या शिक्षिकेला जाणवायला लागलं. नयननं ‘किशोर मित्र’ नावाची संस्था स्थापन केली आणि मेरीनंही ‘आदिती ट्रेनिंग सेंटर’ या नावाच्या एका ट्रस्टची नोंदणी केली. त्यानंतर अशा शाळा सुटलेल्या मुलींना शिकवायचं काम मेरीच्या सहकार्यानं तिच्या जागेत सुरू झालं. सुरुवातीला दोन मुली आल्या. नंतर नंतर मुलींची संख्या वाढत गेली. यातल्या प्रत्येक मुलीची कहाणी वेगळीच होती. एकीचं लग्न लवकर झालेलं आणि काहीच महिन्यांत तिच्या नवऱ्याचा खून झालेला... अशा वेळी अनेकजण सहानुभूतीनं ‘अरेरे’ करत बघू लागले, तर काहींनी ‘पांढऱ्या पायाची’ म्हणत तिला दूषणं द्यायला सुरुवात केली. या मुलींना शिकवून आत्मनिर्भर करता येईल, असं नयनला वाटायला लागलं. मुलींवर घरातली जबाबदारी असल्यानं साडेअकरा ते साडेतीन अशा वेळात मुली या ठिकाणी जमायला लागल्या. इथं पठडीतल्या शिक्षणपद्धतीप्रमाणे बाराखडीपासून शिक्षण सुरू झालं नव्हतं. रोजच्या अडणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करून वेगळ्या पद्धतीनं, त्यांना गोडी वाटेल अशा तऱ्हे‍नं नयन त्यांना शिकवायला लागली. मुलींनाही ही पद्धत आवडली. दहावीपर्यंतच्या परीक्षांना मुली बसू लागल्या, पासही होऊ लागल्या. मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण झाली आणि त्यांनी आम्हाला पुढंही शिकायचंय, असा आग्रह नयनजवळ धरला. मग याच मुलींसाठी म्हणून नयननं बारावीपर्यंतचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. नयनबरोबरच तळमळीनं काम करू बघणाऱ्या आणि शिक्षकी वृत्ती अंगी असणाऱ्यांची टीम तयार झाली. अभ्यासाशिवाय मुली अवांतर वाचन करू लागल्या, नाटकं करू लागल्या, गाणी गाऊ लागल्या... त्यांची लग्नं होऊ लागली आणि लग्नानंतर त्या उत्तम रीतीनं संसार करू लागल्या. हळूहळू बारावीपर्यंतच नव्हे, तर पदवीपर्यंत शिकायचं, असा हट्ट या मुलींनी नयनजवळ करताच नयननं त्याही गोष्टीला होकार दिला आणि मुली पदवीपर्यंत शिकू लागल्या. आता याच मुलींना काहीतरी काम करायला हवं असं तीव्रतेनं वाटू लागलं. अर्थार्जनासाठी या मुलींना फक्त शिवणटिपण, लोणची-पापड यात न अडकवता वेगळं काहीतरी करू या, असा विचार करून यातूनच ‘पोटली’ प्रकल्प उदयाला आला आणि २०१२पासून प्रत्यक्षात सुरू झाला. पोटली प्रकल्प म्हणजे आजीबाईचा बहुगुणी बटवा असतो तसंच काहीसं! भीमराव तुपे यांच्या सहकार्यानं हा प्रकल्प उभा राहिला. ० ते ३ वयोगटावर लक्ष केंद्रित करून बाळाच्या आईला जागरूक करण्यासाठी या शिकलेल्या मुलींना प्रशिक्षित करण्यात आलं. बाळाच्या मेंदूचा विकास पहिल्या चार ते पाच वर्षांत ९० टक्के होतो. त्यानंतर इतर वाढ वयाच्या १६व्या ते १७व्या वर्षापर्यंत होते. मेंदूची वाढ कुठल्या टप्प्यात कशी होते, त्याचा विकास चांगला होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, या गोष्टींसाठी आठ प्रमुख गोष्टींवर जास्त भर देण्यात आला. मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्याला काय काय कळतं यापासून मुलांच्या मूलभूत गरजा काय आहेत, अशा अनेक गोष्टी त्यात समाविष्ट करण्यात आल्या. यात प्रकटन कौशल्य, सकारात्मक प्रतिमा, शारीरिक विकास, आध्यात्मिक पाया, विचारकौशल्य, भावनिक स्वास्थ्य, सामाजिक क्षमता आणि स्वयंमूल्य अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला. या सगळ्या गोष्टी शिकून यातून सुरुवातीला १४ प्रशिक्षित मुली तयार झाल्या. या मुली घरोघर जाऊन त्या त्या घरातल्या बाळ होणाऱ्या मातेला, बाळ झालेल्या मातेला, घरातल्या इतर स्त्रियांशी संवाद साधत या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देऊ लागल्या. यात अनेक अडचणी होत्या. जन्माला आलं की मूल आपोआप वाढतं, त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायची गरज नसते, अशा रीतीचे अनेक गैरसमज पसरलेले असतात. या पार्श्वभूमीवर आपला संयम, चिकाटी न सोडता या मुलींना काम करायचं होतं. त्यांच्याच भाषेत, त्यांचीच उदाहरणं देत त्यांना तयार करायचं होतं. आणि मुख्य म्हणजे मुलींनी ते आव्हान स्वीकारलं. कामशेत, कान्हेफाटा, जांभूळ, पवनानगर अशी २० किलोमीटर अंतरामधली अनेक गावं या मुलींचं कार्यक्षेत्र बनली. मुली घरोघर जाऊ लागल्या. यात गृहभेटी, पालकसभा आणि शेजारसभा असे उपक्रम राबवले जाऊ लागले. यात अनेक गमतीजमती घडत. एकदा एक तीन वर्षांची मुलगी अतिशय गलिच्छ अशा शिव्या देताना आढळून आली. तिची आईच नाही, तर सगळेच रडकुंडीला आले. समजावून झालं, मारून झालं; पण तिच्यावर कुठलाच परिणाम होईना. तिच्या तोंडून शिव्या घालवण्यासाठी अखेर एक खेळ तयार करण्यात आला. आणि कुठलीही शिवी द्यायची झाली, की त्या शब्दाऐवजी किंवा त्या शिवीऐवजी कावकाव, चिवचिव असे शब्द वापरण्यात येऊ लागले. त्या मुलीलाही खूप मजा येऊ लागली आणि अशा रीतीनं तिची शिव्यांची सवय कायमची सुटली. या मुली आपल्यासाठी चांगलं काम करताहेत हे अशा अनेक उदाहरणांमधून गावातल्या स्त्रियांच्या लक्षात आलं आणि त्या या मुलींचं म्हणणं समजावून घेऊ लागल्या. आपण आपल्या मुलांकडे कसं लक्ष द्यायला हवं, त्यांचे प्रश्न कसे हाताळले पाहिजेत, हेही त्यांच्या लक्षात येऊ लागलं. 

एका घरात दोन मुली आणि एक मुलगा होता. मुली आहेत म्हणून त्यांचा वाढदिवस करायचा प्रश्नच नव्हता; पण वंशाचा दिवा असलेल्या मुलग्याचा वाढदिवस जवळ येताच त्याच्या वाढदिवसाची जंगी तयारी सुरू झाली. अशा वेळी याच प्रशिक्षित मुली त्या घरी गेल्या आणि त्यांच्या हस्तक्षेपानं, समजवण्यानं त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला आपली चूक लक्षात आली. 

एका घरात तर एक घटना अशी घडली होती, की प्रशिक्षणार्थी मुली नयनजवळ येऊन ढसढसा रडल्या. घडलं असं होतं, की एका घरात एक गप्प गप्प राहणारी लग्न झालेली एक तरुणी या प्रशिक्षणार्थी मुलींना दिसली. तिचं लग्न झालं आणि तिला दिवस गेले. काहीच महिन्यांत तिनं एका मुलीला जन्म दिला. आपल्या घरात मुलगा हवा असताना हिनं मुलगी जन्माला घातल्यामुळे घरात तिला जातायेता त्रास द्यायला सुरुवात झाली. अतिशय वाईट पद्धतीनं तिचा छळ करण्यात येऊ लागला. या सगळ्या गोष्टींचा त्या मुलीवर इतका परिणाम झाला, की तिनं आपल्या लहानग्या बाळाला अंगावर दूध पाजणं सोडूनच दिलं. रडून रडून एके दिवशी त्या उपाशी असलेल्या बाळानं प्राण सोडला. 

चुकीच्या समजुती मनात ठसल्यामुळे किती वाईट गोष्टी आपल्या आसपास घडताहेत, हेही या प्रशिक्षित मुलींना दिसत राहिलं. शिक्षणानं त्यांना योग्य-अयोग्य समजण्याची ताकद आली होती. नयन आणि तिच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या शिक्षणानं त्या विचार करायला शिकल्या होत्या. चांगला माणूस म्हणून घडणं आणि घडवायला मदत करणं या गोष्टी या मुलींना महत्त्वाच्या वाटू लागल्या. आता मुली ‘एमकॉम’वगैरेपर्यंत शिकून लग्न झाल्यावर, एखादं मूल झाल्यावर पुन्हा पोटली प्रकल्पाचं काम हातात घेऊन करू लागल्या. एकच मूल, बस! त्यामुळे आपण त्याच्याकडे नीट लक्ष देऊ शकतो आणि आपण आपलंही आयुष्य जगू शकतो, ही भावना या मुलींच्या मनात रुजली. 

संवाद कार्डे

नयननं या प्रकल्पात या प्रशिक्षित मुलींच्या हाती ४० कार्डस् दिली आहेत. ती पाठपोट असल्यानं एकूण ८० होतात. या कार्डांवर चंद्रशेखर बेगमपुरे यांनी सुरेखशी बोलकी चित्रं काढलेली आहेत. या कार्डावर असलेली माहिती नयन आणि नयनची मैत्रीण आशा साठे यांनी तयार केली आहे. आशा साठे या रवींद्रनाथ टागोर यांच्या गाढ्या अभ्यासक आहेतच, तसंच साहित्यिक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्या हाडाच्या शिक्षिका आहेत. मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, याचा विचार त्यांच्या मनात असल्यानं या कार्डाच्या निर्मितीमध्ये त्यांनी खूप खोलवर लक्ष घालून नयनला मदत केली आहे. ही कार्डस् घेऊन या मुली घरोघर जातात. तीन महिने हा उपक्रम राबवला जातो. यादरम्यान प्रत्येक घरात ‘कहाणी सुजाण पालकत्वाची’ ही नयन कुलकर्णीनं लिहिलेली पुस्तिका भेट दिली जाते. 

या कार्डांना संवाद-कार्डे असं म्हटलं जातं. बालकाचा विकास म्हणजे त्याची शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि सामाजिक वाढ. ती कशी होते, त्यासाठी काय गरजेचं आहे, याची ओळख या कार्डांच्या मदतीनं आणि प्रशिक्षित मुलींच्या साह्यानं पालकांना करून दिली जाते. केवळ घरातल्यांची इच्छा आणि मूल होणं म्हणजे स्त्रीच्या जगण्याचं सार्थक एवढ्या समजुतीपेक्षाही पालकत्व ही एक मोठी जबाबदारी असून, ती कशी निभावली पाहिजे, हे हा ‘पोटली प्रकल्प’ सांगतो. 

बदलाचे वारे वाहण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करावं लागतं. त्यासाठी अनेकांना परिश्रम घ्यावे लागतात. अनेकांचे हात या कामाला लागावे लागतात. या सगळ्यांमध्ये आदिती ट्रेनिंग सेंटर स्थापणारी आणि आपल्या जागेचा चांगल्या कामासाठी उपयोग करणारी मेरी डिसूझा, आपल्या निवृत्तीनंतरच्या वयात कात टाकून पुन्हा तारुण्याकडे वळत त्या वयाची ऊर्जा घेऊन काम करणारी नयन, यामुळे ‘पोटली’ प्रकल्पाला यश आलंय, येतंय. हे सगळं बघितलं की वाटतं, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!’

संपर्क : 
नयन कुलकर्णी : (०२०) २५८९ ९५१२

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ghanasham D. Belhekar About 312 Days ago
Commendable activities
0
0
Reshma Gaikwad About 312 Days ago
नयन मैड़म खुप छान काम करतात आणि मी तितली 13 वी ची स्टुडेंट आहे आणि पोटली सुधा करते आणि मला हे करायला खुप आवडते
0
0
Govind ramchandra khollam About 313 Days ago
Its a very awsome project for kids & parents also. Its todays requirment. Keep it up best wishes......
1
0

Select Language
Share Link
 
Search