Next
रोमचा अग्निप्रलय
BOI
Sunday, October 21, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:इसवी सनाच्या पहिल्या शतकात, १९ जुलै ६४ रोजी अज्ञात कारणामुळे इटलीतील रोममध्ये आग भडकते. संपूर्ण शहर बेचिराख करूनच ती शांत होते. एकीकडे राजधानी जळत आहे आणि त्या देशाचा सम्राट नीरो मजेत फिडल वाजवत बसला आहे, ही कथा आपण ऐकून आहोत; पण प्रत्यक्षात तिथं नेमकं काय घडलं होतं?... जाणून घेऊ या ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ सदरातील आजच्या लेखातून...
.......
अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या वास्तू आणि शहरांच्या कथा आपण चित्रपटांमधून बघतो. ‘टॉवरिंग इन्फर्नो’ हा १९७५मध्ये आलेला सिनेमा. निकृष्ट दर्जाच्या वीज बोर्डात ‘शॉर्ट सर्किट’ झाल्यामुळे ठिणग्या उडतात आणि बघता बघता एक प्रचंड बहुमजली इमारत जळून खाक होते. ही झाली एका इमारतीची गोष्ट. इसवी सनाच्या पहिल्या शतकात, १९ जुलै ६४ रोजी अज्ञात कारणामुळे इटलीतील रोममध्ये आग भडकते. संपूर्ण शहर बेचिराख करूनच ती शांत होते. एकीकडे राजधानी जळत आहे आणि त्या देशाचा सम्राट नीरो मजेत फिडल वाजवत बसला आहे, ही कथा आपण ऐकून आहोत. प्रत्यक्षात तिथं घडलं तरी काय?

ज्युलियस सीझरज्युलियस सीझरपासून राजधानीचं शहर असलेल्या प्राचीन रोमचा नीरो तिरस्कार करत असे. अरुंद रस्ते, वाढलेल्या झोपडपट्ट्या, नियोजनशून्य शहररचना हे सगळं त्याला मनस्ताप देत असे. त्याच्या डोक्यातल्या योजनेप्रमाणे त्याला राजधानी नव्यानं उभी करायची होती. ती संधी १९ जुलै सन ६४ च्या सकाळी एका अपघातानंच निर्माण झाली. अपघात कसला, भीषण संकटच ते! फक्त ते मुद्दाम ओढवून घेतलेलं नसून नैसर्गिक होतं. (झोपडपट्ट्यांना आग लावतात त्याप्रमाणे नव्हे.) ‘सर्कस मॅक्झिमस’ भागातल्या काही दुकानांना अचानक आग लागली. पॅलेटिन टेकडीच्या दक्षिणेला, रथांच्या प्रेक्षणीय शर्यती जिथे होत, तो रोमचा विभाग. लाकूड, ज्वालाग्राही पदार्थ आणि वाऱ्याची साथ या सगळ्या गोष्टींमुळे ती आग वेगानं पसरली. घनदाट वस्तीच्या शहराला अग्नीच्या जिव्हा गिळंकृत करू लागल्या. सहा दिवस हा स्वाहाकार चालू होता. पुढेही काही ठिकाणी आग धुमसतच होती. तिचं स्वरूप आणि विस्तार इतका भयानक होता, की त्यावर नियंत्रण आणणं केवळ अशक्य होतं. तशी कुठली यंत्रणाच अस्तित्वात नव्हती. संपूर्ण शहर भीती आणि गोंधळानं व्यापून गेलं. घाबरलेल्या, किंचाळणाऱ्या स्त्रिया, तरुण व वृद्ध असे सर्व वयोगटांतले लोक सैरावैरा पळत होते. आसऱ्याला शेजारच्या घरी जावं, तर आग तिथेही मागोमाग हजर! तरीही दुर्बल-अपंगांना होता होईल तेवढी मदत लोक करतच होते. दूरदूरपर्यंत, वाटेतल्या सगळ्या वस्तूंना भस्मसात करत आग पसरत गेली. टायबर नदीच्या काठी लोक आसरा घेत होते. दुसरीकडे कुठे सुरक्षित जागाच उरली नव्हती. खाद्यपदार्थांसह घरांतल्या सर्वच वस्तू आगीत नष्ट झाल्या होत्या. जमिनीखालच्या दफनभूमीत काहींनी गर्दी केली.

या संकटकाळाचा फायदा घेऊन लहान-मोठे बदमाश शहरात लुटालूट करत होते. आग विझवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात ते अडथळा आणत होते. श्रीमंत वस्त्यांवर त्यांचं विशेष लक्ष केंद्रित झालं होतं. अफवांचा महापूर पसरला होता.

नीरोसम्राट नीरो त्या वेळी रोमपासून ३५ मैलांवर, अँटियम इथल्या प्रासादात राहत होता. तो धावतच राजधानीत परतला. त्याचा नवा राजवाडाही ज्वाळांनी वेढलेला होता. त्यानं अग्निशामक यंत्रणा आणि आपत्ती-निवारण करणाऱ्या सेवकांना भराभर हुकूम सोडले. वाचलेल्या सार्वजनिक इमारती आणि राजाचं खासगी उद्यान बेघर झालेल्यांना उपलब्ध करून देण्यात आलं. जवळपासच्या गावांमधून अन्नपदार्थ मागवून ते अत्यंत कमी किमतीला पुरवण्यात आले. सहा दिवस अखंड अग्निप्रलय चालू होता. ते महासंकट नियंत्रणापलीकडचं होतं. चहू दिशांनी वाटेत येणाऱ्या सर्व इमारतींना अग्नी गिळून टाकत होता. पहिलं तांडव संपतं न संपतं, तोच ‘कॅपिटलाइन’ टेकडीच्या उत्तरेला नव्यानं आग लागली. रोमचा तो भाग विरळ वस्तीचा असल्यानं मनुष्यहानी फार झाली नाही. परंतु अनेक मंदिरं आणि सरकारी वास्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

शहराचा अपरिमित विध्वंस झाल्यानंतर, अखेर नऊ दिवसांनी तो अग्निप्रलय शांत झाला. हजारो अज्ञात नागरिकांनी आपले प्राण गमावले आणि लक्षावधी लोक बेघर झाले. शहराच्या १४ विभागांपैकी फक्त चार विभागांना आगीचा स्पर्शही झाला नव्हता. दहातले तीन भाग पार भुईसपाट झाले आणि सात ठिकाणी भग्नावशेष उरले होते. कायमच्या नष्ट झालेल्या मौल्यवान, प्राचीन वारसा सांगणाऱ्या गोष्टी म्हणजे, ग्रीक कलेचे उत्कृष्ट नमुने, न्यूमाचा राजवाडा (रोमचा दुसरा राजा), रोमच्या संरक्षक देवता स्थापित असलेले व्हेस्टाचे देऊळ आणि अन्य काही सुंदर वास्तू... अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या सर्व गोष्टी नामशेष झाल्या.

दगड-मातीचे प्रचंड ढिगारे उचलणं आणि लुटालुटीला प्रतिबंध करणं, यासाठी नीरोने सर्वांनाच शहरात प्रवेश बंद केला. आपापल्या घरीसुद्धा कोणी जाऊ शकत नव्हतं. ज्या जहाजांमधून धान्यसाठा आत येई, त्यातून सगळा राडारोडा दूर नेण्यात आला. शहर नव्यानं उभं करणं हे फार मोठं आव्हान होतं. ते प्रचंड खर्चिकही होतं. त्याचे आराखडे आखताना आगीपासून संरक्षण कसं मिळेल, याचा विचार झाला. रुंद रस्ते, भरपूर मोकळ्या जागा, सुंदर भौमितिक रचना, इमारतीच्या उंचीवर मर्यादा, जमिनीपासून काही उंचीपर्यंत दगडी बांधकाम, इत्यादी इत्यादी योजना तयार झाल्या. दोन घरांत सामायिक भिंत असण्यावर बंदी आली. सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत होती. आधीच्या राज्यकर्त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं होतं. सर्व शहरात लोकांसाठी खेळतं पाणी उपलब्ध करण्यात आलं. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास अधिकारी नेमण्यात आले. या नव्या रचनेला नावं ठेवणारे नागरिकही होते. जुन्या रोमचं ‘नामोनिशाण’ नाहीसं झालं होतं. परंतु राखेतून उभ्या राहिलेल्या त्या भव्यदिव्य नगराचं वर्णन करावं तितकं थोडंच होतं. प्राचीन वास्तू आणि मंदिरांच्या जागी नीरोनं पुन्हा, पहिल्यापेक्षा अधिक चांगली बांधकामं केली. ‘सर्कस मॅक्झिमस’ हे व्यापारी संकुल नव्यानं उभं राहिलं. ‘गोल्डन हाउस’ - नीरोचा राजवाडा - मोठा प्रेक्षणीय बनला. सुमारे २०० एकरांमध्ये एक छोटं रोमच प्रस्थापित झालं. महाल, मंदिरं, बागा, स्नानगृहं, तलाव, कारंजी आणि प्रवेशद्वारासमोर नीरोचा १२० फूट उंचीचा, ब्राँझपासून बनवलेला पुतळा उभारण्यात आला.शहर उभारणी आणि आपत्तीग्रस्तांना मदतकार्य यांची पराकाष्ठा करणाऱ्या नीरोबद्दल काही अफवाही पसरल्या. त्याच्या इच्छेनुसार आग लावण्यात आली आणि बघता बघता राजधानी जमीनदोस्त झाली; इकडे सम्राट आपलं फिडल वाजवत स्वस्थ बसला होता, इत्यादी बातम्या पसरत होता. त्यांना प्रत्यक्ष पुरावे मात्र कोणतेच देण्यात आले नाहीत; मात्र आपल्यासमोर आजही व्हायोलिन वाजवणाऱ्या त्या राजाचं चित्र उभं आहे.

त्या अग्निप्रलयानंतर, नीरोच्या राजवटीचा ऱ्हास सुरू झाला. शहर आणि राजवाड्याच्या उभारणीत उधळलेल्या अमाप संपत्तीमुळे तो जनतेमध्ये अप्रिय बनला. निकटच्या मंडळींचे त्यानं खून केले, असा संशय होता. परिणामी, जून (इ. स.) ६८मध्ये तिथल्या सिनेटनं नीरोला जनतेचा शत्रू ठरवलं. एखाद्या गुलामाला फटके मारून आणि दगडानं ठेचून ठार करतात, तशी शिक्षा राजाला द्यावी, असं ठरवण्यात आलं. ती टाळण्यासाठी नीरोनं स्वत:च आपला गळा कापून घेतला आणि मरण पत्करलं. एका सम्राटाची काय ही अवस्था झाली! त्याच्या उत्तराधिकाऱ्यानं राजवाड्याचा बराचसा भाग कार्यालये आणि सार्वजनिक वापरासाठी खुला केला. काही ठिकाणी नव्या इमारती उभारल्या. आज नीरोचा तो राजवाडा, त्याचे अवशेष, नव्या बांधकामांखाली गाडले गेले आहेत.

नीरोच्या त्या प्रचंड पुतळ्याचं काय झालं, हे कोणालाच नक्की सांगता येत नाही. काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो, की २४ हत्ती लावून तो पुतळा तिथून हलवण्यात आला. पुढे त्याचा कसलाच मागमूस राहिला नाही. रोमच्या त्या प्रचंड आगीप्रमाणे, पुतळ्याचंही रहस्य कोणाला सोडवता आलं नाही.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
suhas About 357 Days ago
Exactly opposite reason is shown in an English movie Quo Vadis.
0
0

Select Language
Share Link
 
Search